• Latest
  • Trending
George Mallori mystery on everest

पहिल्या एव्हरेस्टवीराची शोकांतिका

October 29, 2021
भारत वेस्ट इंडीज क्रिकेट

भारत-वेस्ट इंडीज क्रिकेट मालिका ः भारताचा दणदणीत विजय

July 29, 2022

10 मिनिटांत स्पोर्ट न्यूज

July 27, 2022

चेस ऑलिम्पियाड : लक्ष भारताच्या कामगिरीवर

July 27, 2022
बोस्टन मॅरेथॉन- कॅथरिन स्वित्झरची कहाणी

बोस्टन मॅरेथॉन- कॅथरिन स्वित्झरची कहाणी

July 23, 2022
विम्बल्डन डायरी 2022

विम्बल्डन डायरी 2022

July 11, 2022
इलेना रिबाकिना विम्बल्डन

विम्बल्डन जिंकणारी कोण ही इलेना रिबाकिना?

July 11, 2022
निरोपाच्या स्पर्धेत सानिया मिर्झा हिचे स्वप्न अधुरे

निरोपाच्या स्पर्धेत सानिया मिर्झा हिचे स्वप्न अधुरे

July 11, 2022
सोव्हिएत संघ आणि अमेरिका या दोन राष्ट्रांतील शीतयुद्ध आणि क्रीडा क्षेत्र

सोव्हिएत संघ आणि अमेरिका या दोन राष्ट्रांतील शीतयुद्ध आणि क्रीडा क्षेत्र

May 6, 2022
एलिसन फेलिक्स

‘कोंबडीच्या पायाची…’ एलिसन फेलिक्स

April 26, 2022
शेन वॉर्न

शेन वॉर्न – जादूई फिरकीचा बादशाह

March 8, 2022
रोड मार्श

ऑस्ट्रेलियाचा महान क्रिकेटपटू रोड मार्श यांचे निधन

March 5, 2022

युक्रेन-रशिया युद्ध आणि क्रीडाविश्व

April 5, 2022
Monday, August 15, 2022
kheliyad
  • Home
  • Cricket
  • All Sports
  • Inspirational story
  • Online Chess Puzzle
  • Raanwata
  • Video
  • sports quiz
No Result
View All Result
  • Home
  • Cricket
  • All Sports
  • Inspirational story
  • Online Chess Puzzle
  • Raanwata
  • Video
  • sports quiz
No Result
View All Result
kheliyad
No Result
View All Result

पहिल्या एव्हरेस्टवीराची शोकांतिका

जगातील पहिला एव्हरेस्टवीर कोण, या प्रश्नाचं उत्तर एक रहस्य बनलं आहे. आजही आपण तेन्झिंग नोर्गे आणि एडमंड हिलरी यांना पहिले एव्हरेस्टवीर मानतो. मात्र, त्यांच्याआधीही १९२४ मध्ये एक गिर्यारोहक शिखरावर गेला होता. कोण आहे हा एव्हरेस्टवीर?

Mahesh Pathade by Mahesh Pathade
October 29, 2021
in All Sports, Mount Everest series, Other sports
14
George Mallori mystery on everest

George Mallori mystery on everest

Share on FacebookShare on TwitterShare on LinkedinShare on TelegramShare on WhatsappShare on PinterestShare on RedditShare on Email

 

 

पहिल्या एव्हरेस्टवीराची शोकांतिका

जगातील पहिला एव्हरेस्टवीर कोण, या प्रश्नाचं उत्तर एक रहस्य बनलं आहे. आजही आपण तेन्झिंग नोर्गे आणि एडमंड हिलरी यांना पहिले एव्हरेस्टवीर मानतो. मात्र, त्यांच्याआधीही १९२४ मध्ये एक गिर्यारोहक शिखरावर गेला होता, असा दावा केला जात आहे. मात्र, त्याच्या मृत्यूने हे रहस्य उलगडू शकलेलं नाही. या गिर्यारोहकाचा मृतदेह तब्बल ७५ वर्षांनी हाती लागला. त्यातून पुढे आलेल्या माहितीनुसार असा दावा केला जात आहे, की हाच तो गिर्यारोहक आहे, ज्याने पहिल्यांदा शिखर सर केलं. कोण आहे हा गिर्यारोहक?


ही घटना आहे १९२४ ची. ब्रिटनचा एक धाडसी तरुण एव्हरेस्टच्या मोहिमेवर निघाला होता. त्या वेळी तेन्झिंग नोर्गे दहा वर्षांचे होते, तर एडमंड हिलरी अवघ्या पाच वर्षांचे. एव्हरेस्टला गवसणी घालण्याचं स्वप्न पाहणारा हा ब्रिटिश तरुण एव्हरेस्टच्या मोहिमेवर गेला खरा, पण परत कधीच आला नाही. तब्बल ७५ वर्षांनी म्हणजे १९९९ मध्ये त्याचा मृतदेह हाती लागला आणि इथूनच सुरू झाला पहिल्या एव्हरेस्टवीराचा वाद.

