• Latest
  • Trending
सुपर डॅनची निवृत्ती…

सुपर डॅनची निवृत्ती…

August 13, 2020
सॉफ्ट सिग्नल क्रिकेट

कसोटी क्रिकेट : सॉफ्ट सिग्नल जून 2023 नंतर बाद

May 17, 2023
कोहली गंभीर

कोहली, गंभीर… शब्दाला शब्द शब्दन् शब्द!

May 3, 2023
रजनी नागेश लिमये

समर्पिता- रजनी नागेश लिमये

March 7, 2023
Jeswin Aldrin Long Jump

Jeswin Aldrin ची Long Jump ठरली हनुमान उडी!

March 3, 2023

पुन्हा कुटप्पा प्रशिक्षक

February 24, 2023
Virat Kohli 25 हजार

Virat Kohli च्या वेगवान 25 हजार धावा

February 20, 2023
चेतन शर्मा वादाचं उत्तेजक

Chetan Sharma Sting- भारतीय खेळाडू उत्तेजक घेतात!

March 3, 2023
फुटबॉल 2022 : भारतीय फुटबॉलवरील बंदीने गाजले वर्ष

फुटबॉल 2022 : भारतीय फुटबॉलवरील बंदीने गाजले वर्ष

February 19, 2023

बॅडमिंटन 2022 : सिंधू, श्रीकांतनंतरच्या फळीने जागविला विश्वास

February 11, 2023
ravindra jadeja ball tampering

काय म्हणता? Ravindra Jadeja ने Ball Tampering केलं?

February 10, 2023
विक्रमवीर नोव्हाक जोकोविच

विक्रमवीर नोव्हाक जोकोविच

February 24, 2023
हॉकी वर्ल्ड कप जर्मनी

वर्ल्ड कप हॉकी : जर्मनी 17 वर्षांनी विश्वविजेता

February 5, 2023
Thursday, June 1, 2023
kheliyad
  • Home
  • Cricket
  • All Sports
  • Inspirational story
  • Online Chess Puzzle
  • Raanwata
  • Video
  • sports quiz
No Result
View All Result
  • Home
  • Cricket
  • All Sports
  • Inspirational story
  • Online Chess Puzzle
  • Raanwata
  • Video
  • sports quiz
No Result
View All Result
kheliyad
No Result
View All Result

सुपर डॅनची निवृत्ती…

बॅडमिंटनविश्वातील अनभिषिक्त सम्राट लिन डॅन याने 4 जुलै 2020 रोजी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनमधून निवृत्ती घेतली. त्याच्या निवृत्तीने तब्बल दोन दशकांच्या झंझावाताची विश्रांती म्हणावी लागेल.

Mahesh Pathade by Mahesh Pathade
August 13, 2020
in Badminton, Other sports
1
सुपर डॅनची निवृत्ती…

Lin Dan

Share on FacebookShare on TwitterShare on LinkedinShare on TelegramShare on WhatsappShare on PinterestShare on RedditShare on Email

सुपर डॅनची निवृत्ती

बॅडमिंटनविश्वातील अनभिषिक्त सम्राट लिन डॅन याने 4 जुलै 2020 रोजी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनमधून निवृत्ती घेतली. त्याची निवृत्ती म्हणजे तब्बल दोन दशकांच्या झंझावाताची विश्रांतीच म्हणावी लागेल.
Mahesh Pathade
Sports Journalist

Follow us

या विश्वाच्या साम्राज्यावर चार राजांचं साम्राज्य होतं. या चारही राजांचा दरारा इतका होता, की कोणीही त्यांच्यासमोर टिकाव धरू शकत नव्हतं. या राजांनी अनेकदा तुंबळ युद्ध केलं. किती तरी आक्रमणे रचली. मात्र, कोणीही ना हरले, ना जिंकले.

कालांतराने या राजांनी एकामागोमाग आपल्या साम्राज्याचा त्याग केला. यापैकी अखेरचा एकमेव राजा उरला होता. अखेर या राजानेही ४ जुलै २०२० रोजी आपल्या साम्राज्याला अलविदा केला.

