All SportsMount Everest seriesOther sports

Edmund Hillary : First on Everest

Edmund Hillary : First on Everest

पन्नासचं दशक युद्धज्वराने जर्जर झालेलं होतं. अमेरिका- रशियातील शीतयुद्धही याच काळातलं.

दुसरं महायुद्ध शमलं नाही तोच उत्तर आणि दक्षिण कोरियात युद्धाची ठिणगी पडली. जिंकलं कुणी नाही, पण धग कायम राहिली.

युद्धोत्तर विश्व भयंकर परिस्थितीचा सामना करीत होतं. याच दशकात रशियाने अणुबॉम्बपेक्षा महाभयंकर हायड्रोजन बॉम्बची यशस्वी चाचणी घेतली.

एकूणच हे पन्नासचं दशक युद्धाचे चटके घेऊनच आलं. आर्थिक विषमता आणि जगण्यासाठी धडपड हे या दशकाचं विदारक वैशिष्ट्य.

या दशकात एक वर्ग आशेवर जगणारा होता, तर दुसरा वर्ग अपेक्षा बाळगून होता. पण तिसरा एक वर्ग होता, जो चौकटीबाहेर जाण्याचं साहस करीत होता. मूठभर लोकांचा हा वर्ग. एडमंड हिलरी याच वर्गातला. Edmund Hillary : First on Everest

Edmund Hillary : First on Everest

Mahesh Pathade
Sports Journalist, Writer

एडमंड हिलरी आणि तेन्झिंग नोर्गे या दोघांनाही लढायचं होतं. हिलरीला स्वतःला सिद्ध करण्यासाठी लढायचं होतं, तर तेन्झिंग नोर्गेला जगण्यासाठी लढायचं होतं. हिलरी हरला तर पुन्हा उठणार होता. तेन्झिंगला जगण्याची लढाई हरून चालणार नव्हतं. दोघांचेही मार्ग अखेर एकाच ठिकाणी जुळणार होते, ते म्हणजे जगातील सर्वोच्च एव्हरेस्ट शिखरावर. Edmund Hillary : First on Everest

तेन्झिंग नोर्गेचं एकवेळ मान्य आहे. त्याचं धाडस परिस्थितीतून आलं, पण एडमंड हिलरीचं तसं काहीही नव्हतं. त्याचं धाडस विशुद्ध होतं. त्यात परिस्थिती, संघर्ष यातली कोणतीही भेसळ नव्हती. निव्वळ धाडस होतं. त्याने एव्हरेस्ट मोहिमेचा निर्णय घेतला तेव्हा तर त्या शिखराला कोणीही गवसणी घातलेली नव्हती. तरीही त्याने ते शिखर निवडलं. कारण ही एक भयंकर जीवघेणी चढाई होती. त्याच्या आधीही जगभरातील अनेक गिर्यारोहकांनी एव्हरेस्टला आव्हान दिलं… त्यातले काही परतलेच नाहीत आणि जे परतले त्यांना शिखर सर करता आलं नाही. त्या वेळी ६३ देशांतील तब्बल १२०० गिर्यारोहक अपयशी ठरले होते. म्हणूनच मला एडमंड हिलरी सामान्य कुटु्ंबातला असामान्य व्यक्ती वाटतो.

Edmund Hillary : First on Everest शिखरावर पहिलं पाऊल ठेवण्यासाठी तोच योग्य होता. कदाचित ही एव्हरेस्टनेच केलेली निवड होती. एडमंड हिलरी यांनी २९ मे १९५३ जेव्हा एव्हरेस्ट शिखरावर पाऊल ठेवलं तेव्हा जगभरात त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरू झाला. मात्र, ही कामगिरी करण्यापूर्वी एडमंडने अनेक पराक्रम केले होते. एव्हरेस्ट शिखर सर केल्यानंतर ते सगळे झाकोळले गेले हेही तितकेच खरे.

एडमंडचे वडील होते पत्रकार


Edmund Hillary : First on Everest | एडमंडच्या परिवाराचा प्रवासही मजल-दरमजल असाच होता. एडमंडचे वडील पर्सिव्हल ऑगस्टस (Percival Augustus) यांनी पहिल्या महायुद्धात 15 व्या रेजिमेंटच्या गल्लीपोली (Gallipoli) मोहिमेत सहभाग घेतला होता.

1916 मध्ये वैद्यकीय कारणास्तव ते सैन्यातून अनफिट ठरले. सैन्यातून परतल्यानंतर ते गरट्रुड (Gertrude) यांच्याशी विवाहबद्ध झाले. तसा त्यांचा मूळ पिंड पत्रकारितेचा. पहिल्या महायुद्धापूर्वी ते पत्रकार होते.

नंतर ते तुआकौ डिस्ट्रिक्ट न्यूज (Tuakau District News) या साप्ताहिकाचे संपादकही झाले. साप्ताहिकाचे काम पाहतानाच ते मधुमक्षिका पालनही करायचे.

