Cricket

एक अनटोल्ड स्टोरी…

‘एम. एस. धोनी ः दि अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटात एक संवाद आहे…

“लाइफ में सब बॉल एक समान थोडे ना मिलेगा, मेरिट पर खेलना है और टिके रहना है, स्कोअरबोर्ड अपने आप बढेगा…”

सुशांतने काय अप्रतिम धोनी साकारला! लाजवाब होती संवादफेक!

सुशांतच्या आयुष्यातही सगळेच चेंडू एकसमान नव्हतेच, पण तो मेरिटवर खेळत होता. फक्त एक चूक केली. तो टिकून राहिला नाही आणि आयुष्याचा स्कोअरबोर्ड कायमचा थांबला…

एका चित्रपटाने त्याने क्रिकेटप्रेमींच्या मनात अढळ स्थान मिळवले होते. अनेकांना तो धोनीइतकाच जवळचा वाटत होता… कलाकार आणि क्रीडापटूमधला हा पूल इतका सहज अजिबातच बनलेला नाही…

साठ-सत्तरच्या दशकातला एक काळ होता, जेथे कला आणि क्रीडा या दोन्ही संस्कृती नकोशा वाटत होत्या. ‘खेलोगे कुदोगे तो होंगे खराब, पढोगे लिखोगे तो होंगे नवाब’ अशी एक धारणाच बनली होती. पुढे साठच्या दशकानंतर कलेचं क्षेत्र लोकांना अधिक जवळचं वाटू लागलं, पण खेळ स्वीकारायला भारतीय मानसिकता काहीशी कचरताना दिसली. परिणामी, क्रीडासंस्कृती मागे राहिली. त्या वेळी कलेने आपलं विश्व इतकं विस्तारलं, की पडद्यावरचा हा नकली हिरो मैदानावरच्या ढोपरं फोडणाऱ्या नायकापेक्षा उंच वाटू लागला. अगदी क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन म्हंटलं, तरी एखादा कलाकार आमंत्रित केला जायचा. ज्याने मैदानं गाजवली त्या खेळाडूला खुर्चीही ऑफर केली जात नव्हती. त्या वेळी टीका व्हायची, की क्रीडापटू असली हीरो असताना, नकली हिरोंना स्थान देण्याइतकी वाईट गोष्टी दुसरी नाही. आज परिस्थिती अशी आहे, की कला आणि क्रीडासंस्कृती दोन्ही हातात हात घालून पुढे जात आहेत. दोन्ही संस्कृतींमध्ये आता पुसटशी रेषा उरली आहे… ही रेषा इतकी धूसर झाली आहे, की खेळाडू आणि नायक दोन्हींतलं अंतर राहिलंच नाही. मेरी कोम, एम. एस. धोनीपासून अझरुद्दीन, कपिलदेवपर्यंत… किती तरी खेळाडूंवर चित्रपट आले. चित्रपटसृष्टीलाही खेळाडू कथेचा विषय वाटू लागला हेही नसे थोडके… हा काळाचा महिमा म्हणावा. असो…


हेही वाचा… सुशांतने असा साकारला धोनी


हरहुन्नरी अभिनेता सुशांतसिंह राजपूत Sushant singh Rajput | याच्या आत्महत्येनंतर हा सगळा बदलता कालक्रम झर्रकन डोळ्यांसमोर आला. सुशांतसिंह कलाकार होता, पण भारतीय क्रीडाविश्वालाही तो चटका लावून गेला. त्याचं मुख्य कारण म्हणजे २०१६ मधील ‘एम. एस. धोनी ः दि अनटोल्ड स्टोरी’ हा चित्रपट. अर्थातच महेंद्रसिंह धोनीवर Mahendra Singh Dhoni | बेतलेल्या या चित्रपटात सुशांतने इतकं अप्रतिम काम केलं आहे, की धोनीपेक्षाही सुशांत अधिक रुबाबदार वाटला… असं असतानाही सुशांत धोनीच्या व्यक्तिरेखेत अजिबात डोकावला नाही. तो धोनीलाच सादर करीत राहिला आणि एका नवख्या कलाकाराने मुरब्बी क्रिकेटपटू अप्रतिम साकारला. हा चित्रपट इतका हिट ठरला, की सुशांत आणि धोनीमध्ये सुशांतच धोनी असल्याचं वाटू लागला… जेवढा धोनी क्रिकेटपासून विलग न होणारा खेळाडू आहे, किंबहुना थोडंसं अधिकच सुशांतचंही क्रिकेटशी घट्ट नातं झालं होतं. हे नातं क्रिकेटप्रेमींनीच उभं केलं इतकं अप्रतिम काम सुशांतने केलं. मात्र, सुशांतच्या मनात क्रिकेटशी किती जवळचं नातं होतं, हे त्यालाच माहीत. आता तीही एक अनटोल्ड स्टोरी झाली आहे.