हा मृतदेह होता ब्रिटनचा जॉर्ज मेलोरी यांचा. २९ मे १९५३ रोजी एडमंड हिलरी आणि तेन्झिंग नोर्गे एव्हरेस्ट शिखर सर केले होते. मात्र, जॉर्ज मेलोरी (George Mallory) आणि सँडी आयर्विन (Andrew “Sandy” Irvine) हेच पहिले एव्हरेस्टवीर असावेत, ज्यांनी हिलरी आणि नोर्गे यांच्याही आधी म्हणजे तब्बल २९ वर्षांपूर्वी ०८ जून १९२४ रोजी शिखर सर केल्याचा दावा केला जात आहे. त्यासाठी जॉर्ज मेलोरीची थरारक कहाणी समजून घ्यावी लागेल…

जॉर्ज हर्बर्ट ले मेलोरी George Herbert Leigh Mallory | एक निष्णात आणि प्रचंड साहसी गिर्यारोहक. हा एका पाद्रीचा clergyman | मुलगा. त्याचे वडील हर्बर्ट ले मेलोरी, तर आई अॅनी बरिज Annie Beridge | तीही वॉल्टन डर्बिशायरमधील एका पाद्रीचीच मुलगी. जॉर्जला दोन बहिणी आणि एक लहान भाऊ. भावाचं नाव ट्रॅफर्ड ले मेलोरी. असं हे चेशायरच्या (Cheshire) मॉबर्ली या लहानशा गावातलं सहा जणांचं कुटुंब. जॉर्जचा (George Mallory) जन्म १८ जून १८८६ चा. मॉबर्लीतल्या हॉबक्राफ्ट लेनमध्ये १० बेडरूमच्या आलिशान बंगल्यात वाढलेला जॉर्ज तसं पाहिलं तर पुढील आयुष्य सुखेनैव व्यतित करू शकला असता; पण छे.. साहसाला बंधनं मान्य नसतात.

बालपणापासून गिर्यारोहणाची आवड


लहानपणीच जॉर्जला (George Mallory) रॉक क्लायंबिंग आणि माउंटेनिअरिंगने ओळख करून दिली ती आरएलजी आयर्विंग यांनी. हे आयर्विंग महाशय आल्प्सला दरवर्षी निवडक मुलांना घेऊन जायचे. अर्थात, जॉर्जने (George Mallory) आधी शिक्षण पूर्ण करण्याचा ध्यास घेतला.

जॉर्ज हुशार होताच, शिवाय नवनवीन विषयांचे ज्ञान अर्जित करण्यातही त्याला कमालीची ओढ असायची. त्याने १९०५ मध्ये केम्ब्रिज विद्यापीठाच्या माग्दालीन महाविद्यालयात प्रवेश घेतला. महाविद्यालयीन जीवनात त्याला चांगले मित्रही लाभले. हाच मित्रांचा मेळा पुढे ब्लूम्सबरी ग्रुपशी Bloomsbury Group | जोडला गेला. वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा हा ग्रुप. या मित्रांमध्ये रुपर्ट ब्रुक Rupert Brooke | होता, जो पुढे विख्यात कवी म्हणून नावाजला गेला. पहिल्या महायुद्धावरील त्याच्या ‘दि सोल्जर’ कवितेने त्याला विशेष लोकप्रिय बनवले.

आणखी एक मित्र होता जॉन मेनार्ड केन्स John Maynard Keynes | त्याची अर्थशास्त्रावर हुकूमत. जेम्स स्ट्रॅची James Strachey | हा पुढे मनोविश्लेषक झाला. लिटन स्ट्रॅची Lytton Strachey | हा ब्रिटिश लेखक आणि समीक्षक, डंकन ग्रँट Duncan Grant | उत्तम चित्रकार…

या डंकनने जॉर्जची काही पोर्ट्रेटही बनवली होती. ही मित्रांची यादी पाहिली तर जॉर्ज (George Mallory) नशीबवानच म्हणायला हवा. या मित्रांमध्ये जॉर्ज एकमेव खेळाडू. महाविद्यालयात तो रोइंगही उत्तम करायचा.

ज्या वेळी जॉर्ज (George Mallory) एव्हरेस्ट मोहिमेवर गेला होता, त्यानंतर त्याच्या आठवणींत १९०९ मध्ये लिटन स्ट्रॅचीने लिहिले होते…

“जॉर्ज… सहा फूट उंचापुरा देखणा. त्याची शरीरयष्टी उत्तम खेळाडूला शोभेल अशी.. जणू प्रॅक्सिटेल्सच. | Praxiteles | (प्रॅक्सिटेल्स चौथ्या शतकातला देखणा तरुण. याचा नग्नावस्थेतील पुतळा मानवाच्या उंचीइतकाच आजही ग्रीसमधील एका वस्तुसंग्रहालयात आहे. स्ट्रॅचीने जॉर्जची तुलना या प्रॅक्सिटेल्सशी केली आहे.) आणि त्याचा चेहरा.. विलोभनीय. बोटिचेलीने साकारलेल्या चित्रातील तरुणासारखा देखणा.”

जॉर्ज (George Mallory) देखणाच नव्हता, तर हुशारही तितकाच होता. डिग्री घेतल्यानंतर त्याने केंब्रिज विद्यापीठात वर्षभर शिक्षण घेतलं आणि १९१२ मध्ये ‘बोस्वेल अ बायोग्राफर’ नावाचा एक निबंधही सादर केला. काही काळ त्याने फ्रान्समध्येही घालवला. नंतर त्याने चार्टरहाउस या इंग्लंडमधील प्रतिष्ठित अशा सार्वजनिक शाळेत शिक्षकाची नोकरी पत्करली. येथे त्याला रॉबर्ट ग्रेव्हज नावाचा विद्यार्थी भेटला, जो पुढे विख्यात कवी म्हणून ओळखला गेला.

