All SportsMovie Review

इजाजत म्हणजे न सुटलेल्या प्रेमाचा गुंता

‘इजाजत’मध्ये नसिरुद्दीन मला जगातला सगळ्यात भाग्यवान प्रियकर वाटला, ज्याची प्रेयसी त्याच्यावर मनापासून प्रेम करते. त्याचं लग्न झालेलं असतानाही तिचं पत्रातून व्यक्त होणं हृदय पिळवटून टाकतं. अर्थात, मी फक्त गाणी ऐकली; पण चित्रपट अजिबातच पाहिलेला नव्हता, तरी मला हा फील आला.

इजाजत

छोटी सी कहानी से, बारिशों के पानी से
सारी वादी भर गयी
ना जाने क्यों, दिल भर गया
ना जाने क्यों, आँख भर गयी

गाण्यात जरी दिल भर गया म्हंटलं असलं तरी हे गाणे ऐकून दिल (मन) काही भरत नाही…हो, पण डोळे भरून येतात.

अगदी ऐंशी-नव्वदच्या दशकाचा फील घ्यावासा वाटला, की हमखास गुलजार ऐकावा.

मग सुरू होतो आठवणींचा पाऊस.

अजून एक गाणं मनात रुंजी घालत असतं.

ते म्हणजे, ‘मेरा कुछ सामान, तुम्हारे पास पडा है..’

प्रेयसीचं इतकं प्रेम लाभलेला भाग्यवान प्रियकर निराळाच..

चित्रपटात ते खोटं का असेना, पण ‘इजाजत’मध्ये नसिरुद्दीन मला जगातला सगळ्यात भाग्यवान प्रियकर वाटला, ज्याची प्रेयसी त्याच्यावर मनापासून प्रेम करते.

त्याचं लग्न झालेलं असतानाही तिचं पत्रातून व्यक्त होणं हृदय पिळवटून टाकतं.

अर्थात, मी फक्त गाणी ऐकली; पण चित्रपट अजिबातच पाहिलेला नव्हता, तरी मला हा फील आला.

असाच एकदा रात्री धो धो पाऊस सुरू होता नि मला ‘छोटी सी कहानी से…’ हे गाणं आठवलं.

तुम्हाला माहितीच आहे, पाऊस आणि आपली कृत्रिम वीज एकत्र कधी नांदत नाही.

सुदैवाने त्या रात्री मुसळधार पाऊस कोसळूनही वीज होती.

म्हणून कम्प्युटर सुरू केला नि इंटरनेटवर हे गीत ऐकत बसलो.

अचानक वीज चमकावी तसा मनात विचार आला, की हा चित्रपट आपण अजून पाहिला कसा नाही?

मग काय, ‘यू ट्यूब’वर सर्चून काढला ‘इजाजत’.

मन रडणं काय असतं, ते अनुभवायचं असेल तर ‘इजाजत’ नक्की पाहावा.

या चित्रपटाच्या संपूर्ण कथानकात जाणार नाही, तो तुम्ही स्वतःच पाहावा; पण काही प्रसंग मन हेलावून गेले…

‘इजाजत’ म्हणजे संपूर्ण गुलजार आणि आरडींचा खास परिसस्पर्श लाभलेली एक अप्रतिम कलाकृती.

माया, सुधा आणि महिंद्र यांच्यातील प्रेमाची कहाणी असली तरी मला हा प्रेमाचा त्रिकोण अजिबात वाटत नाही, तर तो प्रेमाचा गुंता वाटतो.

जसा धाग्याचा गुंता सोडवताना वाटतं, की गुंता सुटतोय; पण तो गुंता आणखी होत जातो आणि तो सोडविण्यासाठी आपण त्यात आणखी गुंतत जातो.

हा चित्रपट अगदी तसाच आहे.

ही कहाणी सुरू होते महेंद्र आणि सुधाच्या संवादातून.

दोघे एका अतिदुर्गम रेल्वे स्टेशनवर भेटतात आणि बाहेर धो धो पाऊस पडत असतो.

या दोघांच्या नात्यातले धागे उलगडत जाताहेत, असे वाटत असतानाच धक्कादायक ‘दि एंड’ होतो.

त्यातून चित्रपट पाहणारा अजिबात सावरत नाही हा माझा दावा आहे.

सुधाशी लग्न ठरलेलं असतानाही महेंद्र मायात गुंतत जातो.