एडमंडचं घराणं मूळ इंग्लंडमधील


पुढे हिलरी दाम्पत्याला 1917 मध्ये पहिली मुलगी झाली. जून तिचं नाव. दुसरा मुलगा एडमंड. त्याचा जन्म 20 जुलै 1919 रोजी न्यूझीलंडमधील ऑकलंड (Auckland) शहरातला. तिसरा सर्वांत लहान मुलगा रेक्सचा जन्म 1920 चा. एडमंड किवींच्या भूमीत जन्मला तरी त्याचं घराणं न्यूझीलंडशी संबंधित अजिबातच नव्हतं. त्यांचं घराण मूळचं इंग्लंडमधील. कारण त्याचे आजोबा इंग्लंडमधील यॉर्कशायरमधून न्यूझीलंडमध्ये वायरोआ (Wairoa) येथे स्थायिक झाले.

कुशाग्र बुद्धीचा एडमंड


एडमंडचं प्राथमिक शिक्षण तुआकौ (Tuakau) येथे झालं. एडमंड पहिल्या बाकावरचा विद्यार्थी. म्हणजे प्रचंड हुशार. ज्या वयात मुलं प्राथमिक शिक्षण पूर्ण करतात, तेथे एडमंडने दोन वर्ष आधीच ते पूर्ण केलं. म्हणजे वयाच्या 11 व्या वर्षी तो प्राथमिक परीक्षा उत्तीर्ण झाला. एरवी हे शिक्षण वयाच्या 13 व्या वर्षी पूर्ण होतं.

वडिलांशी कधी पटलं नाही…


Edmund Hillary : First on Everest

एडमंडचं त्याच्या वडिलांशी फारसं पटलं नाही. कारण ते प्रचंड शिस्तीचे होते. ते छोट्या छोट्या गोष्टींवर संतापायचे. त्यामुळे एडमंडच्या मनात त्यांच्या भीतीने ग्रासलेला असायचा.

किशोरावस्थेत तर त्यांना अनेकदा टोकायचे. त्यामुळे घरी आणि शाळेत त्याला बऱ्याच शारीरिक शिक्षांना सामोरं जावं लागलं. एडमंड हुशार होता, तरीही त्याला शाळेतल्या शिक्षकांकडून सतत अपमान स्वीकारावा लागला.

एडमंड हा अपमान कधीही विसरू शकला नाही. त्यामुळेच त्याच्या आईने त्याला ऑकलंड ग्रामर शाळेत दाखल केलं. भलेही ही शाळा लांब असो, पण तेथे एडमंड किमान चांगल्या वातावरणात तर राहील. शेवटी ती आईच होती. तिला मुलाचं मन कळत होतं.

एडमंडने आपल्या आत्मचरित्रात म्हंटलं आहे, की ज्याची मला गरज होती, ते प्रेम मला आईने दिलं. एडमंडने जे भोगलं ते मुलाच्या वाट्याला येऊ नये म्हणून त्याने आपल्या मुलांशी नेहमीच उत्तम संबंध राखले.

एका शारीरिक शिक्षणशास्त्राच्या शिक्षकाने तर एडमंडच्या सडपातळ देहाकडे खोचकपणे पाहिलं. आणि डोळे फिरवत पुटपुटला, हा काय पुढे जाईल?

एडमंड हिलरी यांच्या डोळ्यांसमोरून ही घटना बरीच वर्षे जाता जात नव्हती. त्यांनी एडमंडवर त्याच्या सडपातळ देहाविषयी घृणा निर्माण केली.

मी पुढे काही करू शकणार नाही, यापेक्षाही माझं शरीर किती भयंकर आहे, हेच माझ्या मनात अधिक पक्क बसलं होतं, असं एडमंड यांनी एका मुलाखतीत म्हणाले होते.

शिक्षणासाठी रोज पावणेदोन तासांचा प्रवास


एडमंडची ऑकलंड ग्रामर स्कूलमध्ये दाखल झाला. ही शाळा तुआकौपासून बरीच लांब होती. म्हणजे सायकलिंग करून सकाळी सातच्या आत त्याला तुआकौ स्टेशनवर पोहोचावं लागायचं. तेथून तो ट्रेनने ऑकलंडला पोहोचायचा. शाळा सुटल्यानंतर तो घरी पोहोचायचा तेव्हा सायंकाळचे सहा वाजायचे.

शाळेपर्यंत पोहोचण्यासाठीच त्याला 1 तास 40 मिनिटांचा प्रवास करावा लागायचा. परतीचा प्रवासही तेवढाच. साडेतीन वर्षे त्याने ही रोज 12 तासांची कसरत केली. नंतर हिलरी कुटुंब ऑकलंडमधील रीमुएरा (Remuera) भागात स्थायिक झालं, तेव्हा कुठे त्याची ओढाताण थांबली.

घरी वडिलांचा मार आणि शाळेत शिक्षकांचा, यामुळे एडमंडमध्ये न्यूनगंड निर्माण झाला. तो शाळेत कोणत्याही खेळात भाग घेऊ शकला नाही. मात्र, ऑकलंड शाळेत ट्रेनने जाऊ लागल्याने त्याला चपळता आणि शारीरिक क्षमता लक्षात आली. कारण त्या दैनंदिन अप-डाउनमुळे त्याची धावपळ हाच त्याचा एक खेळ झाला होता.

शाळा सोडली…


एडमंड हुशार होताच, पण त्याला सलग शिक्षण काही घेता आलं नाही. विश्वास बसणार नाही, पण त्याला शाळा सोडावी लागली. कारण बऱ्याचदा त्याला वडिलांच्या मधुमक्षिका पालनात मदत करावी लागत होती.

