All SportsCricketFootball

2020 मध्ये या दिग्गज खेळाडूंनी घेतला जगाचा निरोप | These players died in 2020

 

2020 मध्ये या दिग्गज खेळाडूंनी घेतला जगाचा निरोप

करोना महामारीमुळे 2020 हे वर्ष संपूर्ण विश्वासाठी जवळजवळ वाया गेले. जीवन किती क्षणभंगुर आहे याची प्रचीती आली. क्रीडाविश्वासाठी तर हे वर्ष भयंकर त्रासदायक ठरले. या वर्षात अनेक दिग्गज खेळाडूंनी या जगाचाच निरोप घेतला. संपूर्ण विश्वाला चटका लावून जाणारा महान फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांचा मृत्यूही याच वर्षातला. 2020 या वर्षाला निरोप देताना अशा अनेक क्रीडापटूंची उणीव सतत भासत राहील, ज्यांनी या विश्वाचा कायमचा निरोप घेतला. These players died in 2020 |

Cricket

10 फेब्रुवारी

पहिल्यांदाच भारत दौरा करणाऱ्या पाकिस्तानी संघातील सदस्य वकार हसन

कराची | पहिल्यांदाच भारतीय दौरा करणाऱ्या पाकिस्तानी संघाचे सदस्य असलेले वकार हसन Waqar Hasan cricketer | यांचं वयाच्या 87 व्या वर्षी निधन झालं. हसन 1952 मध्ये भारत दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तानी संघाचे अखेरचे जिवंत असलेले खेळाडू होते.

ते 1954 मध्ये इंग्लंड आणि 1955-56 मध्ये वेस्ट इंडीजच्या दौऱ्यावरही गेले होते. या दौऱ्यात विजय मिळविणाऱ्या पाकिस्तानी संघाचे ते एक भाग होते. त्यांनी 1959 मध्ये क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.

त्यांनी 21 कसोटी सामन्यांमध्ये 1,071 धावा केल्या होत्या. वकार हसन यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख निवडकर्ता आणि प्रबंधक या पदांवर काम केले आहे. त्यांचा जन्म 12 सप्टेंबर 1932 रोजी अमृतसर येथे झाला होता.

1952 च्या भारत दौऱ्यात त्यांनी तीन अर्धशतके झळकावली होती. लाहोर येथील 1955 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध 189 धावांची शतकी खेळी ही त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी होती.

6 एप्रिल

न्यूझीलंडचे माजी फलंदाज जॉक एडवर्डस

वेलिंग्टन | न्यूझीलंडकडून सहा कसोटी आणि आठ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेलणारे ‘बिग हिटर’ यष्टिरक्षक फलंदाज जॉक एडवर्ड्स Jock Edwards | यांचे निधन झाले. ते 64 वर्षांचे होते. त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही.

एडवर्ड्स यांनी 1974 ते 1985 दरम्यान सेंट्रल डिस्ट्रिक्ट प्रोव्हिन्स या स्थानिक संघाकडून ते 67 प्रथमश्रेणीचे सामने खेळले होते. धडाकेबाज फलंदाजीसाठी एडवर्डस प्रसिद्ध होते.

त्यांची फलंदाजी टी-२० शी अनुरूप होती. मात्र त्यांच्या काळात टी-२० सामने अस्तित्वातच नव्हते. एडवर्ड्स यांचा कसोटी क्रिकेटमधील सर्वश्रेष्ठ क्षण 1978 मधील ऑकलंडमध्ये होता. त्या वेळी त्यांनी इंग्लंडविरुद्ध दोन्ही डावांत अर्धशतक केले होते.

10 एप्रिल

भारताचे सर्वांत ज्येष्ठ क्रिकेटपटू वॉल्टर डिसुझा

मुंबई | भारताचे सर्वांत ज्येष्ठ माजी प्रथमश्रेणी क्रिकेटपटूंपैकी एक असलेले वॉल्टर डिसुझा यांचं निधन झालं. ते 93 वर्षांचे होते. खार येथील आपल्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

डिसुझा गुजरात आणि एसीसीकडून खेळले. गुजरातकडून खेळताना त्यांनी इंदूरमध्ये होळकर संघाविरुद्ध 1950-51 मध्ये रणजी करंडक स्पर्धेचा अंतिम सामना खेळला होता. त्यात त्यांना 50 आणि 77 धावा केल्या होत्या.

14 एप्रिल

पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू जफर सरफराज

कराची | पाकिस्तानचे माजी प्रथमश्रेणी क्रिकेटपटू जफर सरफराज यांचे कोरोना संसर्गामुळे निधन झाले. ते पाकिस्तानचे पहिले व्यावसायिक क्रिकेटपटू आहेत, ज्यांचा कोरोना संसर्गाने मृत्यू झाला.

मधल्या फळीतले फलंदाज सरफराज पेशावरकडून 15 प्रथमश्रेणी सामने खेळले होते. त्यांनी 1994 मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

15 मे

दक्षिण आफ्रिकेचे माजी कर्णधार हॅन्सी क्रोनिएचे वडील ईव्ही

जोहान्सबर्ग | दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार हॅन्सी क्रोनिएचे वडील आणि देशातील महिला क्रिकेटच्या प्रचारात महत्त्वपूर्ण भूमिका निभावणारे ईव्ही क्रोनिए यांचे वयाच्या 80 व्या वर्षी निधन झाले.

ते बराच काळ कर्करोगाने ग्रस्त होते. त्यांच्या मागे पत्नी सॅन-मेरी, मोठा मुलगा फ्रान्स, मुलगी हेस्टर आणि नातवंडे असा परिवार आहे.

ईव्ही यांचा धाकटा मुलगा हॅन्सी क्रोनिए यांनी 1994 ते 2000 या काळात दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व केले. ईव्ही यांनी 1960 ते 1971 पर्यंत ‘फ्री स्टेट’ साठी 27 प्रथमश्रेणी सामने खेळले.

13 जून

भारताचे सर्वांत ज्येष्ठ प्रथमश्रेणी क्रिकेटपटू वसंत रायजी

मुंबई | भारताचे प्रथमश्रेणीतील सर्वांत ज्येष्ठ क्रिकेटपटू वसंत रायजी Vasant Raiji | यांचे निधन झाले. ते 100 वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली आहेत.

उजव्या हाताचे फलंदाज रायजी यानी 1940 च्या दशकात नऊ प्रथमश्रेणी क्रिकेट सामने खेळले. त्यात त्यांनी एकूण 277 धावा केल्या. त्यांची 68 ही वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या होती.

न्यूझीलंडचे माजी क्रिकेटपटू मॅट पूरे

ऑकलंड | न्यूझीलंडचे माजी क्रिकेटपटू मॅट पूरे Matt Poore | यांचं निधन झालं. 1955 मध्ये बेंगलुरू येथील सामन्यादरम्यान भटक्या कुत्र्याला त्यांनी पकडले होते. त्यांच्याशी जोडली गेलेली ही एक कायमची आठवण आहे. ते 90 वर्षांचे होते.

2 जुलै 

प्रसिद्ध ‘डब्लूत्रय’चे अखेरचे फलंदाज एवर्टन वीक्स

सेंट जोन्स | एकेकाळचे दिग्गज क्रिकेटपटू आणि वेस्ट इंडीजच्या प्रसिद्ध ‘डब्लूत्रय’चे अखेरचे फलंदाज सर एवर्टन वीक्स Sir Everton Weekes | यांचे बुधवारी, 2 जुलै 2020 रोजी निधन झाले. ते 95 वर्षांचे होते.

