All SportsKabaddiSports HistorySports Review

तीस का दम

बड्डी महर्षी बुवा साळवी म्हणायचे, की दम हा कबड्डीचा आत्मा आहे. हा आत्मा टिकवण्याच्या दृष्टीने कबड्डीने महत्त्वपूर्ण बदल केला. गेल्याच महिन्यात कबड्डी महासंघाने ३० सेकंदांचा दम अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला. यासह आणखीही काही बदल केले आहेत, जे देखण्या कबड्डीला आणखी स्मार्ट आणि वेगवान करणारे ठरणार आहेत…

श्वासोच्छ्वास ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. आपलं जगणं-मरणंच एका श्वासावर आहे. हेच कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी अतिशय सोप्या शब्दांत सांगितलं आहे, ‘‘आला सास गेला सास, जीवा तुझं रे तंतर, अरे जगनं मरनं एका सासाचं अंतर…’’

आपल्या जन्मा-मरणाचं अंतर एका श्वासाचं आहे. मात्र, हा श्वास आपण किती वेळ घेऊ शकतो, हे व्यक्तीनिहाय अवलंबून आहे. कबड्डी हा खेळही श्वासावर म्हणजेच योगावर आधारलेला रांगडा खेळ. म्हणूनच बुवा साळवींनी या दमाला कबड्डीचा आत्मा म्हंटलं आहे. मात्र, हा दम किती असावा याचे संकेत असले तरी निश्चित नव्हते. आता ते निश्चित केल्याचे समाधान आहे.

घर तसा पाहुणा किंवा देश तसा वेश या उक्तीनुसार गावातून शहरात आल्यानंतर शहरातल्या लाइफस्टाइलशी जुळवून घ्यावेच लागते. तेथे तुम्हाला जन्मदत्त अस्मिताही बाजूला ठेवाव्या लागतात. कबड्डीही मातीतून मॅटवर आली. केवळ मॅटवर आली म्हणून कबड्डी स्मार्ट झाली नाही, तर पारंपरिक नियमांतही बदल केल्याने ती स्मार्ट झाली. गेल्याच महिन्यात कबड्डीने चार बदल केले आहेत. त्यातील महत्त्वपूर्ण बदल म्हणजे प्रत्येक चढाई ३० सेकंदांची असेल. दुसरा बदल तीनपेक्षा कमी खेळाडू असलेल्या बचाव संघाने चढाईपटूची पकड केल्यास ती सुपर पकड मानली जाईल आणि या पकडीला दोन गुण मिळतील. तिसरा आणि चौथा बदल पंचांशी निगडित आहे. एक गणवेशाशी, तर दुसरा मानधनाशी निगडित आहे. पंचांचा गणवेश आता पिवळा फुल टी शर्ट आणि काळी पँट व पांढरे शूज असा असेल.

कबड्डीतील नियमांत जे दोन महत्त्वपूर्ण बदल आले आहेत, ती प्रो-कबड्डीची देणगी आहे. यापूर्वीही चढाई किती वेळ असावी याचे काही संकेत होतेच; पण त्याला मर्यादा निश्चित नव्हती. बऱ्याचदा एक चढाई ४० ते ५० सेकंदांपर्यंतही घेतली जात होती. मात्र, प्रो कबड्डीने ३० सेकंदांचा दम आणि सुपरपकडीचे दोन गुण अमलात आणल्यानंतर कबड्डी महासंघाने हे दोन नियम अमलात आणले. अर्थात, दम धरल्यानंतरही कबड्डी कबड्डीचा उच्चार मात्र स्पष्ट असायला हवा, याकडेही कटाक्ष ठेवायला हवा. यापूर्वी राजाराम पवार, सदानंद शेट्टे यांच्यासारखे किती तरी खेळाडू जेव्हा चढाई करायचे तेव्हा त्यांचा कबड्डी कबड्डीचा दम प्रेक्षक गॅलरीतही ऐकू यायचा. आता बहुतांश चढाईपटूचा आवाजच कानी पडेनासा झाला आहे. त्यासाठी पंचांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

कबड्डीतच नव्हे, तर बहुतांश सर्वच खेळांत श्वासाला महत्त्व आहे. धनुर्विद्येतही बाण सोडण्यापूर्वी श्वास रोखून धरावा लागतो, बास्केटबॉलमध्येही २४ सेकंदांत चेंडू बास्केट करावाच लागतो, मार्शल आर्टमध्येही जेव्हा बर्फाची लादी फोडण्याचे जे कर्तब दाखवले जाते, त्या वेळी आधी दीर्घ श्वास घेतल्यानंतर आघात केला जातो. म्हणूनच कबड्डीत तीस सेकंदांची चढाई करण्याचा नियम करण्यामागे शास्त्रशुद्ध कारण आहे. उशिरा का होईना, कबड्डीने ते अधिक सुस्पष्ट केले हे महत्त्वाचे. हा कबड्डीचा आत्मा टिकवण्याच्या दृष्टीने पडलेले हे महत्त्वाचे पाऊल म्हणावे लागेल.

