All SportsOther sports

क्रीडाविश्व हादरले… चार महिन्यांत तीन नेमबाजांच्या आत्महत्या

मानसिक तणावामुळे चार महिन्यांत तीन युवा नेमबाजांच्या आत्महत्या झाल्यामुळे क्रीडाविश्व हादरले आहे. भारतीय नेमबाजीसाठीच नाही, तर संपूर्ण क्रीडा क्षेत्राला हा धोक्याचा इशारा आहे. राज्यस्तरीय नेमबाज हुनरदीपसिंग सोहल, जागतिक विद्यापीठ नेमबाजी स्पर्धेत ब्राँझ मेडल जिंकणारा नमनवीर सिंग यांच्यानंतर आता खुशसीरत सिंग कौर संधू हिने आत्महत्या केली. हे तिन्ही खेळाडू पंजाबमधील युवा नेमबाज. मात्र, अवघ्या चार महिन्यांत या तिघांच्या आत्महत्यांनी भारतीय नेमबाजी कमालीची हादरली आहे. खुशसीरत सिंग कौर हिने 8 डिसेंबर 2021 रोजी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. कामगिरी उंचावता न आल्याने मानसिक तणावातून या तिघांनी आत्महत्या केल्याचे समोर येत आहे. त्यामुळे ही चढाओढ कोणत्या थराला जात आहे, याचा आत्मचिंतन करण्याची वेळ क्रीडा क्षेत्रावर आली आहे.

जागतिक कुमार स्पर्धेत सहभागी झालेली व एका वर्षात राष्ट्रीय स्तरावर 11 सुवर्ण पदके मिळविणारी खुशसीरत कौर हिची आत्महत्या अनेकांना चटका लावून गेली. हुनरदीपसिंग सोहल ही महिला नेमबाज राज्यस्तरीय स्पर्धेत खेळली आहे. ती दुखापतींनी त्रस्त होती. यामुळे कामगिरी उंचावता येणार नाही, स्पर्धा खेळता येणार नाही, यामुळे ती मानसिक तणावाखाली होती. त्यामुळे तिने आत्महत्त्या करण्याचा टोकाचा निर्णय घेतला असावा, असा कयास व्यक्त होत आहे.

नमनवीर सिंग ब्रार याचीही कहाणी वेगळी नाही. जागतिक विद्यापीठ स्पर्धेत त्याने ब्राँझ पदक जिंकले होते. मात्र, कामगिरी उंचावता न आल्याने त्यानेही काही महिन्यांपूर्वीच जीवन संपवले. या घटनांनी अभिनव बिंद्राने चिंता व्यक्त केली आहे. ऑलिम्पिकमध्ये पहिले वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारा अभिनव बिंद्रा म्हणाला, या तीन आत्महत्या एक इशारा दिला आहे. सगळं काही ठीक आहे, असं समजणं चूक ठरेल. याला खेळ हेच कारण असेल, असे आपण ठामपणे म्हणू शकणार नाही. त्यांची वैयक्तिक कारणेही असू शकतील. मात्र, संघटनांनी अधिक जबाबदारीने काम करून खेळाडूंना समर्थन द्यायला हवे. एकूणच युवा नेमबाजांच्या आत्महत्या चिंताजनक मानल्या जात आहेत.

कोण आहे खुशसीरत कौर?

जिल्हा स्तरावरून आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत 50 पेक्षा अधिक पदके जिंकणारी नेमबाज खुशसीरत कौर हिने आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त होत आहे. हा टोकाचा निर्णय तिला का घ्यावा लागला, याचे कारण स्पष्ट झालेले नाही. खुशसीरत कौर पंजाबमधील फरिदकोट जिल्ह्यातील हरिंद्रानगर येथील रहिवासी आहे. ती बारावीतील विज्ञान शाखेची विद्यार्थिनी होती. काही दिवसांपासून खुशसीरत मानसिक तणावाखाली दिसत होती. चांगली कामगिरी करण्याच्या अपेक्षांचे ओझे हेच तिचे तणावाचे कारण सांगितले जात आहे. खुशसीरत आनंदी कुटुंबातली होती. घरात इनमिन चारच लोक होते. आईवडील आणि एक लहान भाऊ असं हे चौकोनी कुटुंब. वडील शिक्षक, तर आई अ‍ॅग्रीकल्चर विभागात नोकरी करते. लहान भाऊ शिक्षण घेत आहे. त्यामुळे या आत्महत्येमागे आर्थिक तणाव असण्याचे कारण नसावे.

