All SportsFootballInspirational Sport storyInspirational story

कसे बनले महान फुटबॉलपटू पेले?

महान फुटबॉलपटू आणि ब्राझीलला फुटबॉलच्या यशोशिखरावर नेणारे एडसन अरांतस डो नेसिमेन्टो उर्फ पेले (वय 82) यांचे गुरुवारी, 29 डिसेंबर 2022 रोजी रात्री निधन झालं. अनेक दिवसांपासून ते आतड्याच्या कर्करोगाशी झुंज देत होते. त्यांच्यावर एक महिन्यापासून येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाने एका युगाचा अंत झाला. पेलेंच्या फुटबॉल प्रवासावर एक प्रकाशझोत…

फुटबॉलचा जादूगार, द किंग म्हणून ज्यांचा आवर्जून उल्लेख केला जातो. मात्र, पेले स्वत:ला ‘फुटबॉलचा बीथोवन’ (Beethoven of Football) म्हणायचे. त्यांच्याकडे अशी काही जादू होती, की संपूर्ण विश्व या देखण्या फुटबॉलच्या प्रेमात पडलं.

तसं पाहिलं तर ब्राझील भ्रष्टाचार, सैन्याचा उठाव आणि और अत्याचारी सरकारमुळे कमालीचा होरपळत आहे. अशा परिस्थितीत पेलेंनी फुटबॉलला नवी ओळख मिळवून दिली. फुटबॉल खेळणे जर कला असेल तर पेलेंपेक्षा श्रेष्ठ कलाकार विश्वात दुसरा कोणीही नसेल. तीन वर्ल्ड कप विजेतीपदे, 784 गोल आणि जगभरातील फुटबॉलप्रेमींसाठी प्रेरणास्रोत बनलेले पेले यांनी यशाची मोठी गाथा सोडून या जगाचा निरोप घेतला. तसं पाहिलं तर त्यांनी 1200 पेक्षा अधिक गोल केले होते; मात्र फिफाने केवळ 784 गोलला मान्यता दिली आहे. क्रीडाविश्वातील पहिल्या वैश्विक सुपरस्टारपैकी एक असलेले पेले यांची लोकप्रियता भौगोलिक सीमांच्या बंधनात अजिबात अडकली नाही.

महान फुटबॉलपटू पेले यांचं पूर्ण नाव एडसन अरांतेस डो नासिमेंतो (Edson Arantes do Nascimento). त्यांचा जन्म 1940 चा. फुटबॉलची लोकप्रियता शिखरावर नेण्यात आणि त्यासाठी मोठं मार्केट निर्माण करण्यात पेले अग्रणी होते. त्यांची लोकप्रियता इतकी होती, की 1977 मध्ये ते कोलकात्यात आले तेव्हा जणू संपूर्ण शहरच ठप्प झालं होतं. ते 2015 आणि 2018 मध्येही भारतात आले होते.

पेले यांनी वयाच्या 17 व्या वर्षी म्हणजे 1958 मध्ये आपल्या पहिल्याच विश्व कप स्पर्धेत ब्राझीलची छबीच बदलून टाकली. हा पहिला वर्ल्ड कप ते स्वीडनमध्ये खेळले होते. या स्पर्धेत त्यांनी चार सामन्यांत सहा गोल केले. त्यापैकी दोन अंतिम फेरीतील सामन्यात होते. फायनलमध्ये ब्राझीलला त्यांनी यजमान स्वीडनला 5-2 असा विजय मिळवून दिला. याच सामन्यापासून त्यांनी यशाची एक मोठी रेघ खेचली. फिफाने गौरविलेल्या महान खेळाडूंच्या यादीतले पेले राजकीय नेत्यांच्याही आवडीचे राहिले. 1970 च्या विश्व कप स्पर्धेपूर्वी त्यांना राष्ट्रपति एमिलियो गारास्ताजू मेडिसी यांच्यासोबत एका मंचावर स्थानापन्न होण्याचा मान मिळाला होता. हे मेडिसी ब्राझीलच्या हुकूमशाही सरकारमधील सर्वांत निर्दयी सदस्यांपैकी एक होते. ब्राझीलने 1970 ची स्पर्धा जिंकली, जो पेलेंचा कारकिर्दीतला तिसरा विश्व कप होता. ब्राझीलच्या गुंतागुंतीच्या शासनकाळात मध्यमवर्गातून आलेला एक कृष्णवर्णीय खेळाडू फुटबॉलविश्वातील कोहिनूरसारखा देदीप्यमान निघाला. पेलेंची लोकप्रियता इतकी होती, की देशातील अंतर्गत कलहही त्यांच्या एका सामन्यासाठी बाजूला ठेवले जात होते. 1960 च्या दशकात अशीच एक घटना घडली होती. नायजेरियात सरकार आणि विरोधकांमध्ये प्रचंड कलह माजला होता. मात्र, हा गृहकलह 48 तासांसाठी स्थगित करण्यात आला. का, तर त्यांना लागोसमध्ये पेलेंचा एक सामना पाहता यावा!

एकदा कॉस्मॉसच्या आशिया दौऱ्यावर असताना 1977 मध्ये महान फुटबॉलपटू पेले यांना मोहन बागान क्लबने कोलकात्यात आमंत्रित केले होते. त्या वेळी त्यांनी ईडन गार्डनवर जवळपास अर्धा तास फुटबॉल खेळले. त्यांना पाहण्यासाठी या मैदानावर तब्बल 80,000 प्रेक्षकांनी हजेरी लावली होती. या सामन्यानंतर मोहन बागानचं जणू नशीबच पालटलं आणि संघ विजयाच्या वाटेवर परतली. त्यानंतर पेले 2018 मध्ये कोलकाता आले. ही त्यांची शेवटची भेट ठरली. त्या वेळीही त्यांच्याविषयीची प्रेम तसुभरही कमी झालेलं नव्हतं.