त्याला मायाशी लग्न करायचं असतं. तो सुधाला सगळं सांगतोही.

अर्थात, सुधा हे सगळं समजून घेते, पण प्रश्न दादूचा असतो.

याच दादूंनी अनाथ महेंद्रलाही सांभाळलेलं असतं आणि त्यांच्या लांबच्या नात्यातल्या बहिणीलाही सांभाळलेलं असतं.

याच दादूंच्या बहिणीची मुलगी म्हणजे सुधा. सुधा शिक्षिका असते.

महेंद्रला आपल्याशी लग्न करायचं नाही हे ती जाणून असते.

त्यामुळे ती महेंद्रला सल्ला देते, “तुम्ही तुमच्या आयुष्याला वेसण नका घालू. तुम्ही तेच करा, जे सत्य आहे; योग्य आहे.”

महेंद्रला मार्ग मोकळा झाल्यासारखं वाटतं; पण माया मुळातच एक मुक्त विचारांची ख्रिश्चन मुलगी असते.

कुठलीही बंधनं नसलेली एक मुक्त स्त्री.

तिला लग्न म्हणजे आत्महत्या वाटते.

महेंद्रसोबत आज जे प्रेम आहे, ते लग्नानंतर संपून जाईल.

त्यामुळे तिला त्याच्या आकंठ प्रेमात बुडण्यातच आवडतं.

नियतीला या दोघांचं लग्न मान्य नसतं.

त्यामुळे पुढे अशा काही घटना घडतात, की महेंद्र नाइलाजाने दादूने ठरविलेल्या तारखेवर सुधाशी लग्न करतो; पण या दोघांनाही मायाची आठवण अस्वस्थ करीत असते.

म्हणजे महेंद्रला तिच्या आठवणी येणं आणि तिच्या आठवणींतल्या महेंद्रमुळे सुधाचं अस्वस्थ होणं.

मायाचा सतत फोन येणं आणि या फोनमुळे होणारी महेंद्रची विचित्र अवस्था.

तिच्या आठवणी महेंद्रच्या इर्दगिर्द सतत घुटमळत राहतात.

सुधाला वाटतं, की महेंद्र संपूर्ण माझा नाहीच.

तिला प्रत्येक वस्तूची, भावनांची विभागणी माया आणि तिच्यात झाल्यासारखं वाटतं.

सुधाला महेंद्रसकट सगळं स्वतःचं हवं असतं.

इथे महेंद्र सुधावरही जिवापाड प्रेम करतो; पण माया त्याची दुखरी नस होऊन जाते.

इजाजत या चित्रपटात एक प्रसंग तर मन हेलावून टाकतो. सुधाला मायाच्या काही वस्तू घरात आढळतात. सुधा म्हणते, तिच्या या महागड्या वस्तू आपण दोघेही वापरणार नाही. मग त्या घरात पडून वाया जाण्यापेक्षा तिला त्या परत द्यायला हव्यात.

महेंद्र त्या वस्तू नाइलाजानेच परत मायाकडे पाठवतो. इथे मायाची मनःस्थिती गुलजार यांनी अप्रतिम व्यक्त केली आहे, ती ‘मेरा कुछ सामान…’ या गीतातून. माया पत्र पाठवून म्हणते, की एवढ्याच वस्तू होत्या का माझ्या, ज्या तू परत पाठवल्यास. ते पत्र वाचून महेंद्र सद्गदित होतो.

तो सुधापुढे पत्र धरतो आणि म्हणतो ही आहे माया.

मायाने एक सुंदर प्रसंग सांगितला आहे.

ती म्हणते तुला आठवतंय महेंद्र, आपण लाइट न लावता सायकलवरून जात असतो. त्याच वेळी हवालदार आपल्याला पकडतो व दंड ठोकतो. मग आपण किती गरीब, लाचार असल्याचे नाटक करतो. अखेर हवालदाराला आपली दया येते नि आपल्याकडे पाहून आठाणे (अठण्णी) देतो.. या आठाण्यातले एक चाराणे (चवन्नी) माझे होते. तो मला परत दे. इथे खल्लास व्हावंसं वाटतं.

मायाची पत्रे महेंद्रला सापडत नाही. त्याची ती अस्वस्थता पाहून सुधा विचारते, मायाची पत्रं शोधताहेत ना…?