जॉर्जची आठवण सांगताना ग्रेव्हज म्हणाला, “जॉर्जने (George Mallory) शिक्षकीपेशात वेळ वाया घालवला. तो विद्यार्थ्यांशी शिक्षकाप्रमाणे कधीच वागला नाही. एक मित्र म्हणूनच वावरला. कदाचित शाळेला ते रुचले नसेल.”

रुथ टर्नरशी विवाह


चार्टरहाउसमध्ये असतानाच जॉर्जची ओळख रुथ टर्नरशी Ruth Turner | झाली. ही ओळख प्रेमात झाली आणि १९१४ मध्ये ते विवाहबद्ध झाले. लग्नानंतर सहाच दिवसांनी ब्रिटन आणि जर्मनीत युद्ध झाले. जॉर्ज आणि रुथला तीन मुले झाली. थोरल्या मुलीचा जन्म १९१५ चा. फ्रान्सेस तिचं नाव. दुसरी मुलगी बरिज रुथ उर्फ बेरी. तिचा जन्म १९१७ मधील. आणि सर्वांत लहान मुलगा जॉन १९२० मध्ये जन्मला. दुर्दैवाने या चारही मुलांना पितृसुख लाभलंच नाही.

आपल्या कुटुंबासमवेत जॉर्ज मेलोरी. (स्रोत- गुगल)

दुसऱ्या महायुद्धात सहभाग


शिक्षकी पेशात जॉर्ज रमला होता. मात्र, १९१४ मध्ये जगात अशा काही घटना घडामोडी घडल्या, की ज्यामुळे जॉर्जला (George Mallory) लेखणी सोडून बंदूक हाती घ्यावी लागली! कारण याच काळात म्हणजे १९१४-१८ दरम्यान पहिलं महायुद्ध झालं. तो फ्रेंच सेनेकडून लढला. हे महायुद्धच त्याची साहसी प्रतिमा अधिक अधोरेखित करून गेलं. एक गिर्यारोहक म्हणून त्याची प्रतिमा तयार झाली. कारण डिसेंबर १९१५ मध्ये जॉर्जची सेकंड लेफ्टनंटपदावर नियुक्ती झाली. १ जुलै १९१७ मध्ये त्याला लेफ्टनंट पदावर बढती मिळाली. अखेर २१ फेब्रुवारी १९२० मध्ये तो आर्मीतून बाहेर पडला आणि गिर्यारोहणात त्याने आपले कसब आजमावले.

‘एव्हरेस्ट’च्या साहसी मोहिमेवर…


जॉर्जने माउंट एव्हरेस्ट Mount Everest | मोहिमेत ब्रिटिश सरकारच्या वतीने तीन वेळा सहभाग घेतला होता. या मोहिमा होत्या १९२१, १९२२ आणि १९२४ या वर्षातल्या. जॉर्जला तशीही रॉक क्लायंबिगची आवड होतीच. जॉर्जने एव्हरेस्ट मोहिमेत सहभाग घेतला तेव्हा हे शिखर फारसं कुणाला माहीतही नव्हते. या शिखराची माहिती घेण्यासाठी ब्रिटिश गिर्यारोहकांनी हे शिखर सर करण्याचा निर्णय घेतला. यात जॉर्जची निवड झाली. त्या वेळी जॉर्जच्या तिन्ही मुलांनी वयाची दहा वर्षेही ओलांडलेली नव्हती. 

माउंट एव्हरेस्ट मोहिमेसाठी जॉर्ज मेलोरीची निवड सहजपणे झालेली नाही. इच्छा झाली नि मोहिमेवर गेला असं अजिबात नव्हतं. त्यासाठी शास्त्रशुद्ध निवडप्रक्रिया होती, जी आज फारशी गांभीर्याने घेतली जात नाही. त्या वेळी या मोहिमेसाठीची निवडप्रक्रिया भयंकर होती.

एका चेंबरमध्ये गिर्यारोहकाला दिवसभर बंद केले जात होते. जेम्स बाँडच्या चित्रपटातील खलनायक जसे नायकाचा छळ करण्यासाठी एखाद्या खोलीत बंद करून त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न करायचे, तसाच हा चेंबर असायचा. जेम्स बाँडच्या चित्रपटांतली ही कल्पना कदाचित याच निवडप्रक्रियेतून घेतली असावी.

या चेंबरमध्ये खाली उतरताना कृत्रिम हिमालयीन हवा वेगाने सोडली जायची. किमान तासभर ती असायची. त्यामुळे चेंबरचे तापमान उणे 40 अंश सेल्सिअसपर्यंत असायचे. एव्हरेस्टवरील तापमानाइतकं वातावरण या चेंबरमध्ये असायचं. यात ऑक्सिजनची मात्रा शोषून घेतली जात होती. या परीक्षेत फिंच आणि जॉर्ज मेलोरी हे दोघेच उत्तीर्ण झाले होते.

पहिली मोहीम


जॉर्ज मेलोरीने १९२१ मध्ये ब्रिटिश रिकनायसन्स एक्सपीडिशनमध्ये (British Reconnaissance Expedition) सहभाग घेतला. ही मोहीम आयोजित आणि प्रायोजित केली होती माउंट एव्हरेस्ट कमिटीने. उत्तरी मार्गाने ही मोहीम आखण्यात आली. लष्करात नोकरी केल्याने जॉर्जकडे नेतृत्वगुणही होते. त्यामुळे आपसूकच मोहिमेच्या एका गटाचे नेतृत्वही त्याच्याकडे चालून आले. सोबतीला डझनावर शेर्पा होते. मात्र, बिकट हवामानामुळे जॉर्जच्या टीमला माघारी फिरावे लागले. पहिली मोहीम फारशी समाधानकारक ठरली नाही. अन्यथा याच मोहिमेत जॉर्ज पहिला एव्हरेस्टवीर ठरला असता.