वडिलांना मदत करावी लागत असल्याने त्याला शाळा सोडावी लागली. एडमंडचं शैक्षणिक आणि भावनिक अशा दोन्हींत तो उद्ध्वस्त झाला होता. मात्र नंतर त्याने आपलं शिक्षण पूर्ण केलं.

छोट्या एडमंडचं मोठं ध्येय 


Edmund Hillary : First on Everest | एडमंड लहानपणापासूनच लाजाळू होता. पटकन कोणात मिसळत नव्हता. तो स्वतःच्याच विचारांत गढलेला असायचा. मौनं सर्वार्थ साधनम् असं म्हणतात. एडमंडच्या मौनातच बरीच मोठी स्वप्ने दडलेली होती.

Edmund Hillary : First on Everest

Edmund Hillary : First on Everest| किशोरावस्थेतच त्याने गिर्यारोहणाचा ध्यास घेतला. तो अवघ्या 16 वर्षांचा होता, तेव्हा त्याने गिर्यारोहणाचा अभ्यास सुरू केला. एकदा त्याच्या शाळेची सहल माउंट रुआपेहूवर (Mount Ruapehu) गेली होती.

हा न्यूझीलंडमधील असा पर्वत आहे, जेथे देशातला सर्वांत मोठा सक्रिय ज्वालामुखी पाहायला मिळतो. तो ज्वालामुखी पाहून एडमंडच्या मनातली गिर्यारोहणाची आस प्रज्वलित झाली. पुढे पुढे तर एडमंडला पर्वतांच्या उंचीचं वेडच लागलं.

एडमंडने स्वतःचं एक विश्व शोधलं होतं, जे त्याला गिर्यारोहणाच्या रूपाने मिळालं. त्याला जाणवलं, की आपल्याकडेही शारीरिक क्षमता आहे, जी पर्वतांची शिखरं सर करण्यास उपयुक्त आहे.

वडिलांना कामात मदत केल्यानंतर रविवार त्याने स्वतःसाठी राखून ठेवलेला होता. त्याने एका ट्रम्पिंग क्लबमध्ये प्रवेश घेतला आणि पर्वतराजींमध्ये तो आपला वेळ घालवू लागला.

पहिलं शिखर माउंट ऑलिवर


Edmund Hillary : First on Everest

Edmund Hillary : First on Everest | इथूनच एडमंडच्या गिर्यारोहण उंची गाठत गेलं. तो स्कीइंग आणि हायकिंग करण्यासाठी पर्वतांवर जाऊ लागला.

वयाच्या 19 व्या वर्षी त्याने पहिली चढाई माउंट ऑलिवरवर (Mount Oliver) केली. हा पर्वत 7500 मीटर उंचीचा. न्यूझीलंडमधील दक्षिणेतल्या आल्प्स (Southern Alps) पर्वतालाही त्याने गवसणी घातली. तो वर्षातून दोनदा गिर्यारोहण करायचा.

फेब्रुवारीत रॉक क्लायंबिंग आणि सप्टेंबरमध्ये बर्फाची कामं. हळूहळू त्याने कौशल्य मिळवलं आणि वेगाने प्रगती केली. हळहळू त्याने आपली वेगळी ओळख निर्माण केली. शिखरामागून शिखरं सर करीत गेला. त्याला त्याचं अस्तित्व जाणवू लागलं.

एडमंड मार्लबोरो येथे प्रशिक्षण घेत असताना पर्वतांवर तासन् तास वेळ घालवू लागला. त्या वेळी त्याने एकट्याने 2885 मीटर उंचीचं माउंट तापुआनुकूवर चढाई केली. तेथून खाली ब्लेनहीम (Blenheim) शहरात सायंकाळी आला आणि बसची वाट पाहत उभा राहिला.

शिखरावरून परतल्याने त्याचं शरीर मातीने माखलेलं होतं, दाढी केलेली नसल्याने तो फारच अजागळ दिसायचा. तिथे जवळच असलेल्या व्यक्तीने सांगितले, बस प्रशिक्षण केंद्राकडे निघून गेली आहे.

तेव्हा एडमंड म्हणाला, मला त्याची पर्वा नाही. मी एका सुंदर पर्वताला सर करून आलो आहे, हेच माझ्यासाठी महत्त्वाचं आहे.

एडमंडला पर्वतांनी धीट आणि परिस्थितीशी सामना करायला शिकवलं होतं.

सैन्यात भरती आणि माघारीही… 


Edmund Hillary : First on Everest | हा काळ म्हणजे दुसऱ्या महायुद्धाची नांदी होती. महायुद्धाच्या काळातच त्याने न्यूझीलंडच्या हवाई दलात अर्ज केला होता. मात्र वैयक्तिक कारणास्तव त्याने हा अर्ज मागेही घेतला.

नंतर त्याने 1943 मध्ये पुन्हा रॉयल न्यूझीलंड हवाई दलात नेव्हिगेटर म्हणून काम केले. दुसऱ्या महायुद्धात त्याची नियुक्ती दक्षिण प्रशांत महासागरातील एका युद्धनौकेवर करण्यात आली होती. ते दिवस त्याने खूपच आनंदाने घालवले.

