All SportsWomen Power

उमोजा- महिलांचंच एक गाव!

अत्याचाराची परिसीमा झाली, की क्रांतीची ठिणगी पडते. या ठिणगीला हवा मिळाली, की त्याची ज्योत होते आणि शुष्क खाद्य मिळालं, की ती रौद्र रूप धारण करते. अशाच एका ठिणगीतून वसलंय एक गाव, जेथे आहे फक्त महिलांचं राज्य. होय, पुरुषांना या गावात अजिबात प्रवेश नाही. आफ्रिकेतील केनियामध्ये असलेलं ‘उमोजा’ (Umoja) हे ‘लेडीज ओन्ली’ गाव आज जगभर चर्चेचा विषय ठरलं आहे. जाणून घेऊ हे महिलांचे गाव- उमोजा.

अशोक सूर्यवंशी


मोजा म्हणजे आफ्रिकन भाषेत एकता. मुळात स्त्री. जन्मत:च अबला. पुरुषांपुढे तिची ताकद तरी किती? त्यात आफ्रिकन देशांची अवस्था महिलांसाठी तर आणखीनच भयंकर. समाजाने सुरुवातीपासूनच महिलेला एक तर देव्हाऱ्यात बसविले किंवा चुलीपुढे. खरं तर देव्हाऱ्यात नावापुरतेच बसविले. तिचे वर्षानुवर्षे स्थान चुलीपुढे आणि मानवजातीच्या विस्तारापुरतेच मर्यादित. लग्न करून बायको घरात आणली, की ती जणू मोलकरीणच. घरातील पडेल ती कामे करणारी, आपल्याला हवं तेव्हा, हव्या त्या ‘सेवा’ देणारी, घरच्यांना हवं-नको ते सगळं बघणारी, मुलाबाळांचा सांभाळ करणारी अशी फुलटाइम बिनपगारी ‘कामगार’च. मात्र, हे सगळं सहनशक्तीच्या पलीकडे गेलं तर काय करायचं? मरायचं? छे… लढायचं. अशाच लढवय्या स्त्रियांनी एकत्र येऊन असा काही निर्णय घेतला, की त्यांनी गावातून पुरुषच वजा केला.

ही कथा आहे जगातील एकमेव ‘लेडीज ओन्ली’ म्हणून प्रसिद्धीस आलेल्या उमोजा (Umoja) गावची. ‘उमोजा’ असं गाव, जिथे आहे स्त्रियांनी स्त्रियांसाठी चालवलेलं स्त्रियांचं राज्य. या गावात पुरुषांना प्रवेश निषिद्ध आहे. गरिबी आफ्रिकन देशांच्या पाचवीलाच पूजलेली. साहजिकच भारताप्रमाणेच पुरुषसत्ताक पद्धतीचा पूर्वीपासूनच या खंडामध्ये अंमल आहे. स्त्री केवळ उपभोग्य वस्तू. तिच्याशी लग्न केलं, की ती आपली मालमत्ताच झाली. या पुरुषी अहंकाराचा वारसा प्रत्येकाने अगदी पुरेपूर जपलेला. मनाजोगता हुंडा न दिल्यास पत्नीला मारहाण करणे, तिला असह्य वेदना देणे, लैंगिक अत्याचार करणे या बाबी तर येथील मुली-महिलांसाठी नित्याच्याच. पुरुषसत्ताक व्यवस्थेच्या विरोधात जाणे या अबला महिलांसाठी केवळ अशक्यच. वर्षानुवर्षे आफ्रिकेतील अनेक देशांमध्ये बालपणापासून मुली अशा नरकयातना भोगत आलेल्या आहेत. त्यातच स्त्रीला लैंगिक सुखाच्या आनंदापासून दूर ठेवण्यासाठी बालपण ते कुमारवयादरम्यान मुलींची केली जाणारी ‘सुंता’ हा तर या महिलांसाठी नरकच. यामुळे ती मुलांना जन्म तर देऊ शकते; मात्र तिला समागमाचं सुख मिळणार नाही, यासाठीची पुरेपूर व्यवस्था वर्षानुवर्षे केलेली. सगळी सुखे भोगण्याचा अधिकार फक्त पुरुषांनाच. वयाने मोठ्या पुरुषांशी बळजबरीने विवाह, बलात्कार हे या महिलांना नित्याचेच. घरून पाठबळ नसलेल्या या महिला सगळीकडूनच बाटवल्या गेल्या. आफ्रिकेत छावण्या टाकलेल्या ब्रिटिश सैनिकांनीही त्यांना आपल्या वासनेची शिकार बनवलं.

