CricketMS Dhoni

धोनीचा दे धक्का…! आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा

MS Dhoni announces retirement

खेळियाड


महेंद्रसिंह धोनी… हे नाव क्रिकेटविश्वात सतत धडका देत होतं. निवृत्तीच्या उंबरठ्यावर तो होताच, पण हा उंबरठा कधी ओलांडणार यावर सातत्याने चर्चा झडत होती. अखेर महेंद्रसिंह धोनीनेच या चर्चांवर पडदा पाडला नि आंतरराष्ट्रीय क्रिकेटला कायमचा गुडबाय केला. MS Dhoni announces retirement |

निवृत्तीच्या घोषणेचा मुहूर्तही त्याने निवडला- 15 ऑगस्ट. तो निवृत्त होणारच होता… मात्र त्याचे कोणतेही संकेत त्याने न दिल्याने चर्चेला उधाण आलं होतं. मात्र, निर्णय घेण्याची त्याची धक्का देण्याची पद्धत नवी नाही. आजही त्याने हेच धक्कातंत्र वापरलं आणि अचानक निवृत्तीची घोषणा केली. MS Dhoni announces retirement |

चाहत्यांना चकित करण्याची त्याची खेळी नवी नाही. मैदानातही त्याने प्रतिस्पर्ध्यांना असेच चकित केले होते. त्याचा अंदाज कुणालाही आला नव्हता. MS Dhoni announces retirement |

धोनीने यापूर्वीही असे निर्णय घेतले आहेत, ज्यामुळे अनेकांना अचंबित केले आहे. करिअरचा निर्णय घेण्यापासून हे धक्कातंत्र त्याने अवलंबलं आहे. मुळात त्याचं हे सगळं वागणंच उत्स्फूर्त आहे. त्यामागे कोणतीही कारणे नसतात. या वेळी मात्र खूप विचारांती हे धक्कातंत्र वापरलं असावं.


हेही वाचा…

  1. सुशांतने असा साकारला धोनी
  2. एक अनटोल्ड स्टोरी…
  3. विराट हा सामना कधीही विसरू शकणार नाही…

त्याचा एक निर्णय आठवतो. ज्या वेळी त्याने टीम इंडियाच्या कर्णधारपदाची धुरा खांद्यावर घेतली, त्या वेळीही त्याचा निर्णय धक्कादायक होता. ‘कॅप्टन कूल’ म्हणून त्याची एक प्रतिमा निर्माण झाली होती. त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाही ऐन भरात होती.

अचानक त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आणि सगळे अचंबित झाले. कुणालाही वाटले नव्हते, की धोनी असा अचानक निवृत्तीची घोषणा करेल. धक्कातंत्राची चाहत्यांनी बसलेली ही पहिली किक.

आताही त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्वच प्रकारातून निवृत्ती जाहीर केली. त्याची कुणालाही भणक लागू दिली नाही. त्याच्या निवृत्तीच्या निर्णयाचाही खास अंदाज पाहायला मिळाला.

आपल्या ऑफिशियल इन्स्टाग्रामवर त्याने एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओत किशोर कुमारच्या आवाजातलं पार्श्वसंगीत आहे… मैं पल दो पल का शायर हुं, पल दो पल मेरी कहानी है…

या गाण्यातून त्याने थेट संकेत दिले. हा व्हिडीओ शेअर करताना त्याने लिहिले… ”आतापर्यंत प्रेम आणि साथ देण्यासाठी तुमचे धन्यवाद. सायंकाळी सात वाजून 29 मिनिटांनी मला निवृत्त समजावे.”

MS Dhoni announces retirement |  ही पोस्ट व्हायरल झाली नि चाहत्यांमध्ये खळबळ माजली. असं कसं होऊ शकतं? अजून खूप खेळायचं होतं. पण छे… प्रवास कुठे तरी थांबणारच असतो. कदाचित धोनीचा क्रिकेट प्रवास इथपर्यंतच होता. आतून ती जाणीव होत असते.

हा आतला आवाज ओळखायला हवा. बाहेरचा फक्त गोंगाट असतो. आतून येते ती अनामिक हाक. ही हाक वेळीच ओळखत धोनीने थांबण्याचा निर्णय घेतला.

चाहत्यांना हे अजिबात रुचणार नाही. कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली, तेव्हाही चाहत्यांना धक्का पचवता आला नव्हता. आता तर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधूनच निवृत्ती घेतल्याने चाहते हळहळले.

कसोटीतील निवृ्त्तीही अशीच…

धोनीने सर्वांत आधी 30 डिसेंबर 2014 रोजी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला होता. त्याने भारताकडून 90 कसोटी सामने खेळले आहेत. त्याच्याच नेतृत्वाखाली भारतीय संघाने कसोटीत जगात अव्वल स्थान मिळवले होते. त्या वेळी टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होती. कसोटी मालिकेतील तिसरा सामना मेलबर्नच्या मैदानावर होता. हा सामना बरोबरीत सुटला आणि धोनीने सर्वांना धक्का देत कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.