पेले यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाक म्हणाले होते, ‘‘तुम्ही कधी ऑलिम्पिक नाही खेळलात, पण तुम्ही ऑलिम्पिक खेळाडू आहात. कारण संपूर्ण कारकिर्दीत ऑलिम्पिकच्या मूल्यांना तुम्ही आत्मसात केले.’’

फुटबॉलविश्वात अनेक वर्षांपासून चर्चा होते, की पेले, मॅराडोना आणि आता लिओनेल मेस्सी यांच्यात सर्वांत महान कोण? दिएगो मॅराडोना यांनी दोन वर्षांपूर्वीच जगाचा निरोप घेतला. मेस्सीने दोन आठवड्यांपूर्वीच विश्व कप जिंकण्याचं स्वप्न पूर्ण केलं.

पेलेंसारख्या खेळाडूंचं निधन होत नाही, तर अमर होतात. त्यांच्या खेळाची छाप कधीच धूसर होणार नाही. गुडबाय फुटबॉलच्या राजा! (Beethoven of Football)

कोलकात्यावर ‘ब्लॅक पर्ल’ची जादू

ऋषिकेश मुखर्जीचा एक विनोदी चित्रपट आहे- ‘गोलमाल.’ त्यात उत्पल दत्त इंटरव्ह्यूमध्ये अमोल पालेकरला ‘ब्लॅक पर्ल’ पेले यांच्याविषयी विचारतात. त्या वेळी अमोल पालेकर म्हणतो, असं ऐकलंय, की कलकत्त्यात (कोलकाता) सुमारे 30-40 हजार वेडे त्यांच्या दर्शनासाठी अर्ध्या रात्री दमदम विमानतळावर जमा झाले आहेत… चित्रपटातला हा संवाद फुटबॉलचा जादूगार पेले यांच्याप्रती असलेल्या वेडेपणाचं उत्तम उदाहरण.

ही घटना होती 1977 ची, जेव्हा पेले प्रथमच कोलकात्यात आले होते. त्या वेळी संपूर्ण शहर त्यांच्या रंगात रंगलं होतं. दिएगो मॅराडोनाचा ‘हँड ऑफ गॉड’ आणि लिओनेल मेस्सीचं विश्व कप जिंकण्याचं अपूर्ण स्वप्न पूर्ण होण्याच्या अनेक वर्षांपूर्वीची ही गोष्ट. ब्राझीलचा या स्टार फुटबॉलपटूने बंगालला या सुंदर खेळाने वेडं केलं होतं. ईडन गार्डनचं मैदान 24 सप्टेंबर 1977 रोजी प्रेक्षकांनी खचाखच भरलं होतं. सामना होता न्यूयॉर्क कॉस्मॉस विरुद्ध मोहन बागान यांच्यात. न्यूयॉर्क कॉस्मॉसकडून खेळत होते तीन वेळचे विश्व कप विजेते पेले. कॉस्मॉस क्लब म्हणजे कुशल खेळाडूंचा भरणा. दुसरीकडे मोहन बागान क्लब देशातच अडचणींची वाट तुडवत होता. कारण ईस्ट बंगालचा त्या वेळी दबदबा वाढला होता. अशा परिस्थितीतही मोहन बागान निडरपणे खेळला आणि महान फुटबॉलपटू पेले यांना एकही गोल करू दिला नाही. मोहन बागानने जवळजवळ 2-1 ने सामना जिंकलाच होता… पण एका वादग्रस्त पेनल्टीमुळे लढत 2-2 अशी बरोबरीत येऊन ठेपली. मोहन बागानचे प्रशिक्षक पी. के. बॅनर्जी यांनी त्या वेळी गौतम सरकारवर पेलेंना रोखण्याची जबाबदारी सोपवली होती. सरकारसाठी तर ही ‘ड्रीम मॅच’च होती. त्यामुळे सरकारने कोणतीही कसूर ठेवली नाही. या लढतीनंतर ‘मोहन बागान’चं नाव देशात कमालीचं लोकप्रिय झालं.

मोहन बागानने सायंकाळी पेले यांचा सत्कार सोहळा ठेवला. या सोहळ्यात त्यांना हिऱ्याची अंगठी दिली जाणार होती. मात्र, खेळाडूंना सगळ्यात जास्त रुची ‘ब्लॅक पर्ल’ला भेटण्यातच होती. पेलेंना सर्वांत प्रथम भेटले ते गोलकीपर शिवाजी बॅनर्जी. जेव्हा सहाव्या खेळाडूची घोषणा झाली, तेव्हा अनेक लोकांच्या गराड्यात अडकलेले पेले बाहेर आले आणि त्यांनी या खेळाडूला अर्थात गौतम सरकारला प्रेमाने आलिंगन दिलं.

‘‘चुन्नीदा (चुन्नी गोस्वामी) सुद्धा माझ्याजवळच उभे होते. त्यांनी पेलेंचं हे वाक्य ऐकलं. ते मला म्हणाले, गौतम, आता तू फुटबॉल खेळणे सोड. आता हे कौतुक ऐकल्यानंतर काय मिळवायचं बाकी ठेवलंय. माझ्या कारकिर्दीतलं हे सर्वांत मोठं यश होतं. खरंच!’’ – गौतम सरकार

सरकारने 45 वर्षांनंतरही या आठवणी ताज्या ठेवल्या. ते म्हणाले, ‘‘तू 14 क्रमांकाच्या जर्सीवाला आहे, ज्याने मला गोल करू दिला नाही. मी स्तब्ध झालो.’’

सरकार म्हणाले, ‘‘चुन्नीदा (चुन्नी गोस्वामी) सुद्धा माझ्याजवळच उभे होते. त्यांनी पेलेंचं हे वाक्य ऐकलं. ते मला म्हणाले, गौतम, आता तू फुटबॉल खेळणे सोड. आता हे कौतुक ऐकल्यानंतर काय मिळवायचं बाकी ठेवलंय. माझ्या कारकिर्दीतलं हे सर्वांत मोठं यश होतं. खरंच!’’