पन्नासच्या दशकात त्यांनी सर क्लाइड वाल्कॉट आणि सर फ्रँक वॉरेल यांच्यासोबत विश्व क्रिकेटमधील सर्वांत मजबूत फलंदाजीचा क्रम तयार केला होता. त्यांना कैरेबियन क्षेत्रातील खेळांचा ‘जनक’ मानले जाते.

वीक्स, वाल्कॉट आणि वॉरेल या तिघांचाही जन्म बार्बाडोसमध्ये ऑगस्ट 1924 ते जानेवारी 1926 पर्यंत 18 महिन्यांच्या अंतराने झाला होता. या तिन्ही खेळाडूंनी 1948 मध्ये तीन आठवड्यांच्या अंतराने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.

वॉरेल यांचे 1967 मध्ये, तर वालकॉट यांचे 2006 मध्ये निधन झाले. ब्रिजटाउनचे राष्ट्रीय स्टेडियम ‘थ्री डब्लूज ओवल’ या तिघांच्या नावाने ओळखले जाते.

वीक्स यांनी कारकिर्दीत 48 कसोटी सामने खेळले. यात त्यांनी 58.61 च्या सरासरीने 15 शतकांच्या मदतीने 4,455 धावा केल्या. सलग पाच डावांत शतके ठोकण्याचा अनोखा विक्रम त्यांच्या नावावर आहे.

1948 पासून हा विक्रम अद्याप कोणीही मोडू शकलेला नाही. प्रशिक्षक, विश्लेषक, संघव्यवस्थापक आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे पंच या सर्व क्षेत्रांत त्यांनी आपली छाप सोडली आहे.

डकवर्थ-लुईसमुळे चर्चित असलेले लुईस यांचे निधन

लंडन ः मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये पावसाचा व्यत्यय आल्यास डकवर्थ-लुईस-स्टर्न नियमांचा अवलंब केला जातो. हा नियम तयार करणाऱ्यांपैकी टोनी लुईस Tony Lewis | यांचे निधन झाले. ते 78 वर्षांचे होते.

टोनी लुईस यांनी आपले सहकारी गणितज्ञ फ्रँक डकवर्थ यांच्यासोबत डकवर्थ लुईस नियम तयारस केला होता. हा नियम 1997 मध्ये सादर करण्यात आला आणि आयसीसीने (आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद) 1999 या नियमाचा अधिकृतपणे स्वीकार केला.

2014 मध्ये हा नियम डकवर्थ-लुईस-स्टर्न नियम असे नामकरण करण्यात आले. हा गणितीय फार्म्युला आता जगातील सर्वच मर्यादित षटकांच्या क्रिकेट स्पर्धेत अवलंबला जातो.

विशेष म्हणजे लुईस क्रिकेटपटू नव्हते. मात्र, त्यांना क्रिकेट आणि गणितातील योगदानाबद्दल 2010 मध्ये ब्रिटिश साम्राज्याचा एमबीई या विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

13 ऑगस्ट

उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष यदुपती सिंहानिया

लखनऊ | उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे (यूपीसीए) अध्यक्ष यदुपती सिंहानिया यांचे गुरुवारी सिंगापूर येथे निधन झाले. ते बराच काळ आजारी होते आणि सिंगापूरमधील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. ते 67 वर्षांचे होते.

त्यांच्या मृत्यूची माहिती मिळताच यूपीसीएचे कार्यालय आणि कानपूरमधील अन्य संस्था बंद करण्यात आल्या होत्या.

2 सप्टेंबर 

इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू डेव्हिड केपल

नॉर्थम्पटन | इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू डेव्हिड केपल यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ते 57 वर्षांचे होते. इंग्लंड संघाकडून 1987 ते 1990 पर्यंत 15 कसोटी सामने आणि 23 वन-डे सामने खेळले आहेत.

केपल यांना 2018 मध्ये ‘ब्रेन ट्यूमर’ झाल्याचे निष्पन्न झाले होते. केपल कौंटी संघात खेळाडू, नंतर प्रशिक्षकाच्या रूपाने सलग 32 वर्षांपर्यंत ते क्रिकेटशी जोडले गेले होते.

केपल यांनी 1981 ते 1998 पर्यंत नार्थम्पटनशरसाठी 270 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. जुलै 1987 मध्ये त्यांनी पाकिस्तानविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते.

2 सप्टेंबर 

पाकिस्तानचे माजी प्रथमश्रेणी क्रिकेटपटू रियाज शेख

कराची | पाकिस्तानचे माजी प्रथमश्रेणी क्रिकेटपटू रियाज शेख यांचे निधन झाले. त्यांना करोना संसर्ग झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. करोनामुळे मृत्यू झालेले ते दुसरे व्यावसायिक खेळाडू ठरले आहेत.

मृत्यूचे कारण जाणून घेण्यापूर्वीच शेख परिवाराने त्यांचा दफनविधी केला. रियाज शेख 51 वर्षांचे होते. त्यांनी 43 प्रथमश्रेणी सामन्यांत 116 विकेट घेतल्या.

सूत्रांनी दावा केला आहे, की ‘‘त्यांच्या परिवाराने सकाळी घाईघाईत त्यांचा दफनविधी करण्यात आला. मात्र, ते जर करोना पॉझिटिव्ह निष्पन्न झाले असते तर कुटुंबाला वेगवेगळ्या तपासणी प्रक्रियेतून जावे लागले असते. त्यामुळेच शेख कुटुंबाने त्यांचा घाईघाईत दफनविधी करण्यात आला.’’

15 सप्टेंबर

माजी क्रिकेटपटू सदाशिव रावजी पाटील

मुंबई | एका कसोटी सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व करणारे माजी क्रिकेटपटू सदाशिव रावजी पाटील यांचं कोल्हापुरातील त्यांच्या निवासस्थानी निधन झालं. ते 86 वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली आहेत.

अष्टपैलू पाटील यांनी 1955 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध एका कसोटी सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. त्यानंतर त्यांना भारताकडून खेळण्याची संधी मिळाली नाही.

पाटील यांनी 1952 ते 1964 दरम्यान महाराष्ट्रासाठी 36 प्रथमश्रेणी सामन्यांत 866 धावा केल्या, तर 83 विकेट घेतल्या. त्यांनी रणजी करंडक स्पर्धेत महाराष्ट्राच्या कर्णधारपदाची धुराही सांभाळली होती.

14 ऑक्टोबर

न्यूझीलंडचे सर्वांत ज्येष्ठ क्रिकेटपटू जॉन रीड

ऑकलंड | न्यूझीलंडचे सर्वांत ज्येष्ठ क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार जॉन रीड यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले. पन्नास आणि साठ च्या दशकात जगातील सर्वोत्तम अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणून रीड यांचा लौकिक होता.

त्यांनी 34 कसोटी सामन्यांत न्यूझीलंड संघाच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळली आहे. रीड यांचा जन्म ऑकलंडमध्ये झाला होता. मात्र शिक्षण वेलिंग्टनमध्ये घेतले. त्यांनी 246 प्रथमश्रेणी सामन्यांत 41.35 च्या सरासरीने 16,128 धावा केल्या आहेत. यात 39 शतकांचा समावेश आहे.

4 नोव्हेंबर

‘कॅब’चे माजी संयुक्त सचिव सरादिंदू पाल

कोलकाता | बंगाल क्रिकेट संघाचे (कॅब) माजी संयुक्त सचिव सरादिंदू पाल यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी आणि मुलगी आहे.

