• Latest
  • Trending
Edmund Hillary : First on Everest

हिमालयातला वाघ ः तेन्झिंग नोर्गे

October 28, 2020
महिला क्रिकेट वर्ल्ड कप

महिला टी 20 क्रिकेट वर्ल्ड कप : कोण आहेत या जगज्जेत्या भारतीय कन्या?

February 2, 2023
ऑस्ट्रेलियन ओपन अरिना सबालेन्का

ऑस्ट्रेलियन ओपन : अरिना सबालेन्का विजेती

January 29, 2023

हॉकीपटू नीना असईकर राणे यांचे निधन

January 25, 2023
महिला कुस्तीगिरांचे शोषण

महिला कुस्तीगिरांचे शोषण होतेय?

January 23, 2023
महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे

दीड मिनिटात शिवराज राक्षे ‘महाराष्ट्र केसरी’

January 16, 2023
भारतीय क्रिकेट 2022

भारतीय क्रिकेट 2022 : संघर्षाचं वर्ष

January 23, 2023
कसे बनले महान फुटबॉलपटू पेले?

कसे बनले महान फुटबॉलपटू पेले?

January 16, 2023
टेबल टेनिस 2022

टेबल टेनिस 2022- शरथ आणि मनिकाची चमक

December 27, 2022
साहसी, प्रेरणादायी- ग्लेन कनिंघम (Glenn Cunningham)

साहसी, प्रेरणादायी- ग्लेन कनिंघम (Glenn Cunningham)

December 24, 2022
कतार विश्वचषक फुटबॉल स्पर्धा

कतार विश्वचषक फुटबॉल स्पर्धा- हे माहीत आहे काय?

December 16, 2022
लवलिना बोर्गोहेन भारतीय बॉक्सिंग

2022- भारतीय बॉक्सिंग आणि लवलिना बोर्गोहेन वाद

January 29, 2023
नोव्हाक जोकोविच कोरोना लसीकरण

वर्ष 2022- नोव्हाक जोकोविच आणि कोरोना लसीकरण

December 5, 2022
Thursday, February 2, 2023
kheliyad
  • Home
  • Cricket
  • All Sports
  • Inspirational story
  • Online Chess Puzzle
  • Raanwata
  • Video
  • sports quiz
No Result
View All Result
  • Home
  • Cricket
  • All Sports
  • Inspirational story
  • Online Chess Puzzle
  • Raanwata
  • Video
  • sports quiz
No Result
View All Result
kheliyad
No Result
View All Result

हिमालयातला वाघ ः तेन्झिंग नोर्गे

जगातील पहिला एव्हरेस्टवीर तेन्झिंग नोर्गे (Tenzing Norgay Mount everest) यांचा जीवनप्रवास थक्क करणारा आहे. त्यांची न ऐकलेल्या कहाणीवर एक प्रकाशझोत.

Mahesh Pathade by Mahesh Pathade
October 28, 2020
in Mount Everest series, Other sports
7
Edmund Hillary : First on Everest

Edmund Hillary : First on Everest

Share on FacebookShare on TwitterShare on LinkedinShare on TelegramShare on WhatsappShare on PinterestShare on RedditShare on Email

हिमालयातला वाघ : तेन्झिंग नोर्गे

जगातील पहिला एव्हरेस्टवीर तेन्झिंग नोर्गे यांचा जीवनप्रवास थक्क करणारा आहे. त्यांच्या न ऐकलेल्या कहाणीवर एक प्रकाशझोत...
Mahesh Pathade
Sports Journalist

पन्नासच्या दशकात सुरैयाने भारतीयांना वेड लावलं होतं, तर राजेश खन्ना तरुणाईच्या गळ्यातील ताईत होता. पन्नासच्या दशकात चित्रपटातील नायकच जगातले महान नायक आहेत की काय, असं हे भारलेलं आणि तितकंच पिचलेलंही वातावरण होतं. पिचलेलं यासाठी, की गरिबीत वाढलेल्या अनेक पिढ्या गरिबीतच खपल्या…

ही जगण्याची लढाई होती. पन्नासच्या दशकात सगळ्या लढाया लढून झाल्या, पण जगण्याच्या लढाया आजही सुरू आहेत. इतर लढायांमध्ये एक वेळ पराभव मान्य असतो, पण जगण्याच्या लढाईत पराभवाला थारा नसतो. तेन्झिंग नोर्गे (Tenzing Norgay) हीच तर लढाई लढत होता.

या लढाईला देशाच्या सीमा मान्य नसतात. भाकरीच्या चंद्रासाठी तिबेटहून नेपाळ आणि नेपाळहून भारत असा त्याचा प्रवास. आयुष्यच इतकं खडतर होतं, की एव्हरेस्टचाही त्याच्यापुढे निभाव लागला नाही.

एकूणच त्यांची जगण्याची लढाई माउंट एव्हरेस्ट (mount everest) शिखराइतकीच खडतर होती.. दोन वेळच्या अन्नासाठी रोजचा संघर्ष. जिथे खायची भ्रांत तेथे तोंडाला रोज पावडर, नट्टाफट्टा करण्याचे चोचले असणे शक्यच नाही.

पण जेव्हा तेन्झिंग नोर्गे यांनी 1953 मध्ये जगातील पहिल्या एव्हरेस्टवीराचा (mount everest) मान मिळवला, तेव्हा त्यांच्या नावाने एका स्विस कंपनीने चक्क शेर्पा तेनसिंग (Sherpa Tensing) नावाच्या क्रीम बाजारात आणल्या. याच नावाने या कंपनीने इतकी काही सौंदर्यप्रसाधनांची उत्पादनं बाजारात आणली, की शेर्पा कुटुंबाने उभ्या आयुष्यात कधी पाहिली नसतील. MOUNT EVEREST SERIES |

तेन्झिंग (Tenzing Norgay ) यांच्या अनेक पिढ्या पाठीवर ओझं वाहत खपल्या. सामान वाहून नेण्यासाठी याकसारख्या प्राण्यांचा पारंपरिक वाहन म्हणून आधार घेतला.