हा सामना कोलकाता मैदानाचे प्रसिद्ध फुटबॉल प्रशासक धिरेन डे यांच्या प्रयत्नांचा परिणाम होता. ते त्या वेळी मोहन बागानचे महासचिव होते.

सरकार म्हणाले, ‘‘माझा विश्वासच बसत नव्हता, जेव्हा धिरेनदा यांनी आम्हाला सांगितलं, की पेले आपल्याविरुद्ध खेळणार आहेत. आम्ही म्हणालो, की खोटं नका बोलू. मात्र, नंतर समजलं, की खरंच सामना होत आहे. त्यानंतर आमची झोपच उडाली.’’

तीन आठवड्यांपूर्वीच तयारी सुरू झाली होती. या सामन्यात पहिला गोल करणारे श्याम थापा म्हणाले, ‘‘पेले यांच्याविरुद्ध खेळण्यासाठीच मी ईस्ट बंगाल सोडून मोहन बागानमध्ये आलो. या सामन्याने आमच्या क्लबचं नशीबच बदललं.’’

मोहन बागानने या सामन्याच्या चार दिवसांनंतर आयएफए शील्ड स्पर्धेच्या अंतिम फेरीत ईस्ट बंगालला पराभूत केलं. त्यानंतर रोवर्स कप आणि ड्युरांड कप स्पर्धाही जिंकली.

पेले यांनी 2013 मध्ये पुन्हा कोलकात्यात पाऊल ठेवलं. दुर्गापूजेच्या काळात पेले आले होते. मात्र, या वेळी त्यांच्या हातात काठी होती. वाढत्या वयानंतरही त्यांच्याप्रती असलेलं प्रेम तसुभरही कमी झालेलं नव्हतं. त्यांच्या भेटीसाठी ‘प्रिंस ऑफ कोलकाता’ सौरव गांगुलीही सहभागी झाला होता. गांगुलीने नेताजी इंडोअर स्टेडियमवर पेलेंचं स्वागत केलं होतं. त्या वेळी गांगुली म्हणाला, ‘‘मी तीन विश्व कप स्पर्धा खेळल्या आहेत. यात विजेता, तसेच उपविजेता होण्यात बराच फरक असतो. तीन विश्व कप आणि गोल्डन बूट जिंकणं खूप मोठी गोष्ट आहे.’’

महान फुटबॉलपटू पेले म्हणाले होते, ‘‘मी भारतात येण्याचं आमंत्रण स्वीकारलं, कारण मला इथले लोक खूप आवडले.’’ पेलेंनी जाताना हेपण सांगितलं, ‘‘जर मी काही मदत करू शकलो तर मी पुन्हा येईन.’’

महानतेचे मानदंड निश्चित केले पेलेंनी

त्यांचं पदलालित्य पाहताना जणू विश्व स्तब्ध व्हायचं. पेलेंनी फुटबॉल देखणा करून महानतेचे नवे मानदंड प्रस्थापित केले होते. अनेक पिढ्यांवर अमीट छाप सोडणारे असे खेळाडू दुर्मिळच असतात. फुटबॉलचा जादूगार व महान फुटबॉलपटू पेले यांच्या निधनाने जणू एका युगाचा अंत झाला. 1958 च्या विश्वकप फुटबॉल स्पर्धेत प्रथमच खेळले तेव्हा त्यांचं वय अवघं 17 वर्षांचं होतं. ब्राझीलच्या विजेतेपदाचे सूत्रधार पेलेच होते. सत्तरच्या दशकात त्यांनी खेळातून निवृत्ती घेतली तेव्हा त्यांनी असे मानदंड कायम केले होते, की ब्राझीलच नाही, तर विश्वातील प्रत्येक फुटबॉलपटूला त्या कसोटीवरच तपासले जाऊ लागले. ब्राझीलमध्ये गारिंचापासून दीदीपर्यंत, जिकोपासून रोमारियोपर्यंत आणि रोनाल्डोपासून नेमारपर्यंत अनेक सुपरस्टार फुटबॉलपटू झाले, मात्र पेलेसारखा दुसरा कोणीच होऊ शकला नाही. तीन विश्व कप जिंकणारे एकमेव खेळाडू पेले यांनी ब्राझीलसाठी 95 गोल केले. त्यांच्यानंतर नेमारचा क्रमांक लागतो. त्याने 75 गोल केले, तर रोनाल्डोच्या नावावर 62 गोल आहेत. पेले यांनी ब्राझीलसाठी 114 सामने खेळले. त्यापैकी 92 पूर्ण आंतरराष्ट्रीय सामने होते. त्यांनी विश्व कप स्पर्धेत 14 सामने खेळत 12 गोल केले. फुटबॉलच्या महान खेळाडूंमध्ये गणले गेलेले पेले आधी सँतोस क्लबसाठी, नंतर ब्राझीलच्या संघातून आपल्या खेळाने जगाचं लक्ष वेधलं. त्यांची कलात्मकता, कौशल्य आणि पायातली जादू यामुळे प्रतिस्पर्धी खेळाडूही थक्क होत होते. त्यांच्या खेळात ब्राझीलची सांबा शैली झळकत होती. ब्राझीलला फुटबॉलची महाशक्ती बनविणारे पेले यांच्या कारकिर्दीची सुरुवात साओ पाउलोच्या रस्त्यांवर झाली. परिस्थिती हलाखीची. त्यामुळे वृत्तपत्रांच्या रद्दीचा गोळा करून ते फुटबॉल खेळत. फुटबॉलच्या महान खेळाडूंची जेव्हा चर्चा होते, तेव्हा पेले यांच्यासोबत फक्त दिएगो मॅराडोना आणि आता लियोनेल मेस्सी यांचंच नाव घेतलं जातं. पेले यांनी लीग सामन्यांत जवळपास 650 आणि वरिष्ठ सामन्यांमध्ये 1,281 गोल केले. ‘द किंग’ म्हणून ओळखले जाणारे पेले यांनी सर्वांत प्रथम 1958 मध्ये स्वीडनमध्ये झालेल्या विश्व कप स्पर्धेत वयाच्या 17 व्या वर्षी आपल्या कौशल्याची प्रचीती दिली. ते त्या स्पर्धेत सर्वांत लहान वयाचे खेळाडू होते. अंतिम फेरीत ब्राझीलने यजमान स्वीडनविरुद्ध 5-2 ने विजय मिळवला, तेव्हा दोन गोल करणारे पेले यांना सहकारी खेळाडूंनी खांद्यावर घेत जल्लोष केला होता. मात्र, चार वर्षांनंतर विश्व कप दुखापतीमुळे फारसे खेळू शकले नाही. फक्त दोन सामने त्यांना खेळता आले. मात्र, ब्राझीलने विजेतेपद राखले होते. मेक्सिकोत 1970 मध्ये झालेल्या विश्व कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत इटलीवर विजय मिळवला. त्या वेळीही पेलेंनी गोल एक गोल केला होता. या गोलचे सूत्रधार होते कार्लोस अल्बर्टो.