पाल एक वर्षांपासून आजारी होते. नुकतीच त्यांनी करोनावर मात केली होती. मात्र, यात त्यांची तब्येत प्रचंड ढासळली. पाल 2005 ते 2007 दरम्यान कॅबचे संयुक्त सचिव होते.

5 नोव्हेंबर

मोहित शर्माच्या वडिलांचे निधन

दुबई | इंडियन प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात खेळण्यासाठी दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज मोहित शर्मा ५ नोव्हेंबर रोजी दुबईत आला.

आयपीएलच्या पहिल्या क्वालिफायर सामन्यापूर्वीच त्याच्या वडिलांचे निधन झाल्याने तो माघारी परतला. दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडूंनी मोहितच्या वडिलांच्या सन्मानार्थ सामन्यात दंडावर काळी पट्टी बांधली होती.

आयपीएलमध्ये मोहित शर्मा केवळ एकच सामना खेळू शकला होता. त्याने 20 सप्टेंबर रोजी किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध झालेल्या सामन्यात एक गडी बाद केला होता. दिल्ली कॅपिटल्सने हा सामना सुपरओव्हरमध्ये जिंकला होता.

९ नोव्हेंबर

व्हीव्हीएस लक्ष्मणचे प्रशिक्षक अशोकसिंह

हैदराबाद | व्हीव्हीएस लक्ष्मण आणि आंध्र प्रदेशचे यष्टिरक्षक एमएसके प्रसाद यांच्यासारख्या क्रिकेटपटूंना प्रशिक्षण देणारे अशोक सिंह यांचे आजारपणामुळे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुलगे, एक मुलगी असा परिवार आहे.

अशोकसिंह यांनी लक्ष्मण यांना 1998 पासून निवृत्त होईपर्यंत प्रशिक्षण दिले. गेल्या वर्षीच त्यांच्या मेंदूच्या कर्करोगावर शस्त्रक्रिया झाली होती.

8 डिसेंबर

बेन स्टोक्सला पितृशोक

क्राइस्टचर्च | इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्स याचे वडील गेड यांचं निधन झालं. गेड यांना मेंदूचा कर्करोग होता. या आजाराशी ते वर्षभरापासून लढत होते. अखेर 8 डिसेंबर 2020 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 65 वर्षांचे होते.

दक्षिण आफ्रिकेत 2019 मध्ये झालेल्या मालिकेत स्टोक्सने मधले बोट वाकवून इशारा करीत वडिलांचा सन्मान केला होता. त्याने मधले बोट यासाठी वाकवले होते, की खेळ सुरू ठेवण्यासाठी त्याच्या वडिलांना आपल्या हाताच्या बोटाचा एक भाग कापावा लागला होता.

Athletics

1 मार्च 2020

अ‍ॅथलेटिक्स प्रशिक्षक जोगिंदरसिंग सैनी Joginder Singh Saini |

पतियाळा | अनुभवी अ‍ॅथलेटिक्स प्रशिक्षक आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेते जोगिंदरसिंग सैनी यांचे वृद्धापकाळाने 1 मार्च 2020 रोजी निधन झाले. ते 90 वर्षांचे होते.

भारतातील काही ट्रॅक तथा मैदानी खेळाडूंना पैलू पाडण्याचे श्रेय सैनी यांना जाते. ते 1970 ते 1990 या दोन दशकांत ते अनेत वर्षे राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स संघाचे प्रशिक्षक होते. पंजाबच्या होशियारपूर जिल्ह्यात एक जनवरी 1930 रोजी सैनी यांचा जन्म झाला.

विज्ञान शाखेतून त्यांनी शिक्षण घेतले आणि शारीरिक शिक्षणाचा त्यांनी डिप्लोमा घेतला. पतियाळात एनआयएसचा कोर्स केल्यानंतर 1954 मध्ये ते अ‍ॅथलेटिक्सचे प्रशिक्षक झाले. ते 1990 मध्ये तत्कालीन भारतीय अमॅच्युअर एथलेटिक्स महासंघाचे मुख्य प्रशिक्षकही होते.

भारतीय अ‍ॅथलेटिक्समध्ये दिलेल्या योगदानाबद्दल सैनी यांना 1997 मध्ये द्रोणाचार्य पुरस्काराने गौरविण्यात आले. ते 1978 मधील आशियाई क्रीडा स्पर्धेत आठ सुवर्णपदकांसह 18 पदके जिंकणाऱया भारतीय संघाचेही प्रशिक्षक होते.

‘सैनी साहब’ या नावाने ओळखले जाणारे सैनी 2004 पर्यंत प्रशिक्षक होते. त्यानंतर एएफआयचे ते सल्लागार झाले. 1962 च्या आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारे गुरबचनसिंग रंधावा यांना डेकॅथलॉनमध्ये यश आजमावण्यासाठी सैनी यांनीच प्रेरित केले होते. याशिवाय त्यांनी दिग्गज मॅरेथॉन खेळाडू शिवनाथ सिंह यांनाही प्रशिक्षण दिले.

13 ऑक्टोबर

ऑलिम्पियन धावपटू चार्ली मूरे

वॉशिंग्टन | 1952 च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये 400 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत सुवर्णपदक जिंकणारे अमेरिकेचे धावपचू चार्ली मूरे यांचे निधन झाले.ते 91 वर्षांचे होते.

मूरे यांनी 1952 च्या ऑलिम्पिकमध्ये 400 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत 50.8 सेकंदांची वेळ नोंदवत सुवर्णपदक जिंकले होते. ऑलिम्पिकनंतर त्यांनी लंडनमध्ये ब्रिटिश एम्पायर स्पर्धेत 440 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत 51.6 सेकंदांची वेळ नोंदवत विश्वविक्रम केला होता.

Hockey

1 मार्च 2020

माजी हॉकीपटू बलबीरसिंग खुल्लर Balbir Singh Kullar |

नवी दिल्ली | माजी हॉकीपटू बलबीरसिंग खुल्लर Balbir Singh Kullar | यांचं पंजाबमध्ये हृदयविकाराने निधन झाले. ते 77 वर्षांचे होते. 1968 च्या ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या भारतीय संघाचे ते सदस्य होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा आणि दोन मुली आहेत. त्यांचा एक मुलगा कमलबीरसिंग अमेरिकेत स्थायिक आहे.

बलबीरसिंग खुल्लर यांचं जालंधर जिल्ह्यातील संसारपूर येथील निवासस्थानी हृदयविकाराने निधन झाले. संसारपुरातच बलबीरसिंग Balbir Singh Kullar | यांचा जन्म झाला.

1963 मध्ये फ्रान्सच्या लियोनमध्ये भारतीय संघात पदार्पण केले. ‘इनसाइड फॉरवर्ड’वर ते खेळायचे. भारतीय संघाकडून खेळताना त्यांनी बेल्जियम, इंग्लंड, नेदरलँड आणि पश्चिम जर्मनीसारख्या देशांचा दौरा केला आहे.

1966 मध्ये बँकॉक आशियाई स्पर्धेत सुवर्ण आणि 1968 मध्ये मेक्सिकोतील ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या भारतीय संघाचे ते सदस्य होते.

8 एप्रिल

स्विस आइस हॉकीपटू चापोट

ज्युरिख | स्वित्झर्लंडकडून 100 पेक्षा अधिक सामने खेळणारे माजी आइस हॉकीपटी रॉजर चापोत यांचं कोरोना संसर्गामुळे निधन झालं. ते 79 वर्षांचे होते.