पतियाळा येथे झालेल्या नॅशनल शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेवरून खुशसीरत नुकतीच घरी परतली होती. या स्पर्धेत तिला एकही पदक मिळू शकले नाही. त्यामुळे मानसिक तणावाखाली होती. काही दिवसांपूर्वी इजिप्तमध्ये झालेल्या शूटिंग वर्ल्डकप स्पर्धेत तिने भारताचे प्रतिनिधित्व केले होते. मात्र, तेथेही तिला एकही पदक मिळू शकले नव्हते. खुशसीरत कौर हिच्या कुटुंबाशी निकटचे संबंध असलेले व हॉकीचे प्रशिक्षक हरबन्स सिंग यांनाही धक्का बसला. ते म्हणाले, गेल्या वर्षी राष्ट्रीय स्पर्धेत तिने 11 पदके जिंकली होती. या कामगिरीवरच तिची विश्वकप स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली होती. मात्र, काही दिवसांपूर्वी पतियाळातील राष्ट्रीय स्पर्धेत तिला एकही पदक जिंकता आले नाही. त्यामुळे दोनतीन दिवसांपासून ती कुणाशीही फारशी बोलत नव्हती.

कोरोना काळात कामगिरी खालावली

कोरोना काळात अनेक खेळाडूंना सराव करता आला नाही. कामगिरी खालावण्याच्या भीतीमुळे अनेक खेळाडू मानसिक तणावाखाली आले होते. खुशसीरतही अशाच खेळाडूंपैकी एक होती. कुटुंबातील सदस्यांचे म्हणणे आहे, की खुशसीरत नेमबाजी या खेळाबाबत खूप गंभीर होती. गेल्या वर्षी कोरोनामुळे तिला ना नियमित सराव करता आला, ना कामगिरी उंचावता आली. यामुळे ती काही दिवसांपासून तणावाखाली दिसत होती. आम्ही तिला या तणावातून बाहेर काढण्याचा बराच प्रयत्न केला. तिचं लक्ष इतर गोष्टींमध्ये वळवण्याचाही प्रयत्न केला. मात्र, आम्ही अपयशी ठरलो.

मनू भाकरला मागे टाकायचे होते

खुशसीरतला नेमबाजीचं पॅशन होतं. हेच पॅशन तिच्या मृत्यूचं कारण बनलं. पेरूमध्ये आंतरराष्ट्रीय 25 एमएम शूटिंग स्पर्धेत तिने सहभाग घेतला होता. कोरोनापूर्वीचा काळाचा विचार केला, तर खुशसीरतने एका वर्षात 11 गोल्ड मेडल जिंकत राष्ट्रीय स्तरावर इतिहास रचला होता. खुशसीरत फक्त नेमबाज नव्हती, तर उत्तम जलतरणपटू होती. राष्ट्रीय स्तरावरील जलतरण स्पर्धेतही खुशसीरतने गोल्ड मेडल जिंकले होते. जलतरणानंतर ती शूटिंगकडे वळली. अवघ्या चार वर्षांत तिने या खेळात प्रावीण्य मिळवले होते. मात्र, खेळाविषयीचं हे पॅशन तिचा जीव घेईल, असं तिच्या कुटुंबाला स्वप्नातही वाटलं नव्हतं. खुशसीरत 8 डिसेंबर 2021 रोजी आजीच्या खोलीत झोपली होती. त्याच दरम्यान तिने आत्महत्या केली. खुशसीरतने बंदुकीने कानाजवळ गोळी झाडली होती. गुरू गोबिंद सिंग मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.