महान फुटबॉलपटू होण्यातला पेले यांचा प्रवास सोपा मुळीच नव्हता. त्यांचं बालपण गरिबीत गेलं. 23 अक्टूबर 1940 रोजी जन्मलेले पेले यांना फुटबॉल किट खरेदी करण्यासाठी बूटपॉलिश करावी लागली. वयाच्या अवघ्या 11 व्या वर्षी ते सँतोसच्या युवा टीममध्ये दाखल झाले होते. काही वर्षांतच त्यांची वरिष्ठ संघात निवड झाली. त्यांनी ब्राझीलसाठी 114 सामन्यांत 95 गोल केले. पेलेंचं कौशल्य पाहिल्यानंतर अनेक क्लबचं त्यांच्याकडे लक्ष गेलं. त्यांना खरेदी करण्यासाठी युरोपीय क्लबमध्ये प्रचंड चढाओढ लागली होती. ही चढाओढ रोखण्यासाठी अखेर ब्राझील सरकारने हस्तक्षेप करीत पेलेंना राष्ट्रीय संपत्ती म्हणून घोषित केले. त्यांनी आपल्या कारकिर्दीतला अखेरचा सामना 1971 मध्ये पूर्व युगोस्लावियाविरुद्ध खेळला. हा सामना 2-2 असा बरोबरीत सुटला. मैदानावरून निवृत्ती घेताना त्यांना अश्रू अनावर झाले. स्टेडियममध्ये ‘थँक्यू’चा संदेश घुमत होता आणि मोठ्या बॅनरवर लिहिलं होतं, ‘‘ लाँग लिव द किंग.’’ ब्राझीलच्या पिवळ्या दहा नंबरच्या जर्सीमध्ये पेलेंची छबी फुटबॉल चाहत्यांच्या आठवणीत कायम घर करून राहिली.

अन् पेलेंनी मला आलिंगन दिले होते

भारताचे महान फुटबॉलपटू श्याम थापा यांनी पेले यांच्याविषयी जागविलेल्या आठवणी….

ते वर्ष 1977 होते. मी त्या वेळी ईस्ट बंगालकडून खेळत होतो. त्या वेळी मी छान बहरात होतो. त्यामुळे मला अनेक क्लब घेण्यास उत्सुक होते. मोहन बागानची ऑफर खूपच आकर्षक होती. ईस्ट बंगालला हे समजल्यावर त्यांनी तेवढीच रक्कम देण्याची तयारी दाखवली. त्यामुळे मी ईस्ट बंगालकडेच राहावे असा विचार करत होतो. त्याच वेळी बागानच्या धीरेन डे यांनी मला बोलावले. त्या वेळी कराराचा नवा प्रस्ताव येणार असेच वाटले होते. मात्र, त्यांनी जे काही सांगितले ते ऐकून मला धक्काच बसला. ‘हे बघ श्याम, आमच्या विनंतीनुसार कॉसमॉस संघ आणि पेले हे कोलकोत्यामध्ये खेळणार आहेत.’ माझा कानावर विश्वासच बसला नाही. धीरेन यांनी मला याबाबतची ग्वाही दिली. पेलेंविरुद्ध खेळण्याची कल्पना मी स्वप्नातही केली नव्हती. मी लगेच ईस्ट बंगालकडे गेलो आणि त्यांना बागानकडून खेळणार असल्याचा निर्णय सांगितले. पैशांपेक्षा पेले यांच्याविरुद्ध खेळण्याची संधीच माझ्यासाठी मोलाची होती.

मी बागानकडे गेलो आणि आम्ही सुरुवातीच्या सामन्यात पराभूत झालो. चाहत्यांच्या रोषास सामोरे जावे लागत होते. महान फुटबॉलपटू पेले यांच्याविरुद्ध खेळण्याची मिळणारी संधी सर्व दु:खावर मात करीत होती. पेले कोलकात्यात आले. त्या वेळी चाहत्यांनी क्लबच्या प्रवेशाद्वाराशी चांगलीच गर्दी केली होती. कॉसमॉसविरुद्धच्या त्या लढतीच्या वेळी सर्वच आम्हाला प्रोत्साहित करीत होते. ते सर्व पेलेंचा खेळ पाहण्यासाठी आले होते. त्या वेळचे वातावरण मी कधीच विसरणार नाही.

