भारतात कोणी आणला चेस बॉक्सिंग खेळ? (भाग 2)

भारतात अनेक नवे खेळ आले. पाश्चात्त्य देशांतून आलेल्या खेळांचं प्रमाण यात सर्वाधिक आहे. त्यातील किती रुजले हा संशोधनाचा विषय आहे; पण नव्या खेळांनी काही राज्यांमध्ये औत्सुक्य निर्माण केलं एवढं मात्र खरं. त्यापैकीच एक म्हणजे ‘चेस बॉक्सिंग’ (chess boxing) खेळ.
भारतात अनेक नवे खेळ आले. पाश्चात्त्य देशांतून आलेल्या खेळांचं प्रमाण यात सर्वाधिक आहे. त्यातील किती रुजले हा संशोधनाचा विषय आहे; पण नव्या खेळांनी काही राज्यांमध्ये औत्सुक्य निर्माण केलं एवढं मात्र खरं. त्यापैकीच एक म्हणजे ‘चेस बॉक्सिंग’ (chess boxing). गंमत म्हणजे या खेळाचं आकर्षण एक तर मुष्टियोद्ध्याला असलं पाहिजे किंवा बुद्धिबळपटूला तरी. प्रत्यक्षात या दोन्ही खेळाडूंना ‘चेस बॉक्सिंग’चं अजिबात आकर्षण निर्माण झालं नाही. मग हा खेळ भारतात कसा आला, हा प्रश्न उरतोच. खेळता येवो वा ना येवो, नव्या खेळाची संघटना स्थापन करून आपलं वर्चस्व या ना त्या मार्गाने कसं स्थापित करता येईल, हा एवढाच हेतू यामागे दिसून येतो.
बंगालमध्ये कसा आला हा चेस बॉक्सिंग खेळ?
२०११ मध्ये या खेळाने बंगालमार्गे भारतात शिरकाव केला. तुम्ही म्हणाल, बुद्धिबळ हा खेळ विश्वनाथन आनंदमुळे भारतात जसा लोकप्रिय झाला, तसंच मेरी कोममुळे बॉक्सिंगनेही भारताला वेड लावलं. त्यामुळे या दोन्ही खेळांच्या लोकप्रियतेतून भारतात या खेळाने शिरकाव केला असू शकेल. मात्र, तसंही काही नाही.
या दोन्ही खेळांच्या लोकप्रियतेचा कोणताही लवलेश ‘चेस बॉक्सिंग’ला chess boxing | नाही हे आधी लक्षात घ्यायला हवं. म्हणजे उत्तम बुद्धिबळपटूला कधीच वाटलं नाही, की आपण बॉक्सिंग रिंगमध्येही कमाल करावी. कदाचित एखाद्या मुष्टियोद्ध्याला बुद्धिबळ खेळता येत असेलही, पण त्याने बॉक्सिंग रिंग सोडून बुद्धिबळाला आपलंसं कधी केल्याचं ऐकिवात नाही. म्हणजेच काय, तर चेस बॉक्सिंगचं कोणत्याही बुद्धिबळपटूला ना आकर्षण होतं, ना कुणा मुष्टियोद्ध्याला.
कराटेपटूने स्थापन केली संघटना
ही संघटना स्थापन केली एका भलत्याच व्यक्तीने. त्या व्यक्तीचा मूळ खेळ कराटे. मोंटू दास असं या व्यक्तीचं नाव. मूळचा कोलकात्यातील असलेला हा मोंटू किकबॉक्सिंग असोसिएशन ऑफ बंगाल या संघटनेचा सरचिटणीस. नंतर तो ऑल इंडिया किकबॉक्सिंग संघटनेचाही सरचिटणीस झाला.
वयाच्या १६ व्या वर्षी त्याला या चेस बॉक्सिंगची ओळख त्याच्या प्रशिक्षकाने करून दिली. हा खेळ काहीसा हटके आहे, हे त्याच्या लक्षात आलं नि या पठ्ठ्याने थेट या खेळाचा संस्थापक इपे रुबिंघशीच संपर्क साधला. मग ई-मेलद्वारे संपर्क असो वा फोनद्वारे. त्याने माहिती घेतली नि २०११ मध्ये त्याने या खेळाची कोलकात्याला पहिली ओळख करून दिली ती एका प्रदर्शनीय लढतीने.
त्या वेळी त्याने कोलकात्यात चेस बॉक्सिंग क्लब स्थापन केला होता. नंतर त्याने चेस बॉक्सिंग ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया ही राष्ट्रीय स्तरावरची संघटना (सीबीओआय) स्थापन केली नि तिच्या सरचिटणीसपदावर तो स्वत:च विराजमान झाला.
