Thursday, April 15, 2021
kheliyad
  • Home
  • Cricket
  • Football
  • Other sports
  • Inspirational story
  • Online Chess Puzzle
  • Tennis
No Result
View All Result
  • Home
  • Cricket
  • Football
  • Other sports
  • Inspirational story
  • Online Chess Puzzle
  • Tennis
No Result
View All Result
kheliyad
No Result
View All Result

Ang Rita Sherpa | ऑक्सिजन नाकारणारा हिमबिबट्या

गिर्यारोहक आंगरिता शेर्पा Ang Rita Sherpa | यांचं 21 सप्टेंबर 2020 रोजी निधन झालं. त्याबद्दल त्यांना वाहिलेली सुमनांजली...

Mahesh Pathade by Mahesh Pathade
September 23, 2020
in Mount Everest series, Other sports
2
Ang Rita Sherpa
Share on FacebookShare on Twitter

 

Ang Rita Sherpa |

ऑक्सिजन नाकारणारा हिमबिबट्या


माउंट एव्हरेस्टच्या मालिकेतील ही नववी कहाणी. माउंट एव्हरेस्ट तर सगळेच सर करतात, पण ऑक्सिजनशिवाय विक्रमी दहा वेळा शिखर सर करणारा गिर्यारोहक निराळाच म्हणावा लागेल. ही विक्रमी कामगिरी साकारणारे गिर्यारोहक आंगरिता शेर्पा Ang Rita Sherpa | यांचं 21 सप्टेंबर 2020 रोजी निधन झालं. त्याबद्दल त्यांना वाहिलेली सुमनांजली…

Ang Rita Sherpa

काही महिन्यांपूर्वी एक बातमी वाचली होती. इस्रायलच्या तेल अवीव विद्यापीठाच्या संशोधकांनी एक असा सजीव शोधून काढला, जो ऑक्सिजनशिवाय राहू शकतो… अनेकांचे डोळे विस्फारले असतील. विस्फारणारच! आज ऑक्सिजनचं महत्त्व किती आहे, हे पाहता भुवया उंचावण्याची प्रतिक्रिया स्वाभाविकच म्हणावी लागेल…

हा सजीव जेलीफिशसारखा असून, त्याला हेन्नेगुया सल्मिनीकोला असं नाव देण्यात आलं आहे. या सजीवात म्हणे, मायटोकाँड्रियल जीनोम Mitochondrial Genome नाही. हा असा जीनोम आहे, ज्याच्यामुळे त्या सजीवाला ऑक्सिजनची गरजच नाही…

हे ऐकल्यानंतर मला तर अजिबातच आश्चर्य वाटलं नाही… कारण हा शोध अगदी अलीकडचा आहे. नेपाळमध्ये तर 1948 मध्येच याच्यापेक्षा भारी एक सजीव जन्मला, ज्याचं नाव आंगरिता शेर्पा (Ang Rita Sherpa).

त्याने तर माउंट एव्हरेस्टचं शिखर तब्बल दहा वेळा ऑक्सिजनशिवाय सर केलंय. इस्रायलच्या सजीवाला जसं शास्त्रीय नाव दिलं, तसं या नेपाळच्या सजीवालाही हिमबिबट्या Snow Leopard | म्हणून ओळखलं जातं…

हो, पण या नेपाळच्या सजीवात मायटोकाँड्रियल का काय ते आहे की नाही माहीत नाही, पण तो ऑक्सिजनशिवाय पर्वत शिखरांच्या दिशेने सातत्याने झेपावत राहिला…

इटलीत जेव्हा करोनाच्या संसर्गाने धुमाकूळ घातला होता, तेव्हा ऑक्सिजनची टंचाई कमालीची भासली. इतकी, की वृद्धांचे ऑक्सिजन काढून तरुण आणि मुलांना दिले जात होते… हे ऐकूनच नखशिखांत थरकाप उडतो.

मात्र, तिथं आंगरिता शेर्पा Ang Rita Sherpa | असते तर त्यांनी हसत हसत आपल्या तोंडावरचा ऑक्सिजन दुसऱ्याला दिला असता… म्हणाले असते, हव्या तितक्या दिवस राहू दे…!!!