मात्र, तेन्झिंग (Tenzing Norgay ) यांनी एव्हरेस्ट शिखर सर केल्यानंतर त्यांच्या नावाने न्यूझीलंडमधील एका कंपनीने शेर्पा नावाची कार बाजारात आणली!

इंग्लंडची महाराणी एलिझाबेथ यांनी तेन्झिंग यांचा गौरव करण्यासाठी खास इंग्लंडला आमंत्रित केले, तेव्हा त्यांच्याकडे साधा पासपोर्टही नव्हता.

विमानातून दुसऱ्या देशात कधी तरी जाऊ असं त्यांना स्वप्नातही वाटले नसेल. मात्र, 2008 मध्ये नेपाळने आपल्या मालकीच्या लुकला विमानतळाचे नाव बदलून तेन्झिंग-हिलरी एअरपोर्ट असं ठेवलं.

हिमालयीन माउंटेनीअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये उभारण्यात आलेला तेन्झिंग नोर्गे यांचा पुतळा

तेन्झिंग यांचा हा जीवनप्रवासच थक्क करणारा आहे. तेन्झिंग (Tenzing Norgay ) जेव्हा एव्हरेस्ट शिखर करणारे जगातील पहिले मानव ठरले तेव्हा तर भारतीयांची छाती अभिमानाने फुलली, तसं नेपाळी जनतेनेही त्यांना डोक्यावर घेतलं.

दोन देशांना समृद्ध करणारे तेन्झिंग अप्रत्यक्षपणे तिबेटलाही समृद्ध केले हे अनेकांना माहीत नसेल…

तेन्झिंग (Tenzing Norgay) यांचा जन्म उत्तरेतील नेपाळमधील खुम्बू येथे मे 1914 मध्ये झाला. (या जन्मस्थानाबद्दल मतभेद आहेत… या लेखात त्याची सविस्तरपणे माहिती दिली आहे.). शेर्पा बौद्ध कुटुंबात जन्मलेले तेन्झिंग यांचं बालपण दारिद्र्यात गेलं.

नेपाळमध्ये गिर्यारोहणात कौशल्य असलेल्या लोकांसाठी, कुलींसाठी राहण्याची व्यवस्था होती. यात विशेषतः शेर्पाच अधिक असत. या शेर्पांमध्ये एक नाव होतं- शेर्पा तेन्झिंग नोर्गे यांचं.

मात्र, पुरेसे पैसे मिळत नसत. त्यामुळे त्यांनी नेपाळ सोडलं आणि नोकरीच्या शोधात 1933 मध्ये ते भारतात दार्जिलिंगमध्ये आले.

त्या वेळी त्यांचं वय होतं 17 वर्षे. जगण्यासाठी काही तरी करायला हवं म्हणून त्यांनी खटपटकेली. मग काहीच करता आलं नाही म्हणून त्यांनी 1933 मध्ये भिक्षुकी केली. कारण 15 जणांच्या कुटुंबाची जबाबदारी त्यांच्या वडिलांना तर पेलणं शक्यच नव्हतं. त्यात तेन्झिंग (Tenzing Norgay) यांना एकदोन नव्हे, तर 13 भावंडे.

काही महिने कशीबशी सरली. दार्जिलिंगमध्ये मात्र ते काहीसे स्थिरस्थावर झाले. कारण हाताला कामं मिळू लागली.

एव्हरेस्टच्या पर्वतामुळे त्यांना जगण्याची दिशा मिळाली. त्याची सुरुवात एका ब्रिटिश मोहिमेपासून झाली. पाश्चात्त्य गिर्यारोहकांना मदतीसाठी शेर्पासारखे मेहनती आणि प्रामाणिक कुली हवेच होते. या पाश्चात्त्यांची ओझी खांद्यावर वाहत एव्हरेस्टचा खडतर प्रवास सुरू केला. त्यातून त्यांना चांगले पैसे मिळू लागले.

1935 मध्ये ते कुली म्हणून सर एरिक शिपटन यांच्या सुरुवातीच्या एव्हरेस्ट सर्वेक्षण मोहिमेत सहभागी झाले. नंतर ते कोणत्या ना कोणत्या मोहिमेत सहभागी होत गेले.

दुसऱ्या महायुद्धानंतर तेन्झिंग (Tenzing Norgay ) यांना बढती मिळाली. म्हणजे ते कुलींचे सरदार बनले. त्यामुळे प्रत्येक एव्हरेस्ट मोहिमांमध्ये त्यांचा सहभाग ठरलेला.

१९५० आणि १९५१ मध्ये अमेरिका आणि इंग्लंडने आयोजित केलेल्या मोहिमांत तेन्झिंग यांचा समावेश होता. मात्र, या दोन्हीही मोहिमा अयशस्वी ठरल्या.

स्वित्झर्लंडच्या गिर्यारोहकांनी 1952 मध्ये दक्षिण मार्गाने दोन वेळा मोहिमा आखल्या. या दोन्ही मोहिमांमध्ये तेन्झिंग नोर्गे होते. अर्थात, या मोहिमा अपयशी ठरल्या.

त्याच्या पुढच्याच वर्षी 1953 मध्ये आणखी एक मोहीम राबविण्यात आली. ही तेन्झिंग यांची कुलींचा सरदार म्हणून सातवी मोहीम होती. या वेळी तेन्झिंग यांचं भाग्य खुललं. नावाप्रमाणेच ते बौद्ध धर्माचे भाग्यवान अनुयायी ठरले.

ही ब्रिटिशांनी राबविलेली मोहीम होती, ज्यात न्यूझीलंडचे एडमंड हिलरी यांचा समावेश होता. या दोघांनी एकाच वेळी शिखरावर पहिल्यांदा पाऊल ठेवले, जे यापूर्वी कोणालाही शक्य झालं नव्हतं. तो दिवस होता 29 मे 1953.