भारतात त्याने घेतलेल्या पहिल्या प्रदर्शनीय सामन्याला म्हणे, सुमारे १५०० प्रेक्षकांनी हजेरी लावली होती, असा दावा त्यानेच ‘सीबीओआय’च्या अधिकृत संकेतस्थळावर केला आहे. या लढतीत खेळण्याचा मान मिळाला कोलकात्याच्या सुभाष नाश्कर आणि मिदनापूरच्या सौमेन प्रामाणिक या दोन खेळाडूंना. ही लढत सौमेनने सातव्या फेरीत सुभाष नाश्करला चेकमेट करून जिंकली. अशा प्रकारे चेस आणि बॉक्सिंग या दोन्ही खेळाची कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या या मोंटू दासने भारतात चेस बॉक्सिंगची मुहूर्तमेढ रोवली.
हा मोंटू दास कोण?
मोंटू दास मूळचा मार्शल आर्टचा खेळाडू. गेल्या २३ वर्षांपासून तो या खेळात कार्यरत आहे. १९९५ मध्ये तो इंडियन कराटे चॅम्पियन होता. त्याने देशात किकबॉक्सिंगच्या अनेक स्पर्धाही घेतल्या होत्या. किकबॉक्सिंग आणि बॉक्सिंगचा फारसा निकटचा संबंध नाही.
किकबॉक्सिंग म्हणजे लत्थाप्रहार आणि अधूनमधून ठोसे लगावणे. त्याला बॉक्सिंगचे सर्वच नियम लागू होत नाहीत. असे असले तरी त्याचा बॉक्सिंगशी काही तरी संबंध आहे असं म्हणायला जागा आहे, ते म्हणजे चेस बॉक्सिंग या नव्या खेळामुळे. चेस बॉक्सिंग हा खेळ भारतात रुजवण्याची सुरुवात मोंटू दासने केली हे खरं असलं तरी तो 2019 पर्यंत रुजलेला नाही असं ठामपणे म्हणता येईल. या खेळाची ओळख मोंटू दासने करून दिली एवढंच आपण म्हणू शकतो.
महाराष्ट्रात मुंबईतच चेस बॉक्सिंग खेळ!
महाराष्ट्रात चेस बॉक्सिंग रुजलेली नाही, पण मुंबईत या खेळाचं काही प्रमाणात गारूड आहे. मुंबईतील साकीनाका येथील माधवी गोनबरे हिने 2018 मध्ये जागतिक अमॅच्य़ुअर चेस बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. वयाच्या 22 व्या वर्षी तिने ही कामगिरी केली होती. कोलकाता येथे झालेल्या या स्पर्धेत रशिया, फिनलंड, अमेरिका, जर्मनीसह अन्य देशांतील 100 पेक्षा अधिक खेळाडू सहभागी झाले होते.
माधवी गोनबरे हिची कहाणी थोडीशी वेगळी आहे. अत्यंत गरीब कुटुंबातील माधवीचं चेस बॉक्सिंगमधील यश नक्कीच कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे. तिची आई एका शाळेत शिपाई आहे. आर्थिक परिस्थिती जेमतेमच. या स्पर्धेत ती पहिल्यांदा सहभागी झाली होती, तेव्हा साकीनाका पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक अविनाश धर्माधिकारी यांनी तिला मदत केली होती.
स्पर्धेसाठी लागणारे 30 हजार रुपयांचे शुल्क धर्माधिकारी यांनी भरले होते. धर्माधिकारी यांना डोंगरी येथे सहाय्यक आयुक्तपदी बढती बदली झाल्यानंतरही ते माधवीला विसरले नाहीत. त्यांनी तिला मदतच केली. तिचा स्पर्धेसाठीचा खर्च दानशूरांच्या मार्फत करण्यात आला.
माधवीने धर्माधिकारी यांचे आभार मानलेच, शिवाय सामाजिक कार्यकर्त्या लविता पॉवेल यांचेही तिने आभार ममाले. या पॉवेल यांनी माधवीला दीड लाख रुपयांची मदत केली, ज्यामुळे माधवीला शैक्षणिक, तसेच स्पर्धांचा खर्च करता आला.
जागतिक स्पर्धेत सहभागी होणारा हा आहे पहिला चेस बॉक्सर!
शैलेश त्रिपाठीही या खेळाकडे आकर्षित झाला. हा शैलेश भारतातला अव्वल क्रमांकाचा चेस बॉक्सर. 2015 मध्ये तरी त्याची कारकीर्द ऐन भरात होती. हा शैलेश एका शिक्षकाचा मुलगा. सामान्य कुटुंबातील शैलेशला शिक्षणापेक्षा खेळात अधिक रस होता.
