अमेरिकेची स्टार टेनिसपटू सेरेना विल्यम्स आता पूर्णपणे तंदुरुस्त झाली आहे. २३ वेळी ग्रँडस्लॅम किताब जिंकणारी सेरेना आता सहा महिन्यांच्या ब्रेकनंतर कोर्टवर पुनरागमन करण्यास सज्ज झाली आहे.
अमेरिकन ओपनबरोबरच ती फ्रेंच ओपन खेळण्यासाठीही सज्ज असेल. कँलेंडर वर्षातल्या सर्वच स्पर्धा खेळण्यास तिने उत्सुकता दाखवली आहे.
सेरेनाने लेक्सिंग्टनजवळ १० ऑगस्ट २०२० पासून सुरू होणाऱ्या ‘टॉप सीड ओपन’ Top Seed Open | स्पर्धेवर लक्ष केंद्रित केलं आहे.
या स्पर्धेत आता हार्ड कोर्ट स्पर्धेचाही समावेश करण्यात आला आहे. ही स्पर्धा अमेरिकन ओपनच्या तयारीसाठी फायदेशीर ठरू शकेल.
मार्चनंतर अमेरिकेत डब्लूटीए WTA | ही पहिली स्पर्धा होणार आहे. अर्थातच, या स्पर्धेला प्रेक्षक नसतील.
या स्पर्धेत सेरेनाची बहीण आणि सात वेळा ग्रँडस्लॅम चॅम्पियन ठरलेली व्हीनस विल्यम्स, व्हिक्टोरिया अजारेंका, स्लोआने स्टीफन्स आणि उगवती स्टार खेळाडू कोको गॉफ खेळणार आहे.
जागतिक मानांकनात नवव्या स्थानावर असलेली सेरेना फेब्रुवारीत फेड कपमध्ये अमेरिकेकडून खेळली होती. त्यानंतर आता टॉप स्पीड ओपन ही तिची पहिलीच स्पर्धा असेल.
सेरेनाने अशा स्थितीत टेनिस खेळणार आहे, जेथे करोना रुग्णसंख्या रोज नवनवे उच्चांक गाठत आहे. त्यामुळे टेनिसमधील पुनरागमन तिच्यासाठी आव्हानात्मक असेल.
सेरेनाला फुप्फुसाचा त्रास आहे. सध्या करोना महामारीच्या संकटकाळात तिला अधिक सतर्क राहावे लागणार आहे. सेरेना आता ३८ वर्षांची असून, अजूनही तिच्यात खेळण्याची उमेद आहे.
‘‘मला खूप काळजी घ्यावी लागणार आहे. कारण टेनिसच माझं आयुष्य आणि माझं आरोग्य आहे.” – सेरेना विल्यम्स