कल्पना जरी भयंकर वाटली तरी मला खात्री आहे, असचं घडलं असतं!!! कारण एकदोन वेळा नाही, तर तब्बल दहा वेळा ऑक्सिजनशिवाय माउंट एव्हरेस्ट सर करणं गंमत नाही…

आज वातावरणात ऑक्सिजन असूनही माणसं कृत्रिम ऑक्सिजनशिवाय पटकीसारखे मरताहेत. आंगरिता शेर्पा Ang Rita Sherpa | मात्र अशा शिखरावर गेले, जेथे वातावरणातही ऑक्सिजन नाही आणि कृत्रिम ऑक्सिजनही त्यांनी कधी बाळगला नाही. असे एकदा होऊ शकते, पण दहा वेळा?

जगातील हा पहिला गिर्यारोहक आहे, ज्याने हिवाळी मोहिमेत ऑक्सिजनशिवाय एव्हरेस्ट सर केलं. सर्वाधिक वेळा ऑक्सिजनशिवाय एव्हरेस्टवर चढाई करण्याचा विक्रमही त्यांच्याच नावावर आहे…

म्हणूनच मित्रांनी त्यांचं नाव हिमबिबट्या ठेवलं ते उगीच नाही. हिमबिबट जसे दुर्मिळ आहेत, तशीच आंगरितासारखी माणसंही आपल्या पराक्रमाने अतिदुर्मिळ नव्हे, तर अलौकिक सजीवांमध्ये मोडतात.

मुळात शेर्पांच्या डीएनएतच अपार कष्ट आहेत. कोणतंही काम अंगमेहनतीशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. देवाने जे शरीर दिलं आहे, त्याचा पूर्ण वापर करणाऱ्यांमध्ये शेर्पांचाच क्रमांक पहिल्या स्थानी येईल.

आंगरिता Ang Rita Sherpa | यांचा जन्म थामेतला. नेपाळमधील सोलुखुम्बू जिल्ह्यातलं एक छोटंसं गाव. याच गावात पहिले एव्हरेस्टवीर तेन्झिंग नोर्गे यांचं बालपण गेलं.

शेर्पांच्या कुटुंबातले 80 च्या दशकापूर्वीचे जन्म अलिखितच असायचे. अशिक्षित कुटुंबाच्या लेखी दिवस महत्त्वाचा कधीच नसतो. त्यांच्या लेखी जगण्याला जास्त महत्त्व. आंगरिता Ang Rita Sherpa | यांचा जन्म 1948 चा. तारीख माहिती नाही.

शेर्पाच्या कुटुंबात माणसांइतकाच याकला जास्त महत्त्व. त्यांचं पालनपोषण याच याकवर होतं. आंगरिता Ang Rita Sherpa | यांचं बालपण याकची काळजी वाहण्यात आणि हिमालयापासून तिबेटपर्यंतच्या व्यापारमार्गातले कूली म्हणूनच गेलं.

शेर्पा कुटुंबातला प्रत्येक व्यक्ती हिमालयाच्या सेवेसाठीच वाहिलेला असतो. आंगरिता हेही त्यातून सुटले नाहीत. वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी ते हिमालयाच्या मोहिमेत कुली म्हणून रुजू झाले.

परिस्थिती इतकी हलाखीची होती, की त्यांच घर नव्हे जणू गोठाच. शेर्पांची घरं अशीच असायची. आपण पाहतो, जी जिन्याखालची रूम असते तशी ती होती. आंगरिता Ang Rita Sherpa | यांचं घरही स्वच्छतागृहाखालीच होतं.

सगळे जमिनीवर झोपायचे. आंगरिता अक्षरशः स्वच्छतागृहात झोपायचे. वीस वर्षांपूर्वी जेव्हा ते न्यूझीलंडला निघाले होते, तेव्हा काही वेळ सिंगापूरमध्ये थांबले होते. त्या वेळी त्यांनी आपल्या बालपणातलं हे हलाखीचं वास्तव सांगितलं.

शेर्पांची अशीच पारंपरिक घरं असायची. पन्नासच्या दशकात खुमजंग, खुंडे, नामचे या गावांत हे चित्र होतं. ही गावं आता कुठं तरी बदलली आहेत. गावांत लॉज झाले, शेर्पांची गोठ्यासारखी घरं आता टूमदार बंगल्यात रूपांतरित झाली आहेत. ही गावंही आता पर्यटनाची स्थळं बनली आहेत.