महेंद्र चपापतो- ‘अं… हं..’ तेवढ्यात सुधा म्हणते, “मी ती व्यवस्थित ठेवली आहेत” असं म्हणत ती तिच्या दागिन्यांच्या लाकडी पेटीत ठेवलेली पत्रे महेंद्रकडे सोपवते.

तेवढ्यात महेंद्र म्हणतो, तू दागिने यात ठेवायचीस ना! मग ती काढून पत्रे कशाला ठेवलीस?

माया म्हणते, “मी तुझ्या दागिन्यांसाठी माझे दागिने बाजूला ठेवले!”

ही कहाणी महेंद्र आणि सुधाच्या संवादातून उलगडताना सिक्वेन्स इतका अप्रतिम लावला आहे, की सॅल्यूट करावासा वाटतो आरडी आणि गुलजार यांना.

एक दिवस मायाचा अपघाती मृत्यू होतो आणि चित्रपट नव्या कहाणीकडे वळतो.

मायाच्या मृत्यूपूर्वीच सुधा महेंद्रपासून विलग झालेली असते. महेंद्र एकटा होतो.

अचानक एका रेल्वे स्टेशनवर त्याला सुधा भेटते. बाहेर धो-धो पाऊस आणि दोघे एकमेकांसमोर आल्यानंतर आठवणींचा पाऊस…

इथे दोघांची कश्मकश भारीच दाखवली आहे.

असं वाटतं, की ही दुभंगलेली मने पुन्हा एकत्र येतील आणि वेगवेगळ्या प्रसंगातून तसे जाणवतेही.

म्हणजे महेंद्रची सिगारेट शिलगावण्यासाठी लागणारी माचिसची पेटी किंवा त्याचं ते भिजणं आणि तिने त्याचं डोकं टॉवेलने पुसणं, व्हिस्की पिण्याची त्याची इच्छा असतानाही तिचं त्याला अधिकाराने रोखणं…

वाटतं, की या सगळ्या गोष्टी त्यांच्यातली दरी हळूहळू संपवत आहेत.

महेंद्रची सिगारेट पिण्याची सवय सुधाला नवीन नसतेच. मात्र, सिगारेट बाळगताना महेंद्र लायटर हमखास विसरतो.

म्हणून सुधा पर्समध्ये माचिसची पेटी नेहमी बाळगत असे.

या वेळीही महेंद्र सिगारेट काढतो. पण लायटर शोधत असतानाच सुधा पर्समधून माचिसची पेटी काढून त्याला देते.

महेंद्र चकित होतो. किती तरी वर्षे सुधा आपल्यापासून दूर राहिली.

पण तिने आपल्यासाठी अजूनही पर्समध्ये माचिसची पेटी ठेवली.

माझ्यावर किती हे प्रेम! महेंद्र तिला गमतीने म्हणतो, “मी नसतानाही तू माचिस ठेवतेस? तू सिगारेट पिणे सुरू केले की काय…?”

ती म्हणते, “तुमची विसरण्याची आणि माझी माचिस ठेवण्याची सवय गेली नाही…” या उत्तराने सुधा अजूनही महेंद्रचीच आहे यावर आपण बापुडे प्रेक्षक लगेच शिक्कामोर्तब करतो.

पण छे… इथे जबर धक्कातंत्र वापरलं आहे.

हे धक्कातंत्र काय आहे, चित्रपट पाहण्यातच मजा आहे.

अखेर सुधा महेंद्रचा निरोप घेते. का निरोप घेते, यासाठी चित्रपट पाहायला हवा.

सुधा निघून जाते आणि महेंद्र पाहतच राहतो. आता त्या स्टेशनवरचा पाऊस एकीकडे थांबलेला असतो, तर दुसरीकडे महेंद्रच्या डोळ्यांत अश्रूधारा सुरू झालेल्या असतात….

इजाजत चित्रपट पाहिल्यानंतर अनेक दिवस मन कुठे तरी रेंगाळत राहतं…

80 च्या दशकातील या चित्रपटाची सर आताच्या चित्रपटांना अजिबात नाही.

तेव्हा हा चित्रपट आवर्जून पाहा, असं मी हक्काने सुचवेन.

हा संपूर्ण चित्रपट पाहायचा असेल तर इथे क्लिक करा…

[jnews_element_embedplaylist playlist=”https://www.youtube.com/watch?v=yRb3rUv5sHY” column_width=”4″]

सुशांतने असा साकारला धोनी…

Follow on Twitter @kheliyad

[jnews_block_37 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”60″]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!