चापोत स्वित्झर्लंडचे फ्रेंच भाषक क्षेत्रात राहणारे दिग्गज हॉकीपटू होते. साठच्या दशकात मधल्या फळीतील सर्वोत्तम खेळाडूंमध्ये त्यांची गणना व्हायची.

7 मे

कोडावा हॉकी महोत्सवाचे सहसंस्थापक पंडांडा कटप्पा

नवी दिल्ली | कोडावा हॉकी महोत्सवाचे सहसंस्थापक आणि कूर्ग क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्ती पंडांडा कटप्पा यांचं निधन झालं. वाढत्या वयामुळे कटप्पा यांना अनेक त्रास जाणवत होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. ते 85 वर्षांचे होते.

स्टेट बँक ऑफ इंडियाचे निवृत कटप्पा यांनी कोडावा हॉकी महोत्सवाच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावली होती. ही कोडावा कुटुंबांसाठी विशेष हॉकी स्पर्धा आहे, ज्याची सुरुवात 1997 मध्ये झाली होती.

३१ डिसेंबर

भारतीय संघाचे माजी हॉकीपटू मायकेल किंडो

राउरकेला | भारताच्या 1975 मधील हॉकी विश्व कप विजेता संघ आणि 1972 मधील ऑलिम्पिक कांस्य पदक विजेत्या संघाचे सदस्य राहिलेले मायकेल किंडो वृद्धापकाळाने निधन झाले. ते 73 वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.

किंडो फुलबॅक होते आणि 1975 मध्ये क्वालालंपूर येथे कडवे प्रतिस्पर्धी पाकिस्तानला पराभूत करीत भारताने विश्वकप जिंकला होता. या विजेत्या संघात किंडो होते.

म्यूनिख ऑलिम्पिक 1972 मध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या भारतीय संघाचेही ते सदस्य होते. यात त्यांनी तीन गोल केले होते.1972 मध्ये त्यांना अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

Football

1 एप्रिल 

मार्सिलेचे माजी अध्यक्ष पापे डियोफ Pape Diouf |

मार्सेली | मार्सिले Marseille | फुटबॉल क्लबचे माजी अध्यक्ष पापे डियोफ Pape Diouf | यांचे कोरोनामुळे निधन झाले.

पापे डियोफ हे माबाबा Mababa Diouf |, पापा डियोफ Papa Diouf | या नावांनीही ओळखले जात. ते 68 वर्षांचे होते.

डियोफ यांचा जन्म चाड येथे झाला. मात्र, त्यांच्याकडे फ्रान्स आणि सेनेगलचे नागरिकत्व होते. त्यांनी 2005 ते 2009 पर्यंत मार्सिले क्लबचा मजबूत संघ तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळेच मार्सिले क्लब 2010 मध्ये लीग वन किताब जिंकण्यात यशस्वी ठरला.

कोविड-19 च्या उपचारासाठी त्यांना डकारहून नीसकडे रवाना व्हायचे होते. मात्र, तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

6 एप्रिल

गार्डियोलाच्या आईचा कोरोनाने मृत्यू

लंडन | मँचेस्टर सिटीचे स्टार फुटबॉलपटू पेप गार्डियोला याची आई डालर्स साला कारियो यांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला. त्या 82 वर्षांच्या होत्या. स्पेनमध्ये कोरोना संसर्गामुळे एप्रिलपर्यंत 13,055 जणांचा मृत्यू झाला होता. तेथे एका दिवसात 637 लोकांनी प्राण सोडला.

6 जून

माजी फुटबॉलपटू हमसाकोया

मलाप्पुरम (केरळ) | माजी फुटबॉलपटू ई हमसाकोया E Hamsakoya | यांचे मलाप्पुरम रुग्णालयात कोविड-19 संसर्गामुळे निधन झाले. पाराप्पानांगडी येथील रहिवासी असलेले हमसाकोया 61 वर्षांचे होते.

ते मुंबईत स्थायिक झाले होते. ते संतोष ट्रॉफीत महाराष्ट्राकडून खेळायचे. ते कुटुंबासह 21 मे रोजी केरळमध्ये परतले होते. तेव्हापासून ते क्वारंटाइनमध्येच होते. कुटुंबातील पाच जणांना करोना संसर्ग झाला होता.

11 जुलै

इंग्लंडचा विश्वकप विजेता फुटबॉलपटू चार्लटन

लंडन | विश्व कप विजेत्या इंग्लंड फुटबॉल संघाचे खेळाडू आणि आयर्लंडचे माजी प्रशिक्षक जॅक चार्लटन यांचं वयाच्या 85 व्या वर्षी निधन झाले. इंग्लंडमधील पूर्वोत्तर नॉर्थम्बर्लंड येथील निवासस्थानी त्यांचं निधन झालं.

वेम्बली स्टेडियममध्ये 1966 च्या विश्वकप स्पर्धेतील अंतिम सामन्यात अतिरिक्त वेळेनंतर जर्मनीला 4-2 पराभूत करीत इंग्लंड विश्वविजेता ठरला होता. आक्रमण फळीतले चार्लटन यांनी 1966 च्या इंग्लंडच्या विश्वविजेतेपदात महत्त्वाची भूमिका बजावली होती. या संघात त्यांचे भाऊ बॉबी चार्लटनही होते.

त्यांनी 1965 ते 1970 पर्यंत इंग्लंडसाठी 35 सामने खेळले आणि 1967 मध्ये त्यांना इंग्लंडचे वर्षातले सर्वोत्तम फुटबॉलपटू म्हणून गौरविण्यात आले होते. स्थानिक सामन्यांत त्यांचा लीड्ससोबतचा प्रवास 1952 ते 73 पर्यंत चालला होता. या दरम्यान त्यांनी विक्रमी 773 सामने खेळले.

ते 1969 मधील लीगच्या विजेतेपदासह स्थानिक विजेतेपद जिंकणाऱ्या संघाचे सदस्य होते. ते 1986 मध्ये आयर्लंडचे प्रशिक्षक झाले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आयर्लंडने 1990 च्या विश्वकप स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती.

6 ऑगस्ट

व्हेनेझुएला फुटबॉल महासंघाच्या अध्यक्षांचे निधन

काराकस | व्हेनेझुएला फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष जीसस बेरारडिनेली यांचा अचानक बेशुद्ध झाल्यानंतर दोन आठवड्यांनी निधन झाले. ते ६१ वर्षांचे होते.

व्हेनेझुएलाच्या अधिकाऱ्यांनी सार्वजनिक पैशांचा गैरवापर केल्याप्रकरणी बेरारडिनेली यांच्याविरुद्ध चौकशी सुरू केली होती. त्यांनंतर 16 दिवसांनंतर त्यांचा मृत्यू झाला.

बेरारडिनेल यांना 22 जुलैला काराकस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना व्हेटिलेटरवर ठेवण्यात आले होते.

9 ऑगस्ट

भारत व मोहन बागानचे माजी फुटबॉलपटू मनितोम्बी

कोलकाता | भारतीय फुटबॉल संघाचे माजी डिफेंडर आणि मोहन बागानचे कर्णधार राहिलेले मनितोम्बी सिंह Manitombi Singh | यांचे वयाच्या 39 व्या वर्षी निधन झाले. मणिपूरच्या इम्फाळजवळील त्यांच्या गावात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

ते बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. त्यांना काय आजार होता, याची माहिती कुटुंबाने दिली नाही. त्यांच्या मागे उनके पत्नी व आठ वर्षांचा मुलगा आहे. मनितोम्बी सिंह यांच्या निधनाने मोहन बागानला धक्का बसला आहे.