कोण आहे नमनवीर सिंग ब्रार?

अवघ्या 29 वर्षांचा नमनवीर सिंग ब्रार आंतरराष्ट्रीय नेमबाज आहे. त्याने 13 सप्टेंबर 2021 रोजी पहाटे पावणेचार वाजता पिस्तुलातून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. त्याच्या घरात एकही सुसाइड नोट मिळालेली नाही. मात्र, तो काही दिवसांपासून मानसिक तणावात होता. नमनवीर फरिदकोटचाच रहिवासी. त्याचे वडील फरिदकोटमधील व्यापारी आहेत. सुखवस्तू कुटुंबातला नमनवीर याच्या नेमबाजीसाठी वडिलांनी नेहमीच प्रोत्साहन दिले. त्याला कोणतीही अडचण येऊ नये म्हणून 2009 मध्ये ते फरिदकोटवरून मोहाली सेक्टर 71 येथे स्थायिक झाले. तेथेच नमनवीरचा नेमबाजीचा सराव सुरू झाला. गेल्याच वर्षी 2020 मध्ये त्याचं लग्न झालं होतं. मात्र, 13 सप्टेंबरची पहाट कुटुंबासाठी काळी पहाट ठरली. घरात अचानक गोळी झाडल्याचा आवाज आला. कुटुंब धावत त्याच्या खोलीत आले. तेथे नमनवीर रक्तलांच्छित अवस्थेत पडलेला दिसला. त्याच्या डोक्यातून गोळी आरपार गेली होती. जवळच त्याची परवानाधारक पिस्तूल पडलेलं होतं. नमनवीरची त्या वेळी गर्भवती असल्याचे सांगितले जाते. नमनवीरची बहीणही नेमबाज आहे. नमनवीर 12 सप्टेंबर 2021 रोजी रात्री एकच्या सुमारास पार्टीवरून घरी परतला होता. नमनवीर सिंग ब्रार पंजाब विद्यापीठाचा विद्यार्थीही होता. 2015 मध्ये दक्षिण कोरियात झालेल्या जागतिक विद्यापीठ स्पर्धेत डबल ट्रॅप संघात त्याने सहभाग घेतला होता. त्यात त्याने कांस्यपदक मिळवले होते. त्याच काळात त्याने अखिल भारतीय विद्यापीठ शूटिंग स्पर्धेतही कांस्य पदक मिळवले होते. त्यानंतर पोलंडमध्ये झालेल्या जागतिक शूटिंग स्पर्धेत कांस्य पदक जिंकले. नमनवीरने चंदिगड येथील डीएव्ही महाविद्यालयातून पदवी संपादन केली होती. त्यानंतर वकिलीच्या शिक्षणासाठी त्याने पंजाब विद्यापीठात शिक्षण घेतलेमार्च 2021 मध्ये झालेल्या दिल्लीतील वर्ल्डकप एमक्यूएस श्रेणीत नमनवीर चौथ्या स्थानावर राहिला होता. त्यासाठी त्याने पतियाळातील मोतीबाग शूटिंग रेंजवर सराव केला होता.

या युवा नेमबाजांच्या आत्महत्या चिंताजनक आहेत. त्यामागे वैयक्तिक कारणे असली तरी या सर्वांचा खेळ एकच आहे. एकाच खेळातील तीन जणांच्या आत्महत्यांवर चर्चा होणे आवश्यक आहे. यापैकी एकाही खेळाडूने सुसाइड नोट लिहिलेली नाही. कदाचित या युवा नेमबाजांच्या आत्महत्या मानसिक तणावातून उमटलेली उत्स्फूर्त प्रतिक्रिया असू शकते. स्पर्धा कोणतीही असो, ती नैराश्याचे कारण ठरू नये यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. निकोप स्पर्धेचे वातावरण निर्माण करायला हवे. तरच या आत्महत्या रोखता येतील. 

Follow us

Facebook Page

[jnews_block_37 first_title=”Read more at” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”80″]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!