त्याने युद्धातले भयंकर प्रसंग तर नाही अनुभवले, पण एका दुर्घटनेमुळे त्याने आपली योग्यता सिद्ध केली. एका मोटर बोटवरील पेट्रोल टँक फुटल्याने मोठा स्फोट झाला.

एडमंड नौकेवर चढला. मात्र त्या बोटीतून ज्वाळा बाहेर निघाल्याने तो मागे इंजिनच्या कव्हरवर फेकला गेला. त्यात तो बऱ्यापैकी भाजला होता. त्या वेळी मदतीसाठी त्याला 500 मीटर पोहावं लागलं आणि एक किलोमीटर चालावं लागलं.

त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी त्याला पाहिलं, तेव्हा एडमंडची वाचण्याची शक्यता कमी असल्याचे सांगितले.

वायुसेनेने तातडीने एडमंडच्या घरी फोन केला नि सांगितले, एडमंड गंभीर जखमी झाला आहे. तो काही महिन्यांत यातून बाहेर पडेल, अशी दुवा करा. मात्र तीन आठवड्यांत एडमंडची तब्येत चांगली झाली आणि आजारपणाच्या सुट्या घेऊन तो घरी परतला.

हा सगळा प्रवास त्याच्या वडिलांसारखाच होता. वडिलांनी पहिलं महायुद्ध अनुभवलं, तर मुलाने दुसरं महायुद्ध. एडमंडचं दैव बलवत्तर होतं म्हणून तो दुर्घटनेतून सावरला आणि पुन्हा आपल्या आवडीच्या गिर्यारोहणाकडे परतला.

पण काहीही असो, ही युद्धाची वर्षे त्याच्यासाठी भयंकर होती. कारण या काळात त्याला गिर्यारोहणाची आवड जोपासता आली नाही.

माउंट एव्हरेस्टचं आकर्षण


Edmund Hillary : First on Everest | प्रत्येक गिर्यारोहकाचं स्वप्न असतं, ते म्हणजे जगातील सर्वोच्च माउंट एव्हरेस्टला गवसणी घालणे.

एडमंडलाही हे शिखर खुणावू लागलं. माउंट एव्हरेस्ट जिंकणं हेच त्याच्या आयुष्याचं लक्ष्य बनलं. त्यासाठी त्याने दोन वर्षे स्कॉटिश हायलँड्सवर कठोर प्रशिक्षण घेतलं. एडमंडला जाणीव होती, की माउंट एव्हरेस्टची चढाई सोपी नाही.

त्यामुळे त्याने आपले कच्चे दुवे हेरले आणि त्यावर मेहनतही घेतली. न्यूझीलंडमधील माउंट कूक (Mount Cook ) हे सर्वांत उंच शिखर. माइक सुलिवनसोबत त्याने या शिखरालाही गवसणी घातली. अर्थात, अशा अनेक शिखरांना गवसणी घातली तरी एडमंडची ओळख तेवढ्यापुरती मर्यादित अजिबातच नव्हती.

तीन मोहिमा अपयशी


Edmund Hillary : First on Everest | एडमंड हिलरी यांनी माउंट एव्हरेस्टवर तीन चढाया केल्या होत्या. तिन्ही अपयशी ठरल्या. मात्र, या अपयशाने ते अजिबात खचले नाही.

1951 मध्ये प्रथमच एव्हरेस्ट मोहिमेत ते सहभागी झाले होते. या मोहिमेचे नेतृत्व एरिक शिफ्टन यांच्याकडे होते. मात्र, ही मोहीम फसली. नंतर 1952 मध्ये ब्रिटिश एव्हरेस्ट मोहिमेत पुन्हा सहभागी झाले. प्रत्येक मोहिमेत त्यांना नव्या आव्हानांना सामोरं जावं लागलं.

या वेळी ते रस्ता चुकल्याने शिखर हुकलं. त्यांची ही दुसरी मोहीमही अयशस्वी ठरली. त्या वेळी एव्हरेस्टच्या चढाईसाठी तिबेट आणि नेपाळ हे दोन मार्ग वर्षातून एकदाच खुले केले जायचे.

त्यामुळे 1952 मध्ये पुन्हा ते एव्हरेस्ट मोहिमेसाठी सज्ज झाले. या वेळी ते एका स्विस पथकासोबत मोहिमेवर निघाले. Edmund Hillary : First on Everest | याच दलात तेन्झिंग नोर्गेही होते. आठ हजार मीटरपेक्षा उंचावर ते पोहोचले, पण वादळाने घात केला.

शिखर 200 मीटरवर होते, पण खराब हवामानामुळे त्यांना पुन्हा शिखराने हुलकावणी दिली. तिसऱ्या मोहिमेतही त्यांना अपयश आलं. सततच्या अपयशानंतरही ते हिमालयाकडे पाहत म्हणाले, ‘मी परत येईन. त्या वेळीही तू असाच उंच राहशील, पण माझा आत्मविश्वास आधीपेक्षा जास्त उंचावलेला असेल.’