दुसरी मोहीम


अर्थात, अजूनही पहिला एव्हरेस्टवीर कोण याचं उत्तर स्पष्ट नव्हतं. १९२२ मध्ये पुन्हा मोहीम आखण्यात आली. मोहिमेचे नेतृत्व ब्रिगेडिअर जनरल चार्ल्स ब्रुस (Charles Bruce) यांच्याकडे होते. ही मोहीम फत्ते होणारच ही एक आशा होती. कारण पहिली मोहीम फसली असली तरी त्यातून जो अनुभव मिळाला, त्याचा फायदा त्यांना पुढे मिळाला.

एडवर्ड स्ट्रट्स हॉवर्ड सोमरवेल, एडवर्ड नॉर्टन यांच्यासोबत जॉर्ज मेलोरीने २६,९८० फुटापर्यंत (८,२२५ मीटर) चढाई केली. हा एक विक्रमच होता. कारण एवढ्या उंचीवर आजपर्यंत कोणीही गेलं नव्हतं. मेलोरीकडे एका ग्रुपचं नेतृत्व होतं. नियोजनबद्ध चढाईसाठी केलेली ही विभागणी होती. एव्हरेस्ट त्यांच्यापासून फक्त दोन हजार फुटांवर होतं. मेलोरीला खात्री होती, की एव्हरेस्ट फत्ते केल्याशिवाय थांबायचं नाही. मात्र, दुर्दैव आड आलं. अचानक वादळ आलं…

काही कळण्याच्या आत हिमस्खलनामुळे मेलोरीच्या ग्रुपमधील सात शेर्पा बर्फाखाली दबले गेले. एकाच वेळी सात शेर्पांनी जीव गमावल्याचा मोठा धक्का मेलोरीला बसला. त्यामुळे ही मोहीम अर्ध्यावरच सोडून त्याला माघारी परतावं लागलं. मेलोरी आतून पुरता हादरला. सात जणांना मृत्यूच्या खाईत ढकललं, अशी भावना त्याच्या मनात घर करून राहिली. त्याचा परिणाम पुढच्या मोहिमेवर झाला.

अखेरची मोहीम रहस्यमयी


दोन वर्षांच्या विश्रांतीनंतर १९२४ मध्ये पुन्हा एकदा मोहीम आखण्यात आली. या वेळी जॉर्ज मेलोरी नाखूश होता. या मोहिमेसाठी तो अजिबात इच्छुक नव्हता. त्याच्या डोळ्यांसमोर झालेला शेर्पांचा मृत्यू त्याला कमालीचा अस्वस्थ करीत होता. त्यातून तो अजूनही सावरलेला नव्हता. शिक्षकी पेशाची नोकरी आता त्याला सोडावीशी वाटत नव्हती. पत्नी रुथ आणि त्याची चिमुकली मुलं यामुळे त्याचा पाय आता निघत नव्हता; पण काय कोण जाणे, तो या मोहिमेसाठी अखेर सज्ज झाला. अर्थात, या वेळी तो मनापासून मोहिमेवर निघालाच नव्हता.

श्रीमंत महिलेची जॉर्जला अजब ऑफर


जेफ्री आर्चरने जॉर्ज मेलोरीवर ‘पाथ्स ऑफ ग्लोरी’ Paths of Glory | नावाची एक कादंबरी लिहिली आहे. त्यात धक्कादायक घटना नमूद केली आहे- एव्हरेस्ट मोहिमेवर जाण्यापूर्वी १९२३ मध्ये जॉर्ज मेलोरी एका अभ्यास दौऱ्यासाठी अमेरिकेला गेला होता.

तेथे एका धनाढ्य महिलेने जॉर्जला एव्हरेस्ट मोहिमेसाठी १० हजार डॉलरची मदत देऊ केली होती. मात्र, त्यासाठी तिने एक अट घातली. ती म्हणजे जॉर्जने तिच्यासोबत एक रात्र काढावी! जॉर्जला ही अट भयंकरच वाटली. त्याने ती ऑफर थेट नाकारली नाही; पण ती जेव्हा स्नानगृहात गेली तेव्हा जॉर्जने तेथून पलायन केलं. म्हणजे ज्या अपार्टमेंटमध्ये ती महिला राहत होती, तेथील खिडकीतून तो स्पायडर मॅनसारखा पसार झाला. असो. तिसऱ्या मोहिमेबाबत त्याला पहिल्यासारखी ओढ नव्हती. मात्र, ही मोहीम निर्धाराची होती. दोन मोहिमा अयशस्वी ठरल्या तरी तिसरी मोहीम यशस्वी होईलच, अशी त्याला खात्री होती.

तो सहकारी सँडी आयर्विनसह एव्हरेस्टच्या शिखराच्या अगदी समीप पोहोचले. त्यांच्यापासून शिखर अवघ्या साडेसहाशे फुटांवर होतं. मात्र, काही क्षणातच भयंकर वारे वाहू लागले आणि या वादळात जॉर्ज आणि आयर्विन दोघेही बेपत्ता झाले.

