बॅडमिंटनमधील प्रवाही सिंधू

Follow us :
चीनच्या अभेद्य भिंतींवर साईना नावाच्या लाटा आदळत असताना ‘सिंधू’चा प्रवाह कुणाच्या लक्षात आला नव्हता. मात्र, २०१३ मध्ये या प्रवाहाचा तडाखा जगाला प्रथमच जाणवला. मात्र, नदीला कधी तरी महापूर येतो आणि ओसरतोही…‘संथ वाहते कृष्णामाई’सारखा…तिचा प्रवाह कुणाच्या लक्षात येत नाही.
मात्र, हा प्रवाह क्षणिक नव्हता. ती वादळापूर्वीची शांतता होती. 2013 मध्ये मकाऊ ओपन (Macau Open) जिंकून तिने अखेर ते सिद्ध केलं. बॅडमिंटनविश्वावरील नवी स्टार खेळाडू ‘पुसरला वेंकटा सिंधू’ (Pusarla Venkata Sindhu) अर्थात पी. व्ही. सिंधू P V Sindhu | हिने साकारलेली ही कामगिरी.
रॅकेट स्पोर्टमध्ये आशिया खंड नुकताच कुठं तरी बाळसं धरू लागला होता. टेनिस सानिया मिर्झा, तर बॅडमिंटनमध्ये चीन, मलेशिया, इंडोनेशिया, कॅनडानंतर भारतीयांनीही आपल्या पावलांचे ठसे उमटवण्यास सुरुवात केली होती. सुरुवातीला अपर्णा पोपट, पी. गोपिचंद यांनी बॅडमिंटनविश्वावर भारताची ओळख निर्माण करून दिल्यानंतर साईना नेहवाल, नंतर पी. व्ही. सिंधूने P V Sindhu | ही ओळख अधिक सुस्पष्ट केली.
बॅडमिंटनची 2015 मधील जागतिक क्रमवारीत पुरुष गटात पहिल्या दहा खेळाडूंमध्ये आठ खेळाडू आशिया खंडातील होते, तर दोन युरोप खंडातील. यात आशिया खंडातील आठव्या स्थानी भारताचा एकमेव के. श्रीकांत होता (श्रीकांत मार्च 2020 च्या रँकिंगमध्ये 14 व्या स्थानावर घसरला आहे ).
महिलांची आजची (वर्ष 2020) स्थिती पाहिली तर सिंधू एकमेव भारतीय खेळाडू आहे, जी सातव्या स्थानावर आहे, तर एकेकाळची अव्वल बँडमिंटनपटू साईना नेहवाल 20 व्या स्थानावर घसरली आहे. अर्थात, पुरुष आणि महिला गटात भारतातील तीन खेळाडू (किदांबी श्रीकांत, साईना नेहवाल, पी व्ही सिंधू) अव्वल स्थानावरही काही काळ होतेच.
2015 मधील स्थिती पाहिली तर महिला गटातील पहिल्या २० खेळाडूंमध्येही १६ खेळाडू आशियातलेच आहेत. त्यात दुसऱ्या स्थानी भारताची साईना, तर १२ व्या स्थानावर पी. व्ही. सिंधू P V Sindhu | आहे. उर्वरित युरोप खंडातील आहेत. या क्रमवारीवरूनच बॅडमिंटनचं चित्र स्पष्ट होतं.
उर्वरित खेळाडूंमध्ये चीन, जपान, कोरियातील खेळाडूंचीच नावे सातत्याने चमकत आहेत. मात्र, हे चित्र फार काळ राहणार नाही असं आशादायी चित्र साईनानंतर पी.व्ही. सिंधूने भारतीयांच्या मनावर रंगवलं.
P V Sindhu | पी. गोपीचंदमुळे प्रेरणा
खेळाविषयी सिंधूची निष्ठा वादातीत आहे. वयाच्या आठव्या वर्षापासून बॅडमिंटनचे धडे गिरवणारी पी. व्ही. सिंधू P V Sindhu | या खेळाकडे ठरवून आली, असं म्हंटलं तर ते चूक ठरणार नाही. वडील अर्जुन पुरस्कारप्राप्त व्हॉलीबॉलचे खेळाडू. असं असलं तरी ‘पीव्ही’ व्हॉलीबॉलकडे वळली नाही.