अखेर चौथ्या एव्हरेस्ट मोहिमेवर एडमंड 1953 मध्ये पुन्हा सहभागी झाले. ज्या टीममध्ये एडमंड होते, त्याच टीममध्ये त्यांची सोबत करणार होते तेन्झिंग नोर्गे. तेन्झिंग गिर्यारोहणात कुशल होते. या मोहिमेचे नेतृत्व होते कर्नल जॉन हंट (Colonel John Hunt). याच मोहिमेत तेन्झिंग आणि एडमंडमध्ये मैत्रीचे धागेही घट्ट विणले गेले.

Edmund Hillary : First on Everest | या मोहिमेत मार्च 1953 मध्ये 25,900 फुटांवर बेस कॅम्प तयार करण्यात आला होता. मे 1953 मध्येच जॉन हंट यांनी बाउड्रीलन आणि इवान्स ही पहिली टीम शिखराकडे पाठवली होती. मात्र, इवान्सची ऑक्सिजन प्रणाली रस्त्यातच खराब झाल्याने दोघांनाही माघारी परतावं लागलं. जर ही ऑक्सिजन प्रणाली संपली नसती तर आज चित्र वेगळं असतं.

त्यामुळे जॉन हंट यांनी दूसरी टीम अर्थातच हिलरी आणि तेन्झिंग यांना शिखराकडे पाठवलं. वेगाने वाहणारे थंड वारे यामुळे दोघांना दक्षिण बाजूला पोहोचण्यासाठीच दोन दिवस लागले.

एडमंड आणि तेन्झिंग यांना 28 मे रोजी रात्री आठ हजार मीटर उंचावर मुक्काम करावा लागला. ती रात्र भयंकरच होती. हाडे गोठविणाऱ्या या थंडीत एडमंड आणि तेन्झिंग तंबूत झोपले होते.

Edmund Hillary : First on Everest | अंगावर ओव्हरकोट होते, तरीही थंडीने ते कापत होते. या वेळी हिलरीने झोपताना एक चूक केली. ती म्हणजे, रात्री हिलरीचे बूट तंबूबाहेरच राहिले होते. त्यामुळे हे बूट अक्षरशः फ्रिझरमधून काढल्यासारखे बर्फाने थिजले. त्यामुळे हिलरीचे पायही बर्फाने थंड पडले होते. नंतर त्यांनी पायांना गरम केले आणि नंतर पुढे शिखराकडे निघाले.

दोघांच्याही पाठीवर 14 किलोचं सामान होतं आणि चढाई भरपूर होती. आव्हानांना सामोरे जात दोघेही अखेर एव्हरेस्टच्या शिखरावर जाऊन पोहोचले. तो दिवस होता 29 मे 1953 सकाळी अकरा वाजेचा. शिखरावर प्रथमच मानवी पावलाचे ठसे उमटले होते. दोघे जवळपास 15 मिनिटे शिखरावर होते.

एडमंड आणि तेन्झिंग यांना 28 मे रोजी रात्री आठ हजार मीटर उंचावर मुक्काम करावा लागला. ती रात्र भयंकरच होती. हाडे गोठविणाऱ्या या थंडीत एडमंड आणि तेन्झिंग तंबूत झोपले होते.

अंगावर ओव्हरकोट होते, तरीही थंडीने ते कापत होते. या वेळी हिलरीने झोपताना एक चूक केली. ती म्हणजे, रात्री हिलरीचे बूट तंबूबाहेरच राहिले होते. त्यामुळे हे बूट अक्षरशः फ्रिझरमधून काढल्यासारखे बर्फाने थिजले. त्यामुळे हिलरीचे पायही बर्फाने थंड पडले होते. नंतर त्यांनी पायांना गरम केले आणि नंतर पुढे शिखराकडे निघाले.

दोघांच्याही पाठीवर 14 किलोचं सामान होतं आणि चढाई भरपूर होती. आव्हानांना सामोरे जात दोघेही अखेर एव्हरेस्टच्या शिखरावर जाऊन पोहोचले. तो दिवस होता 29 मे 1953 सकाळी अकरा वाजेचा. शिखरावर प्रथमच मानवी पावलाचे ठसे उमटले होते. दोघे जवळपास 15 मिनिटे शिखरावर होते.

पहिल्या एव्हरेस्टवीरावरून वाद
एडमंड हिलरी आणि तेन्झिंग नोर्गे यांनी एव्हरेस्ट शिखर सर केल्यानंतर जगभर कौतुकाचा वर्षाव झाला, पण एका वादाने नवे वळण घेतले.

काही गिर्यारोहकांनी एडमंड आणि तेन्झिंग यांना पहिले एव्हरेस्टवीर मानण्यास नकार दिला. पहिला एव्हरेस्टवीर जॉर्ज मेलोरी होता. त्याने शिखर सर केले, पण परतताना त्याला जीव गमवावा लागला, असा काही जणांनी दावा केला.

मात्र, त्याला कोणताही अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. ते अखेरपर्यंत गूढच राहिलं. असं असलं तरी एडमंड हिलरी आणि तेन्झिंग नोर्गेची कामगिरी झाकोळली गेली नाही.


हेही वाचा…. पहिला एव्हरेस्टवीर कोण?