नशीब त्यादिवशी नक्कीच प्रसन्न असणार. मी कॉसमॉसविरुद्ध गोल केल्यावर स्टेडियममधील चाहते बेभान झाले होते. सामन्याच्या दिवशी खास मेजवानी होती. आम्ही पेले यांना भेटणार होतो. पेले माझ्याकडे आले. मी त्यांना कॉसमॉसविरुद्ध गोल केला असे सांगितले. पेले यांनी माझ्याकडे पाहिले आणि अविश्वासाने विचारले. काय, तू माझ्या संघाविरुद्ध गोल केलास, मी नाही तुझ्याशी हस्तांदोलन करणार.. हे बोलत असताना त्यांनी मला त्यांच्याकडे खेचले आणि मला आलिंगन दिले आणि म्हणाले तू ग्रेट आहेस.

मला काय बोलावे तेच सूचले नाही. मी ज्यांना कायम दैवत मानले, तेच मला आलिंगन देत, मला तू ग्रेट असल्याचे सांगत होते. माझा कानांवर विश्वासच बसला नव्हता. तो माझ्यासाठी अविश्वसनीय क्षण होता. त्यांच्या या वाक्याने मला खूपच प्रेरीत केले. त्या मोसमात खूपच बहरात होतो. मोहन बागानला आयएफए शील्ड, ड्युरँड कप, रोव्हर्स कप जिंकून दिला. या तिन्ही स्पर्धांच्या अंतिम सामन्यात मी गोल केला. हे पेले यांच्यामुळे घडले होते. त्यानंतर मी सात वर्षे बागानकडून खेळलो. आता जेव्हा मागे वळून बघतो, त्यावेळी लक्षात येते, फुटबॉल दिग्गजांच्या साथीत काही सेकंद घालवल्यामुळे माझी कामगिरी उंचावली होती. पेले यांचे निधन झाल्याचे ऐकल्यावर मला गुरुवारी रात्री झोप लागली नाही. मी पहाटे दोन पर्यंत रडत होतो. ते माझे दैवत होते. आत्ता केवळ त्या आठवणी उरल्या आहेत.

[jnews_element_embedplaylist playlist=”https://www.youtube.com/watch?v=KMyUnyxVB9Q” column_width=”4″]
असा आहे पेलेंचा जीवनप्रवास
महान फुटबॉलपटू एडसन अरांतेस दो नासिमेंतो उर्फ पेले यांचा जन्म 23 ऑक्टोबर 1940 मध्ये झाला.
त्यांचा जन्म ब्राझीलमधील मिनास गेरैस या राज्यातील ट्रेस कोराकोस या गावात एका सर्वसामान्य कुटुंबात झाला.
दोन भावंडांमध्ये ते थोरले होते. त्यांना डिको हे टोपणनाव होते.
पेलेंचे वडील डॉनडिन्हो फुटबॉलपटू होते. त्यांनी पेलेंचे नाव प्रख्यात अमेरिकी संशोधक थॉमस अल्वा एडिसन यांच्या नावावरून एडिसन असे ठेवले होते.
नंतर त्याला एडसन असेच म्हणू लागले. लहानपणी पेलेंच्या एका आवडत्या फुटबॉलपटूचे नाव बिले असे होते.
त्यांचे ते नाव पेले असे उच्चारायचे. त्यावरूनच एडसनलाच सगळे जण पेले म्हणू लागले.
घरची परिस्थिती गरिबीची असल्याने त्यांनी चहाच्या दुकानात पैसे मिळविण्यासाठी काम केले.
वडिलांमुळे त्यांना फुटबॉल खेळायची सवय लागली. मात्र, फुटबॉल घेण्यासाठीही त्यांना पुरेसे पैसे नव्हते.
मोजे किंवा पेपर यांचा वापर करून ते फुटबॉल तयार करायचे आणि मित्रांसोबत खेळायचे.
अनेक छोट्या-मोठ्या क्लबकडून खेळल्यानंतर एका निवड चाचणीत त्यांनी सँटोस क्लबच्या प्रशिक्षकांना प्रभावित केले. येथून त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही.

