AutobiographyMarathonOther sports

धावपटू संजीवनी जाधव आत्मविश्वासाने म्हणाली, पुन्हा परतेन मी

अ‍ॅथलीटला एकदा डोपिंगचा डाग लागला, की मग तो अश्वत्थाम्याच्या जखमेसारखा अव्याहत भळभळतच राहतो. मग त्या वेदनांनी कुढणंच आहे. दुसरं काही नाही. मात्र, कोणताही उत्तम खेळाडू उत्तेजक द्रव घेत नाही. नकळतपणे आहार, औषधांतून त्याची मात्रा शरीरात जाते आणि मग ‘नाडा’, ‘वाडा’च्या कारवाईला सामोरे जावे लागते. भारताची लांब पल्ल्याची धावपटू संजीवनी जाधव Sanjivani Jadhav | हिला अशाच डोपिंग चाचणीला सामोरे जावे लागले आणि दोषी आढळल्याने तिच्यावर दोन वर्षांची निलंबनाची कारवाई झाली.मात्र, हे सगळे नकळतपणे झालंय, याची जाणीव ‘वाडा’लाही होती, पण बंदी घातलेले उत्तेजक द्रव जर शरीरात आढळले तर कारवाई करणे क्रमप्राप्त आहे. संजीवनीवर ही कारवाई झाली. इथे आपण कोणतीही शहानिशा न करता लगेच एखाद्या खेळाडूवर नकारात्मक मत बनवतो. मात्र, तुम्हाला जे समजलेलं असतं ते अर्धसत्य असतं. वस्तुस्थिती जाणून घेतली तर खेळाडूच्या वेदनाही तुम्हाला जाणवतील. मूळची नाशिकची असलेल्या संजीवनी जाधवशी बोलताना या वेदना कळल्या. तिच्याशी संवाद साधला असता डोपिंगचं पूर्ण सत्य उलगडत गेलं. अजाणतेपणी झालेल्या या चुकीवर संजीवनीला काय म्हणायचंय, त्यावर टाकलेला हा प्रकाशझोत…

“डोपिंगविषयी मी यापूर्वी ऐकलं होतं, पण ते माझ्याबाबतीत घडेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. मला माहीत नाही, की माझ्या शरीरात उत्तेजक द्रव कसे आले, पण नकळतपणे घडलेली ही चूक मला सिद्ध करता आली नाही. यामुळे मी खचणार नाही. आता यातून मला सावरायला हवे.” संजीवनी जाधव आत्मविश्वासाने सांगत होती. उत्तेजक द्रव चाचणीत दोषी आढळल्याने आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्स फेडरेशनने संजीवनीवर दोन वर्षांच्या निलंबनाची कारवाई केल्यानंतर संजीवनी प्रथमच आपल्या भावना व्यक्त करीत होती. 

एकूणच या प्रकरणाला तू कशी सामोरी गेलीस?


धावपटू संजीवनी जाधव : खरंच, हे प्रकरण अतिशय धक्कादायक होतं, जे माझ्याबाबतीत घडलं. उत्तेजक द्रव माझ्या शरीरात कसे आले हे मला सिद्ध करता आले नाही हे मी प्रामाणिकपणे मान्य करते. याबाबत मीच पूर्ण अनभिज्ञ आहे. यावर जागतिक उत्तेजक द्रव सेवनविरोधी संस्थेची (वाडा) वर्षभर केस सुरू होती. मी माझ्या वकिलांमार्फत बाजू मांडली. त्यांनी माझ्या आहाराची सर्व घटकतत्त्वे तपासली. यात कुठेही उत्तेजक द्रव आढळले नाही. मात्र, युरिनमध्ये ‘प्रोबेनेसिड’ नावाचा एक घटक आढळला. हा उत्तेजक द्रवांमध्ये बंदी घातलेला घटक आहे. मात्र, माझ्या शरीरात या घटकाची मात्रा केवळ ०.९ नॅनो ग्रॅम होते. ही मात्रा इतकी कमी आहे, की ती नसल्यात जमा आहे. त्याचा कोणत्याही खेळाडूला काहीही फायदा होणार नाही. हा घटक जर दोन ते पाच ग्रॅमपर्यंत असेल तर मात्र ते गंभीर मानले जाते. अर्थात,  ‘वाडा’च्या नियमानुसार ते एक स्टेरॉइडच आहे. असे असले तरी खेळाडूला आपली बाजू मांडण्याची संधी असते. तशी ती मलाही मिळाली. जर हा घटक माझ्या शरीरात एखाद्या पोषक घटकतत्त्वातून आला असेल तर माझी कारवाईतून सुटका होईल. त्यासाठी मला हे सिद्ध करावे लागेल, की हा घटक शरीरात कसा आला? प्रश्न असा आहे, की मी जे काही सप्लिमेंट वगैरे घेते किंवा जो आहार घेते, त्यातून हा घटक आला किंवा नाही हे मलाच माहीत नाही. जेवढ्या तपासण्या झाल्या, त्यातही हा घटक आढळलेला नाही. मग आता सिद्ध कसे करायचे, की हा घटक कसा आला? मला शंका आहे, ती माझ्या व्हिटॅमिनवर. या प्रकारानंतर मी व्हिटॅमिन घेणेही टाळले.
खरंच, हे प्रकरण अतिशय धक्कादायक होतं, जे माझ्याबाबतीत घडलं. उत्तेजक द्रव माझ्या शरीरात कसे आले हे मला सिद्ध करता आले नाही हे मी प्रामाणिकपणे मान्य करते. याबाबत मीच पूर्ण अनभिज्ञ आहे.
या निर्णयाविरुद्ध अपिलाची संधी असते. तू अपील का केले नाही?