कदाचित तुम्हाला ही एखादी रंजक दंतकथा वाटत असेल; पण तसं अजिबात नाही. ही वस्तुस्थिती आहे. हा अखेरचा राजा म्हणजे बॅडमिंटनवर दोन दशके आपला दबदबा निर्माण करणारा चीनचा लिन डॅन. (Lin Dan) super-dan-lin-dan-retire |

इंडोनेशियाचा तौफिक हिदायत (Taufik Hidayat), डेन्मार्कचा पीटर गेड Peter Gade, मलेशियाचा ली चोंग वेई (Lee Chong Wei) आणि चीनचा लिन डॅन (Lin Dan) हे बॅडमिंटनविश्वातील ‘फोर किंग’ म्हणून ओळखले जातात.

यापैकी तिघांनी यापूर्वीच आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन कारकिर्दीतून निवृत्ती घेतली होती. या ‘फोर किंग’मधील अखेरचा चौथा राजा लिन डॅननेही निवृत्ती घेतल्यानंतर बॅडमिंटनविश्वातील एक अध्याय संपला.

तसं पाहिलं तर चिनी नावं उच्चारणं खूपच कठीण. चिनी नावांबाबत गमतीने म्हंटलं जायचं, की एखादी ताटली किंवा वाटी फेकल्यानंतर जो आवाज होतो, त्यावरून ही नावं ठेवली जात असावीत.

लिन डॅनच्या (Lin Dan) नावात असं काहीही नव्हतं. त्याची रॅकेट वाजली आणि जगभर त्याचं नाव झालं.

बॅडमिंटन विश्वात चीन, इंडोनेशिया, मलेशियाचं वर्चस्व नेहमीच पाहायला मिळतं. या चिनी भिंतीला भारतीय खेळाडूंनीही धडका दिल्या.

सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू, के. श्रीकांत, प्रणॉय कुमार, पी. कश्यप या खेळाडूंनीही आव्हान निर्माण केल्यानं चिनी नावंही आता कुठे आपल्या ओठांवर रुळू लागली आहेत. त्यातलंच एक नाव म्हणजे लिन डॅन. (Lin Dan)

लिन डॅनचा ((Lin Dan)) जन्म हक्का समाजातला. ही हक्का कुटुंबे चीनच्या पहाडी भागातली. हा समूह प्रचंड मेहनती.

प्रामुख्याने गुआंग डोंग Guangdong |, फुजिआन Fujian, जिआंग्झी Jiangxi, गुआंग्झी Guangxi, सिचुआन Sichuan, हुनान Hunan, झेजिआंग Zhejiang, हैनान Hainan आणि गिझौ Guizhou या भागात हा समूह प्रामुख्याने आढळतो, जेथे त्यांची वडिलोपार्जित घरं आहेत.

हक्का म्हणजे पाहुणी कुटुंबे. अशा या कुटुंबात लिन डॅनचा ((Lin Dan)) जन्म १४ ऑक्टोबर १९८३ रोजी झाला.

निसर्गदत्त डावखुरेपण


लिन डॅनच्या (Lin Dan) काही नैसर्गिक सवयी होत्या, ज्या त्याने कधीच बदलल्या नाहीत. उदाहरणार्थ, त्याचं डावखुरेपण. उजव्या हाताला जणू विश्वमान्यता आहे. कारण डाव्या हाताची माणसं खूपच कमी असतात.

डॅन डावखुरा आहे, घरात कुणालाही माहीत नव्हतं. पण ज्या सहजतेने तो कोणतीही वस्तू पकडायचा तेव्हा तो डाव्या हाताचाच उपयोग करायचा. त्याच्या वडिलांना माहीत नव्हतं, की डॅन डावखुरा आहे. एकदा त्याने खेळण्यांतील बंदूक डाव्या हातात पकडली होती.

वडिलांनी पाहिलं, अरे हा तर डावखुरा आहे! त्यांनी त्याला ती बंदूक उजव्या हातात पकडायला सांगितली. त्याची डावखुरी सवय मोडण्यासाठी बरेच प्रयत्न झाले, पण डॅनने ही सवय अजिबातच सोडली नाही.