महान फुटबॉलपटू पेले यांची अविस्मरणीय कामगिरी

3 वर्ल्ड कप तीनदा जिंकलेले एकमेव खेळाडू. 1958, 1962 आणि 1970 च्या वर्ल्ड कप विजेत्या ब्राझील संघात स्थान.
17 पेले यांनी पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकला, त्या वेळी ते 17 वर्षांचे. हा विक्रम अजूनही कायम.
1,281 पेले यांनी 1365 लढतींत 1281 गोल केले. (अनधिकृत लढतीतील धरुन). पेले संघात असताना त्यांचा सँतोस क्लब अनेकांविरुद्ध सामने खेळला होता. पेले यांच्या नेमक्या गोलबाबत वाद आहेत; पण इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फुटबॉल अँड स्टॅटिस्टिक्सच्या आकडेवारीस जास्त मान्यता दिली जाते. ब्राझील संघटना आणि सँतोसने दिलेल्या आकडेवारीनुसार 1367 सामन्यांत 1283 गोल.
757 ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांनी क्लब; तसेच आंतरराष्ट्रीय लढतीत एकूण 757 गोल 812 लढतीत केले. हा विक्रम कित्येक वर्षे कायम; पण ख्रिस्तियानो रोनाल्डोने त्यांना काही वर्षांपूर्वी मागे टाकले होते.
659 पेले यांनी सँतोस क्लबकडून 659 सामन्यांत केलेले गोल. एका क्लबकडून सर्वाधिक गोल करण्याचा पेले यांचा विक्रम लिओनेल मेस्सीने (बार्सिलोना 672) काही वर्षांपूर्वी मागे टाकला.
6 महान फुटबॉलपटू पेले यांनी सँतोसला ब्राझीलच्या सिरी एमध्ये सहादा विजेते केले. 1961-65 आणि 1968.
2 सँतोसला कोपा लिबेरटडोर्स स्पर्धेत 1962 आणि 1963 मध्ये कर्णधार असताना विजेते केले.
6 पेले यांनी ब्राझीलसाठी सहा वेगवेगळी विजेतेपदे जिंकली. याशिवाय सँतोसकडून प्रत्येकी दोनदा कोपा लिबरेटॅडोरेस आणि इंटरकाँटिनेंटल कप जिंकला
1 पेले यांनी न्यूयॉर्क कॉसमॉस संघासाठी 1977 मध्ये एनएएसएल स्पर्धा जिंकली होती. त्यांनी या संघाकडून 35 व्या वर्षी खेळण्यास सुरुवात केली. त्यांनी तीन मोसमांत 64 गोल केले.
4 पेले एकूण चार फुटबॉल वर्ल्ड कप खेळले. त्यांनी 1958च्या स्पर्धेत 6, 1962; तसेच 1966च्या स्पर्धेत प्रत्येकी 1 आणि 1970च्या स्पर्धेत चार गोल केले होते.
12 पेले यांनी फिफा वर्ल्ड कपचा निरोप घेतला, त्या वेळी त्यांनी 12 गोल केले होते. त्यावेळी सर्वाधिक गोलच्या क्रमवारीत ते दुसरे होते (जस्ट फाउंटेन, फ्रान्स – 13) सध्या किलियन एम्बापेसह संयुक्त सहावे. फाउंटेन, लिओनेल मेस्सी, गेरार्ड म्युलर, रोनाल्डो नाझारिओ (ब्राझील), मिरोस्लाव क्लोज यांच्यापाठोपाठ.
6 1970च्या मेक्सिकोतील वर्ल्ड कप स्पर्धेतील चार गोलांव्यतिरिक्त सहा गोलांत निर्णायक साह्य. एका स्पर्धेतील सर्वाधिक.
92 पेले यांच्या एकूण हॅटट्रिक. अनधिकृत लढतींतील कामगिरीसह
127 सँतोसकडून 1959च्या मोसमात 127 गोल. एका क्लबकडून एका वर्षातील हा सर्वाधिक गोलांचा विक्रम असल्याचा अनेक अभ्यासकांचा दावा; पण अधिकृत मान्यता नाही.
5 किमान चार वर्ल्ड कप स्पर्धेत गोल करणाऱ्या पाच खेळाडूंपैकी पेले एक आहेत. ख्रिस्तियानो रोनाल्डोकडून ही कामगिरी पाच स्पर्धात. मेस्सी, क्लोज आणि उवे सीलेर यांचाही त्यात समावेश.
77 पेले यांनी ब्राझीलकडून एकूण 92 सामन्यांत 77 गोल केले. ब्राझीलच्या सर्वाधिक गोलच्या क्रमवारीत ते साठ वर्षे (1962 ते 2022) अव्वल होते. नेमारने त्यांना मागे टाकले; पण तो पेले यांच्यापेक्षा 32 लढती जास्त खेळला आहे.
80.43% पेले ब्राझीलकडून 92 लढती खेळले. त्यात ब्राझीलने 67 लढती जिंकल्या, 14 बरोबरीत आणि केवळ 11 पराभव. त्यामुळे ते खेळलेल्या सामन्यात ब्राझीलच्या यशाची टक्केवारी 80.43. पेले आणि गारिंचा एकमेकांच्या साथीत खेळले, त्या वेळी ब्राझीलने एकही लढत गमावली नाही.
0.84% पेले यांची आंतरराष्ट्रीय लढतीतील सामन्यामागील गोलची सरासरी 0.84 आहे. किमान 30 गोल केलेले ब्राझीलचे खेळाडू. नेमारच्या 77 गोलची सरासरी आहे 0.62, तर रोनाल्डोच्या 62 गोलची सरासरी आहे 0.63.
16 वयाच्या 16 वर्षी ब्राझीलकडून पहिली आंतरराष्ट्रीय लढत खेळले. निरोपाची लढत खेळले, त्यावेळी वय होते 31 (1971).
17 वर्ल्ड कप स्पर्धेत पेले यांनी पहिला गोल केला, त्या वेळी त्यांचे वय होते 17 वर्षे 239 दिवस. स्पर्धेतील पहिली हॅटट्रिक केली, त्यादिवशी त्यांचे वय होते 17 वर्षे 249 दिवस आणि वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यातील (1958, वि. स्वीडन) पहिला गोल केला, त्या वेळी वय होते. 17 वर्षे 249 दिवस.
86 पेले वर्ल्ड कप खेळलेल्या लढतीत ब्राझीलच्या यशाची टक्केवारी आहे 86 टक्के. नेमके सांगायचे तर 14 सामन्यांत 12 विजय.
72.8 2000 मध्ये पेले यांची शतकातील सर्वोत्तम फुटबॉलपटू म्हणून निवड झाली. त्या वेळी फिफा पदाधिकारी, पत्रकार आणि मार्गदर्शकांनी दिलेल्या एकूण मतांपैकी 72.8 टक्के मते पेले यांना मिळाली होती. इंटरनेटच्या माध्यमातून झालेल्या मतदानात दिएगो मॅराडोना सरस ठरले होते. त्यामुळे दोघांना हा पुरस्कार संयुक्तपणे देण्यात आला होता.