नवी पिढी सुखवस्तूत असली, तरी त्यासाठी आंगरिता Ang Rita Sherpa | यांना किती वेदना सहन कराव्या लागल्या असतील याची कल्पनाच न केलेली बरी.

एका कुशीवर माउंट एव्हरेस्ट, तर दुसऱ्या कुशीवर चो ओयू. आंगरिता Ang Rita Sherpa | यांच्या साहसाची पहिली ओळख चो ओयू पर्वतानेच दिली. तिबेटमधील चो ओयू हे जगातील सहाव्या क्रमांकाचं उंच पर्वतशिखर. उंची 8,102 मीटर. वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी त्यांनी हे शिखर सर केलं.

जसं जिन्याने पहिल्या मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर सहजपणे जावं, तसं आंगरिता एकामागोमाग एक पर्वतशिखरं सर करीत राहिले. विशेष म्हणजे अनेकदा ते ऑक्सिजनशिवाय ही शिखरं सर करीत होते.

चो ओयू, माउंट एव्हरेस्टबरोबरच चीन-पाकिस्तान सीमेवरील जगातील दुसऱ्या क्रमांकाचं के2 (8,611 मीटर), जगातील चौथ्या क्रमांकाचं ल्होत्से, आठव्या क्रमांकाचं मानस्लू, हिमालय पर्वतरांगेतलीच अन्नपूर्णा आणि धौलगिरी… ही शिखरं पादाक्रांत केली तीच मुळी त्यांच्या अतुलनीय पराक्रमाने.

एरव्ही प्रत्येक जण माउंट एव्हरेस्टचं स्वप्न पाहायचा. प्रत्येक गिर्यारोहकाच्या पाठीवर ऑक्सिजनच्या किमान दोन बोटल तरी असायच्या. आंगरिताच्या पाठीवर एकही ऑक्सिजनची बोटल नसायची.

अनेकांना आश्चर्य वाटायचं. हा काय आत्महत्या करायला चालला की काय? साधारणपणे एव्हरेस्टचा उतरणीचा काळ हा आत्महत्येचा प्रयत्न (SUICIDE ATTEMPT) मानला जातो. आंगरिताची ही प्रक्रिया चढाईपासूनच सुरू होते.

दक्षिणपूर्व मार्गाने त्यांनी पहिल्यांदा माउंट एव्हरेस्ट ऑक्सिजनशिवाय सर केलं. ती तारीख होती 7 मे 1983. एव्हरेस्टच्या गौरवशाली इतिहासातली अतुलनीय अशी कामगिरी.

आंगरिता यांनी नंतर पुढच्या 13 वर्षांत तब्बल दहा वेळा माउंट एव्हरेस्टला गवसणी घातली. त्यांची ही कामगिरी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदविली गेली. माउंट एव्हरेस्टवरील विक्रमी दहावी यशस्वी चढाई 1996 मध्ये केली. ही त्यांची अखेरची मोहीम ठरली.

आंगरिता अतिशय कुशल शेर्पा मानले जायचे. एकदा धौलगिरीसारख्या कमी उंचीच्या शिखरासाठी कुली म्हणून त्यांना बोलावलं होतं. धौलगिरी 3 च्या कॅम्पवर काही सामान घेऊन जायचं होतं. अशा वेळी शेर्पाकडे गिर्यारोहणाची सर्व उपकरणे असणं आवश्यक होतं. पण आंगरिता यांनी पायात शूज नसताना आणि क्लायंबिग गिअर नसताना कॅम्पपर्यंत सामान पोहोचवलं होतं.

ही कामगिरी इतकी थक्क करणारी होती, की कोणताही शेर्पा या कामगिरीसाठी अजिबातच राजी झाला नसता. आंगरिता मात्र मिळेल ती कामं घेत अगदी निष्ठेने ती पारही पाडायचा. म्हणूनच त्यांच्यासारखा शेर्पा नेपाळच्या भूमीवर अभावानेच सापडेल.