प्रशिक्षक स्टीफन कांस्टेंटाइन यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणारे ते 23 वर्षांखालील भारतीय संघाचे ते प्रमुख सदस्य होते. या संघाने 2003 मध्ये हो ची मिन्ह शहरात व्हिएतनामला 3-2 असे पराभूत करीत एलजी कप जिंकला होता.

सिंगापूरमध्ये 1971 मध्ये आठ देशांची स्पर्धा जिंकल्यानंतर भारताचे हे पहिलाच आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील विजेतेपद होते. मनितोम्बी यांनी 2002 मध्ये बुसान आशियाई स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते. 2015-16 मध्ये झालेली मणिपूर राज्य लीगमध्ये त्यांची अखेरची स्पर्धा होती.

12 ऑक्टोबर

भारतीय फुटबॉल संघाचे माजी कर्णधार कार्लटन चॅपमन

नवी दिल्ली | भारतीय फुटबॉल संघाचे माजी कर्णधार कार्लटन चॅपमन यांचं बेंगलुरू येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. ते 49 वर्षांचे होते. मिडफिल्डर चॅपमन 1995 ते 2001 पर्यंत भारताकडून खेळले होते.

त्यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने 1997 मध्ये सॅफ कप जिंकला होता. क्लब स्तरावर त्यांनी ईस्ट बंगाल आणि जेसीटी मिल्ससारख्या संघांचं प्रतिनिधित्व केलं होतं.

टाटा फुटबॉल अकादमीतून प्रशिक्षण घेतलेले चॅपमन 1993 मध्ये ईस्ट बंगालशी जोडले गेले. चॅपमन यांनी पंजाबमधील क्लबकडून 14 ट्राफ्या जिंकल्या होत्या. यात 1996-97 मधील पहिल्या राष्ट्रीय फुटबॉल लीगचाही (एनएफएल) समावेश आहे.

९ नोव्हेंबर

भारतीय संघाचे माजी डिफेंडर सत्यजित घोष

कोलकाता | भारत आणि मोहन बागानचे माजी डिफेंडर सत्यजित घोष याचं तड़के बंदेल येथील देवनंदपुरातील आपल्या निवासस्थानी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 62 वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी आणि एक मुलगी आहे.

घोष यांनी 1985 मध्ये नेहरू कपमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते. घोष यांनी 1980 मध्ये आपल्या करिअरला सुरुवात केली. रेल्वे एफसीबरोबरच ते मोहन बागान क्लबशीही जोडले गेले.

भारताचे स्टार डिफेंडर सुब्रत भट्टाचार्य यांच्यासोबत त्यांची चांगली जोडी जमली होती. दुखापतींमुळे 1986 मध्ये मोहन बागानसोबतची त्यांची कारकीर्द संपुष्टात आली. त्यानंतर ते मोहम्मेडन स्पोर्टिंगशी जोडले गेले. 1989 मध्ये घोष पुन्हा बागानशी जोडले गेले आणि 1993 मध्ये निवृत्त होईपर्यंत क्लबसोबत राहिले.

15 नोव्हेंबर

लिव्हरपूलचे माजी गोलरक्षक क्लेमेन्स

लंडन : लिव्हरपूल, टोटनहॅम आणि इंग्लंडचे माजी गोलरक्षक रे क्लेमेन्स यांचं निधन झालं. क्लेमेन्स 72 वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा आणि दोन मुली असा परिवार आहे.

इंग्लंडमधील त्याच्या पिढीतील सर्वांत महान गोलरक्षकांपैकी क्लेमेन्स यांनी तीन युरोपियन चषकांव्यतिरिक्त लिव्हरपूलसह पाच उच्चस्तरीय लीगची विजेतीपदे जिंकली. क्लेमेन्स यांनी इंग्लंडकडून 61 सामने खेळले.

क्लेमेन्स अशा लिव्हरपूल संघाचे भाग होते, ज्यांनी 1977 ते 1981 दरम्यान युरोपवर वर्चस्व गाजवले. त्याचबरोबर दोन यूएफा कप, एक एफए कप आणि द लीग कप जिंकला. क्लेमेन्स यांनी टॉटनहॅमसमवेत यूएफा आणि लीग चषक जिंकला.

25 नोव्हेंबर

जगविख्यात फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना

ब्युनॉस आयर्स | जगविख्यात फुटबॉलपटू दिएगो मॅरेडोना (Diego Maradona ) यांचे 25 नोव्हेंबर रोजी रात्री निधन झाले. ते 60 वर्षांचे होते.

Argentina soccer superstar Diego Maradona passes Away

प्राथमिक माहितीनुसार, दिएगो मॅरेडोना यांना राहत्या घरी हदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे समजते.

काही दिवसांपूर्वीच मॅरेडोना यांची ब्रेन सर्जरी झाली होती. या वेळी त्यांच्या मेंदूत झालेल्या रक्ताच्या गाठी हटवण्यात आल्या होत्या. मॅरेडोना यांना दोन आठवड्यांपूर्वीही ह्रदयविकाराचा झटका आला होता.

त्या वेळी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आज त्यांना राहत्या घरी पुन्हा ह्रदयविकाराचा झटका आला. यामध्ये त्यांची प्राणज्योत मालवली.

9 डिसेंबर

अर्जेंटिना फुटबॉल संघाचे मॅनेजर साबेला

ब्यूनॉस आयर्स | विश्व कप 2014 मध्ये अर्जेंटिनाच्या फुटबॉल संघाचे प्रशिक्षक राहिलेले अलेजांद्रो साबेला यांचे हृदयविकाराने निधन झाले. ते 66 वर्षांचे होते.

त्यांना 25 नोव्हेंबर रोजी ब्यूनॉस आयर्सच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ज्या रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्याच रुग्णालयात अर्जेंटिनाचे महान फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांचं निधन झालं होतं.

10 डिसेंबर

इटलीचे विश्व कप विजेता संघाचे कर्णधार पाओलो रॉसी

रोम | १९८२ मध्ये इटलीला फुटबॉलचं विश्वविजेतेपद मिळवून देणाऱ्या संघाचे कर्णधार पाओलो रॉसी यांचं निधन झालं. ते 64 वर्षांचे होते. निवृत्तीनंतर ते समालोचक म्हणूनही सक्रिय होते. ते सरकारी प्रसारणकर्ता आरएआयशी (रेडिओ टेलिव्हिजन इटॅलिया) जोडले गेले होते.

रॉसी यांची फेडरिका कॅपेल्लेटी यांनी पतीसोबतचे छायाचित्र इन्स्टाग्रामवर शेअर करीत एक ओळ लिहिली- ‘निरंतर इटलीसाठी…’

सट्टेबाजी प्रकरणात रॉसी यांना निलंबित केल्यानंतर 1980 मध्ये त्यांनी दमदार पुनरागमन केले आणि 1982 मध्ये इटलीला विश्वविजेतेपद मिळवून देण्यात निर्णायक भूमिका बजावली.

इटलीचे नेतृत्व करण्याबरोबरच त्यांनी स्पेनमध्ये विश्वकप स्पर्धेत सहा गोल नोंदवले होते. यात ब्राझिलविरुद्ध 3-2 असा विजय मिळवताना त्यांनी हॅटट्रिक नोंदवली होती. त्यांनी पश्चिम जर्मनीविरुद्ध अंतिम फेरीतील सामन्यात पहिला गोल नोंदवला होता.