मात्र, जेवताना तो उजव्या हाताचा उपयोग करतो एवढंच त्याच्या आईवडिलांना समाधान होतं.

तर तो पियानोवादक झाला असता…


लिन डॅन (Lin Dan) खूपच लहान होता तेव्हा त्याच्या आईवडिलांनी त्याला पियानो शिकवायला पाठवलं. भविष्यात तो उत्तम पियानिस्ट होईल, अशी त्यांची इच्छा होती. लिन डॅनला संगीतकलेत अजिबातच रुची नव्हती.

कोणत्याही कलेविषयीचं प्रेम हृदयापासून असावं लागतं. मात्र, जेव्हा त्याच्या मित्रांना बॅडमिंटन खेळताना पाहिलं तेव्हा तो आनंदाने ओरडला… त्याचे हात बॅडमिंटन खेळण्यासाठी आसुसले.

बॅडमिंटनविषयीची ही त्याची पहिली ओढ. त्याने पहिल्यांदा बॅडमिंटनच्या रॅकेटला स्पर्श केला तेव्हा तो अवघ्या पाच वर्षांचा होता. नंतर हीच रॅकेट त्याच्या आयुष्याचा भाग बनली.

त्याची बॅडमिंटन रॅकेटवरील पकड इतकी घट्ट होती, की वयाच्या बाराव्या वर्षी त्याने नॅशनल ज्युनिअर चॅम्पियनशिप जिंकली. डॅनचं (Lin Dan) हे पहिलं मोठं यश.

चिनी आर्मीत गिरवले बॅडमिंटनचे धडे


लिनचं कौशल्य पीपल्स लिबरेशन आर्मीने हेरलं. चिनी सैन्यात स्पोर्ट ब्रँच आहे. या स्पोर्ट ब्रँचमध्ये लिन डॅनची (Lin Dan) वयाच्या १३ व्या वर्षी वर्णी लागली.

सैनिकी शिस्तीत डॅनने बॅडमिंटन कोर्टवर दहा वर्षे जणू युद्धाचे धडे घेतले. उत्तम शारीरिक तंदुरुस्ती हे सैनिकी प्रशिक्षणाचं वैशिष्ट्य.

त्यामुळेच डॅनचे स्मॅशेस कमालीचे वेगवान असायचे. त्याने कारकिर्दीत ताशी ४०१ किलोमीटर वेगाने स्मॅश मारला आहे. या सैनिकी शिस्तीमुळे डॅनच्या मनावर एकच गोष्ट बिंबवण्यात आली, ती म्हणजे जिंकण्यासाठीच लढायचं.

तब्बल दहा वर्षांच्या प्रशिक्षणानंतर त्याने बॅडमिंटनवर प्रभुत्व मिळवलं. वयाच्या १८ व्या वर्षी त्याने राष्ट्रीय बॅडमिंटन संघात स्थान मिळवलं.

लिन डॅन (Lin Dan) जेव्हा कोर्टवर उतरला तेव्हा त्याचं अस्तित्व केवळ एक स्पर्धक म्हणूनच होतं. जागतिक क्रमवारीत ६० व्या क्रमांकावरील खेळाडूची तुलना अव्वल स्थानावर कधी होऊच शकत नव्हती.

मात्र, कोर्टवर आपल्या कर्तृत्वाने जी भरारी घेतली, त्याला तोड नव्हती. मार्च 2004 मध्ये जागतिक क्रमवारीत 60 व्या क्रमांकावरून थेट पहिल्या क्रमांकावर झेप घेतली.

तब्बल दोन वर्षे त्याने हे अव्वल स्थान राखलं. बॅडमिंटनमध्ये इतक्या प्रदीर्घ काळ अव्वल स्थानावर राहण्याचा विक्रम आजही कोणी मोडू शकलेलं नाही.

अपयशाने अस्वस्थ


जगातील सर्वच स्पर्धा त्याने जिंकल्या. जणू अपयश त्याला माहीतच नाही. मात्र, असं अजिबात नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात अपयशाचा एक काळ असतो, जो यशाकडे घेऊन जातो.