Read more

Ang Rita Sherpa
Mount Everest series

Ang Rita Sherpa | ऑक्सिजन नाकारणारा हिमबिबट्या

Mahesh Pathade
by Mahesh Pathade
September 23, 2020
2
Edmund Hillary : First on Everest
All Sports

Edmund Hillary : First on Everest

Mahesh Pathade
by Mahesh Pathade
October 28, 2020
6
Edmund Hillary : First on Everest
Mount Everest series

हिमालयातला वाघ ः तेन्झिंग नोर्गे

Mahesh Pathade
by Mahesh Pathade
October 28, 2020
7
George Mallori mystery on everest
All Sports

पहिल्या एव्हरेस्टवीराची शोकांतिका

Mahesh Pathade
by Mahesh Pathade
October 28, 2020
14

1985 ची एक घटना आहे. त्या वेळी ते नॉर्वेच्या टीमचे शेर्पा होते. या नॉर्वे टीमचा लीडर शिखरावर असताना अचानक प्रचंड वेगाने बर्फाळ वादळ आलं. आंगरिता यांनी या वादळातून त्या लीडरला सहिसलामत बाहेर काढलं.

एव्हरेस्ट शिखरावर कूच करताना मदतीचा हात देणारे फारच कमी असतात. 1987 मध्ये आंगरिता यांची ऑक्सिजनशिवाय शिखराकडे जाण्याची चौथी विक्रमी चढाई होती. त्या वेळी त्यांनी अडचणीत सापडलेल्या एका कोरियन टीमला मदत केली होती.

एकदा हाडे गोठविणाऱ्या थंडीत एका टीमसोबत ते शिखरावर निघाले होते. रात्रीची वेळ होती. भयंकर थंडीने दात तडतड वाजत होते. अशा वेळी आंगरिता आणि एक सदस्य यांची टीमपासून चुकामूक झाली.

अशा या थंडीत रात्र कशी काढायची? मग शरीर गरम ठेवण्यासाठी हे दोघे रात्रभर एरोबिक्स करीत राहिले. शेर्पा मायाळू आणि मदतीसाठी सदैव तत्पर असतात. आंगरिता त्याचं मूर्तिमंत उदाहरण होतं. 1990 मध्ये एव्हरेस्ट मोहिमेवर निघालेल्या नेपाळी सेनेचीही मदत केली होती.

कौटुंबिक शोकांतिका


सतत मदतीसाठी तत्पर असणाऱ्या आणि विक्रमांना गवसणी घालणाऱ्या आंगरिता यांच्या वाट्याला दुःख आणि वेदनाच आल्या. त्यांनी तीन मुलं. कारसांग (Karsang) हा त्यांचा सर्वांत थोरला मुलगा. वडिलांसारखाच उत्तम गिर्यारोहक. तब्बल नऊ वेळा त्याने एव्हरेस्ट सर केले.

मुलाच्या कामगिरीने आंगरिता यांची छाती अभिमानाने फुलायची. मात्र, 2012 मध्ये एव्हरेस्ट मोहिमेवर गेलेला कारसांग पुन्हा कधीच परतला नाही. कुटुंबाला बसलेला हा जबर धक्का होता. आंगरिता यांनी स्वतःला सावरलं, पण पत्नी खचली. वर्षभरानंतर 2013 मध्ये तिनेही या जगाचा निरोप घेतला.

आंगरिता यांचा दुसरा मुलगा चेवांग (Chhewang) यानेही एव्हरेस्टचा वारसा पुढे सुरू ठेवला. त्याने पाच वेळा एव्हरेस्ट सर केलं आहे.

अखेरचा टप्पा पुन्हा हलाखीत


आंगरिता तसे एकटेच पडले होते. अतुलनीय कामगिरी करणाऱ्या या शिखरवीराच्या नशिबी मात्र पुन्हा हलाखीचं जिणं आलं. बालपणी जेवढ्या खस्ता खाल्ल्या, तेवढ्याच खस्ता त्यांना नकोसं असलेल्या बालपणात म्हणजे वार्धक्यातही अनुभवाव्या लागल्या. गरिबीचं हे वर्तुळ या साहसवीराच्या वाट्याला येणं हे हृदय पिळवटणारं होतं.

अखेरचं विक्रमी शिखर सर केल्यानंतर त्यांचा गौरव झाला, पण आर्थिक पातळीवर त्यांचे हात रितेच राहिले. आर्थिक आणि शारीरिक या दोन्ही अवस्था ढासळत गेल्या.

