Cricket

सत्तर वर्षांत वीक्स यांच्या विक्रमाजवळ फक्त द्रविडच पोहोचला

गेल्या ७० वर्षांत या क्रिकेटविश्वाने व्हिवियन रिचर्ड्सपासून सचिन तेंडुलकरपर्यंत अनेक महान फलंदाज पाहिले. मात्र, यात एकमेव राहुल द्रविड होता, जो सर एव्हर्टन वीक्स Sir Everton Weekes | यांच्या सलग पाच शतकांच्या विक्रमाच्या समीप जाऊ शकला. मात्र, गेल्या ७० वर्षांत वीक्स यांचा हा विश्वविक्रम कोणीही मोडू शकलेला नाही. Sir Everton Weekes records |

वीक्स यांनी मार्च 1948 मध्ये इंग्लंडविरुद्ध किंग्स्टनमध्ये चौथ्या कसोटी सामन्यात 141 धावांची शतकी खेळी साकारली. त्यानंतर वेस्ट इंडीजचा संघ जेव्हा भारत दौऱ्यावर आला तेव्हा वीक्स यांनी दिल्ली, मुंबई आणि कोलकात्यात सलग चार डावांत 128, 194, 162 आणि 101 धावा केल्या. त्यांनी भारतीय गोलंदाजांची यथेच्छ धुलाई केली होती. चेन्नईत सहावे शतक तर अवघ्या दहा धावांनी हुकले. मात्र, येथेही ते भारतीय गोलंदाजीला अजिबात शरण गेले नाही तर ते धावबाद झाले होते. वीक्स यांनी सलग पाच शतकांचा विश्वविक्रम रचला तेव्हा त्यांनी ऑस्ट्रेलियाचे जॅक फिंगलटन (1936 मध्ये) आणि दक्षिण आफ्रिकेचे एलन मेलविले (1939 पासून 1947 पर्यंत) यांचा सलग चार शतकांचा विक्रम मोडीत काढला. वीक्स यांचं हे आव्हान अद्याप कोणालाही पेलता आलेलं नाही. अपवाद फक्त राहुल द्रविडचा. मात्र, तोही त्यांच्या विक्रमाशी बरोबरी करू शकला नाही. द्रविडने ऑगस्ट-सप्टेंबर २००२ मधील इंग्लंड दौऱ्यात चार कसोटी सामन्यांत 100.33 च्या सरासरीने 602 धावा कुटल्या. यात त्याने सलग तीन डावांत तीन शतके झळकावली होती. क्रिकेटची भिंत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या द्रविडने या कसोटी मालिकेत नॉटिंगहॅममध्ये 115, लीड्समध्ये 148 आणि ओव्हलच्या मैदानावर 217 धावा केल्या होत्या. त्यानंतर वेस्ट इंडीजचा संघ तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारत दौऱ्यावर आला तेव्हा द्रविडने मुंबईतल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच डावात निवृत्ती स्वीकारली होती. मात्र, तत्पूर्वी त्याने 100 धावांची शतकी खेळी साकारली. द्रविडला वीक्स यांच्या विक्रमाशी बरोबरी करण्याची संधी 17 ऑक्टोबर 2002 मध्ये चेन्नईमध्येच मिळाली होती. विंडीजविरुद्धचा हा दुसरा कसोटी सामना होता. मात्र, पहिल्या डावात तो केवळ 11 धावा करू शकला. जर्मेन लॉसन याने आपल्या इनस्विंगरवर द्रविडच्या यष्ट्यांचा वेध घेतला. मात्र, सलग चार सामन्यांत चार शतके झळकावणारा द्रविड जगातला चौथा फलंदाज ठरला. अशी कामगिरी करणारा 1948 नंतर तो एकमेव फलंदाज आहे. Sir Everton Weekes records |