लुइस मेरी रोजशी विवाह


एडमंड न्यूझीलंडच्या उत्तर द्वीपसमूहातल्या ऑकलंड शहरातील एका तरुणीच्या प्रेमात पडला. पाहताच ती बाला कलेजा खलास झाला…. असंच काहीसं होतं. ही तरुणी होती लुइस मेरी रोज (Louise Mary Rose).

ती सिडनी विद्यापीठात संगीत शिक्षण घेत होती. तरुण संगीतकार असलेली मेरी कन्झर्वेटोरियम ऑफ म्युझिकची विद्यार्थिनी. ती उत्तम व्हायोलिनवादक होती. ऑकलंड परिवारातील लुइस मेरी रोजला एडमंड बऱ्याच वर्षांपासून ओळखत होता. त्याला ती मनापासून आवडायची.

अर्थात, एडमंड तिच्यापेक्षा 11 वर्षांनी मोठा होता. मात्र तो आता वलयांकित व्यक्तींमध्ये जाऊन पोहोचला होता. जगातला पहिला एव्हरेस्टवीर झाला होता. तिला लग्नाची मागणी घालण्याचा विचार त्याच्या मनात आला, पण तो घाबरायचा. तिला मागणी तरी कशी घालावी?

त्यामुळे त्याने आईला सांगितलं, तू जाऊन तिला सांग. आणि आईने त्याचा प्रस्ताव लुइस मेरी रोजपुढे ठेवला. त्या वेळी लुइस मेरी रोजचा 23 वा वाढदिवस होता. लुइस मेरी रोजने त्याला नाही म्हंटले नाही. तिने होकार दिला आणि 3 सप्टेंबर 1953 रोजी ते दोघे विवाहबद्ध झाले. एडमंडसाठी तो एक विलक्षण असा दिवस होता.

पत्नीचा मृत्यू


एडमंडला तीन मुले होती. पहिला मुलगा पीटर (जन्म 1954), दुसरी मुलगी सारा (जन्म 1956) आणि बेलिंडा (जन्म 1959). एडमंड आता नेपाळमध्ये पायाभूत सुविधांसाठी प्रयत्न करीत होता. विशेषतः शेर्पा कुटुंबांसाठी उत्तम आरोग्य सुविधा मिळण्यासाठी नेपाळमधील फाफलू या गावात हॉस्पिटल उभारण्यासाठी व्यस्त होता.

त्याला भेटण्यासाठी लुईस मुलगी बेलिंडासह नेपाळमध्ये 31 मार्च 1975 रोजी निघाली. मात्र काठमांडूवर पोहोचत नाही तोच त्यांच्या विमानाला अपघात झाला. यात पत्नी व मुलगी बेलिंडा दोघीही मृत्युमुखी पडल्या. 45 वर्षीय पत्नी लुइस आणि अवघ्या 16 वर्षांची बेलिंडाच्या मृत्यूने एडमंडला मोठा धक्का बसला.

सर किताबाने सन्मान


एव्हरेस्ट मोहीम सर केल्यानंतर इंग्लंडने त्यांना ‘सर’ या किताबाने सन्मानित करण्याची घोषणा केली. एडमंड हिलरी चकित झाले.

नॅशनल जिओग्राफिक या प्रसिद्ध मासिकाला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले होते, ‘मी कदाचित या सन्मानास योग्य नव्हतो. जेव्हा ही बातमी माझ्या कानावर पडली तेव्हा मी विचार करू लागलो, की यानंतर मी माझ्या शहरात स्वतंत्रपणे कसा फिरू शकेन? मला आता माझ्यासाठी नवे कपडे खरेदी करावे लागतील.’

चक्क ट्रॅक्टरने दक्षिण ध्रुवावर!

एव्हरेस्ट सर केल्यानंतर एडमंड हिलरी थांबले नाहीत. त्यांनी त्यानंतर हिमालयाची दहा शिखरंही सर केली. विश्वास बसणार नाही, पण एडमंड हिलरी मॅसी-फर्ग्युसन ट्रॅक्टरने massey ferguson tractor | दक्षिण ध्रुवावर जाणारे जगातील पहिले व्यक्ती होते. हे अजबच आहे. मी या ट्रॅक्टरची जाहिरात पाहिली होती, ‘‘ये करे ट्रॅक्टर का सारा काम और दे कार जैसा आराम…’’ कधी कधी काही जाहिराती अतिरंजित असतात, पण हिलरी जेव्हा ट्रॅक्टरने दक्षिण ध्रुवावर गेले, तेव्हा ही जाहिरात खरी मानावी का, असा प्रश्न पडला. असो, पण हिलरी यांनी विश्वास ठेवला आणि दक्षिण ध्रुवावर जाऊन आले. हे सगळं अविश्वसनीयच म्हणावं लागेल. आणखी विशेष म्हणजे ते उत्तर ध्रुवावरही जाऊन आले. अर्थात, त्या वेळी त्यांनी ट्रॅक्टर नेला नाही. चंद्रावर पहिले पाऊल ठेवणारे नील आर्मस्ट्राँग यांच्यासोबत त्यांनी उत्तर ध्रुवावर पाऊल ठेवलं आणि दोन्ही ध्रुवांवर पाऊल ठेवणारे ते जगातील पहिले व्यक्ती ठरले. हादेखील विक्रमच होता, पण ते यामुळे लक्षात राहिले नाही. लक्षात राहिले ते एव्हरेस्टमुळेच.