त्यांचा मित्र ओडल त्यांना शोधण्यासाठी दोन वेळा २७ हजार फुटांवर जाऊन आला. मात्र, दोघे कुठेच सापडले नाहीत. मग ते शिखरावर गेले होते का, शिखरावरून परतताना ते कसे बेपत्ता झाले, अशा अनेक प्रश्नांनी जगभरात चर्चा झडू लागल्या. अनेक कयास बांधले जाऊ लागले… मात्र, हाती ठोस काही लागले नसल्याने या मोहिमेचं गूढ आजपर्यंत कायम राहिलं. मात्र, अनेकांना विश्वास होता, की जॉर्ज मेलोरी हाच पहिला एव्हरेस्टवीर आहे. 

शोधमोहिमेची पंचाहत्तरी!


एव्हरेस्टच्या इतिहासात जॉर्ज आणि आयर्विन एक रहस्य बनले होते. हे रहस्य उलगडायचे असेल तर जॉर्ज मेलोरी आणि आयर्विनचा मृतदेह हाती लागणे आवश्यक होतं. कारण त्यांचा मृत्यू एव्हरेस्टवरून परततानाच झाला होता की एव्हरेस्ट चढताना झाला होता, हा शोध महत्त्वाचा होता. पहिला एव्हरेस्टवीर कोण, याचं उत्तर शोधणं महत्त्वाचं होतं. यामुळे पहिल्या एव्हरेस्टवीराचा विक्रम कदाचित जॉर्ज मेलोरी आणि सँडी आयर्विन यांच्या नावावर असू शकेल; पण पुरावे हाती लागत नव्हते. त्यासाठी या दोघांचा मृतदेह हाती लागणे आवश्यक होते. त्यांना शोधण्यासाठी अनेक मोहिमा राबविण्यात आल्या. या मोहिमा आणि मेलोरी, आयर्विनचे बेपत्ता होणे यावर अनेक पुस्तके लिहिली गेली आहेत.

एका घटनेने जॉर्ज आणि आयर्विनच्या शोधमोहिमेने नवी कलाटणी मिळाली. १९३६ मध्ये फ्रँक स्माइथने जॉर्ज मेलोरीचा मृतदेह पाहिल्याचा दावा केला होता. फ्रँक हा ब्रिटिश गिर्यारोहक. तो एक लेखक, फोटोग्राफर आणि वनस्पतिशास्त्राचा अभ्यासकही होता. त्याने सांगितले, की जेथे आयर्विनची १९३३ मध्ये कुऱ्हाड सापडली, तेथेच मला एक मृतदेह दिसला. माझ्यापासून तो खूपच लांब होता. मी उच्च दर्जाच्या टेलिस्कोपने त्या मृतदेहाचा चेहरा पाहण्याचा प्रयत्न केला. मात्र, दगडांमुळे तो स्पष्टपणे दिसू शकला नाही; पण ती हीच जागा होती, जेथून मेलोरी आणि आयर्विन कोसळले असावेत.

त्याने ही महत्त्वाची बाब ब्रिटिश सैन्याधिकारी व गिर्यारोहक एडवर्ड फेलिक्स नॉर्टन यांना पत्राद्वारे सांगितली होती. ही प्रसारमाध्यमांसाठी सनसनाटी न्यूज ठरली असती. मात्र, हे पत्र समोर आलेच नाही. २०१३ मध्ये फ्रँकच्या मुलाने फ्रँकचं जीवनचरित्र लिहिलं, तेव्हा या पत्राचा मजकूर लोकांसमोर आला. त्या वेळी पहिला एव्हरेस्टवीर कोण, या प्रश्नाने पुन्हा उचल खाल्ली.

चिनी गिर्यारोहकाकडून मिळाली माहिती, पण…


एकवेळ एव्हरेस्टची मोहीम सोपी आहे, पण एखादा मृतदेह शोधून तो खाली आणणे भयंकर आव्हानात्मक आहे. जॉर्जचा मृतदेह हाती लागणं कठीण होतं. तो नेमका कुठे कोसळला असेल, याचा अंदाज येत नव्हता. शोधमोहिमेतलाच एक टॉम होल्झेल याला एक सुगावा मिळाला. १९७५ मध्ये ८१०० मीटरवर एका ब्रिटिश माणसाचा मृतदेह ओलांडून चिनी गिर्यारोहक पुढे गेला होता. हा चिनी गिर्यारोहक होता वँग हंग्बाओ. ही माहिती टॉम होल्झेलचा टेंट-मेट (जसा रूममेट असतो, तसा एव्हरेस्टवर एकाच तंबूत असलेल्या सहकाऱ्याला टेंट-मेट म्हणतात) झँग जुन्यान या चिनी गिर्यारोहकाकडून मिळाली.

हा महत्त्वाचा धागा हाती लागला होता. मग झँगच्या मदतीने होल्झेल वँगला भेटला. आता वँग हाच एकमेव दुवा होता, ज्याने ८१०० मीटरवर एक मृतदेह पाहिला होता. त्याचं वर्णन जॉर्ज मेलोरीशी मिळतंजुळतं होतं. ही माहिती शोधमोहिमेला बळ देणारी होती. या एवढ्या एकाच माहितीच्या आधारावर होल्झेलने १९८६ मध्ये शोधमोहीम राबवली. सोबत वँगही होताच. दुर्दैवाने या मोहिमेच्या दुसऱ्याच दिवशी भयंकर अशा हिमस्खलनात वँगचा मृत्यू झाला. एका महत्त्वाच्या टप्प्यात या मोहिमेतला ऑक्सिजनच गेला. वँगने जी तोंडी माहिती दिली होती ती पुरेशी ठरणार नव्हती.