लीन डॅनने (Lin Dan) अशाच एका भयंकर अनुभवातून गेला आहे. विश्वविजेतेपद असून लिन तसा दीनच होता. कारण या किताबांमध्ये ऑलिम्पिक पदक नव्हतं. 2004 च्या अथेन्स ऑलिम्पिक स्पर्धेत त्याला ही संधी होती.

मात्र, त्याचा हा ऑलिम्पिक दौरा वांझोटाच ठरला. पहिल्याच फेरीत जगज्जेता लीन (Lin Dan) पराभूत झाला. ज्या भूमीत पराभूत झाला, तीही एका जगज्जेत्याचीच होती. म्हणजे सिकंदराची.

लीन कमालीचा निराश झाला. त्याला ती अथेन्सची युद्धभूमी खायला उठली होती.

आता इथं थांबणं त्याला असह्य झालं होतं. मायभूमीत परतण्याची इच्छाही त्याने व्यक्त केली. मात्र, त्याच्या संघाने त्याला परवानगी दिली नाही.

पराभूत लीन 21 दिवस ऑलिम्पिकच्या कुंभमेळ्यात हरवला होता. पराभवाने तो कमालीचा अस्वस्थ होता. रात्र रात्र झोप लागत नव्हती.

तो त्याच्या मित्रांना म्हणाला, “तुम्ही चिंता करू नका. मी उत्तम आहे.” मात्र, त्याचं मन कमालीचं अस्वस्थ होतं. तो चीनला परतला तेव्हा भीतीने त्याला ग्रासले होते. कोणालाही तोंड दाखवण्याची जागा राहिली नव्हती.

कधी घरी जाऊन स्वतःला एक खोलीत बंदिस्त करून घेतो असं झालं होतं. जगातला अव्वल नंबरच्या या सुपर डॅनने नंतर पाच विश्वविजेतीपदे आणि अन्य आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील खोऱ्याने पदके होती. मात्र, एका ऑलिम्पिक पदकाने त्याला अस्वस्थ केलं.

संतापात तोडले रॅकेट


या पराभवातून लिन (Lin Dan) स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करीत होता. त्याने ठरवलं, आता २००८ ची ऑलिम्पिक स्पर्धा जिंकल्याशिवाय स्वस्थ बसायचं नाही. स्पर्धेला वर्ष-दीड वर्ष बाकी होतं. त्याला आता कुणाचाही सल्ला नकोसा झाला होता.

कारण त्याला आत्मविश्वासाची गरज होती आणि तो कुणाच्या शब्दांतून मिळेल असं त्याला अजिबात वाटलं नाही. कारण त्याला एक भीती होती.

२००८ मध्ये लोकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही तर…? त्याची ही अस्वस्थता प्रशिक्षणातूनही उफाळून यायची. इतकी, की त्याने किती तरी रॅकेट तोडले! प्रशिक्षणातच तो भयंकर दबावाखाली आला होता.

२००८ जसजसं जवळ येऊ लागलं तसतसं भीतीने पुन्हा डोके वर काढले. त्याची झोप उडाली. तो फक्त प्रतिस्पर्ध्याचाच विचार करू लागला. तो काय खात असेल, काय विचार करीत असेल…

ऑलिम्पिक सुवर्णपदकाने आयुष्य परिपूर्ण


त्याचं आयुष्य जणू आता २००८ च्या ऑलिम्पिकवरच अवलंबून होतं आणि ते खरंही होतं. चार विश्वविजेतीपदांचा स्वामी ऑलिम्पिकविना भिकारी, अशी त्याची अवस्था होती. तो ऑलिम्पिकच्या युद्धभूमीवर उतरला आणि एकेक सामना जिंकत अंतिम फेरीत पोहोचला.

आता ही लढत सोपी मुळीच नव्हती. तसं पाहिलं तर त्याचं रौप्यपदक निश्चित झालं होतं. पण तो रौप्यपदकासाठी खेळतच नव्हता. त्याला हवं होतं सुवर्ण. पण ते सहजी मिळणार नव्हतं. कारण समोर होता मलेशियाचा दिग्गज खेळाडू ली चोंग वेई (Lee Chong Wei).