तब्बल 8,504 मीटर उंचीवर ते तंबूतून बाहेर आले आणि सकाळी शिखराकडे कूच केले. हे इतकं सहजपणे घडलं नाही.

चढाई करण्यापूर्वीची रात्र हिलरी आणि तेन्झिंग यांच्यासाठी तर भयंकर होती. वेगाने वाहणारे बर्फाळ वारे आणि बर्फवृष्टीचा सामना त्यांना करावा लागला.

रात्री झोपताना हिलरी यांचे बूट तंबूबाहेरच राहिले होते. सकाळी उठल्यानंतर त्यांचे पाय बर्फाने अक्षरशः थिजले होते.

शिखराकडे जाताना अखेरच्या टप्प्यात त्यांना एक भलामोठा उभा सुळका दिसला. हा सुळका त्यांच्या मोहिमेत बाधा ठरत होता. कारण या सुळक्यामुळेच दुसरा पर्यायी रस्ता वापरावा लागत होता.

हा मार्ग म्हणजे डोक्यामागून उलट घास घेण्यासारखे होते. त्यामुळे मोठं अंतर कापावं लागणार होतं. त्यामुळे शिखरावर पोहोचण्याचा वेळही जास्त लागत होता.

अशा वेळी हिलरी यांनी शक्कल लढवली आणि या सुळक्याला जो मधोमध तडा गेलेला होता त्यातून जाण्याचा निर्णय घेतला.

त्या रस्त्याने पहिल्यांदा हिलरी आणि त्यांच्या मागून तेन्झिंग गेले. २९ मे १९५३ रोजी ११ वाजून ३० मिनिटांनी ते जगातल्या सर्वोच्च शिखरावर पोहोचले.

तिथे हिलरी यांनी बर्फ तोडणाऱ्या आपल्या कुऱ्हाडीसोबत तेन्झिंग (Tenzing Norgay ) यांचा फोटो काढला.

अर्थात, सगळ्या फोटोंमध्ये तेन्झिंग नोर्गेच दिसतात. कारण तेन्झिंग यांना फोटो काढता येत नव्हता. कॅमेरा हातात घेण्याचा कधी प्रसंगच आला नाही.

पन्नासच्या दशकात स्वतःचा कॅमेरा असणे ही मूठभर लोकांचाच शौक होता. कुलीला कॅमेऱ्याची कसली आली हौस! शिखरावर फोटो हाच एकमेव पुरावा ग्राह्य धरला जातो.

तेन्झिंग नोर्गे यांनी शिखर सर केलं तेव्हा त्यांनी पर्वतालाच मिठाई खाऊ घातली.

म्हणजे जेव्हा तेन्झिंग शिखरावर पोहोचले तेव्हा त्यांनी मिठाई आणि मुलगी नीमाची पेन्सिल बर्फात खोचली.

यावर तेन्झिंग म्हणाले, “आपण चांगलं काम केलं, की घरातील प्रिय व्यक्तींना मिठाई देतो, तसंच माझ्या आयुष्यात एव्हरेस्ट माझ्यासाठी प्रिय होता. आता तर तो माझ्या अगदी जवळ आहे. म्हणून मी मिठाई बर्फाखाली ठेवली.” शिखरावर ते जवळपास 15 मिनिटे थांबले.

अतिशय साध्यासरळ विचारसरणीचे तेन्झिंग यांनी एव्हरेस्ट शिखरावर पहिलं पाऊल ठेवण्याचं श्रेय एडमंड हिलरी यांनाच दिलं आहे. हे अनेकदा त्यांनी सांगितलंही आहे.

तेन्झिंग म्हणाले होते, “मी त्या वेळी पहिल्या किंवा दुसऱ्या स्थानाचा कधीच विचार केला नाही. मी हा विचार कधीच केला नाही, की तिथे सोन्याचं फळ आहे आणि हिलरी यांना धक्का देऊन ते मी मिळवावं. आम्ही हळूहळू पुढे चालत राहिलो आणि काही वेळातच शिखरावर पोहोचलो. पहिल्यांदा हिलरी पोहोचले, त्यानंतर मी.”

या मोहिमेत आणखी एक नमूद करण्यासारखा प्रेरणादायी प्रसंग आहे. या मोहिमेचं नेतृत्व कर्नल हंट यांच्याकडे होतं. हंट यांनी मागे राहून या मोहिमेचं यशस्वी नेतृत्व केलं.

त्यांनी मनात आणलं असतं तर ते शिखरावर सहज पोहोचले असते. मात्र, त्यांनी असं केलं नाही. उलट त्यांनी दोन टीम केल्या.

पहिली टीम बोरडिलन, इव्हान्स यांची, तर दुसरी टीम हिलरी आणि तेन्झिंग यांची होती. या टीमला पुढे जाण्याचं प्रोत्साहन देत राहिले.

बोरडिलन आणि इव्हान्स शिखरावर जाऊ शकले नाहीत. त्यांनी खाली उतरताना हिलरी आणि तेन्झिंग यांना शिखरावरील स्थितीची माहिती दिली.

एखाद्या अनुभवी खेळाडूने नवोदित खेळाडूला माहिती द्यावी आणि त्याला प्रोत्साहन द्यावं, तशाच काहीशा टिप्स त्यांनी हिलरी आणि तेन्झिंग यांना दिल्या. त्यांच्या या सूचना शिखरावर चढताना तेन्झिंग आणि हिलरी यांना मोलाच्या ठरल्या.

तेन्झिंग यांची स्वतःची अशी जीवनशैली होती. कॉफी हे त्यांचं आवडतं पेय, तर कुत्री पाळणं हा शौक. लहानपणापासूनच गिर्यारोहणाची आवड होती.