धावपटू संजीवनी जाधव : मी निर्दोष आहे हे मला माहीत आहे; ‘वाडा’ला नाही. मात्र, बाजू मांडण्यासाठी ‘वाडा’चा एकच प्रश्न आहे, तो म्हणजे हा घटक तुमच्या शरीरात कसा आला, ते सिद्ध करून दाखवा. हीच नेमकी अडचण आहे. दुसरे म्हणजे माझ्यावर जी दोन वर्षांची कारवाई झाली, त्यातील एक वर्ष उलटून गेले आहे. आता काही आठ-नऊ महिनेच शिल्लक आहेत. माझ्या हातात वय आणि उत्तम कामगिरीची उमेद आहे. जर मी अपील केले असते तर केस आणखी लांबली असती. जिंकले तरी उमेदीचा काळ उलटलेला असेल आणि हरले तर जेवढा काळ केस चालली, त्याच्यापेक्षा अधिक बंदीच्या कारवाईची वर्षे वाढली असती. म्हणजे आज जी दोन वर्षांची बंदी लादली ती पुढे चार वर्षांची झाली असती. त्यामुळे माझे करिअरच संपलं असतं. त्यामुळे जी शिक्षा आहे ती मी स्वीकारली. उलट यामुळे आता मी सराव नियमितपणे करीत आहे. आगामी स्पर्धांमध्ये मला माझं कर्तृत्व सिद्ध करायचं आहे. 

तुझ्या सप्लिमेंटची तपासणी केल्यानंतरही उत्तेजक द्रव आढळले नाही. मग हे आले कुठून? यामागे षडयंत्र असू शकेल का?


धावपटू संजीवनी जाधव : काहीही सांगता येणार नाही. षडयंत्रही असू शकेल. मुळात प्रोबेनेसिड घटक माझ्या शरीरात कसा आला हे माझे मलाच ठाऊक नाही. त्यामुळे हे असं कसं घडलं, हे माझ्यासाठी एक कोडं आहे. जर याची उकल झाली असती तर तुम्ही म्हणता त्या निकषापर्यंत मी येऊ शकेन. त्यामुळे सध्या विचार केला तर दोन्ही शक्यता असू शकतात. एक तर माझ्या सप्लिमेंट किंवा व्हिटॅमिनमधून आले असेल किंवा षडयंत्रही असू शकेल. पण एक मला जाणवतेय, की मी साधारणपणे एक ते दीड वर्षापासून व्हिटॅमिन सुरू केले आहे. आहारातून सर्वच पोषकतत्त्वे मिळत नाहीत. त्यामुळे अशी व्हिटॅमिन घ्यावी लागतात. त्यातून हा घटक आला असू शकतो; पण मी अजून ठाम नाही.

ही कारवाई विसरून तू पुढे कसे पाऊल टाकतेय?


धावपटू संजीवनी जाधव : माझ्यासमोर आता एकच पर्याय आहे, तो म्हणजे पुन्हा कर्तृत्व सिद्ध करणे. अशा प्रकरणातून सावरत जोरदार कमबॅक करण्याशिवाय गत्यंतर नाही. अर्थात, सर्वच खेळाडूंना माझ्यावर विश्वास आहे, की मी यशाचा शॉर्टकट कधीच मारणार नाही. माझा जोरदार सराव सुरू आहे. त्यामुळे आगामी स्पर्धांवर लक्ष केंद्रित करून त्या दृष्टीने तयारी करीत आहे. माझी कामगिरीच यापुढे बोलणार आहे. तेवढा आत्मविश्वास मला आहे. कारण पुढे महत्त्वाच्या स्पर्धा आहेत. एशियन चॅम्पियनशिप स्पर्धा २०२१ मध्ये होणार आहे, तर एशियन गेम्स आणि कॉमनवेल्थ या स्पर्धा २०२२ मध्ये आहेत. या स्पर्धांवरच सध्या तरी मी माझा फोकस ठेवला आहे. 

या प्रकरणानंतर प्रशिक्षक काय म्हणाले?