चिनी भिंतीला हादरे देण्याची क्षमता याच ली चोंग वेईकडे होती. ज्याच्यासाठी लिनने रॅकेट तोडल्या, रात्र रात्र झोपला नाही, एवढेच नाही तर प्रशिक्षकाशीही भांडला, त्या सुवर्णपदकासाठी लिन (Lin Dan) आता चोंग वेईशी लढत होता. त्याने आपलं संपूर्ण कौशल्य पणाला लावलं आणि अखेरच्या स्मॅशवर चोंग वेई पराभूत झाला. लिन जिंकला होता.

वैवाहिक जीवन


तारुण्यात त्याने बॅडमिंटनच्या महत्त्वाच्या स्पर्धा जिंकल्या आणि प्रसिद्धीच्या झोतात आला. चाहत्यांच्या गळ्यातला ताईत बनला होता. त्यापैकीच त्याची एक चाहती होती झी झिंगफँग (Xie Xingfang). नेमकं कोण कोणाच्या प्रेमात पडलं माहीत नाही, पण २००३ मध्ये हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले हे नक्की.

पत्नी झी झिंगफँगसोबत लिन डॅन

झी झिंगफँग साधारण मुलगी नव्हती. ग्वांगझूची रहिवासी असलेली झिंगफँगही उत्तम बॅडमिंटनपटू. तिच्या नावावर दोन विश्वविजेतीपदे आहेत. दोघेही उत्तम खेळत होते. मात्र, झिंगफँग अपयशामुळे काहीशी निराश होती. तिला काही सुचत नव्हतं.

अशातच लिन डॅनने (Lin Dan) तिला बळ दिलं. प्रोत्साहन दिलं. दोघेही एकाच खेळाचे असल्याने मिश्र दुहेरीत खेळावी तसे ते दोघे अडचणींचं शटल सहजपणे टोलवत एकमेकांना साथ देत होते. यातूनच प्रेमाचा अंकुर फुटला. त्यांचं प्रेमप्रकरण क्रीडाविश्वात चवीनं चघळलं जायचं. मात्र, दोघांनीही आपल्या प्रेमाची कधीच जाहीर वाच्यता केली नाही.

या प्रेमावर अखेर अधिकृत मोहोर उमटली. दोघांचा १३ डिसेंबर २०१० मध्ये वाङनिश्चय झाला. दोन वर्षांनी २३ सप्टेंबर २०१२ मध्ये दोघेही विवाहबद्ध झाले. झिंगफँग लिन डॅनपेक्षा दोन वर्षांनी मोठी आहे.

लग्नानंतर लिन डॅनचा खेळ अधिकच बहरला. खेळण्याबरोबरच त्याने हुआकिओ विद्यापीठाची मास्टर्स डिग्री घेतली. २०१२ मधील लंडन ऑलिम्पिक स्पर्धा जिंकल्यानंतर तर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला.

या स्पर्धेनंतर त्याच्या आयुष्यावर पुस्तक प्रकाशित झालं, अंटिल दि एंड ऑफ दि वर्ल्ड (Until the End of the World). लिन डॅन आणि झी झिंगफँग हे जगातील सर्वांत भाग्यवान दाम्पत्य म्हणून मानलं जायचं.

पैसा, प्रसिद्धी या दाम्पत्याच्या पायाशी लोळण घेत होतं. मात्र, एका घटनेने लिन दाम्पत्याच्या आयुष्यात वादळ आलं.

लिन डॅनच्या कारकिर्दीला काळा डाग


लिन डॅन लोकप्रियतेच्या शिखरावर होता. बॅडमिंटनमध्ये असा कोणताही किताब शिल्लक नाही, जो लिन डॅनने (Lin Dan) जिंकलेला नाही. त्यामुळे जगभरात त्याच्या चाहत्यांची कमी नव्हती.

चीनमध्ये तर तो राष्ट्रीय हिरो झाला होता. त्याची एक ग्लॅमरस प्रतिमाही बनत गेली. अर्थात, सुपर डॅनला हा सगळा लौकिक कदाचित झेपला नसावा. किंबहुना तो वाहवत गेला आणि एक दिवस अचानक त्याच्या या प्रतिमेला काळा डाग लागला.