बॉक्सिंग हा त्याचा आवडता खेळ. बुद्धिबळही कधी तरीच खेळायचा. म्हणजे फावल्या वेळेत त्याला बुद्धिबळ खेळायला आवड़ायचे. मात्र, बॉक्सिंगमध्ये तो राष्ट्रीय स्तरापर्यंत खेळला. एके दिवशी त्याला समजलं, की चेस बॉक्सिंग नावाचा एक असा खेळ आहे, ज्यात बॉक्सिंग आणि बुद्धिबळ या दोन्ही खेळांचा संगम आहे, तेव्हा कुतूहलापोटी तो या खेळाकडे वळला.
महाविद्यालयीन जीवनात शैलेश बॉक्सिंग खेळायचा. एकदा त्याच्या मित्राने त्याला चेस बॉक्सिंग खेळाविषयी माहिती दिली. ज्याला बुद्धिबळ चांगलं खेळता येतं, तो या स्पर्धेत चांगले यश मिळवू शकतो. शैलेशला तर दोन्ही खेळ चांगले ठाऊक होते. त्याने निर्णय घेतला, की आपण हा खेळ खेळला पाहिजे. त्यासाठी त्याने कोलकात्यात जाऊन प्रशिक्षण घेतले.
2013 मध्ये जागतिक चेस बॉक्सिंग स्पर्धेसाठी त्याने आपला इरादा स्पष्ट केल्यानंतर त्याची या स्पर्धेसाठी निवड झाली. एका सामान्य कुटुंबातील शैलेशची जागतिक स्पर्धेसाठी निवड होणे हीच मोठी गोष्ट होती. शैलेशचा शिक्षणापेक्षा खेळाकडे अधिक कल होता.
त्याची इच्छा होती, की आंतरराष्ट्रीय स्पर्धेत एकदा तरी भारताचं प्रतिनिधित्व करायला मिळेल. चेस बॉक्सिंगमुळे ही संधी त्याला मिळाली होती. मात्र, घरच्यांचा पाठिंबा नव्हता. आधी शिक्षण मग खेळ, अशी सामान्य कुटुंबाची सर्वसाधारण धारणा असते. तीच शैलेशच्या कुटुंबाचीही होती.
मात्र, शैलेशचा कल पाहता अखेरीस त्यांनी त्याला खेळासाठी पाठिंबा दिला. अर्थात, पाठिंबा मिळाला असला तरी स्पर्धेसाठी लागणारा खर्च मोठा होता. सरकारकडे मदतीची याचना केली. मात्र पदरी निराशाच पडली. एका मंत्र्याला माझ्या यशाचं कौतुक होतं, पण त्यांनी आर्थिक मदत केली नाही.
शैलेश ज्या वेळी मंत्र्याकडे गेला, तेव्हा ते म्हणाले, की प्रचार यंत्रणेसाठीच मोठा खर्च झाला आहे. मात्र, खेळासाठी जो निधी दिला जातो, तोही ते देण्यास तयार नव्हते. अखेर प्रायोजकांवरच माझी मदार होती. एखाद्या सामान्य कुटुंबातील खेळाडूला स्पर्धा खेळणे किती कठीण असते याचा कटू अनुभव मी घेतला आहे, असं उद्विग्नपणे शैलेश म्हणाला.
जागतिक चेस बॉक्सिंग स्पर्धेसाठी पात्र ठरणारा मी भारतातला पहिला खेळाडू होतो. पण सरकारकडून कोणतीही मदत मिळत नसेल तर माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील खेळाडूंनी काय करायचे, असा प्रश्न तो उपस्थित करतो.
एका खेळाडूला प्रशिक्षण, निवास व भोजन व्यवस्था, जाण्या-येण्याचा खर्च मोठा असतो. तो खर्च किमान सरकारने करायला हवा असे मला वाटते, अशी अपेक्षाही शैलेशने व्यक्त केली.
[jnews_widget_facebookpage title=”Facebook Page: kheliyad” url=”https://www.facebook.com/kheliyad” small=”true” header_icon=”fa-facebook-square” url=”https://www.facebook.com/kheliyad” header_type=”heading_3″ header_background=”#3b5998″ header_text_color=”#ffffff” header_line_color=”#3b5998″ header_accent_color=”#3b5998″] [jnews_block_37 header_icon=”fa-angle-double-right” first_title=”Read more at:” url=”https://www.youtube.com/channel/UCtDg3ouSUEsZ-kt8Z83dhAA?sub_confirmation=1″ header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”80″]
चेसबोक्सिंगचा एकंदरीत भारतातील प्रवास अतिशय सुरेख रितीने मांडला आहे.
thank you so much