आवड होती म्हणूनच ते उत्तम गिर्यारोहक होऊ शकले. तेन्झिंग नोर्गे (Tenzing Norgay ) यांचं मूळ नाव नामग्याल बांगडी होतं. त्यांना तेन्झिंग खुमजुंग भुटिया असंही म्हंटलं जायचं.

वैवाहिक जीवन

तेन्झिंग (Tenzing Norgay ) यांचं वैवाहिक जीवनही समृद्धच म्हणायला हवं. त्यांनी तीन विवाह केले होते. दावा फुती (Dawa Phuti) ही त्यांची पहिली पत्नी. तिच्यापासून त्यांना तीन मुले झाली.

दुर्दैवाने पहिल्या मुलाचा वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षीच मृत्यू झाला. नंतर दावा यांना जुळ्या मुली झाल्या.

एकीचं नाव आंग निमा, तर दुसरीचं पेम पेम (Pem Pem). या जुळ्या मुलींच्या जन्मानंतर 1944 मध्ये दावा फुती यांचं निधन झालं.

निमाचं आता लग्न झालं आहे. तिचा पती नोली गलंग (Noli Galang) फिलिपीन्सचा असून, तो एक ग्राफिक डिझायनर आहे.

दावा फुतीच्या निधनानंतर तेन्झिंग यांनी दुसरं लग्न केलं. त्यांच्या दुसऱ्या पत्नीचं नाव आंग ल्हामू (Ang Lahmu).

ल्हामू यांना मूल नव्हतं. मात्र, ल्हामू यांच्या चुलतभावाची दोन मुली त्यांनी दत्तक घेतल्या.

तेन्झिंग यांनी तिसरा विवाह दाक्कू (Dakku) यांच्याशी केला. तिसऱ्या विवाहप्रसंगी त्यांची दुसरी पत्नी ल्हामू हयात होती.

शेर्पा समूहात बहुपत्नित्वाला मान्यता आहे. त्याला इंग्रजी पॉलिजिनी (Polygyny) असं म्हणतात. दाक्कू यांना तीन मुलगे आणि एक मुलगी झाली.

नोर्बू (Norbu), जामलिंग (Jamling) आणि धामे (Dhamey) ही तीन मुले व देकी (Deki) ही मुलगी.

पुढे देकीचं लग्न अमेरिकेतील वकिलाशी झालं. क्लार्क ट्रेनॉर (Clark Trainor) असं तिच्या पतीचं नाव. तेन्झिंग- हिलरी यांच्या एव्हरेस्ट मोहिमेला 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल जामलिंग यानेही हिलरी यांचा मुलगा पीटर याच्यासोबत 2003 मध्ये सुवर्णमहोत्सवी एव्हरेस्ट मोहीम राबवत शिखराला गवसणी घातली.

गुंतागुंतीची कौटुंबिक पार्श्वभूमी


तैवानमध्ये जन्मलेले व नंतर इंग्लंडमध्ये स्थायिक झालेले गिर्यारोहक जॉर्ज बँड (George Christopher Band) यांनी तेन्झिंग यांच्या कुटुंबाची माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, काही क्षण तेही चक्रावले.

तेन्झिंग (Tenzing Norgay ) आणि हिलरी यांच्यासोबत 1953 मध्ये एव्हरेस्ट सर करणाऱ्यांत तेही होते. त्यांनी त्यांचे जन्मस्थळ तिबेटमधीलच नमूद केले आहे. तेन्झिंग यांचा जन्म नामचेबाजारच्या पश्चिमेला काही तासांच्या अंतरावर थामी येथे झाला.

तेन्झिंग यांच्या वडिलांचे नाव मिंगमा (Mingma), तर आईचे नाव किनसुम (Kinsum). तेन्झिंग तेरा भावंडांमध्ये अकरावा. जेम्स रॅम्से उल्मन (James Ramsey Ullman) यांनी लिहिलेल्या मॅन ऑफ एव्हरेस्ट (Man of Everest) या पुस्तकात (पान क्र. 35) ही माहिती आहे.

29 मे 1913 ही त्यांची जन्मतारीख. तेन्झिंग यांनी ही जन्मतारीख स्वीकारली आहे.

मात्र, काही ठिकाणी मे 1914 अशी जन्मतारीख मानली जाते. कुठेही जन्मतारखेबाबत स्पष्टता नाही.

मुळात तेन्झिंग यांची कौटुंबिक पार्श्वभूमी गुंतागुंतीची आहे. त्यांचे लहान भाऊ सोनम तेन्झिंग यांचा जन्म 1930 चा, तर त्यांचा मृत्यू एप्रिल 1998 मध्ये झाला, तेव्हा ते 68 वर्षांचे होते.

सोनम यांची पत्नी द्रोकर (Droker) 2000 मध्ये 70 वर्षांची होती. तेन्झिंग यांचा जन्म 1913 मधील. तेन्झिंग यांच्या म्हणण्याप्रमाणे जर ते शेर्पा कुटुंबातील 11 वे अपत्य असेल तर त्यावर विश्वास ठेवणे केवळ अशक्य.

कारण 1913 नंतर 1930 मध्ये तब्बल 17 वर्षांनी त्यांच्या लहान भावाचा जन्म झाला.

तेन्झिंग यांच्या म्हणण्याप्रमाणे, त्यांच्या आईचं निधन 1955 मध्ये झालं. त्यांचे भाऊबहीणही कालांतराने मृत्युमुखी पडले.

तेन्झिंग नेपाळी नाही, तर तिबेटीयन?


शेर्पा तेन्झिंग नोर्गे (Tenzing Norgay ) यांचा जन्म नेपाळमध्ये झाल्याचे आतापर्यंत मानले जात होते. मात्र, ते नेपाळी नव्हते, तर मूळचे तिबेटियन असल्याचा दावा अमेरिकी गिर्यारोहक एड वेबस्टर (Ed Webster) यांनी आपल्या स्नो ऑफ दि किंग्डम या पुस्तकात केला आहे.