ही घटना ऑक्टोबर 2016 मधील आहे, ज्या वेळी या सुपर हिरोची एक आक्षेपार्ह क्लिप व्हायरल झाली. झाओ याकी Zhao Yaqi | या प्रसिद्ध मॉडेलशी त्याचे विवाहबाह्य संबंध असल्याचे या व्हिडीओ क्लिपमधून जगासमोर आले. त्या वेळी एकच खळबळ माजली.

झाओ याकी Zhao Yaqi | या प्रसिद्ध मॉडेलशी विवाहबाह्य संबंधाने चर्चेत.

हे प्रकरण लिन डॅनच्या आयुष्यात वादळ निर्माण करणारं ठरलं. विशेष म्हणजे ही क्लिप अशा वेळी व्हायरल झाली, ज्या वेळी लिनची पत्नी झी झिंगफँग गर्भवती होती.

अद्भुत, अकल्पनीय असा सुपर डॅन म्हणून ज्याचा लौकिक आहे, त्याने गर्भवती पत्नीला धोका देऊन एका मॉडेलशी अनैतिक संबंध ठेवावेत, हे चिनी जनतेला रुचले नाही. त्याची सगळीकडे छी थू सुरू झाली.

झाओ याकी ही 2009 मधील ग्लोबल टुरिझम मिस वर्ल्डची उपविजेती सुंदरी होती. ही क्लिप व्हायरल झाल्यानंतर झाओ याकीपेक्षा लिन डॅन हाच चिनी जनतेच्या निशाण्यावर आला.

अर्थात, झाओ याकीलाही बरंच भोगावं लागलं हा भाग निराळा. पण लिन डॅनची (Lin Dan) पत्नी गर्भवती असताना हे प्रकरण समोर आल्याने लिन सर्वांच्या टीकेचं लक्ष्य ठरला.

अशा वेळी झी झिंगफँगवर काय संकट कोसळलं असेल याची कल्पनाच न केलेली बरी. अखेर लिन डॅनने सोशल मीडियावर आपली चूक मान्य करीत कुटुंबाची आणि मित्रांची जाहीर माफी मागितली. झी झिंगफँगनेही त्याला माफ केलं.

इथं झिंगफँग प्रगल्भ वाटली. तिने हे प्रकरण फारसं ताणलं नाही. खरं तर ती तिची अगतिकता असेल किंवा टोकाचा निर्णय घेऊन उद्ध्वस्त आयुष्य जगण्यापेक्षा तिने त्याची चूक माफ केली असेलही. काहीही असो, लिनचं आयुष्य सावरलं, पण झाओला या प्रकरणाने प्रचंड अस्वस्थ केलं.

तिनेही पत्रकार परिषद घेत जाहीर माफी मागितली. त्या वेळी तिला अश्रू आवरत नव्हते. “मला माहीत नव्हतं, की आपल्या बेजबाबदार वर्तनाने इतरांना किती त्रास, वेदना पोहोचू शकतील,” असा खुलासा करीत दिलगिरीही व्यक्त केली. त्या वेळी झाओ 34 वर्षांची होती. आता ती चाळिशीत पोहोचली आहे.

“मी माफीची अपेक्षा करू शकत नाही. मात्र, मला माझ्या कुटुंबासाठी, माझ्या सामान्य जीवनासाठी एक संधी हवी आहे,” अशी भावनिक साद तिने घातली.

हे प्रकरण आल्यानंतर अनेक उलटसुलट चर्चांनाही उधाण आलं होतं. झाओ याकी हिला लिनने अनेक लक्झरी कार, तसेच घरही भेट दिल्याची चर्चा होती.

मात्र, या सगळ्या अफवांचं तिने खंडन केलं. हे प्रकरण शमलं, पण लिनची प्रतिमा काळवंडली. सुपर डॅन म्हणून कौतुक होत असलं तरी माणूस म्हणून त्याची कायमच हेटाळणी होत राहिली.