२००१ मध्ये पुल्लेला गोपीचंदने ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपमध्ये मिळवलेला विजय आणि तत्कालीन मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्या हस्ते त्याने स्वीकारलेला पुरस्कार पाहून ती भारावून गेली होती. इथेच तिचा खेळ निश्चित झाला आणि गोपीचंदच्याच मार्गदर्शनाखाली तिचा बॅडमिंटनचा प्रवास प्रशस्त झाला.
P V Sindhu | सरावासाठी 56 किमीचा रोजचा प्रवास
सिंधूने वयाच्या आठव्या वर्षी पहिल्यांदा रॅकेट उचलली. बॅडमिंटन कोर्ट आणि सिंधू हे एक समीकरणच झालं होतं. रोज सात तास सराव करायचा. तिचं खेळाशी नातं इतकं घट्ट होतं, की घर ते पी. गोपीचंद अॅकॅडमी असा ५६ किलोमीटरचा प्रवास ती रोज करायची. यातून जो वेळ मिळायचा तो तिच्या शैक्षणिक अभ्यासासाठी.
त्यावर ती म्हणायची, ‘‘बॅडमिंटनला पहिलं प्राधान्य, नंतर अभ्यास. शाळेत फक्त पास व्हायचं एवढंच माझं लक्ष्य!’’ पण ती शाळेत ७० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवायची हेही तितकच खरं.
P V Sindhu | पहिलं मेडल ब्राँझ
सिंधूने २०१३ मध्ये जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत ब्राँझ मेडल मिळवत ऐतिहासिक कामगिरी केली. जागतिक स्पर्धेत पदक मिळविणारी ती पहिली भारतीय महिला बॅडमिंटनपटू ठरली. मकाऊ ओपनमधील सुवर्णपदकापेक्षाही हे ब्राँझ मेडल तिच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम मेडल असेल.
साईना जागतिक क्रमवारीत पहिल्या किंवा दुसऱ्या स्थानावर असणे जसे भारतीय बॅडमिंटनला अभिमानास्पद आहे, तसेच पी. व्ही. सिंधूने P V Sindhu | आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकणे प्रत्येक भारतीयासाठी गौरवास्पद आहे. यापूर्वी महिलांमध्ये अपर्णा पोपट हे एकमेव भारतीय नाव आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनवर ठसा उमटवून गेले होते.
अपर्णानंतर 15 वर्षांनी महिला बॅडमिंटनला उभारी
अपर्णाने डेन्मार्कमध्ये १९९६ मध्ये तिने जागतिक ज्युनिअर बॅडमिंटन स्पर्धेत सिल्व्हर मेडल जिंकले होते. १९९८ मध्ये कॉमनवेल्थ गेममध्येही तिने सिल्व्हर मेडल जिंकण्याची किमया साधली होती. नऊ वेळा सीनिअर नॅशनल टायटल जिंकणारी ती एकमेव भारतीय महिला खेळाडू आहे. प्रकाश पदुकोण यांच्या कामगिरीशी बरोबरी करणारी ही कामगिरी होती.
अपर्णानंतर तब्बल 15 वर्षांच्या कालखंड गेला आणि मग कुठे भारतात साईना नेहवाल, सिंधूसारख्या खेळाडू उदयास आल्या. अर्थात, अपर्णा खेळत होती त्या वेळची परिस्थिती आणि आजची परिस्थिती यात मोठा फरक आहे.
त्या वेळी महाराष्ट्रात प्रशिक्षक फारसे नव्हतेच. आजही तीच परिस्थिती आहे. पुण्यातील एका कार्यक्रमात पी. गोपीचंद म्हणाले होते, की ‘महाराष्ट्रात बॅडमिंटन समृद्ध असलं तरी त्यांच्या गुणवत्तेला पैलू पाडणारे प्रशिक्षक नाहीत!’ केवळ बॅडमिंटनच नाही, तर अन्य खेळांतही हीच अवस्था आहे. काहीही असो, खेळावर निष्ठा असलेल्या खेळाडूंची प्रतिभा कधीही झाकोळत नाही, हे सिंधूने स्पष्ट केले आहे.