मेलोरी आणि आयर्विन शोधमोहिमेचा दुसरा अंक


एक अत्यंत महत्त्वाची मोहीम फसली. तब्बल १३ वर्षे ही मोहीम थंडावली. अखेर १९९९ मध्ये दुसरी शोधमोहीम राबविण्यात आली. या मोहिमेचं नाव होतं ‘मेलोरी आणि आयर्विन शोधमोहीम’. या मोहिमेचे प्रायोजक होते ‘नोव्हा’ आणि बीबीसी. बीबीसी तर सर्वांनाच माहिती आहे; पण ‘नोव्हा’ हा एक अमेरिकेतला लोकप्रिय टीव्ही शो होता. ही मोहीम आखली होती एरिक सिमन्सन यांनी. याच एरिककडे या मोहिमेचं नेतृत्व होतं.

एरिक अमेरिकेतील पर्वतारोहणाचा मार्गदर्शक होता. १ मे १९९९ रोजी या मोहिमेला सुरुवात झाली. या मोहिमेत कोनार्ड एंकरचाही (Conrad Anker) समावेश होता. कोनार्ड एक उत्तम रॉक क्लायंबर आणि गिर्यारोहक होता. त्याने कसून शोध घेतला नि अखेर त्याला ८,१५७ मीटर उंचीवर बर्फात गोठलेला एक मृतदेह आढळला. हा मृतदेह होता जॉर्ज मेलोरीचा.

ज्याच्यासाठी जिवाचं रान केलं तो अखेर सापडला. इथेच कुठे तरी आयर्विनचाही मृतदेह असू शकेल. कारण त्याच्याकडेच कॅमेरा होता. हा कॅमेरा जर हाती लागला तर महत्त्वाचे पुरावे जगासमोर येणार होते. हेच पुरावे पहिला एव्हरेस्टवीर कोण, याचाही खुलासा करणार होते.

जॉर्ज मेलोरीचं पार्थिव ७५ वर्षांनंतरही उत्तम स्थितीत होतं. ३७ वर्षांच्या देखण्या मेलोरीचं तरुण शरीर निपचित पडलेलं होतं. आज तो जिवंत असता तर एक जख्खड म्हातारा असता; पण बर्फाने त्याचं तारुण्य जपलं होतं. त्याच्या अंगावरील कपड्यावर लिहिलेलं होतं- ‘जी. ले मेलोरी’ G. Leigh Mallory | जॉर्जच्या पार्थिवावरून पितळी धातूतलं अल्टिमेटर, लेदर पॉकेटमधील एक चाकू आणि दोन स्नो गॉगल आढळले. गॉगलना कुठेही तडा गेलेला नव्हता.

खिशात एक पत्र होतं आणि बिलाची पावती होती. लंडमधील कुणा तरी सप्लायरकडून त्याने क्लाइंबिंगचं जे साहित्य घेतलं होतं, त्याचं ते बिल होतं. यावरून एक स्पष्ट झालं, की हा मृतदेह जॉर्ज मेलोरीचाच होता. पण तो कॅमेरा काही मिळाला नाही, ज्यात शिखर सर केल्याचा पुरावा होता. पहिला एव्हरेस्टवीर कोण हा प्रश्न अजूनही तसाच होता… 

जॉर्जचा मृतदेह सापडला, पण पुरावा नाही…


जॉर्ज मेलोरीचं पार्थिव सापडलं, तरी मोहीम थांबलेली नव्हती. आयर्विनचा शोध बाकी होता. मेलोरी सापडूनही ठोस माहिती हाती लागलेली नव्हती. अखेर मेलोरीचं पार्थिव घेऊन ही मोहीम दोन वर्षांसाठी पुन्हा थांबली. नंतर २००१ मध्ये पुन्हा शोधमोहीम राबविण्यात आली. जॉर्ज आणि आयर्विन या दोघांनी शेवटचा मुक्काम केला होता, त्या ठिकाणाचा शोध लागला; पण ना आयर्विनचा मृतदेह आढळला, ना त्याचा कॅमेरा. ही मोहीमही निष्फळ ठरली. ज्याने मेलोरीचा मृतदेह शोधला, त्या कोनराडने २००७ मध्ये अल्टिट्यूड एव्हरेस्ट एक्सपीडिशन (altitude everest expedition) ही अखेरची मोहीम राबवली. या मोहिमेच्याही हाती काहीही लागले नाही. अखेर या शोधमोहिमांनी कायमचा पूर्णविराम घेतला. याबरोबरच पहिला एव्हरेस्टवीर कोण याचं गूढ गिर्यारोहकांना कायम अस्वस्थ करीत राहिलं.

पहिला एव्हरेस्टवीर कोण?


आता प्रश्न हा होता, की जॉर्ज मेलोरी खरंच पहिला एव्हरेस्टवीर होता का? केवळ या प्रश्नाभोवती संपूर्ण जगाचं लक्ष लागलं होतं. तसं जर असेल तर आजपर्यंत ज्या तेन्झिंग नोर्गे आणि एडमंड हिलरी यांना पहिले एव्हरेस्टवीर मानले जात होते, त्यांचा हा विक्रम क्षणात नाहीसा होणार होता.