एडमंड हिलरी आणि एव्हरेस्ट मोहिमेचे लीडर लॉर्ड हंट या दोघांचंही म्हणणं आहे, की शेर्पा तेन्झिंग नोर्गे (Tenzing Norgay) यांचा जन्म नेपाळच्या खुम्बू या पहाडी गावात झाला आहे.

मात्र, अमेरिकी गिर्यारोहक एड वेबस्टर यांच्या पुस्तकात असा दावा केला आहे, की तेन्झिंग (Tenzing Norgay ) यांचा जन्म तिबेटमध्येच झाला. एवढेच नाही तर त्यांचं बरचसं बालपणही तिबेटमध्येच गेलं आहे.

1986 मध्ये तेन्झिंग नोर्गे (Tenzing Norgay) यांचे निधन झाले. मात्र ही अत्यंत संवेदनशील माहिती समोर आली, ज्यामुळे भारत दुखावला जाऊ शकतो.

भारतानेच तेन्झिंग यांच्या मोहिमेचे समर्थन केले होते. पहिला एव्हरेस्टवीर भारतीय आहे, ही अभिमानाची बाब होती.

मात्र, तिबेटची राजधानी ल्हासामधील चिनी अधिकाऱ्यांनी आवई उठवली, की एव्हरेस्ट सर करणारा पहिला गिर्यारोहक चिनीच आहे.

त्या वेळी कदाचित याकडे दुर्लक्ष केलं जाऊ शकतं, पण जेव्हा एड वेबस्टर यांनीही याला दुजोरा दिला तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या. ही सत्यता सांगण्यासाठी तेन्झिंग यांच्या कुटुंबाची परवानगी घेतली असल्याचाही दावा त्यांनी केला आहे.

आत्मचरित्रात नेपाळ हीच जन्मभूमी


आपल्या संपूर्ण आयुष्यात तेन्झिंग आपल्या मूळ भूमीपासून नेहमीच अस्पष्ट राहिले. तेन्झिंग (Tenzing Norgay ) यांच्या टायगर ऑफ स्नोज (Tiger of the Snows) या आत्मचरित्रातही त्यांनी आपल्या बालपणातली ही सत्यता नाकारली आहे.

भूतलेखक जेम्स राम्से उल्मन (James Ramsey Ullman) यांना तेन्झिंग म्हणाले होते, की मी नेपाळमधील थामे गावात लहानाचा मोठा झालो.

वस्तुस्थिती ही आहे, की तेन्झिंगचे पालक 1920 मध्ये आर्थिक हलाखीमुळे तिबेटला स्थलांतरित झाले होते आणि तेथे त्यांनी कर्जही घेतले होते.

तेन्झिंग यांनी आपल्या मूळ भूमीबाबत एकदा सांगितले होते, की माझा जन्म त्सा चू (Tsa-chu) या गावात झाला आहे, जे मकालू पर्वताजवळ आहे.

माउंट एव्हरेस्ट पर्वत या गावापासून चोवीस तासांच्या अंतरावर आहे. जेव्हा माझा जन्म झाला तेव्हा माझी आई दार्जिलिंगच्या घांग ला (Ghang La) येथील मठात आली होती. हेच घांग ला नाव तेन्झिंग यांच्या घराला दिलेलं आहे.

1953 मध्ये जेव्हा तेन्झिंग यांनी एव्हरेस्ट शिखर सर केले, तेव्हा नेपाळ सरकारने काठमांडू येथे त्यांचा स्थानिक नायक (local hero) म्हणून गौरविले होते. मात्र, तत्पूर्वीच त्यांनी भारतीय नागरिकत्व स्वीकारले होते.

त्या वेळी तेन्झिंगला जन्मस्थान स्पष्ट न करण्याबाबत एक प्रकारे राजकीय दबावही होता.

पंडित नेहरूंमुळे तेन्झिंग यांना मिळाला पासपोर्ट


तेन्झिंग आणि एडमंड हिलरी यांनी एव्हरेस्ट शिखर सर केल्यानंतर त्यांना इंग्लंडमध्ये आमंत्रित करण्यात आले होते. हिलरी म्हणाले, त्या वेळी आम्ही पेचात पडलो. कारण तेन्झिंग यांच्याकडे पासपोर्टही नव्हता.

पहिला एव्हरेस्टवीर नेपाळचा की भारताचा हा पेच संपुष्टात आणला तो तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंनी. त्यांनी तेन्झिंग यांना भारतीय पासपोर्ट देण्याचे जाहीर केले.

या घटनेमुळे नेपाळने तेन्झिंग यांना कधीच माफ केले नाही. मात्र, पंडित नेहरू तेन्झिंग यांच्या पाठीशी खंबीरपणे राहिले आणि दार्जिलिंगमध्ये गिर्यारोहणाची पहिली शाळा (mountaineering school) सुरू केली, ज्याच्या मदतीमुळे तेन्झिंग उभा राहिला.

एकूणच या राजकीय वर्चस्वाच्या लढाईत तेन्झिंग यांनी आत्मचरित्रात तिबेटचा उल्लेख जाणीवपूर्वक टाळला. त्यांनी आत्मचरित्रात असे नमूद केले, की “नेपाळच्या उदरात जन्मलो आणि भारताच्या कुशीत वाढलो.” मात्र, वास्तव असे अजिबातच नव्हते.

एड वेबस्टरलिखित स्नो ऑफ दि किंग्डम (Snow in the Kingdom) या पुस्तकातून तेन्झिंगच्या मूळ भूमीचा खुलासा करण्यात आला आहे.

तिबेटच्या खार्टा खोऱ्यातील (Kharta Valley) मोयून (Moyun) हे तेन्झिंग यांचे मूळ गाव आहे, जेथे त्याचा जन्म झाला आहे.