पेलेंचे दहा अविस्मरणीय गोल

[jnews_element_embedplaylist playlist=”https://www.youtube.com/embed/InMfQgo8WLk” column_width=”4″]
7 सप्टेंबर 1956, सँतो आंद्रे, ब्राझील
प्रतिस्पर्धी : कोरिंथियन्स ऑफ सँतो आंद्रे
अगदी तरुण वयात पेले यांनी हा गोल केला होता. त्या वेळी त्यांनी सँतोस क्लबकडून खेळायला नुकतीच सुरुवात केली होती. या लढतीत ते दुसऱ्या सत्रात मैदानात आले होते. या लढतीत पेले यांनी देखणा गोल केला होता. ही मैत्रिपूर्ण लढत सँतोस क्लबने 7-1 अशी जिंकली होती. त्यावेळचा कोरिंथियन्सचा गोलकीपर झालुआर याने नंतर एक बिझनेस कार्ड तयार केले ज्यामध्ये त्याने स्वतःची ओळख ‘पेलेचा गोल स्वीकारणारा पहिला गोलरक्षक’ अशी करून दिली होती.
2 ऑगस्ट 1959, साओ पाउलो
प्रतिस्पर्धी : साओ पाउलोचा युव्हेन्ट्स क्लब
काही जण पेले यांच्या कारकिर्दीतील हा सर्वोत्तम गोल म्हणून गणना करतात. मात्र, याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग उपलब्ध नाही. पेले यांच्या चित्रपटात हा गोल दाखविण्यात आला आहे. त्यांच्या चाहत्यांसाठी या गोलचे चित्रिकरण आवर्जून या चित्रपटासाठी करण्यात आले आहे. मध्यभागी खेळत असलेल्या पेले यांच्याकडे चेंडू आला. त्यांनी पहिल्या बचावपटूला चकवून चेंडूचा ताबा कायम राखला. पेनल्टी स्पॉटजवळ असलेल्या दुसऱ्या बचावपटूला चकवून त्यांनी चेंडू पुढे नेला. चेंडू जमिनीवर न आदळू देता त्यांनी तिसरा बचावपटू आणि गोलरक्षक यांच्या डोक्यावरून तो गोलजाळ्यात पाठविला. या गोलमुळे युव्हेन्ट्स क्लबने त्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविले होते.
19 जून 1958, गॉथनबर्ग, स्वीडन
प्रतिस्पर्धी : वेल्स
पेले यांचा फुटबॉल वर्ल्ड कपमधील पहिला गोल केवळ अविस्मरणीय. वेल्सविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीत 66व्या मिनिटाला त्यांनी हा गोल साकारला होता. पाठीला वळसा घालून 17 वर्षीय पेले यांनी छातीवर घेऊन चेंडूवर ताबा मिळवला. डोळ्याचे पापणे लवते न लवते तोच त्यांनी उजव्या पायाने बचावपटूला चकवून सुरेख गोल नोंदविला.
29 जून 1958, सोलना, स्वीडन
प्रतिस्पर्धी : स्वीडन
पेले यांनी आपल्या पहिल्याच वर्ल्ड कपमध्ये सहा गोल नोंदविले होते. यात अंतिम लढत ब्राझील विरुद्ध स्वीडन अशी झाली होती. ब्राझीलने ही लढत 5-2 अशी जिंकली. यात पेले यांनी दोन (55, 90 मि.) गोल नोंदविले. यातील पहिला गोल त्यांनी 55व्या मिनिटाला केला होता. यानंतर लढत संपायला काही सेकंद शिल्लक असताना त्यांनी ‘हेडर’ करून ब्राझीलला विजयी केले. यातील पहिला गोल जास्त प्रभावी होता.
21 जून 1970, मेक्सिको सिटी
प्रतिस्पर्धी : इटली
पेले यांचा वर्ल्ड कपमधील बारावा आणि अंतिम गोलही अविस्मरणीयच होता. इटलीचा गोलकीपर इन्रिको अल्बेर्तोसीला चकवून त्यांनी सुरेख ‘हेडर’ केला होता. ही लढत बघण्यासाठी एक लाख सात हजारांहून अधिक प्रेक्षक उपस्थित होते. अठराव्या मिनिटाला पेले यांनी हा गोल केला होता. रिव्हेलिनोकडून पेले यांना पास मिळाला. यावर उडी मारून पेले यांनी डोक्याने गोल केला.
19 नोव्हेंबर 1969, रिओ दि जानेरो
प्रतिस्पर्धी : वास्को द गामा
पेले यांचा हा कारकिर्दीतील हजारावा गोल होता. त्यांनी तो मॅराकाना स्टेडियममध्ये पेनल्टी किकवर नोंदविला होता. लढतीच्या 78व्या मिनिटाला त्यांनी उजव्या कॉर्नरने हा गोल करून सँतोसच्या 2-1 अशा विजयात मोलाचा वाटा उचलला. वास्कोचा गोलकीपर आंद्रदाने हा गोल अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात त्याला यश आले नाही. या वेळी पेले यांनी हा चेंडू नेटमध्ये उचलला. या वेळी अनेक पत्रकार आणि छायाचित्रकारांनी मैदानात धाव घेतली. त्यामुळे ही लढत काही मिनिटे थांबविण्यात आली होती.
5 मार्च 1961, रिओ दी जानेरो
प्रतिस्पर्धी : फ्लुमिनेन्स
याला ‘गोल दी प्लाका’ असे सन्मानाने म्हटले जाते. सर्वोत्कृष्ट गोलसाठी हा शब्द वापरला जातो. मॅराकाना स्टेडियममध्ये याचा ब्राँझ फलकही आहे. अर्थात हा गोलही कॅमेरात कैद होऊ शकला नाही. मात्र, त्या वेळी उपस्थित पत्रकार सांगतात, की या मैदानी गोलसाठी पेलेने संपूर्ण मैदान व्यापले होते.
10 ऑगस्ट 1976, न्यूयॉर्क
प्रतिस्पर्धी : मायामी टोरोस
पेलेंनी काही ‘बायसिकल किक’द्वारे गोल केले आहेत. त्यापैकीच हा एक. यांकी स्टेडियममध्ये ही लढत झाली. त्या वेळी ते न्यूयॉर्क कॉसमॉस या क्लबकडून अखेरचा सामना खेळत होता. मायामी टोरोसविरुद्ध ही लढत 8-2 अशी जिंकली होती. पेनल्टी एरियामधून त्यांनी पास मिळाल्यावर काही क्षणात बायसिकल किकद्वारे हा गोल केला होता. या वेळी चेंडू रॉकेटसारखाच नेटमध्ये गेला.
11 ऑक्टोबर 1962, लिस्बन, पोर्तुगाल
प्रतिस्पर्धी : बेन्फिका
इंटरकॉन्टिनेन्टल कपमध्ये पेलेंनी या लढतीत तीन गोल केले होते. या वेळी सँतोस क्लबने जेतेपदही मिळवले होते. यातील त्यांचा दुसर वैयक्तिक गोल डोळ्याचे पारणे फेडणारा होता. तीन बचावपटूंनी भेदून त्यांनी डाव्या पायाने हा गोल नोंदविला होता.
1 ऑक्टोबर 1977, इस्ट रुदरफोर्ड, न्यूजर्सी, अमेरिका
प्रतिस्पर्धी : सँतोस
हा त्यांचा निरोपाचा सामना होता. न्यूयॉर्क कॉसमॉस आणि सँतोस यांच्यात जायंट्स स्टेडियममध्ये हा सामना झाला होता. पेले दोन्ही संघांकडून अर्ध्या वेळ खेळले. मात्र, मध्यंतरापूर्वी त्यांनी फ्री किकवरून कॉसमॉसकडून केलेला गोल अनेकांच्या स्मरणात राहिला.