टॅटूमुळे चर्चेत

लिन डॅनने शरीरावर सहा टॅटू गोंदलेले आहेत. या टॅटूंमुळेही तो चर्चेत आला आहे. एकदा लंडन ऑलिम्पिकमध्ये खेळताना त्याच्या डाव्या दंडावर क्रॉसचं चिन्ह असलेलं टॅटू गोंदलेलं प्रेक्षकांना दिसलं. त्यावरून त्याच्या चाहत्यांमध्ये चर्चेला उधाण आलं होतं.

दंडावरील क्रॉस टॅटूमुळे चाहत्यांनी उंचावल्या भुवया.

अनेकांनी त्याला सुनावलंही. लिन डॅनने धर्म बदलला की ख्रिश्चन धर्माचा चाहता आहे? अशा अनेक प्रश्नांनी विबोसारख्या सोशल नेटवर्किंगवर त्याला ट्रोल करण्यात आलं.

अखेर लिन डॅनने खुलासा केला, की क्रॉस टॅटू माझ्या आजीसाठी गोंदलेलं आहे. तिची ख्रिश्चन धर्मावर श्रद्धा आहे. त्यानंतर चर्चांना पूर्णविराम मिळाला.

जगातला एकमेव खेळाडू


लिन डॅन (Lin Dan) सतत जिंकत होता. फोर किंगमधील इंडोनेशियाचा ली चोंग वेई हा एकमेव खेळाडू होता, ज्याने लिन डॅनला कडवी लढत दिली. मात्र, सलग दोन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये लिन डॅनने त्याला पराभूत केले होते.

हे दोन्ही राजे एकमेकांशी ४० सामने खेळले आहेत. यात लिन डॅन २८ वेळा, तर ली चोंग वेई फक्त १२ वेळा जिंकला. महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये लिन डॅनने (Lin Dan) ली चोंग वेईला हमखास पराभूत केले आहे. मात्र, दोघांची मैत्री आजही कायम आहे.

ली चोंग वेई म्हणायचा, “मी ज्या वेळी सराव करायचो, त्या वेळी माझ्या डोक्यात फक्त लिन डॅनचा विचार सुरू असायचा. मला माहिती होतं, की कोणतीही मोठी स्पर्धा जिंकायची असेल तर मला लिन डॅनला हरवावंच लागेल. मी जेव्हा प्रशिक्षकाला म्हणायचो, की माझी वाट फक्त लिन डॅन (Lin Dan) पाहत असेल.”

ली चोंग वेईचं हे खरंही होतं. कारण बहुतांश स्पर्धांत ते एक तर अंतिम फेरीत किंवा उपांत्य फेरीत तरी एकमेकांशी भिडायचे. ली चोंग वेईचीच ही अवस्था होती असं अजिबातच नाही.

लिन डॅनही सराव करताना ली चोंग वेईचाच विचार करायचा. मात्र, लिन डॅन सरस ठरला. त्याचा हा प्रतिस्पर्धी निवृत्त झाल्यानंतर फोर किंगमधला लिन डॅन एकमेव कोर्टवर होता. त्याला रोखणारे फोर किंगमधील राजेही नव्हते. तो एकटाच अनभिषिक्त राजा होता.

जगातली सगळी पदके त्याने आपल्या खिशात घातली. असा एकही किताब त्याने शिल्लक ठेवला नव्हता, जो त्याच्या जेतेपदाच्या यादीत नाही.

ऑलिम्पिकमध्ये दोन सुवर्णपदके, पाच वेळा वर्ल्ड चॅम्पियन, दोन वेळा विश्वविजेता, पाच वेळा सुदिरामन कपचा विजेता, सहा वेळा थॉमस कप, पाच वेळा आशियाई स्पर्धेतील विजेता, पाच वेळा एशियन चॅम्पियनशिप ही यादी पाहिली की थक्क होतं.

तब्बल 69 आंतरराष्ट्रीय स्पर्धा तो जिंकला आहे. एकूणच सर्व विजेतीपदे असलेला तो एकमेव खेळाडू आहे. त्याला सुपर डॅन का म्हणतात, तर ते यामुळेच. बॅडमिंटनचा ग्रँड स्लॅम जिंकणाऱ्या या योद्ध्याला 2016 नंतर मात्र उतरती कळा लागली.

