अमेरिकन ओपन या टेनिसविश्वातील प्रतिष्ठेच्या स्पर्धेतून माघार घेणाऱ्या खेळाडूंची संख्या वाढतच आहे. आता आघाडीच्या आणखी दोन महिला टेनिसपटूंनी अमेरिकन ओपनमधून माघार घेतली आहे.
जगातील अव्वल टेनिसपटू अॅश्ले बार्टी हिने माघार घेतल्यानंतर आता पहिल्या दहा क्रमांकातल्या आणखी दोन खेळाडूंच्या माघारीने अमेरिकन ओपनला धक्का बसला आहे. युक्रेनची एलिना स्वितोलिना (Elina Svitolina) आणि नेदरलँडची कीकी बार्टेन्स (Kiki Bertens) अशी या आघाडीच्या टेनिसपटूंची नावे आहेत.
बार्टेन्सनेही करोना महामारीचा (coronavirus) धसका घेतला आहे. अमेरिकी टेनिस संघटनेने ८ ऑगस्ट २०२० रोजी सांगितले, की बारबोरा क्रेजसिकोवा (Barbora Krejcikova) हिनेदेखील आपले नाव मागे घेतले आहे. बारबोराला दुहेरीत आठवे मानांकन आहे.
पाचवी मानांकित युक्रेनची स्वितोलिना हिने सांगितले, की प्रवास करून संघाला आणि स्वत:ला जोखमीत टाकण्याची माझी अजिबात इच्छा नाही. सातवी मानांकित डच खेळाडू बार्टेन्सने इन्स्टाग्रामवर सांगितले, की जर मी ही स्पर्धा खेळले तर युरोपातून परतताना मला क्वारंटाइन व्हावे लागेल.
बार्टेन्सला २७ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या फ्रेंच ओपनमध्ये सहभाग घेण्याची इच्छा आहे. तत्पूर्वी अमेरिकी ओपन ३१ ऑगस्ट ते १३ सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.
Comments 3