तीन वर्षांपूर्वीही असेच अचानक सोडले कर्णधारपद

कसोटी क्रिकेटला अलविदा केल्यानंतर धोनी स्थितप्रज्ञ होता. चाहते मात्र हळहळले. हा धक्का पचवत नाही तोच तीन वर्षांनी धोनीने दुसरा धक्का दिला. अचानक त्याने वन-डे आणि टी-20 क्रिकेटच्या कर्णधारपदाची झूल खाली ठेवली.

2007 मध्ये टी-20 वर्ल्डकप, 2011 मध्ये वनडे वर्ल्ड कप आणि 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी… क्रिकेटमधील हे तिन्ही ग्रँडस्लॅम जिंकून देणाऱ्या महेंद्रसिंह धोनीने 2017 मध्ये वनडे आणि टी-20 संघाचे कर्णधारपद सोडले.

कर्णधारपद सोडल्याची माहिती बीसीसीआयने 4 जानेवारी 2017 रोजी ट्विटद्वारे दिली होती.

धोनीचे धक्कातंत्र नवे नाही…

धोनी कोणतेही निर्णय इतके उत्स्फूर्तपणे घेतो, की त्याच्या निर्णयाने अचंबित होण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. केवळ आपल्या आयुष्याच्या बाबतीतच नाही, तर अनेक महत्त्वाच्या सामन्यांतही याचा प्रत्यय अनेकांना आला आहे.

2007 चा टी-20 वर्ल्ड कप आठवत असेलच. त्याने हुकमी गोलंदाजांना डावलून अखेरचं षटक जोगिंदर शर्माच्या हाती सोपवलं तेव्हा तर अनेकांना धक्का बसला.

एवढेच नाही, तर 2008 मध्ये त्याने धाडसी निर्णय घेतला होता. हा निर्णय अनेक जण अजिबातच विसरलेले नसतील. ऑस्ट्रेलिया- श्रीलंकेबरोबर तीन देशांची एक मालिका होती. या मालिकेत त्याने सौरव गांगुली आणि राहुल द्रविडसारख्या वरिष्ठ खेळाडूंना वगळले होते.

या निर्णयाने टीकाही झाली. मात्र, धोनी विचलित झाला नाही. 2011 च्या वर्ल्ड कपमध्ये त्याने स्वतःच पाचव्या क्रमांकावर खेळण्याचा निर्णय घेतला तेव्हाही अशाच भुवया उंचावल्या होत्या.

हे धक्कातंत्र इथच थांबत नाही. सीबी मालिकेत तर त्याने बारा-तेरा खेळाडूंची अदलाबदल केली होती.

आज तुम्हाला हुकमी सलामीवीर म्हणून जो रोहित शर्मा दिसतो, तो धोनीचाच प्रयोग आहे. 2013 मध्ये क्रिकेटजगताला रोहित शर्माची फारशी ओळखही नव्हती. अचानक धोनीने निर्णय घेतला, रोहित शर्मा सलामीला खेळेल. तेव्हाही अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

वर्षभर क्रिकेटपासून लांब

तसाही धोनी वर्षभरापासून क्रिकेटपासून लांबच होता. कदाचित त्याने परतीच्या प्रवासाची तयारी केली असावी. त्याची क्रिकेट मैदानावरील अखेरची उपस्थिती 2019 मधील वर्ल्डकपमध्येच पाहायला मिळाली. हाच त्याचा कारकिर्दीतला अखेरचा सामना. हा सामना होता उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्धचा.

या सामन्यात भारताला पराभवाची नामुष्की स्वीकारावी लागली. त्यानंतर धोनी पुन्हा क्रिकेटमध्ये कधीही दिसला नाही.

मार्च 2020 मध्येच आयपीएलमध्ये परतण्याची त्याची इच्छा होती. मात्र, करोना महामारीमुळे ही परतीची अखेरची दोर कापली गेली. आयपीएल स्थगित झाली. इथेच त्याच्या निवृत्तीचे संकेत मिळाले.

आयपीएलनंतर आयसीसी टी-20 वर्ल्डकपही स्थगित झाली. आता दबक्या आवाजातील धोनीच्या निवृत्तीची चर्चा जाहीरपणे होऊ लागली. तो पुन्हा परतेल, त्याच्यात अजून क्रिकेट शिल्लक आहे किंवा आता निवृ्त्त व्हायला हवं… अशा अनेक प्रश्नांचं मोहोळ उठलं होतं.

दुबईत सप्टेंबरमध्ये आयपीएल 2020 ची घोषणा झाल्यानंतर तर वाटलं, की आता धोनी मैदानात उतरेल. तो चेन्नई सुपरकिंग्स संघाच्या सराव शिबिरातही दिसला. 13 ऑगस्ट 2020 रोजी त्याला पाहिल्यानंतर चाहत्यांना दिलासा मिळाला खरा, पण तो औटघटकेचाच ठरला.

स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्टलाच त्याने अखेर निवृत्तीची अचानक घोषणा केली आणि अनेकांना विश्वासच बसेना. हे खोटं तर नाही? पण ते खोटं नव्हतं. खरं होतं.. दुर्दैवाने खरं होतं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!