या सामन्यात इटली 3-1 ने जिंकत विश्वकपचा मानकरी ठरला. ते 1982 मध्ये फिफाचे सर्वोत्तम खेळाडू निवडले गेले होते.

14 डिसेंबर

लिव्हरपूलचे माजी प्रशिक्षक गेर्राड होलियर

पॅरिस | इंग्लंडमधील लिव्हरपूल क्लबला एका सत्रात तीन विजेतीपदे जिंकून देणारे फ्रान्सचे माजी प्रशिक्षक गेर्राड होलियर यांचे निधन झाले. ते 73 वर्षांचे होते. हृदयाच्या शस्त्रक्रियेनंतर होलियर यांचं निधन झालं.

होलियर 1990 च्या दशकाच्या सुरुवातीला फ्रान्सचेही प्रशिक्षक होते. मात्र त्यांचा हा कार्यकाळ फारसा आठवणीत राहिला नाही. फ्रान्सचा संघ 1994 मध्ये विश्वकपसाठी पात्र न ठरल्याने होलियर यांना आपलं पद गमावावं लागलं होतं.

लिव्हरपूलसोबत ते अधिक यशस्वी ठरले. त्यांच्यामुळे क्लबने 2001 मध्ये एफए कप, लीग कप आणि यूएफा कप जिंकत हॅटट्रिक साधली.

Golf

13 एप्रिल

माजी व्यावसायिक गोल्फर डग सेंडर्स

लॉस एंजिल्स | अमेरिकेचे माजी व्यावसायिक गोल्फर डग सेंडर्स यांचं निधन झालं. ते 86 वर्षांचे होते. पीजीए टूरवर सर्वांत लोकप्रिय खेळाडूंपैकी एक असलेले सेंडर्स यांनी 1956 मध्ये कॅनडा ओपनसह आपल्या व्यावसायिक कारकिर्दीत 20 किताब जिंकले.

गोल्फविश्वात ‘पीकॉक आफ द फेयरवेज’ नावाने ते लोकप्रिय होते. सेंडर्स मेजर चॅम्पियनशिपमध्ये चार वेळा उपविजेता होते.

Baseball

10 मे

माजी बेसबॉलपटू मेरी प्रेट

लॉस एंजिल्स | महिला बेसबॉल लीगमध्ये खेळलेल्या मेरी प्रेट यांचं निधन झालं. त्या 101 वर्षांच्या होत्या. दिग्गज बेसबॉलपटू मेरी 1940 च्या दशकात ‘रॉकफोर्ड पिचेस’ संघाकडून खेळायच्या.

हा संघ ऑल अमेरिकन गर्ल्स प्रोफेशनल बेसबॉल लीगच्या (एएजीपीबीएल) सुरुवातीच्या संघांपैकी एक होता. या संघाच्या मेरी अखेरच्या सदस्या होत्या. मॅसाच्युसेट्सच्या क्विन्सी येथे जॉन स्कॉट नर्सिंग होममध्ये झोपेतच त्यांचा मृत्यू झाला.

मेरी रॉकफोर्ड पिचेस आणि कॅनॉस कोमेट्स संघाच्या पिचर होत्या. ब्रिजपोर्ट येथे 1918 मध्ये जन्मलेल्या मेरी यांनी 1943 मध्ये पिचेसच्या सुरुवातीच्या संघात खेळणाऱ्या अखेरच्या जिवंत सदस्या होत्या.

15 मे

माजी बेसबॉल स्टार बॉब वॉटसन

ह्युस्टन : मेजर लीग बेसबॉलमध्ये (एमएलबी) दिग्गज बॉब वॉटसन यांचे निधन झाले. ते 74 वर्षांचे होते. वॉटसन यांनी ह्युस्टन अ‍ॅस्ट्रोजबरोबरच 14 हंगामांमध्ये मेजर लीग खेळली. 

नंतर वॉट्सन महाप्रबंधक झाले. वर्ल्ड सिरीज जिंकणारे ते पहिले कृष्णवर्णीय होते, जे महाप्रबंधक पदावर गेले. 1996 मध्ये न्यूयॉर्क याँकीजसह त्यांनी ही कामगिरी केली होती. त्यांची दोन वेळा ऑल स्टार टीममध्येही निवड झाली.

‘द बुल’ म्हणून ओळखले जाणारे वॉटसन यांनी 1973 आणि 1975 मध्ये ऑल स्टार टीममध्ये प्रवेश केला. मेजर लीगच्या इतिहासामध्ये दहा लाख धावा जमवण्याची कामगिरीही त्यांच्या नावावर आहे. 4 मार्च 1975 रोजी सॅन फ्रान्सिस्को जायंट्सविरुद्ध त्यांनी हा पराक्रम केला.

Table Tennis

10 मे

माजी राष्ट्रीय टेबल टेनिस विजेते मनमीतसिंग वालिया

नवी दिल्ली | माजी राष्ट्रीय टेबल टेनिस विजेते मनमीतसिंग वालिया यांचं कॅनडातील माँट्रियलमध्ये निधन झाले. ते गेल्या दोन वर्षांपासून एएलएसने (एमियोट्रॉफिक लेटरल स्क्लेरोसिस) पीडित होते.

या आजारात मांसपेशी कमजोर होतात. शारीरिक हालचालींवरही परिणाम होतो. मनमीतसिंग 58 वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली आहेत. उपचारासाठी ते कोइम्बतूरलाही आले होते.

मनमीत 1980 च्या दशकातील शानदार खेळाडूंपैकी एक होते. 1989 मध्ये हैदराबाद येथे पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत एस. श्रीराम यांना हरवून राष्ट्रीय विजेते झाले होते. 1981 पासून सलग चार वर्षे ते राष्ट्रीय स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळले.

मात्र, विजेतेपद जिंकू शकले नाहीत. आठ वेळचा राष्ट्रीय चॅम्पियन ठरलेले कमलेश मेहता यांच्यासोबत १९८० मध्ये आशियाई चॅम्पियनशिपसाठी ते प्रथमच भारताकडून खेळले. त्यानंतर ते अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळले. त्या वेळी भारतीय संघात मनमीत आणि कमलेशशिवाय मनजीतसिंह दुआ, बी. अरुण कुमार आणि व्ही. चंद्रशेखर यांचा समावेश होता.

Gymnastic

7 जून

अमेरिकेचे प्रसिद्ध जिम्नास्ट कुर्ट थॉमस

लॉस एंजिल्स | जागतिक चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारे अमेरिकेचे पहिले पुरुष जिम्नास्ट कुर्ट थॉमस यांचं निधन झालं. ते 64 वर्षांचे होते. त्यांना 24 मे रोजी मस्तिष्काघात झाले होते. त्या वेळी त्यांच्या मेंदूतील एक नस तुटली होती.

थॉमस यांनी 1976 च्या माँट्रियल ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेतल्यानंतर 1978 मध्ये फ्रान्सच्या स्ट्रासबोर्गमध्ये झालेल्या विश्व चॅम्पियनशिपमध्ये फ्लोअर एक्सरसाइजमध्ये सुवर्णपदक जिंकले होते.

अशी कामगिरी करणारे ते अमेरिकेतील पहिले जिम्नॅस्टिक खेळाडू होते. त्यानंतर 1979 मध्ये टेक्सासच्या फोर्ट वर्थमध्ये झालेल्या विश्व चॅम्पियनशिपमध्येही त्यांनी सुवर्णपदक जिंकले होते.