सुवर्णकाळाला ओहोटी


भारताचा अव्वल बॅडमिंटनपटू के. श्रीकांतने 2016 मध्येच म्हंटलं होतं, आता लिन डॅनचा सुवर्णकाळ आता संपला आहे. मात्र, डॅन (Lin Dan) संपलेला नव्हता.

२०१७ मध्ये त्याने अनेक महत्त्वाची विजेतीपदे जिंकली. मात्र, जिंकण्यातलं सातत्य मंदावलं होतं. तो अव्वल स्थानावर नव्हता.

गेल्या वर्षी एप्रिल २०१९ मध्ये मलेशिया ओपन ही त्याची अखेरची स्पर्धा ठरली.

या वयात शरीर साथ देणार नाही. आता पुढचं आयुष्य कुटुंबासाठी असेल. त्यांना जास्तीत जास्त वेळ देता येईल. अर्थात चार ऑलिम्पिक स्पर्धा खेळल्यानंतर मी निवृत्तीचा विचार कधीच केला नव्हता. मी खूप प्रयत्न केले, मेहनत घेतली. पण मी माझी कारकीर्द आणखी विस्तारू शकलो नाही. – लीन डॅन

कोरोना महामारीमुळे तर सर्वच स्पर्धा ठप्प झाल्या. त्यात वयही साथ देत नव्हतं. कारकिर्दीची अखेरच्या टप्प्यात कामगिरीही घसरत चालली होती.

जागतिक क्रमवारीत एकेकाळी अव्वल स्थानी असलेला हा सुपर डॅन अखेरच्या टप्प्यात १९ व्या स्थानापर्यंत घसरला. त्याच्याच देशातल्या शि युकी आणि चेन लोंगसारख्या नव्या दमाच्या दिग्गज खेळाडूंचे आव्हानही त्याच्यासमोर होते.

कदाचित पुढची ऑलिम्पिक आपण खेळू शकणार नाही, ही जाणीव त्याला प्रकर्षाने झाली असावी. म्हणूनच त्याने बॅडमिंटनला अलविदा केला. तब्बल दोन दशके बॅडमिंटनवर अधिराज्य गाजविणाऱ्या लिन डॅनचा प्रवास थांबला.

जिंकल्यानंतर लिन डॅन नेहमी सैनिकी थाटात सॅल्यूट करायचा. बॅडमिंटनला अलविदा करणाऱ्या २१ व्या शतकातल्या या सुपर डॅनच्या कारकिर्दीला आमचाही सॅल्यूट.


[table id=6 /]

Also read...

विल्मा रुडॉल्फ
All Sports

विल्मा रुडॉल्फ हिची प्रेरणादायी कहाणी

December 5, 2022
अंगावर शहारे आणणारी अरुणिमाची कहाणी
Inspirational Sport story

अंगावर शहारे आणणारी अरुणिमाची कहाणी

October 27, 2020
दारा टोरेस ऑलिम्पिक
All Sports

दारा टोरेस- चाळिशीनंतरही ऑलिम्पिक गाजविणारी जलतरणपटू

December 26, 2021
Mahesh Pathade

Mahesh Pathade

Next Post
most beautiful women in sports

most beautiful women in sports | सौंदर्य आणि क्रीडाकौशल्य यांचा सुंदर मिलाफ

Comments 1

  1. Pingback: P V Sindhu | बॅडमिंटनमधील प्रवाही ‘सिंधू’ - kheliyad

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

CONTENT

  • All Sports
  • Women Sports
  • Cricket
  • Tennis
  • Environment
  • Jagjit Singh Gazal
  • Online Chess

INFORMATION

  • Sports History
  • About Us
  • Sports Quiz
  • Inspirational Sports Story

    SOCIAL MEDIA

    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Home
    • About US
    • Gallery
    • Contact

    © 2020 Kheliyad Copyright © 2020 Website The "kheliyad" is not responsible for the content of external sites.

    No Result
    View All Result
    • Home
    • Cricket
    • All Sports
    • Inspirational story
    • Online Chess Puzzle
    • Raanwata
    • Video
    • sports quiz

    © 2020 Kheliyad Copyright © 2020 Website The "kheliyad" is not responsible for the content of external sites.

    error: Content is protected !!