शेर्पा कुटुंबात जन्मलेला नोर्बू हा तेन्झिंग यांचा सर्वांत मोठा मुलगा. त्याचा जन्म दार्जिलिंगमधला. नोर्बूला इतर शेर्पांप्रमाणे आपल्या वडिलांच्या सर्व गुपितांची माहिती होती.

तो तेन्झिंग यांच्या सावत्रभावाला आणि इतर अन्य नातेवाइकांनाही तिबेटमध्ये जाऊन भेटला, ज्याची अनेकांना माहिती नाही. त्याच वेळी नोर्बूला तेन्झिंग यांच्या जन्मस्थानाचा शोध लागला.

तेन्झिंग यांनी त्याच वेळी आपली राष्ट्रीयता सांगितली असती तर त्यांच्यासमोर अनेक समस्या उद्भवल्या असत्या.

या खुलाशाने भारत सरकारलाही त्यांनी निराश केले असते, असे वेबस्टर यांनी दि ऑब्झर्व्हरला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

कदाचित शेर्पा समाज आणि संस्कृतीला धक्का पोहोचला असता. कारण त्यांच्या तिन्ही बायका शेर्पा आहेत. दार्जिलिंग आणि खुम्बूमध्ये त्यांची प्रतिमा उज्ज्वल आहे. कदाचित ही प्रतिमा डागाळली असती.

तेन्झिंग संवेदनशील आणि प्रामाणिक माणूस आहे, यावर माझा विश्वास आहे, असेही वेबस्टर म्हणाले. त्यांचे लिखाण स्पष्ट आहे. त्यांनी त्यांच्या कुटुंबापासून आपल्या मूळ जन्मस्थानाविषयी काहीही लपवून ठेवले नाही.

मात्र, लोकांपासून त्यांनी ही सत्यता दडवली. तो एक गिर्यारोहक आहे. त्यात राष्ट्रीयत्व कोणते याला महत्त्व नाही, असा तेन्झिंग यांना वाटत असावे.

1988 च्या एव्हरेस्ट मोहिमेदरम्यान घांग ला येथील नामदग ल्हे फोडांग (Namdag Lhe Phodang) हा मठ पाहिला. तिबेटच्या कामा खोऱ्यातील ती देवाचं पवित्र असं स्थान आहे.

हे तिबेटी बौद्धांचं पवित्र तीर्थक्षेत्र मानलं जातं. युद्ध आणि दुष्काळात तिबेटी बौद्ध नागरिक या तीर्थक्षेत्राला शरण येतात. घांग लापासून जवळच त्सा चू Tsa-chu (त्यालाच त्शेचू (Tshechu) असंही म्हणतात) हेही एक पवित्र क्षेत्र मालं जातं.

मठाच्या चारही बाजूंना याकच्या चरण्यासाठी कुरण आहे आणि येथेच तेन्झिंग यांनी आपलं बालपण व्यतित केलं. 1950 मध्ये तेन्झिंग यांच्या कुटुंबाच्या घरासह मठ चिनी आक्रमणात उद्ध्वस्त करण्यात आले.

विडंबना ही आहे, की शेर्पा यांचं मूळ स्थान एव्हरेस्टपासून 1000 किलोमीटरवील पूर्व तिबेटच्या खाम येथील आहे. सोळाव्या शतकात ते नेपाळमध्ये स्थलांतरित झाले. मात्र, तिबेटचा उल्लेख त्यांनी टाळला.

या शेर्पांची संख्या नेपाळमध्ये केवळ हजारात असेल, पण गिर्यारोहणातील अतुलनीय कामगिरीमुळे ते संपूर्ण विश्वात प्रसिद्ध आहेत.

शेर्पांची मातृभूमी जरी नेपाळमधील सोलू-खुम्बू (Solu-Khumbu) असली तरी त्यांचे आजही आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध तिबेटशी जोडलेले आहेत.

तेन्झिंग यांचा चुलतभाऊ तिबेटमधील प्रसिद्ध लामा आहे, ज्याने तिबेटमधील रोंगबुक येथे व नेपाळमध्ये तेंगपोचे येथे मठ स्थापन केले आहेत.

तेन्झिंगच्या चुलतभावानेच या तेन्झिंग यांना नाव दिले आहे. त्याचा अर्थ आहे, धर्माचा भाग्यवान समर्थक.

शेर्पांना पैसे देऊन मदतीला ठेवण्याची पद्धत विसाव्या शतकापासून सुरुवात झाली. मेहनत आणि प्रामाणिकपणामुळे शेर्पांनी आपली उपयुक्तता सिद्ध केली. सर्वोत्कृष्ट शेर्पांना टायगर्स म्हणून जाहीर केले जाते आणि पदक देऊन गौरविण्यात येते.

गिरिभ्रमण शेर्पांसाठी फायदेशीर ठरले. त्यामुळे बहुतांश शेर्पा भारतात स्थायिक झाले. त्यामुळे 1949 पर्यंत नेपाळ युरोपीय लोकांसाठी बंदच राहिले.

तेन्झिंग आणि त्याचं कुटुंब खुम्बूमध्ये जगण्याची लढाई लढत होतं. दार्जिलिंगमध्ये त्यांना एक संधी मिळाली आणि यशस्वी झाले. मात्र, तत्पूर्वी हलाखीत त्यांनी काही वर्षे काढली. आर्थिक चणचण भासत होती.

तेन्झिंग यांचे वडील पैशांसाठी बाहेर पडले. त्यानंतर तेन्झिंग यांना ते पुन्हा कधीही दिसले नाहीत. जेव्हा तेन्झिंगचा नावलौकिक त्याच्या मायदेशापर्यंत गेला, तेव्हा त्याने कधीही न पाहिलेले नातेवाईक भारावलेले होते.

