2022 चा वर्ल्डकप खेळण्यास झुलन उत्सुक

Follow us
करोना महामारीमुळे क्रीडाविश्वातील सर्वच स्पर्धांचं वेळापत्रक कोलमडलं आहे. अनेक प्रतिष्ठेच्या स्पर्धा स्थगित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या अनेक खेळाडूंची द्विधा मन:स्थिती झाली आहे.
महिला विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धाही २०२२ पर्यंत स्थगित करण्यात आली आहे. त्या वेळी भारतीय संघाची प्रमुख वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी ३९ वर्षांची होईल. मात्र तरीही तिने स्पर्धेत सहभाग घेण्याची उमेद सोडलेली नाही.
वन-डेमध्ये सर्वाधिक विकेट घेणारी झूलन गोस्वामी म्हणते, की मी सातत्याने चांगली कामगिरी करून संघात स्थान मिळविण्याचा प्रयत्न करीत राहणार आहे.
झुलन आणि भारतीय संघाची कर्णधार मिताली राज यांच्यासारख्या धुरंधर महिला खेळाडू भारतीय संघाचा भक्कम कणा आहे. न्यूझीलंडमध्ये २०२१ च्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात या खेळाडूंमळेच विजय मिळविण्याची आशा बाळगली जात होती.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) ७ ऑगस्ट २०२० रोजी महिला विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा २०२२ पर्यंत स्थगित केल्याचे जाहीर केले. या घोषणेनंतर मितालीने ट्वीट केले, की या स्थगितीमुळे १२ महिने संघाला तयारी करण्यासाठी बराच मोठा काळ मिळाला आहे. कारण करोना महामारीमुळे आमच्या सगळ्या योजनांवर पाणी फिरले होते. आमचं लक्ष्य नेहमीच पहिला विश्वकप उंचावणे हाच राहील.
झुलन आणि मिताली या दोघींचं वय ३७ आहे. झुलनलाही १८ महिन्यांनी न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत खेळायचं आहे. मात्र, तिला हेही मान्य आहे, की या स्पर्धेपर्यंत तंदुरुस्ती आणि कामगिरीच या सगळ्यांचं एकमेव उत्तर आहे.
झूलनने पीटीआयला सांगितले, ‘‘आमच्याकडे तयारीसाठी १८ महिन्यांचा मोठा कालावधी आहे. मात्र, ही स्पर्धा पुढच्या वर्षी जर झाली असती तर चांगले असते. कारण मी बऱ्याच कालावधीपासून या स्पर्धेची वाट पाहत आहे.’’
ती म्हणाली, ‘‘आता तुम्हाला यापुढचा विचार करण्याची गरज आहे. आम्ही पाच-सहा महिन्यांपासून क्रिकेटच खेळलेले नाही. मी आणि माझ्यासारख्या इतर खेळाडूंनी (ज्या केवळ वनडे खेळत आहेत) नोव्हेंबर २०१९ मध्येच स्पर्धा खेळली होती. कारण सर्व संघांनी विश्वकरंडक स्पर्धेपूर्वी (आस्ट्रेलियातील फेब्रुवारी-मार्चमध्ये झालेली विश्वकप) टी-२० स्पर्धाही खेळली होती’’
२०२२ मध्येही खेळणार?
झुलन म्हणाली, ‘‘भारतासाठी खेळणे मोठी सन्मानाची बाब आहे. मी २०२२ मधील स्पर्धेचं लक्ष्य ठेवलं आहे. अर्थात, त्यासाठी या सर्व प्रक्रियेतला एक घटक होणे आवश्यक आहे. सातत्याने सामने खेळत कामगिरी उंचावताही आली पाहिजे. त्यानंतरच विश्वकपबाबत विचार करू शकतो. कारण आता स्पर्धा बरीच लांबणीवर पडली आहे.’’

Comments 2