तसं पाहिलं तर सलग तीन सामन्यांत तीन शतके झळकावणारे अनेक फलंदाज आहेत. कुमार संगकाराने तीन, सुनील गावस्कर, अरविंद डिसिल्वा आणि डेव्हिड वॉर्नर यांनी दोन-दोन संधींमध्ये सलग तीन शतके झळकावली आहेत. मात्र, त्यापुढे कोणीही जाऊ शकलेला नाही. भारतीय संघाचा सध्याचा कर्णधार विराट कोहली याने 2017 मध्ये द्रविडशी बरोबरी करू शकला असता. मात्र, त्याची ही संधी हुकली. त्याने श्रीलंकेविरुद्ध कोलकात्यात नाबाद 104, नागपूरमध्ये 213 आणि दिल्लीत पहिल्या डावात 243 धावा केल्या. मात्र, दुसऱ्या डावात तो 50 धावांवर बाद झाला. ऑस्ट्रेलियाचा मार्नस लबुशेन याने नोव्हेंबर-डिसेंबर २०१९ मध्ये पाकिस्तानविरुद्ध ब्रिस्बेनमध्ये 185 आणि एडिलेडमध्ये 162 धावांची खेळी साकारली. त्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध पर्थवर पहिल्या डावात 143 धावा केल्या. मात्र, कोहलीसारखाच दुसऱ्या डावात अर्धशतक साकारून बाद झाला.

कॅब संग्रहालयात वीक्स

वीक्स यांनी सलग पाच सामन्यांत जी पाच शतकांची विश्वविक्रमी (Sir Everton Weekes records) खेळी साकारली होती, त्यातील चार शतके तर भारतीय भूमीवर झळकावलेली होती. यातील दोन शतके त्यांनी 1948 मध्ये इडन गार्डन्सवर (162 व 101 धावा) केली होती. या ऐतिहासिक खेळीची आठवण बंगाल क्रिकेट संघाने जपण्याचा निर्णय घेतला आहे. बंगाल क्रिकेट संघ इडन गार्डन्सवर क्रिकेट संग्रहालय उभारणार आहे. या संग्रहालयात वीक्स यांचे विशिष्ट असे स्थान असेल, अशी घोषणा बंगाल क्रिकेट संघटनेने 2 जुलै 2020 रोजी केली आहे. करोना महामारी संपुष्टात आल्यानंतर या संग्रहालयाच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे.

महान क्रिकेटपटू, खूप चांगला माणूस

क्लाइड वाल्कॉट आणि फ्रँक वॉरेल यांच्यासोबत ‘डब्लू-त्रयी’चे सदस्य वीक्स यांनी त्या काळात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. त्यांच्यामुळे विंडीजचा दरारा वाढला होता. – आयसीसी

मला कधीच सर एव्हर्टन यांची फलंदाजी पाहण्याची संधी मिळाली नाही. मात्र, मला त्यांच्याविषयी जाणून घेण्याची संधी मिळाली. मी त्यांच्याविषयी वाचून, जुने व्हिडीओ पाहून त्यांच्या शानदार कारकिर्दीविषयी माहिती घेतली. सर एव्हर्टन वेस्ट इंडीज क्रिकेटच्या संस्थापकांपैकी एक होते. ते खूप चांगले माणूस होते. – रिकी स्किरिट, अध्यक्ष, क्रिकेट वेस्ट इंडीज

वेस्ट इंडीजचे दिग्गज सर एव्हर्टन वीक्स यांच्या निधनाने दुःख झाले आहे. बारबाडोसमध्ये आयसीसी संमेलनादरम्यान मी त्यांना भेटलो होतो. सामन्यात पंच असताना आम्ही जो संवाद साधला होता, तो त्यांच्या लक्षात होता. त्यांचा परिवार आणि मित्रांप्रती माझ्या सहवेदना. – अनिल कुंबळे, माजी कर्णधार, भारतीय संघ

सर एव्हर्टन वीक्स क्रिकेटमधील महान खेळाडूंपैकी एक होते. त्यांच्या मित्रपरिवाराप्रती माझ्या सहवेदना. – व्हीव्हीएस लक्ष्मण, माजी क्रिकेटपटू

गेल्या दोन दशकांत अनेक वेळा सर एव्हर्टन यांच्यासोबत काही काळ घालवण्याची मला संधी मिळाली. त्यांच्या केवळ उपस्थितीने नेहमी आनंदी माहोल असायचा. त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळालं. ते खरोखर खूप चांगले माणूस होते. – इयान बिशप, माजी वेगवान गोलंदाज, वेस्ट इंडीज

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!