पाश्चात्त्य गिर्यारोहकांमुळे शेर्पाची वर्षाची कमाई हजार डॉलरच्या घरात आहे. पण जेव्हा नेपाळचं पर्यटन खुलं झालं, त्यानंतर शेर्पांचं दार्जिलिंगमध्ये होणारं स्थलांतर जवळजवळ थांबलं.

ज्या देशात वर्षाचं दरडोई उत्पन्न 200 डॉलर आहे, त्या नेपाळमध्ये शेर्पा बऱ्यापैकी श्रीमंत आहेत. परदेशी पर्यटकांचा ओघ वाढल्यानंतर नेपाळमध्ये पर्यावरणाच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. मात्र, तिबेटी चिनी व्यापाऱ्यांमुळे आर्थिक अडचणी दूर झाल्या आहेत.

1950 मध्ये तिबेटवरील आक्रमणानंतर चीनने नेपाळच्या खुम्बू प्रदेशाच्या सार्वभौमत्वावरही हक्क सांगितला. हा तिबेटी वंशाच्या लोकांचा प्रदेश आहे, असा प्रचार चिन्यांनी सुरू केला.

एव्हरेस्टवर अनेक चीन-तिबेट मोहिमा आखत नेपाळच्या भूभागावरील प्रदेशावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला. तिबेट इन्फॉर्मेशन नेटवर्कचे केट साँडर्स यांनी दि ऑब्झर्व्हरला सांगितले, की चीनला माहीत होते, की तेन्झिंग मूळचा तिबेटी आहे. त्यामुळे त्यांनी पहिला चिनी एव्हरेस्टवीर म्हणून तेन्झिंगचा उल्लेख करीत प्रपोगंडा रचत तिबेटच्या सार्वभौमत्वावर वर्चस्व मिळविण्याची एकही संधी दवडली नाही.

वेबस्टरने आणखी एक विचित्र दावा केला आहे, की 1924 मध्ये एव्हरेस्ट मोहिमेवर गायब झालेला जॉर्ज मेल्लोरी याला तेन्झिंग नोर्गे भेटला असावा.

त्या वेळी तेन्झिंग अवघ्या सात वर्षांचे होते. कारण मेलोरी याने जेव्हा पहिली मोहीम आखली होती, तेव्हा तो तेन्झिंगच्या गावात मुक्कामाला होता. गाय बुलॉक (Guy Bullock) हा गिर्यारोहक त्या वेळी मेलोरीचा सहकारी होता.

त्याने लिहिलेल्या डायरीत नमूद केले आहे, की उन्हाळ्यात ट्रेकिंग करण्यापूर्वी मेलोरीने तेन्झिंगच्या मूळ गावी एक दिवस मुक्काम केला होता.

पहिला एव्हरेस्टवीर, पण सन्मानापासून वंचित


शेरपा तेन्झिंग नोर्गे यांचा नातू (मुलाचा मुलगा) ताशी याची एक तक्रार आहे. ती म्हणजे तेन्झिंग यांना जो सन्मान मिळायला हवा होता तो मिळाला नाही.

तेन्झिंग नोर्गे यांनी एव्हरेस्ट शिखर सर करून साठ वर्षे झाल्यानंतर बीबीसीशी बोलताना ताशी यांनी ही खंत व्यक्त केली होती.

एलिझाबेथ यांना ब्रिटनच्या महाराणीपदाचा मुकुट परिधान करण्याच्या पूर्वसंध्येलाच तेन्झिंग यांनी एडमंड हिलरी आणि ब्रिटनच्या जॉन हंटसोबत एव्हरेस्ट शिखरावर पाऊल ठेवलं होतं. तेन्झिंग यांच्या पावलावर पाऊल ठेवत ताशीनेही एव्हरेस्टचं शिखर सर केलं आहे.

महाराणीने एडमंड हिलरी आणि जॉन हंट यांना नाइटहूडची पदवी देऊन सन्मानित करण्यात आले. मात्र, शेर्पा तेन्झिंग यांना फक्त मेडल मिळालं. ताशीला हे रुचलं नाही. त्यांनी यावर टीकाही केली आहे.

ताशी वांगचुक तेन्झिंग म्हणाले, की “माझ्या आजोबालाही तो सन्मान मिळायला हवा होता, ज्याच्यावर त्यांचा हक्क होता. त्यांना तोच सन्मान मिळायला हवा होता, जो हिलरी आणि हंट यांना मिळाला.”

ताशीचं असंही म्हणणं आहे, की त्याच्या आजोबाशिवाय एडमंड हिलरी कधीच एव्हरेस्ट सर करू शकले नसते. अर्थात, ताशी यांना एडमंड हिलरीविषयी कोणतीही तक्रार नाही. “ते महान व्यक्ती आहेत. माझे त्यांच्याशी खूप चांगले संबंध होते आणि त्यांच्याकडून मला प्रेरणा मिळते,” असेही ताशी यांनी म्हंटले आहे.

एडमंड हिलरी यांनी आपल्या आत्मकथेत नमूद केले आहे, की एव्हरेस्ट शिखरावर पहिल्यांदा पाऊल ठेवणारा मी पहिला व्यक्ती होतो. त्यांचा गाइड शेर्पा तेन्झिंग यांना याचं श्रेय दिलं नाही.

याच कारणामुळे दोन्ही कुटुंबांत कटुता निर्माण झाली होती, असं म्हंटलं जातं. ही आत्मकथा 1986 मध्ये शेर्पा तेन्झिंग यांच्या निधनानंतर प्रसिद्ध झाली होती.

एव्हरेस्ट शिखर सर करण्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त हिलरीचा मुलगा पीटर आणि तेन्झिंगचा नातू ताशी यांनी माउंट एव्हरेस्ट सोबतीने सर करण्याचं एक स्वप्न पूर्ण केलं आहे. त्या वेळी पीटर हिलरी 47 वर्षांचे, तर ताशी 37 वर्षांचा होता.