आंगरिता अंथरुणाला खिळले. छाती दडपविणाऱ्या माउंट एव्हरेस्टला ऑक्सिजनशिवाय आव्हान देणारा हा योद्धा यकृताचा आजार आणि मेंदूत आलेली सूज यामुळे बेजार आणि हतबल झालेला होता.

थामे गावातच 1999 मध्ये त्यांची तब्येत इतकी ढासळली, की त्यांचे मित्र आंग शेरिंग यांनी अखेर भाड्याने हेलिकॉप्टर मागवलं. काठमांडूच्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू झाले…

अखेरची निरवानिरव


मात्र, आंगरिता यांची आजाराने पाठ काही सोडली नाही. अखेरची वर्षे ते काठमांडूत आपल्या मुलीच्या घरी राहिले. 2017 मध्ये त्यांच्या मेंदूतली सूज आणखी वाढली. पुन्हा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

उपचाराचा खर्च डोईजड झाला होता. विश्वविक्रमी कामगिरी करणाऱ्या या साहसवीराची ढासळती आर्थिक आणि शारीरिक स्थिती मनाला चटका लावून गेली. अखेर नेपाळ सरकारने त्यांच्या उपचाराचा खर्च उचलला…

मात्र, तोपर्यंत त्यांचा अखेरचा प्रवास सुरू झाला होता.. आता त्यांना नवं शिखर सर करायचं होतं. ज्या ज्या वेळी ते शिखरावर निघाले त्या त्या वेळी त्यांनी ऑक्सिजनचा नेहमीच त्याग केला. या वेळचं शिखर मात्र दृष्टिपल्याडचं होतं.

या धुरंधर गिर्यारोहकाने काठमांडूत वयाच्या 72 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट केले नाही, पण ते आता एव्हरेस्टपेक्षा उंच शिखराकडे निघून गेले. नेहमीप्रमाणेच ऑक्सिजनशिवाय.

एरवी हिमालयाच्या शिखरावर पळभर तरी थांबायचे. या वेळी मात्र ते दिसणार नाही इतक्या उंच शिखरावर कायमचे थांबणार आहेत.. पुन्हा कधीच न परतण्यासाठी…

हे त्यांचं अखेरचं अकरावं यशस्वी शिखर म्हणावं का? कारण या वेळीही ते प्राणवायू न घेताच निघून गेले.

आंगरिता यांना अखेरचा सलाम…

Ang Rita Sherpa

ऑक्सिजनशिवाय एव्हरेस्ट सर करणारी विक्रमी कामगिरी
क्र. तारीख शिखरमार्ग
1. 7 मे 1983 दक्षिणपूर्व श्रेणी
2. 15 ऑक्टो. 1984 दक्षिण ध्रुव
3. 29 एप्रिल 1985 दक्षिणपूर्व श्रेणी
4. 22 डिसें. 1987 दक्षिणपूर्व श्रेणी
5. 14 ऑक्टो. 1988 दक्षिणपूर्व श्रेणी
6. 23 एप्रिल 1990 दक्षिणपूर्व श्रेणी
7. 13 मे 1992 दक्षिणपूर्व श्रेणी
8. 16 मे 1993 दक्षिणपूर्व श्रेणी
9. 13 मे 1995 उत्तर ध्रुव (उत्तरपूर्व श्रेणी)
10. 23 मे 1996 दक्षिणपूर्व श्रेणी

 

 

Tags: Ang Rita Sherpaclimb mount everestMitochondrial GenomeMount Everest seriesSnow Leopardअंग रिता शेर्पाआंग रिता शेर्पाआंगरिता शेर्पाहिमबिबटहिमबिबट्याहेन्नेगुया सल्मिनीकोला
Mahesh Pathade

Mahesh Pathade

Next Post
Former Australia batsman Dean Jones passes away

Former Australian batsman Dean Jones passes away

Comments 2

  1. Pingback: Edmund Hillary : First on Everest - kheliyad
  2. Pingback: हिमालयातला वाघ ः तेन्झिंग नोर्गे - kheliyad

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Home
  • About US
  • Contact

© 2020 Kheliyad Copyright © 2020 Website Development Divesh Consultancy-9028927697

No Result
View All Result
  • Home
  • Cricket
  • Football
  • Other sports
  • Inspirational story
  • Online Chess Puzzle
  • Tennis

© 2020 Kheliyad Copyright © 2020 Website Development Divesh Consultancy-9028927697

error: Content is protected !!