एडमंड हिलरींचा दुसरा विवाह


एडमंड हिलरी यांच्या पायाशी जगातील सगळे विक्रम लोळण घेत होते. नशीबही विजेत्यालाच साथ देत असतं. एकदा त्यांनी विमानाने अंटार्क्टिकाची मोहीम आखली होती. काय कोणास ठाऊक, पण त्यांना काही कारणास्तव या मोहिमेवर जाता आलं नाही.

त्यामुळे त्यांच्याजागी त्यांचा मित्र पीटर मुल्ग्रेव Peter Mulgrew | याला पाठवण्यात आलं. मुल्ग्रेव हादेखील उत्तम गिर्यारोहक होता. 20 सप्टेंबर 1953 रोजी तो जून मार्था अँडरसन June Martha Anderson | हिच्याशी विवाहबद्ध झाला होता. त्याला दोन मुलं होती- रॉबिन आणि सुसान.

दुर्दैवाने विमान अपघातात त्याचा मृत्यू झाला. पीटरच्या मृत्यूमुळे कुटुंबावर मोठा आघात झाला. मुल्ग्रेवऐवजी हिलरी असता तर…? नंतर हिलरी यांनी मुल्ग्रेव यांची विधवा पत्नी जूनशी विवाह केला.

गिर्यारोहकाच्या मृत्यूने अस्वस्थ

सध्या एव्हरेस्ट सर करण्याची इतकी जीवघेणी स्पर्धा लागली आहे, की एडमंड हिलरीही अस्वस्थ झाले. त्यांनी ही अस्वस्थता व्यक्त केल्यानंतर ते चर्चेत आले होते. ही घटना मे 2006 ची आहे. डेव्हिड शार्प नावाच्या एका गिर्यारोहकाचा एव्हरेस्टवर चढाई करताना मृत्यू झाला. असं म्हणतात, की तो मृत्युशय्येवर असताना त्याला कोणीच मदत केली नाही. त्याला वाचवण्यासाठी कोणीच पुढे आलं नाही. चढाई करणाऱ्यांनी आणि उतरणाऱ्यांनीही त्याच्याकडे पाहिलं, पण मदतीसाठी कोणीही धजावलं नाही. ही असंवेदनशीलता भयंकर अस्वस्थ करणारी होती. आजही हीच स्थिती आहे.

हिलरी यांनी यावर गिर्यारोहकांनाच ठणकावून प्रश्न विचारला, की ‘‘आता एव्हरेस्टवर चढाई करताना दृष्टी बदलायला हवी. आता ती वेळ आली आहे. तुम्ही एखाद्याला मृत्यूच्या दारात ठेवून कसे पुढे जाऊ शकता?’’

एडमंड हिलरी यांनी ‘नथिंग वेंचर, नथिंग विन’ (Nothing Vnture, nothing Win) नावाचं एक पुस्तक लिहिलं आहे. त्यात ते म्हणतात, ‘माझ्या आयुष्यात आलेले अनेक मोठे मोठे क्षण बऱ्याचदा सर्वात मोठा आनंद देऊ शकले नाहीत.’

ते पुढे म्हणतात, ‘निरोपाची वेळ येते तेव्हा कोणाच्या डोळ्यांत अश्रू किंवा सुखरूप घरी परतल्यानंतर दुसऱ्यांना आनंद किंवा एखाद्या विश्वासू माणसाच्या हातात हात देण्याइतका मोठा आनंद दुसरा कोणताही नाही.’

एव्हरेस्ट म्हणजे पिकनिक नाही…

एव्हरेस्टमुळे एडमंड हिलरी यांचं संपूर्ण आयुष्यच बदललं. याच मोहिमेमुळे त्यांचा शेर्पा समूहाशी जवळून संबंध आला. तेन्झिंग नोर्गे यांच्यामुळे शेर्पा यांचं खडतर आयुष्यही त्यांनी अनुभवलं. त्यामुळे त्यांनी या शेर्पांसाठी खूप काम केलं. ते जेव्हा भारत आणि नेपाळचे राजदूत बनले, तेव्हा त्यांनी शेर्पांच्या मुलांसाठी शाळा, रुग्णालये सुरू करण्यासाठी आर्थिक मदत केली. परोपकारी पुरुष म्हणूनही त्यांना लौकिक मिळाला. ते नेहमी सांगायचे, की ‘या हिमालयाने मला जेवढं दिलं, त्याच्या तुलनेत मी या पर्वतासाठी काहीच केलं नाही.’
आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांनी एव्हरेस्टची स्वच्छता मोहीम राबवली. अनेक गिर्यारोहक एव्हरेस्ट सर करतात, पण जाताना कचरा करून जातात, हे त्यांना अस्वस्थ करायचं. त्यांनी खंतही व्यक्त केली, की लोकं हिमालयाला पिकनिक मानू लागले आहेत!
एडमंड हिलरी अमेरिकन हिमालयन फाउंडेशन या संस्थेचे अध्यक्षही राहिले. हिमालयातील पर्यावरणाची जोपासना करण्यासाठी आणि या तेथील कुटुंबांचं राहणीमान उंचावण्यासाठी ही संस्था कार्यरत आहे. हिलरी यांनी भारतात न्यूझीलंडचे राजदूत म्हणूनही साडेचार वर्षे काम केलं. हा काळ त्यांनी दिल्लीत घालवला.