बदलाची ९७ वर्षे

कालौघात अनेक खेळांमध्ये बदल झाले. पौराणिक संदर्भ असलेल्या कबड्डीला मात्र बदलण्यासाठी मोठा ‘दम’ घ्यावा लागला. भारतात विविध राज्यांमध्ये कबड्डी वेगवेगळ्या नावाने खेळला जात होता. मात्र, त्यात सगळीकडे सारखे नियम नव्हते. १९१८ मध्ये यात काही नियम बनवले. मात्र, एकूणच बदलाची नांदी खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातून झाली. १९२३ मध्ये या खेळातील नियमांत बदल हवेत असे भारतीय ऑलिम्पिक संघटनेनेही सुचवले. त्यानुसार ठोस पाऊले उचलली आणि १९२४ मध्ये पुण्यातील डेक्कन जिमखान्याने या खेळाची नियमावली तयार केली. १९५० मध्ये भारतीय कबड्डी महासंघाची स्थापना झाल्यानंतर नियमांमध्ये मोठ्या अंतराअंतराने बदल होत गेले. १९१८ ते २०१५ अशी बदलाची ९७ वर्षे या कबड्डीने पाहिली आहेत. अशा स्थितीतही कबड्डीचा आत्मा टिकून राहिला हेही विशेष.

बदलामागची कारणे

प्रो-कबड्डीने लोकप्रियतेचे शिखर गाठले. मात्र, त्यामागे नियमांतील बदल हे सर्वांत महत्त्वाचे कारण आहे. कबड्डी रटाळ होऊ नये म्हणून ती वेगवान करण्यासाठी प्रो-कबड्डीने केलेले बदल यशस्वी ठरले. त्यातला महत्त्वाचा बदल म्हणजे ३० सेकंदांची चढाई. ती मोजण्यासाठीही ३० सेकंदांचे बझर आणण्यात येणार आहेत. सध्या स्टॉप वॉच वापरले जातात. या बदलामागच्या कारणांबाबत महाराष्ट्र कबड्डी संघटनेचे सचिव संभाजी पाटील यांनी सांगितले, की या बदलांमागे वैज्ञानिक आधार आहे. खरं तर ३० सेकंदांचा नियम आधीही होताच. फक्त ते मोजण्याचं साधन नव्हतं. आता त्यासाठी बझर यंत्रणा आल्याने अधिक अचूकता येईल आणि महत्त्वाचे म्हणजे कबड्डी फास्ट होईल. आज ५२ देशांनी कबड्डीला स्वीकारलं आहे. मातीतून मॅटवर गेल्याने कबड्डीला वैज्ञानिक बदल मानावेत लागतील. कारण मॅटवर वेगाला जास्त महत्त्व राहील. विशेष म्हणजे मॅटवर फिटनेसही तितकाच महत्त्वाचा आहे. शूज घालून खेळायचे असल्याने पकड टाळण्यासाठी वेगवान खेळ करणे आवश्यक आहे. त्यामुळेच तीस सेकंदांची चढाई आवश्यकच आहे. पंचांना पूर्वी निळा टी-शर्ट आणि पांढरी पँट होती. आता पिवळा टी-शर्ट आणि काळी पँट असा गणवेश निश्चित करण्यामागेही वैज्ञानिक कारण आहे. प्रकाशझोतातील सामन्यात प्रकाश रिफ्लेक्ट होऊ नये म्हणून हा बदल करण्यात आल्याचेही पाटील यांनी सांगितले. एकूणच व्यावसायिक स्तरावरील हे बदल झाले असले तरी कबड्डीचा आत्मा टिकून राहिला. 

आंतरराष्ट्रीय पातळीवर जायचं असेल तर नियमांत बदल करणे आवश्यकच होते. एका व्यक्तीची श्वासोच्छवासाची क्षमता किती असू शकते, याचा विचार करूनच तीस सेकंदांची चढाई निश्चित केली आहे. साधारणपणे ४० सेकंदांचा दम खूप कमी लोकांचा आहे. तो सर्वांचाच असेल असे नाही. शिवाय मॅटवर वेगवान खेळ करण्यासाठी हा बदल चांगला आहे, असे नाशिक जिल्हा कबड्डी संघटनेचे सरकार्यवाह प्रशांत भाबड यांनी सांगितले. हे बदल महाराष्ट्रातील सर्वच खेळाडूंनी मनापासून स्वीकारले आहेत. जळगाव जिल्हा कबड्डी संघटनेचे सरकार्यवाह नितीन बरडे, माजी अध्यक्ष मोहन भावसार यांनीही आधुनिक बदलाचे स्वागत केले आहे.

प्रो-कबड्डीने आणखी महत्त्वाचा बदल केला तो म्हणजे तीन चढाया वांझोट्या म्हणजेच निष्फळ ठरल्या तर त्या चढाईपटूला बाद ठरवले जाते. या नियमाबाबत दुमत होते म्हणूनच तो नियम महासंघाने तूर्तास तरी स्वीकारलेला नाही. कारण नियमांतील बदल टप्प्याटप्प्याने असावे; एकदम नको, म्हणूनच हा नियम तूर्तास बाजूला ठेवलेला असेलही. मात्र, नाकारलेला निश्चितच नाही. एकूणच बदलाची ९७ वर्षे टिपताना कबड्डी केवळ स्मार्ट झाली नाही, तर परिपक्व आणि चैतन्यदायीही झाली आहे.

(Maharashtra Times, Nashik & Jalgaon : 14 Dec. 2015)

[jnews_hero_11 post_offset=”5″ include_category=”60″]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!