अलीकडे धोनी क्रिकेटपासून दुरावलाच, त्याच्या निवृत्तीच्या वावटळी उठल्या. उलटसुलट चर्चांना उधाण आलं. पण धोनीने स्वतःला या सगळ्या गोष्टींपासून दूर ठेवलं. कुठेही विचलित झाल्याचं पाहायला मिळालं नाही. आततायीपणे या प्रश्नांना उत्तरेही दिली नाहीत. तो मात्र कूल राहिला. उगाच नाही तो ‘कॅप्टन कूल’ म्हणून ओळखला जात…! अशा या क्रिकेटपटूचं जीवन पडद्यावर साकारणाऱ्या सुशांतने आत्महत्या करावी, हे क्रिकेटप्रेमींना सतत खटकत राहतं. क्रिकेटप्रेमी हे मानायलाच तयार नाहीत, की सुशांत केवळ पडद्यावरचा धोनी होता… तीन तासांचा चित्रपट संपल्यानंतर धोनी वेगळा नि सुशांत वेगळा… हे विलगीकरण क्रिकेटप्रेमींना मान्यच नव्हतं.. मला वाटतं, सुशांत या व्यक्तिरेखेतून बाहेर पडला तरी चांगला ‘कॅप्टन कूल’ होऊ शकला असता… पण छे…

या चित्रपटात धोनीचंच एक वाक्य आहे, “एक कॅप्टन तभी अच्छा कॅप्टन हो सकता है, जब उसकी टीम अच्छी होगी…”

सुशांतची टीम (बॉलिवूडमधील सहकारी) कदाचित चांगली नसावी. त्यामुळेच तो कॅप्टन कूल होऊ शकला नसावा.

खेळ आणि कला क्षेत्रातच नाही, तर प्रत्येक क्षेत्रात तणावाचे प्रसंग येतात. सुशांत मात्र तणावाचा सामना करू शकला नाही. तो चित्रपट क्षेत्रातील वलयांकित जीवनशैलीत गुरफटत गेला. पडद्यावरची कृत्रिम व्यक्तिरेखा साकारता साकारता तो स्वतःचंच अस्तित्व हरवून बसला. तो सुशांत होता तोपर्यंत तो संघर्ष करीत होता. सुशांत होता म्हणूनच तो स्वतःच्या गुणवत्तेवर यश मिळवू शकला. त्याच्याकडे काय नव्हतं! पैसे होते, लोकप्रियतेच्या शिखरावर होता, देखणं व्यक्तिमत्त्व होतं, लढण्याचं वय हातात होतं… यात सुशांत मात्र कुठेही नव्हता… सुशांत म्हणजे त्याचं स्वतःचं अस्तित्व. हे अस्तित्व त्याने ज्या दिवशी गमावलं, त्याच दिवशी त्याच्या मेंदूने त्याला गळफास घेण्याची आज्ञा केली… आणि दुसऱ्या दिवशी ब्रेकिंग न्यूज धडकली.. सुशांतने गळफास घेऊन जीवन संपवलं. एक स्टोरी कायमची अनटोल्ड राहिली…. The Untold Story |

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!