असेही अनाहूत मार्गदर्शन!

एकदा हिलरी आणि त्यांचे मित्र व हॉलिवूड चित्रपट निर्माता मायकेल डिल्लन हे दोघे नेपाळमधील एका गिर्यारोहणाच्या मोहिमेवर गेले होते. ते दोघेही थोडे सुस्तावले होते. अचानक एक अमेरिकी गिर्यारोहक तेथे आला. त्याला काय माहीत, की हे एडमंड हिलरी आहेत. त्याने त्यांना बर्फ कापणाऱ्या कुऱ्हाडीची माहिती दिली आणि ती हातात कशी पकडली पाहिजे याची योग्य पद्धत समजावून सांगितली. हिलरी अतिशय शांतपणे त्याचे मार्गदर्शन घेतले आणि माहिती दिल्याबद्दल धन्यवाद दिले. मात्र, त्या अमेरिकी गिर्यारोहकाने एडमंड हिलरी यांची माहिती न घेताच तेथून निघून गेला. त्याला कळलंच नाही, की आपण कोणाला हे शिकवत होतो…!

अखेरचे दिवस

एडमंड हिलरी यांनी अखेरपर्यंत नेपाळमध्ये पायाभूत सुविधांसाठी सातत्याने प्रयत्न केले. वय निघून चाललं होतं हलक्या हलक्या पावलांनी. मात्र, ते हिमालयापासून दूर राहूच शकले नाही. 22 एप्रिल 2007 रोजी काठमांडूकडे निघाले असताना, त्यांची तब्येत खालावली. हे परतीच्या प्रवासाचे संकेत होते. त्यांना तातडीने न्यूझीलंडमधील ऑकलंड शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. जवळपास नऊ महिने त्यांनी मृत्यूशी झुंज दिली. उपचार सुरू असतानाच 11 जानेवारी 2008 रोजी त्यांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अनेक आव्हानांना सामोरे जाणारे एडमंड हिलरी या वेळी ते मृत्यूला शरण गेले.

संपूर्ण जगावर शोककळा पसरली. पहिल्या एव्हरेस्टवीराने देह ठेवला होता. न्यूझीलंडचा राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर उतरवण्यात आला होता. त्यांचं पार्थिव होली ट्रिनिटी कॅथेड्रलमध्ये Holy Trinity Cathedral ठेवण्यात आलं.

22 जानेवारी 2008 मध्ये आपल्या लाडक्या एव्हरेस्टवीराच्या अंत्यदर्शनासाठी चाहत्यांची प्रचंड गर्दी उसळली होती. ओलावलेल्या पापण्यांनी एडमंड हिलरी यांना अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांच्या पार्थिवाची राख ऑकलंडच्या हौराकी आखातात मिसळण्यात आली. उर्वरित राख नेपाळच्या मठात ठेवण्यात आली, तर 2010 मध्ये एव्हरेस्टच्या शिखरावर काही राख नेण्यात येणार होती. मात्र, ती योजना नंतर रद्द करण्यात आली.

अपयशावर मात करण्याची उमेद बाळगणारे एडमंड हिलरी एव्हरेस्ट पर्वताला एकदा म्हणाले होते, तू आज जेवढा उंच आहे, तेवढाच उद्याही असेल, पण मी पुन्हा येईन तेव्हा माझी उमेद तुझ्यापेक्षा उंचच असेल… एव्हरेस्ट आजही तेवढाच आहे… एडमंड हिलरी यांनी मात्र जी उंची गाठली, तेवढी एव्हरेस्टपेक्षा खचितच चार बोटे उंच आहे…

Click here Mount Everest stories


edit post

Edmund Hillary : First on Everest
All Sports

Edmund Hillary : First on Everest

October 28, 2020

Edmund Hillary : First on Everest पन्नासचं दशक युद्धज्वराने जर्जर झालेलं होतं. अमेरिका- रशियातील शीतयुद्धही याच काळातलं. दुसरं महायुद्ध शमलं…


edit post

Edmund Hillary : First on Everest
Mount Everest series

हिमालयातला वाघ ः तेन्झिंग नोर्गे

August 11, 2020

हिमालयातला वाघ : तेन्झिंग नोर्गे जगातील पहिला एव्हरेस्टवीर तेन्झिंग नोर्गे यांचा जीवनप्रवास थक्क करणारा आहे. त्यांच्या न ऐकलेल्या कहाणीवर एक…


edit post

Mount Everest series 5 : मनाचा थरकाप उडविणारी स्लीपिंग ब्यूटी (उत्तरार्ध)
All Sports

Mount Everest series 5 : मनाचा थरकाप उडविणारी स्लीपिंग ब्यूटी (उत्तरार्ध)

October 27, 2020

मनाचा थरकाप उडविणारी स्लीपिंग ब्यूटी (उत्तरार्ध) Sleeping Beauty-2 | फ्रॅन्सिसला शेवटचं पाहणारी कॅथी ओडाउड हिने काय पाहिलं… याची उत्सुकता लागली…

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!