Snowboard

8 जुलै

स्नो बोर्ड विश्वविजेते पुलिन

गोल्ड कोस्ट | दोन वेळा स्नो बोर्डचे विश्वविजेते आणि शीतकालीन ऑलिम्पियन ॲलेक्स पुलिन यांचा बुधवारी ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्टमध्ये बुडूव मृत्यू झाला.

32 वर्षीय ॲलेक्स यांना जेव्हा पाण्यातून बाहेर काढले त्या वेळी कोणालाही माहीत नव्हते, की ही व्यक्ती स्नो बोर्डची विश्वविजेती खेळा़डू आहे. त्यांचे शरीर थंड पडले होते. जीवरक्षक आणि आपत्कालीन पथकाने त्यांनी कृत्रिम श्वास दिल्यानंतरही ते वाचू शकले नाहीत. ओळख पटल्यानंतर समजले, की ही व्यक्ती पुलिन आहे.

ही दुर्घटना पाम बीचवर स्थानिक वेळेनुसार सकाळी 10 वाजून 40 मिनिटांनी घडली. कृत्रिम रीफवर पुलिनला डायव्हिंग करताना एका सर्फरने पाहिले होते.

चंपी नावाने ओळखला जाणारा पुलिन याने 2011 मध्ये ला मोलिना आणि 2013 मध्ये स्टोनहॅममध्ये विश्व चॅम्पियनशिपमध्ये स्नो बोर्ड क्रॉस स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. तो 2014 सोची शीतकालीन ऑलिम्पिकमध्ये ऑस्ट्रेलियाचा ध्वजवाहक होता.

Basketball

2 सप्टेंबर 

एनबीएच्या हॉल ऑफ फेम अनसेल्ड

वॉशिंग्टन | हॉल ऑफ फेमचा भाग असलेले आणि नॅशनल बास्केटबॉल चॅम्पियनशिपच्या (एनबीए) इतिहासातील 50 सर्वश्रेष्ठ खेळाडूंमध्ये सहभागी असलेले वेस अनसेल्ड यांचे 2 जून रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. ते 74 वर्षांचे होते.

ते वॉशिंगटन विझार्डस संघात होते, ज्या संघाच्या नावावर एनबीएचे एकमेव विजेतेपद जिंकले होते. अनसेल्ड काही दिवसांपासून अनेक आजारांनी त्रस्त होते. यातच ते न्यूमोनियाशीही लढत होते.

अनसेल्ड यांनी कारकिर्दीत सर्व 13 सत्र विझार्डसकडूनच खेळले होते. अनसेल्ड पाच वेळा ऑल स्टार संघात होते. त्यांना 1988 मध्ये हॉल ऑफ फेममध्ये सहभागी करण्यात आले.

11 नोव्हेंबर

दिग्गज बास्केटबॉलपटू टॉमी हेनशॉ

बोस्टन | नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनमधील (एनबीए) ‘बोस्टन सेल्टिक’चे दिग्गज खेळाडू तसेच प्रशिक्षक राहिलेले टॉमी हेनशॉ यांचं निधन झालं. ते 86 वर्षांचे होते.

हॉल ऑफ फेममध्ये सहभागी असलेले हेनशॉ सुमारे 60 वर्षांपर्यंत एनबीएशी जोडले गेले. खेळाडू म्हणूनच नव्हे, तर प्रशिक्षक म्हणूनही ते १७ सत्रांत ‘बोस्टन सेल्टिक’शी जोडलेले होते.

Other

12 सप्टेंबर

विश्व डोपिंग निरोधक एजन्सीचे माजी अध्यक्ष फाहे

सिडनी | विश्व डोपिंग निरोधक एजन्सीचे माजी अध्यक्ष आणि सिडनीला 2000 ऑलिम्पिकचे यजमानपद मिळवून देणारे जॉन फाहे John Fahey | यांचे 76 व्या वर्षी निधन झाले.

फाहे 1992 ते 1995 पर्यंत न्यू साउथ वेल्सचे पंतप्रधान होते. फाहे यांनी 2001 मध्ये राजकीय संन्यास घेतला होता. ते 2008 ते 2013 पर्यंत वाडाचे अध्यक्ष बनले.

Swimming

4 नोव्हेंबर

ऑस्ट्रेलियाचे जलतरण प्रशिक्षक डॉन टालबोट

ब्रिस्बेन | ऑस्ट्रेलियाचे प्रसिद्ध जलतरण प्रशिक्षक आणि ऑस्ट्रेलियन क्रीडा संस्थेचे संस्थापक निदेशक डॉन टालबोट यांचे निधन झाले. ते 87 वर्षांचे होत. टालबोट यांनी क्वीन्सलँडच्या गोल्ड कोस्टमध्ये अखेरचा श्वास घेतला.

जॉन टालबोट आस्ट्रेलियन जलतरणाच्या सुवर्णकाळाचे प्रमुख होते. 1950 च्या दशकात त्यांनी जलतरणाच्या करिअरला सुरुवात केली. 1989 मध्ये आस्ट्रेलियन जलतरण प्रशिक्षक होण्यापूर्वी ते कॅनडा आणि अमेरिकेचेही प्रशिक्षक राहिले आहेत.

त्यांच्या मार्गदर्शनाखाली ऑस्ट्रेलियाने सिडनी ऑलिम्पिक 2000 मध्ये पाच सुवर्ण, नऊ रौप्य आणि चार कांस्यपदके जिंकली होती.

Tennis

7 डिसेंबर

हॉल आफ फेम टेनिसपटू डेनिस राल्स्टन

ऑस्टिन (टेक्सास) | पाच वेळा दुहेरीतील ग्रँडस्लॅम विजेते व साठच्या दशकात व्यावसायिक विश्व चॅम्पियनशिप टेनिस टूरशी जोडले गेलेले सुरुवातीच्या टेनिसपटूंपैकी एक असलेले डेनिस राल्स्टन यांचं निधन झालं. ते 78 वर्षांचे होते.

हॉल ऑफ फेमचे सदस्य राहिलेले राल्स्टन यांना कर्करोगामुळे जीव गमवावा लागला. ते साठच्या दशकात तीन वर्षांपर्यंत अमेरिकेतील अग्रमानांकित टेनिसपटू होते. त्या वेळी कम्प्युटरवर आधारित रँकिंग सुरू झालेली नव्हती.

11 डिसेंबर

विम्बलडन चॅम्पियन अॅलेक्स ओलमेडो

सांटा मोनिका (अमेरिका) | आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेममध्ये सहभागी असलेले 1959 च्या विम्बल्डन आणि ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन अॅलेक्स ओलमेडो यांचं निधन झालं. ते 84 वर्षांचे होते.

मेंदूच्या कर्करोगामुळे त्यांचं निधन झालं. ओलमेडो यांचा जन्म 1936 मध्ये पेरूमध्ये झाला होता. नंतर ते अमेरिकेत स्थायिक झाले. ते 1958 मध्ये अमेरिकेसाठी डेव्हिस करंडक स्पर्धा खेळले आणि विजेते ठरले.

त्यांनी हॅम रिचर्डसनच्या साथीने अमेरिकेची राष्ट्रीय चॅम्पियनशिपही जिंकली होती. आता ही स्पर्धा अमेरिकन ओपन म्हणून ओळखली जाते.

Wrestling

14 डिसेंबर

हिंदकेसरी पहिलवान श्रीपती खंचनाळे

पुणे | प्रसिद्ध पहिलवान आणि 1959 मध्ये हिंदकेसरीचा किताब जिंकणारे श्रीपती खंचनाळे यांचे कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात निधन झाले. ते 86 वर्षांचे होते.