धावपटू संजीवनी जाधव : आम्ही रोज सराव करतो, तेव्हा एकच ध्यास असतो, तो म्हणजे उत्तम कामगिरीचा. या पलीकडे मैदानावर दुसरं काहीही नसतं. जेथे कविता राऊत, मोनिका आथरेसारख्या उत्तम धावपटूंचे आयुष्य घडले, तेथे मीही त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवून कर्तृत्व सिद्ध केले आहे. अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकल्या आहेत. असे असताना उत्तेजक द्रवसेवनाचा विचार कोणी करेल काय? अर्थात माझ्या प्रशिक्षकांचा माझ्यावर विश्वास आहे. एक लक्षात घ्यायला हवे, की जे उत्तेजक द्रव सेवन करतात त्यांच्याकडे सातत्य नसतं. कधी तरी एखादी स्पर्धा ते जिंकतात. माझ्याकडे तर सातत्य आहे. सातत्याने कामगिरी उंचावलेलीच तुम्ही पाहिली आहे. 

अशा प्रकरणानंतर घरच्यांची भावना खूप महत्त्वाची असते. काय म्हणाले तुझे आईवडील?


धावपटू संजीवनी जाधव : माझ्यावर खेळाडूंचा विश्वास होताच, तसा माझ्या आईवडिलांनाही होता. त्यांना माहिती होतं, की मी असं काही करणार नाही. माझ्या भावाने मला दिलेला धीर मला मोलाचा वाटतो. माझ्यावर कारवाई झाल्याचे कळल्यासरशी त्याने मला फोन करून दिलासा दिला. कविता राऊत, ललिता बाबर अशा अनेक खेळाडूंनीही मला फोन करून धीर दिला. हेच मला उभारी देणारे आहे. 
सर्वच खेळाडूंना माझ्यावर विश्वास आहे, की मी यशाचा शॉर्टकट कधीच मारणार नाही.

उत्तेजक द्रव चाचणीवर काही तरी प्रबोधन व्हायला हवं. जे तुझ्याबाबत घडलं ते इतरांकडून नकळतपणे घडण्याचा धोका आहे. यावर तू काही सुचवणार का?


धावपटू संजीवनी जाधव : नवोदित खेळाडूंमध्ये याबाबत जागृती होणे खरंच खूप आवश्यक वाटते. कारण माझ्याकडून जी अजाणतेपणी डोपिंगची चूक झाली, ती इतरांकडूनही घडू शकते. अर्थात, यावर राज्य सरकार प्रयत्न करतेच. मीही त्यात पुढाकार घेईन. कारण मी स्वत: नाशिकमध्ये तालुका क्रीडाधिकारी आहे. मला खेळाडूंपर्यंत पोहोचणे सहज शक्य आहे. त्यांचे प्रबोधन करण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करीन. माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही ही अपेक्षा बोलून दाखविली. तेही म्हणाले, की यावर काही कार्यशाळा घ्यायला हव्यात. 

तू आधी कुस्ती खेळायचीस. आता धावपटू म्हणून करिअर घडवलेस…


धावपटू संजीवनी जाधव : कुस्ती आणि धावणे या दोन्ही प्रकारांमध्ये माझा नेहमीच सहभाग असायचा. शाळेत तर हे दोन्ही प्रकारांमध्ये मी खेळले आहे. माझे वडील कुस्ती खेळायचे. गावात जत्रा असली की दंगलीत उतरायचे. त्यांची इच्छा होती, की आपल्या घरात कोणी तरी पहिलवान व्हावं. त्यातूनच मला कुस्तीची प्रेरणा मिळाली. कुस्ती आणि धावणे यात मी नेहमीच चमकले. शालेय स्पर्धांमध्ये मी याच दोन इव्हेंटमध्ये सहभाग घ्यायचे पाचवी ते दहावीपर्यंत मी अव्वल असायचे. असे असले तरी कुस्ती आणि धावणे यात मोठा फरक आहे. दहावीनंतर मला एकच कोणता तरी खेळ निवडायचा होता. कुस्तीचे प्रशिक्षण घ्यायचे उत्तम प्रशिक्षकाची गरज आहे. नाशिकमध्ये तशी स्थिती नव्हती. मात्र, विजेंदरसिंग हे नाव धावपटूंना चांगले ठाऊक होते. त्यामुळे मी शर्यतीचा विचार पक्का केला. वडिलांनीही मला प्रोत्साहन दिले. राष्ट्रीय शालेय स्पर्धेत रौप्यपदक जिंकून मी माझी योग्यता अकरावी इयत्तेतच सिद्ध केली. आशियाई शालेय स्पर्धा, जागतिक शालेय स्पर्धेतही रौप्य पदक जिंकल्याने रनिंग ही माझी निवड योग्य ठरली.

धावपटू कोलमन निलंबित

Follow on Facebook Page : kheliyad

Follow on Twitter @kheliyad

[jnews_block_37 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”80″]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!