जॉर्जचं पार्थिव खाली आणलं गेलं. मात्र, त्याचं अंतिम दर्शन घ्यायला त्याची पत्नी रुथ नव्हती. तिने जॉर्जच्या विरहात १८ वर्षे काढली आणि १९४२ मध्येच या जगाचा कायमचा निरोप घेतला.

जॉर्जच्या मृतदेहासोबत काही कागदपत्रे मिळाली. मात्र, त्यात त्याची पत्नी रुथचा फोटो नव्हता. जॉर्जचं रुथवर निरतिशय प्रेम होतं. जेव्हा तो तिच्यापासून लांब राहायचा, तेव्हा तो तिचा एक फोटो नेहमी सोबत ठेवायचा.

तो एव्हरेस्टच्या मोहिमेवर निघाला तेव्हा तो पत्नीला म्हणाला होता, की मी तुझा फोटो शिखरावर ठेवेन. जॉर्जच्या पार्थिवासोबत तो फोटो नव्हता. याचा अर्थ जॉर्ज शिखरावरून परतत असल्याचा दावा केला जात आहे. अर्थात, हा पुरावा म्हणून ग्राह्य धरला गेला नाही.

कदाचित त्याच्या पार्थिवावरून तो फोटोही कुठे तरी पडला असावा. अर्थात, तर्क अनेक लावता येतील; पण एक पुष्टी मिळत होती, ती म्हणजे जॉर्ज शिखरावर गेला असावा. कारण बिलाची पावती जर खिशात जशीच्या तशी मिळू शकत असेल तर फोटो का नाही? मग फोटो नसेल तर तो नक्कीच शिखरावर जाऊन आला असेल.

अर्थात, हे अंदाज आहेत, युक्तिवाद आहेत. त्याला अधिकृत दुजोरा कसा मिळणार? तो मिळणार होता फक्त आयर्विनच्या कॅमेऱ्यातूनच. पण तो अखेरपर्यंत सापडलाच नाही.

जॉर्ज मेलोरी- सँडी आयर्विन हेच पहिले एव्हरेस्टवीर


मार्क मॅकेंझी यांचं एक पुस्तक आहे… ‘दि वाइल्डेस्ट ड्रीम, काँक्वेस्ट एव्हरेस्ट’ (The wildest dream, Conquest of Everest) या पुस्तकात मॅकेंझी यांनी काही तथ्ये मांडली आहेत, ज्यातून पुष्टी मिळतेय, की जॉर्ज मेलोरी आणि सँडी आयर्विन यांनी सर्वप्रथम एव्हरेस्ट सर केले होते.

एव्हरेस्ट जगातील सर्वांत उंच शिखर आहे. ज्या वेळी तुम्ही शिखराच्या पायथ्याशी असतात, तेव्हा तुम्हाला गिर्यारोहक ठिपक्यासारखे उंचावर गेलेले पाहायला मिळतात. ८ जून १९२४ रोजी अनेकांनी जॉर्ज आणि आयर्विन या दोघांना ठिपक्यासारखं शिखराकडे कूच करताना पाहिलं होतं.

अचानक ढग भरून आले आणि वादळ घोंगावू लागलं. त्याच वेळी हे दोन्ही ठिपके अचानक गायब झाले.

ब्रिटनचा गिर्यारोहणातील तज्ज्ञ ग्रॅहम होयलँडने (Graham Hoyland) असा दावा केला आहे, की जॉर्ज मेलोरी आणि सँडी आयर्विन हेच माउंट एव्हरेस्ट सर्वांत प्रथम सर करणारे गिर्यारोहक होते. मात्र, शिखरावरून परतताना त्यांचा मृत्यू झाला.

ही माहिती त्यांनी तीन दशकांच्या शोधानंतर दिली आहे. ग्रॅहम होयलँड आठ वेळा माउंट एव्हरेस्ट सर केले आहे. त्यांना पर्वतारोहणाचा गाढा अनुभव आहे. हेच होयलँड जॉर्ज मेलोरी यांच्या गटात मिशनरी डॉक्टरच्या रूपातही सहभागी झालेले होते.

यातून मिळते पुष्टी


जॉर्ज मेलोरी शिखरावर पोहोचल्याची पुष्टी आणखी एका गोष्टीने मिळते, ती म्हणजे शिखरावरून खाली उतरताना गिर्यारोहक चष्मा लावत नाही. ज्या वेळी मेलोरीचा मृतदेह आढळला त्या वेळी त्याचे दोन्ही चष्मे सुस्थितीत आढळले. याचाच अर्थ, मेलोरीने एव्हरेस्ट मोहीम फत्ते केली होती. मात्र, उतरताना तो आयर्विनसह वादळात सापडले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

पुष्टी मिळाली, पण त्याला ठोस पुरावा नव्हता. तो त्यांच्या कॅमेऱ्यातूनच मिळू शकेल. कॅमेरा न मिळाल्याने पहिल्या एव्हरेस्टवीराची ही मोहीम एक रहस्य बनली आहे. मेलोरीची शोकांतिका म्हणजे त्याचा मृतदेहच सापडला ७५ वर्षांनी.