खंचनाळे यांना महाराष्ट्र सरकारने शिवछत्रपती पुरस्काराने गौरविले होते. त्यांनी 1959 मध्ये नवी दिल्लीत झालेल्या रुस्तमे पंजाबचा मानकरी बट्टासिंग यांना पराभूत करून हिंदकेसरीचा किताब जिंकला होता. भारतीय कुस्तीत हा सर्वोच्च प्रतिष्ठेचा किताब मानला जातो.

Sports Journalist

7 फेब्रुवारी

प्रसिद्ध क्रिकेट पत्रकार राजू भारतन

मुंबई | प्रसिद्ध क्रिकेट पत्रकार तथा फिल्म संगीतलेखक राजू भारतन यांचं दीर्घ आजाराने मुंबईत निधन झालं. ते 86 वर्षांचे होते. त्यांच्यामागे मुलगी, नातू आहे. त्यांनी 42 वर्षांपर्यंत ‘द इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया’सोबत काम केले.

त्यांनी फिल्म्स डिव्हिजनसाठी पहिली पूर्ण लांबीची ‘द व्हिक्ट्री स्टोरी’ (1974) या क्रिकेट डॉक्युमेंट्रीचे निर्देशन केले. त्यांनी सहा पुस्तके लिहिली आहेत. ‘रायवल्स इन द सन : अ सर्व्हे ऑफ दि 1952 टूर ऑफ इंग्लंड’ (1952) हे त्यांचं पहिलं पुस्तक होतं.

त्यानंतर त्यांनी ‘इंडियन क्रिकेट – द व्हाइटल फेज’ (1977) हे पुस्तक लिहिलं. गानसम्राज्ञी लता मंगेशकर, आशा भोसले आणि लोकप्रिय संगीत निर्देशक नौशाद यांच्या जीवनावरही लिहिले.

11 ऑगस्ट

अनुभवी क्रीडा पत्रकार जी. के. मेनन

मुंबई | अनुभवी क्रीडा पत्रकार जी. के. मेनन यांचं मुंबई उपनगरात निधन झालं. ते 93 वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.

त्यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ आणि ‘दि टाइम्स ऑफ इंडिया’त काम केल्यानंतर 1990 च्या दशकाच्या सुरुवातीला फ्रीलान्सरचा मार्ग निवडत आपल्या करिअर संपुष्टात आणले.

मेनन क्लब स्तरावर क्रिकेट खेळले होते आणि दादर (मध्य मुंबई)मधील शिवाजी पार्क जिमखान्याचे सक्रिय सदस्य होते. ते 1952-53 च्या बॉम्बे युनिव्हर्सिटी संघाचे मॅनेजर होते. या संघाने बेंगलुरू येथे झालेल्या अंतिम फेरीत दिल्लीला पराभूत करीत रोहिंटन बारिया ट्रॉफी जिंकली होती.

या संघात चंदू पाटणकर, नरी काँट्रॅक्टर, रामनाथ केनी, नरेन ताम्हाणे आणि जीआर सुंदरम सारखे भविष्यातील कसोटीपटूंचा समावेश होता. भारताचा माजी वेगवान गोलंदाज (कै.) रमाकांत देसाई यांच्या करिअरमध्ये मेनन यांचा मोलाचा वाटा होता.

15 ऑक्टोबर

वरिष्ठ क्रीडा पत्रकार आणि क्रिकेट समालोचक भिमानी

कोलकाता : वरिष्ठ क्रीडा पत्रकार आणि क्रिकेट समालोचक किशोर भिमानी यांचं निधन झालं. ते 74 वर्षांचे होते.  त्यांच्या मागे पत्नी रीता आणि पुत्र गौतम भिमानी असा परिवार आहे. तेही टीव्हीवर लोकप्रिय आहेत.

काही दिवसांपूर्वी आधी त्यांना मस्तिष्काघात झाला होता आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. 1987 मध्ये पाकिस्तानविरुद्ध अहमदाबाद कसोटी सामन्यादरम्यान जेव्हा सुनील गावस्कर कसोटी क्रिकेटमध्ये 10,000 धावा करणारे पहिले फलंदाज बनले, तेव्हा भिमानी समालोचन करीत होते.

एवढेच नाही, तर चेपॉकवर 1986 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध बरोबरीत झालेल्या सामन्यादरम्यानही समालोचनाचा माइक भिमानी यांच्याच हातात होता. भिमानी यांनी कोलकात्यातील ‘द स्टेट्समैन’ या दैनिकातही काम केले आहे. ते 1978 ते 1980 दरम्यान कोलकाता क्रीडा पत्रकार क्लबचे अध्यक्षही होते.

Motor sports

12 जानेवारी

हीरो मोटरस्पोर्टसचे रॅली रायडर पाउलो

रियाद | हीरो मोटरस्पोर्टस रॅली टीमचे चालक पाउलो गोन्सालवेज यांचं डकार रॅली 2020 च्या सातव्या टप्प्यातील दुर्घटनेत मृत्यू झाला. पोर्तुगालचा 40 वर्षीय रायडर रॅलीच्या विशेष टप्प्यातील 276 व्या किलोमीटरमध्ये झालेल्या भीषण अपघातात मृत्युमुखी पडला.

2006 मध्ये डकारमध्ये पदार्पण केल्यानंतर तो चार वेळा अव्वल 10 क्रमांकात राहिला. 2015 मधील उपविजेतेपग ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती.

12 एप्रिल

मोटरस्पोर्टस’चे दिग्गज मॉस

लंडन | मोटरस्पोर्टसचे के दिग्गज ब्रिटिश चालक स्टर्लिंग मॉस यांचं दीर्घ आजाराने निधन झालं. ते ९० वर्षांचे होते.

अर्थात, मॉस कधीच फार्म्युला वन रेसचे विजेतेपद जिंकू शकले नाहीत. मात्र, ते चार वेळा उपविजेते ठरले होते, तर तीन वेळा तिसऱ्या स्थानावर राहिले आहेत. त्यांची कारकीर्द 1948 मध्ये सुरू झाली होती. त्यांनी वेगवेगळ्या 529 मोटर रेसमध्ये भाग घेतला होता. यापैकी त्यांनी 212 स्पर्धा जिंकल्या.

15 नोव्हेंबर

स्पोर्टस कार रेसर जिम पेस

मेम्फिस : अमेरिकेचे स्पोर्टस कार रेसर जिम पेस यांचे वयाच्या 59 व्या वर्षी कोविड -१९ च्या संसर्गामुळे निधन झाले.

1996 मध्ये 24 तासांच्या ली मॅन्स शर्यतीतही त्यांनी भाग घेतला होता. त्यात त्यांनी 33 वे स्थान पटकावले. 1990 मध्ये 24 तासांच्या डेटोना रेसमध्येही त्यांनी भाग घेतला आणि जीटीयू श्रेणीत ते जिंकले.

Chess

14 जानेवारी

वरिष्ठ बुद्धिबळ प्रशासक उमर कोया

कोझिकोड (केरळ) | आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाचे (फिडे) माजी उपाध्यक्ष पीटी उमर कोया यांचं निधन झालं. ते 69 वर्षांचे होते. कोया 1996 ते 2006 पर्यंत फिडेचे उपाध्यक्ष होते. त्यांचं निधन दीर्घ आजारामुळे पन्नियानकारा येथील त्यांच्या निवासस्थानी झालं. त्यांच्या मागे पत्नी आणि तीन मुले आहेत.

Keep up with news and events happening in the emerging game through our Facebook and Twitter pages.

[jnews_block_36 first_title=”Read more at :” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”60″]

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!