जेव्हा चढाई केली तेव्हा पीटर हिलरी आणि ताशी यांना थेट शिखरावरच एकमेकांना भेटायचं होतं. मात्र खराब हवामानामुळे हिलरीच्या गटाने सकाळपर्यंत चढाई करणे टाळले. ताशी तीन दिवसांपूर्वीच शिखरावर पोहोचले होते.

तेन्झिंग यांनी जेवढी वादळं एव्हरेस्टवर सोसली, किंबहुना त्यापेक्षा जास्त वादळे त्यांच्या आयुष्यात आली. या सगळ्यांना सामोरे जाऊन ते अशा उंचीवर पोहोचले, जिच्यापुढे शिखरही थिटं पडावं… या शिखरवीराला खेळियाडचा सलाम.

तेन्झिंग यांना फोटो काढताच येत नव्हते...

माउंट एव्हरेस्टचे शिखर सर केल्यानंतर जेवढे फोटो काढले गेले त्यात फक्त तेन्झिंग नोर्गेच दिसतात. कारण तेन्झिंग यांना फोटो काढताच येत नव्हते. तेन्झिंग यांनी जेव्हा हिलरी यांचा फोटो काढण्याची विनंती केली, तेव्हा हिलरी यांनी नकार दिला.

इंग्लंडच्या राणीकडून गौरव

तेन्झिंग यांनी एव्हरेस्ट शिखर सर केल्यानंतर आनंदाचा माहोल होता. नेपाळ सरकारने तेन्झिंग यांना 1953 मध्ये "सुप्रदीप्त मान्यवर नेपाल तारा" हा बहुमान प्रदान केला. इंग्लंडची महाराणी एलिझाबेथ यांच्या हस्ते त्यांना जॉर्ज मेडल देऊन गौरविण्यात आले. हा बहुमान परदेशी व्यक्तींमध्ये सर्वोच्च सन्मान होता. 1959 मध्ये भारत सरकारने तेन्झिंग यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरविले.

Follow us

Read more... Mount Everst Series

Ang Rita Sherpa
Mount Everest series

Ang Rita Sherpa | ऑक्सिजन नाकारणारा हिमबिबट्या

by Mahesh Pathade
September 23, 2020
2

  Ang Rita Sherpa | ऑक्सिजन नाकारणारा हिमबिबट्या माउंट एव्हरेस्टच्या मालिकेतील ही नववी कहाणी. माउंट एव्हरेस्ट तर सगळेच सर करतात,...

Edmund Hillary : First on Everest
All Sports

Edmund Hillary : First on Everest

by Mahesh Pathade
October 28, 2020
6

Edmund Hillary : First on Everest पन्नासचं दशक युद्धज्वराने जर्जर झालेलं होतं. अमेरिका- रशियातील शीतयुद्धही याच काळातलं. दुसरं महायुद्ध शमलं...

Edmund Hillary : First on Everest
Mount Everest series

हिमालयातला वाघ ः तेन्झिंग नोर्गे

by Mahesh Pathade
October 28, 2020
7

हिमालयातला वाघ : तेन्झिंग नोर्गे जगातील पहिला एव्हरेस्टवीर तेन्झिंग नोर्गे यांचा जीवनप्रवास थक्क करणारा आहे. त्यांच्या न ऐकलेल्या कहाणीवर एक...

George Mallori mystery on everest

जॉर्ज मेलोरी : पहिल्या एव्हरेस्टवीराची शोकांतिका

September 19, 2022
अंगावर शहारे आणणारी अरुणिमाची कहाणी

अंगावर शहारे आणणारी अरुणिमाची कहाणी

October 27, 2020
Mount Everest series 5 : मनाचा थरकाप उडविणारी स्लीपिंग ब्यूटी (उत्तरार्ध)

Mount Everest series 5 : मनाचा थरकाप उडविणारी स्लीपिंग ब्यूटी (उत्तरार्ध)

October 29, 2021
Tags: DrokerGeorge Christopher BandJames Ramsey UllmanKinsumlocal heroMingmaMount Everest seriesmountaineering schoolSnow in the KingdomTenzing NorgayTsa-chuतेन्झिंग आणि हिलरीहिमालयातला वाघ ः तेन्झिंग नोर्गे
Mahesh Pathade

Mahesh Pathade

Next Post
भारतीय हॉकीला नामी संधी…

भारतीय हॉकीला नामी संधी...

Comments 7

  1. Pingback: अंगावर शहारे आणणारी अरुणिमाची कहाणी - kheliyad
  2. Pingback: Mount Everest series 3 : शोकांतिका ग्रीन बुटाची... - kheliyad
  3. Pingback: माउंट एव्हरेस्ट ः शिखर की साहसाचं मखर? - kheliyad
  4. Pingback: सगरमाथ्याची गदळगाथा - kheliyad
  5. Pingback: Edmund Hillary : First on Everest - kheliyad
  6. Pingback: National sports awards committee - kheliyad
  7. Pingback: सौंदर्य आणि क्रीडाकौशल्य यांचा सुंदर मिलाफ असलेल्या जगातील १० महिला खेळाडू - kheliyad

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

CONTENT

  • All Sports
  • Women Sports
  • Cricket
  • Tennis
  • Environment
  • Jagjit Singh Gazal
  • Online Chess

INFORMATION

  • Sports History
  • About Us
  • Sports Quiz
  • Inspirational Sports Story

LEGAL

  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Contact

SOCIAL MEDIA

  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Home
  • About US
  • Gallery
  • Contact

© 2020 Kheliyad Copyright © 2020 Website The "kheliyad" is not responsible for the content of external sites.

No Result
View All Result
  • Home
  • Cricket
  • All Sports
  • Inspirational story
  • Online Chess Puzzle
  • Raanwata
  • Video
  • sports quiz

© 2020 Kheliyad Copyright © 2020 Website The "kheliyad" is not responsible for the content of external sites.

error: Content is protected !!