त्याला अखेरचा निरोप देण्यापूर्वीच पत्नी रुथने वयाच्या ५० व्या वर्षीच जगाचा निरोप घेतला. त्याची मुलगी बरिज रुथ उर्फे बेरीलाही आपल्या वडिलांना पाहता आले नाही. ती सात वर्षांची असताना जॉर्ज मोहिमेवर गेला. त्यानंतर बेरीला तिचे वडील कधीच भेटले नाही.

वयाच्या ३६ व्या वर्षी १९५३ मध्ये तिचे निधन झाले. थोरली मुलगी फ्रान्सेस वयाच्या ८४ व्या वर्षी ३७ वर्षीय वडिलांना शेवटचं पाहू शकली. वयाच्या नवव्या वर्षी तिने ज्या रूपात शेवटचं पाहिलं होतं त्याच रूपात ती वडिलांचं पार्थिव पाहू शकली.

सर्वांत लहान जॉन वयाच्या ७९ व्या वर्षी वडिलांना अखेरचा निरोप देत होता. या शोकांतिकेला काय म्हणावं? ना शिखर सर केल्याचं गूढ उकललं, ना अखेरच्या प्रवासाला कुटुंब सोबत होतं…

Read more at

Ang Rita Sherpa
Mount Everest series

Ang Rita Sherpa | ऑक्सिजन नाकारणारा हिमबिबट्या

September 23, 2020
All Sports

Edmund Hillary : First on Everest

October 28, 2020
Edmund Hillary : First on Everest
Mount Everest series

हिमालयातला वाघ ः तेन्झिंग नोर्गे

October 28, 2020
George Mallori mystery on everest
All Sports

पहिल्या एव्हरेस्टवीराची शोकांतिका

October 29, 2021
जगातील सर्वोच्च सात शिखरं सर करणारी एकमेव दिव्यांग महिला.
Inspirational Sport story

अंगावर शहारे आणणारी अरुणिमाची कहाणी

October 27, 2020
Mount Everest series part 5 | फ्रॅन्सिससोबत पती सर्गेई अर्सेंटिएव आणि मुलगा पॉल
All Sports

Mount Everest series 5 : मनाचा थरकाप उडविणारी स्लीपिंग ब्यूटी (उत्तरार्ध)

October 29, 2021

 

 

 

Share this:

  • Twitter
  • Facebook
Tags: An Enduring Mystery on Everest: The Story of MalloryGeorge Herbert Leigh Mallorygeorge mallory and andrew irvineGeorge Mallory Mount Everestgeorge mallory moviegeorge mallory quotesGeorge Mallory's Body Uncovered On Mount Everesthow did george mallory dieLifelong secret of Everest pioneermallory everestmount everest bodiesMystery On Everestruth mallorywhere is george mallory buriedपहिल्या एव्हरेस्टवीराचं गूढपहिल्या एव्हरेस्टवीराची शोकांतिका
Mahesh Pathade

Mahesh Pathade

Next Post
t-20-world-cup-postponed

टी-20 वर्ल्डकप स्थगित होणार?

Comments 14

  1. Chandrakant Hiralal .Yadav says:
    2 years ago

    फार मस्त लिहिलंय थरार उतरलाय पण जीव धोक्यात घालून एव्हरेस्ट चढणाऱ्या ने दहा हजार डॉलर मिळत असताना तिथे चढायलाका नकार दिला हे कळे ना आपल्या सारख्याला मूड नसेल बहुदा

    Reply
    • Mahesh Pathade says:
      2 years ago

      🙂

      Reply
  2. Meghana wagh says:
    2 years ago

    very nice article

    Reply
    • Mahesh Pathade says:
      2 years ago

      THANK YOU SO MUCH

      Reply
  3. Meghana wagh says:
    2 years ago

    Informative article

    Reply
    • Mahesh Pathade says:
      2 years ago

      Thank you so much 🙂

      Reply
  4. Pingback: हिमालयातला वाघ ः तेन्झिंग नोर्गे - kheliyad
  5. Pingback: अंगावर शहारे आणणारी अरुणिमाची कहाणी - kheliyad
  6. Pingback: Mount Everest series 5 : मनाचा थरकाप उडविणारी स्लीपिंग ब्यूटी (उत्तरार्ध) - kheliyad
  7. Pingback: Mount Everest series 3 : शोकांतिका ग्रीन बुटाची... - kheliyad
  8. Pingback: सगरमाथ्याची गदळगाथा - kheliyad
  9. Pingback: माउंट एव्हरेस्ट ः शिखर की साहसाचं मखर? - kheliyad
  10. Pingback: Edmund Hillary : First on Everest - kheliyad
  11. Pingback: Mount Everest series 4 : मनाचा थरकाप उडविणारी स्लीपिंग ब्यूटी! (पूर्वार्ध) - kheliyad

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Twitter Youtube Pinterest Tumblr Instagram LinkedIn Telegram

______________________________

U-19 Cricket World cup

आयपीएल 2022 च्या मोसमात खेळाडूंवरील रकमा ऐकाल तर डोळे विस्फारतील

  1. Sports Quiz
  2. Inspirational Story
  3. अजबगजब खेळ
  4. kheliyad Chess Puzzle
  5. Tennis

© 2020 Kheliyad Copyright © 2020 Website The "kheliyad" is not responsible for the content of external sites.

No Result
View All Result
  • Home
  • Cricket
  • All Sports
  • Inspirational story
  • Online Chess Puzzle
  • Raanwata
  • Video
  • sports quiz

© 2020 Kheliyad Copyright © 2020 Website The "kheliyad" is not responsible for the content of external sites.

error: Content is protected !!