P V Sindhu | हार न मानणारी खेळाडू
अनुकूल- प्रतिकूल कशीही परिस्थिती असली तरी सिंधू मात्र स्थितप्रज्ञ राहिली. विनातक्रार फक्त सराव करीत राहिली. नवनवीन काही तरी शिकत राहिली. एक वेळ अशी होती, की आतापर्यंत म्हणजे जवळपास दीड-दोन वर्षे तिला कोणत्याही स्पर्धेत चमक दाखवता आलेली नव्हती.
२०१३ मध्ये मलेशिया ओपन बॅडमिंटन ग्रँडप्रिक्स गोल्ड स्पर्धेतील गोल्ड मेडलव्यतिरिक्त तिने कोणतेही मेडल जिंकलेले नव्हते. जागतिक स्पर्धेतील मेडलनंतर एखादा खेळाडू बॅडपॅचमध्ये असेल तर त्याची अवस्था काय होत असेल याची कल्पना न केलेली बरी. अशा वेळी मनःस्थिती दोलायमान होते.
जागतिक स्पर्धा जिंकल्यानंतर जेवढे कौतुक होते, तेवढेच टीकेचे घावही सोसावे लागतातच. आता बस एवढंच; पुढे काही अपेक्षा ठेवण्यात अर्थ नाही, असाही सूर टीकाकारांनी लावला. सिंधूने मात्र जीवतोड मेहनत आणि देशासाठी सर्वोत्तम खेळण्याकडेच तिने लक्ष दिलं. म्हणूनच सिंधू कधी डगमगली नाही.
तिचे प्रशिक्षक गोपीचंद यांनीही तिच्याबाबत म्हंटलंच होतं, की सिंधू कधीच हार न मानणारी खेळाडू आहे. मकाऊ ओपन जिंकून तिची ही विजिगीषू वृत्ती दिसून आली. तिच्या दृष्टीने तीन गोष्टी सर्वांत महत्त्वाच्या आहेत. त्या म्हणजे शारीरिक तंदुरुस्ती, प्रतिस्पर्ध्याच्या खेळाचा अभ्यास आणि कोर्टवरील व्यूहरचना. तिचा लक्ष्य या तीनच गोष्टींवर राहिलं. रॅकेट स्पोर्टवर भारतीय खेळाडूंचा दबदबा अबाधित राखण्यात म्हणूनच सिंधूचा वाटा मोलाचाच राहिला आहे.
P V Sindhu |साईनाशी तुलना
पी. व्ही. सिंधूच्या यशानंतर एक कुतूहल भारतीयांमध्ये नेहमीच राहिलं आहे. ते म्हणजे साईनाविरुद्धचा तिचा सामना. खरं तर दोघींमध्ये स्पर्धा अजिबात नाही. आयबीएलमध्ये मात्र या दोघींच्या सामन्याबाबत कमालीची उत्सुकता होती. साईनाकडे अनुभव आहे. सिंधू अवघ्या विशीत असताना जेव्हा साईनाशी तुलना होऊ लागली, तेव्हा सिंधू बॅडमिंटनचे बारकावे शिकत होती. तिने या तुलनेकडे कधीच लक्ष दिले नाही.
साईनाने कारकिर्दीत ४५२, तर सिंधूने २२७ सामने खेळले आहेत. त्यामुळे अनुभवाच्या कसोटीवर साईना उजवी आणि वरिष्ठ खेळाडू आहे. या दोन्ही खेळाडू भारतीय बॅडमिंटनची ताकद आहे. सिंधूने २२७ पैकी १५५ सामने जिंकले, तर ७२ सामन्यांत पराभव स्वीकारला आहे.
2015 च्या मोसमात तिला ३० पैकी १७ सामने गमवावे लागले आहेत. किती सामने गमावले किंवा जिंकले याचा हिशेब सिंधूने कधीच ठेवला नाही. पराभवाचं दुःख तिने कधीच बाळगलं नाही. त्यापेक्षा वीरांगणेसारखं लढण्याचं समाधान तिला जास्त महत्त्वाचं वाटलं. निष्ठेने खेळत राहणं म्हणजे सतत प्रवाही राहणं. ‘सिंधू’चा हाच प्रवाहीपणा तिचं मन कधीही गढूळ करीत नाही. निष्ठा स्वच्छ राहते. तिला माहिती आहे त्सुनामी कधी तरीच येते. प्रवाह मात्र सातत्याने यशाची तहान भागवत राहतो…!
[table id=12 /]
(Maharashtra Times : 30 Nov. 2015)
Comments 2