पेले आमच्यासाठी देव होते…

महान फुटबॉलपटू पेलेपेले भारतभेटीवर आले तेव्हा म्हणजे 2018मध्ये त्यांची मुलाखत घेण्याची मला संधी मिळाली होती. मी जवळपास चाळिस मिनिटे त्यांच्याशी संवाद साधला. फुटबॉल व्यतिरिक्तही आम्ही गप्पा मारल्या. त्यांचे वैयक्तिक आयुष्य आणि भारतीय फुटबॉलविषयी त्यांची मते त्या वेळी जाणून घेता आलीत. खेळाडू म्हणून ते महान होतेच; पण माणूस म्हणूनही ते ग्रेट होते. ते फुटबॉल या खेळाचे खरे राजे होते. आमच्यासाठी ते देव होते. कारण लाखो लोकांना त्यांच्यामुळे प्रेरणा मिळाली आहे.

– बायचुंग भुतिया, भारताचा माजी कर्णधार

महान फुटबॉलपटू पेलेपेले यांच्या निधनाने फुटबॉलचेच नाही, तर पूर्ण क्रीडाविश्वाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्यासारखा दुसरा पेले होणे नाही! त्यांचा वारसा मात्र कायम राहील. त्यांना भावपूर्ण आदरांजली! 

– सचिन तेंडुलकर, भारतरत्न आणि माजी क्रिकेटपटू

महान फुटबॉलपटू पेलेमी पूर्णपणे उद्ध्वस्त झालो आहे. अर्थात,मी खूप भाग्यवान आहे की त्यांच्यासोबत खेळण्याची मला संधी मिळाली आहे. 1977मध्ये ते भारत दौऱ्यावर आले होते. त्या वेळी मोहन बागानविरुद्ध एका प्रदर्शनीय सामन्यात त्यांच्यासह ईडन गार्डन्सवर खेळलो होतो. ही लढत बघण्यासाठी 90 हजारांहून अधिक लोक आले होते. इडन गार्डन्सवरची ती संध्याकाळ मी कधीच विसरू शकत नाही.

– श्याम थापा, माजी फुटबॉलपटू

किंग पेले यांना केवळ गुडबाय असे म्हणून झालेले दु:ख लपविता येणार नाही. सर्व जग दु:खात बुडाले आहे. लाखोंसाठी ते प्रेरणास्थान होते. कालही होते, आजही आणि नेहमीच राहतील. माझ्यावर त्यांचे नितांत प्रेम होते. त्यांच्या आठवणी प्रत्येक फुटबॉलप्रेमींच्या मनात कायम राहतील. किंग पेले, यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

– ख्रिस्तियानो रोनाल्डो, पोर्तुगालचा खेळाडू

तुझे स्थान देवाच्या बाजूला आहे. माझा शाश्वत राजा. भावपूर्ण श्रद्धांजली! 

– रोबर्टो रिव्हिलिनो, पेलेंचे सहकारी

पेले यांच्या आधी दहा हा केवळ नंबर होता, असे मी माझ्या आयुष्यात कुठेतरी वाचले होते. मात्र, ती ओळ अपूर्ण होती. मी तर म्हणेन, पेलेंपूर्वी फुटबॉल हा केवळ खेळ होता. पेलेंनी फुटबॉलला कला आणि मनोरंजनात रूपांतर केले. त्यांनी गरीबांना, कृष्णवर्णीयांना आवाज दिला आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्यांनी ब्राझीलला एक वेगळी ओळख मिळवून दिली. या सर्वांसाठी त्यांचे आभार. त्यांचे निधन झाले असले, तरी त्यांची जादू कायम राहील. 

– नेमार, ब्राझीलचा फुटबॉलपटू

पेले यांच्या निधनाने फुटबॉल या खेळाने एक महान खेळाडू गमावला आहे. त्यांनी लोकांना स्वप्ने दाखवली. पिढ्यान पिढ्या फुटबॉलवर प्रेम करणारी लोक तयार केली. त्यामुळे लहानपणापासूनच अनेकांना पेले व्हावेसे वाटायचे. शेवटी राजा हा नेहमीसाठीच राजा असतो. 

– दिदीएर दिश्चॅम्प, फ्रान्सचे प्रशिक्षक

दुसरा पेले होणे नाही. एक खेळाडू कसा असावा, याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे पेले होते. पेले अतिशय चपळ होते. त्यांच्यासारखी उडी कोणीही मारू शकत नव्हते. दोन्ही पायांनी किक मारण्याची त्यांची शैली, तर केवळ अप्रतिम. शारीरिकदृष्ट्या अतिशय कणखर आणि शूर. 

– सेसर लुइन मेनोटी, अर्जेंटिनाचे प्रशिक्षक

पेले यांची जीवनकहाणी

[jnews_block_9 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”63″]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!