१९९० दरम्यान सुमारे ६०० महिलांवर ब्रिटिश सैनिकांनी बलात्कार केले. त्यानंतर सैन्याविरोधात महिलांवर बलात्कार केल्याचे खटले भरण्यात आले. मात्र, त्यानंतर या महिलांना मिळालेला हा न्याय त्यांच्यावर सर्वात मोठा अन्याय करणारा ठरला. कोर्टातील खटल्यांमुळे ज्या ज्या स्त्रियांवर बलात्कार झाल्याचे उघड झाले, त्यांना नवऱ्याने, सासरच्यांनी घरातून बाहेर हाकलून लावले. बलात्कारामुळे अपवित्र झाल्या म्हणून, तर काहींना लैंगिक आजार झाले असतील म्हणून या महिलांचं छत हिरावलं गेलं. माहेरची कवाडेही बंद झालेली. मग अशा बेघर महिलांनी जायचं कुठं हा प्रश्न होता. रिबेका लोलोसोली ही महिलाही अशीच घरगुती हिंसेची शिकार होती. मग त्यांनी पुरुषांच्या क्रूर, स्वार्थी जगापासून दूर जायचं ठरवलं. तिच्यासारख्या १५ पीडित महिलांनी एकत्र येऊन ‘मसाईमारा’च्या जंगलात स्वतंत्र वस्ती केली. या गावात त्यांनी स्वत:चे नियम बनवले. नवऱ्यांना पाय ठेवू द्यायचा नाही, हा पहिला नियम. या गावातील सगळ्या महिला अगदी समान असतील आणि सर्वांना सगळं स्वातंत्र्य उपभोगण्याचा अधिकार असेल. साहजिकच बालपणापासून अत्याचाराने अस्तित्वच हरवून बसलेल्या या स्त्रियांना स्वत:चे मोकळे आकाश मिळाले. जीवन जगण्याचा एक उद्देश मिळाला.

अशी चालते व्यवस्था…

केनियाची राजधानी नैरोबीपासून 380 किलोमीटरवर संबुरू कौंटीत उमोजा हे गाव वसविण्यात आलं. या गावात अध्यक्ष सोडून सर्व महिला समान आहेत. येथे येणाऱ्या महिलांमध्ये घटस्फोटित, एचआयव्ही बाधित, बलात्कारित, नवऱ्याने टाकलेल्या अशा सर्व प्रकारच्या महिला आहेत. घरातून पळून आलेल्या, हाकलून लावलेल्या, अनाथ मुली-महिलांनाही येथे आसरा दिला जातो. साहजिकच त्यातील अनेकींना मुलेही आहेत आणि त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारीही त्यांचीच. त्यामुळे या सर्व महिला मिळून गावात प्राथमिक शाळाही चालवतात, जेथे ही मुले शिकतात. त्यांच्या आरोग्यासाठी येथे क्लिनिकही उघडण्यात आले आहे. याशिवाय आदिवासी संस्कृती जिवंत ठेवणारं कल्चरल सेंटर आणि संबुरू राष्ट्रीय उद्यान, तसेच गावाला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी कॅम्पिंग साइटही उपलब्ध करून दिली जाते. या गावाला पर्यटक भेट देऊ शकतात; तथापि, गावात मुक्कामी राहण्याचा कुठल्याही पुरुषाला अधिकार नाही. फक्त या गावातील महिलांची मुलेच येथे राहू शकतात. गावातील महिलांना जमीन धारण करण्याचा किंवा जनावरे पाळण्याचा अधिकार नाही. उपजीविकेसाठी या महिला पारंपरिक दागिने, हस्तकलेच्या वस्तू बनवितात आणि विकतात. यातून त्यांची रोजीरोटी चालते.

महिलांचे गाव उमोजा
महिलांचे गाव- उमोजा | उमोजा गावातील शाळा.

पुरुषांकडून आडकाठी

आतापर्यंत पुरुषांच्या डोळ्याला डोळा न भिडवणाऱ्या बायकांनी स्वत:चं गाव स्थापन केलेलं पाहून पुरुष चिडले नसते तरच नवल. त्यांनी या महिलांना त्रास देण्याची एकही संधी सोडली नाही. या गावाजवळच स्वतंत्र गाव उभारून राहण्याचा त्यांनी प्रयत्न केला. येथे येणाऱ्या पर्यटकांनी या महिलांकडून वस्तू विकत घेऊ नयेत यासाठीही प्रयत्न केले. मात्र, या सर्व महिला स्वत:च्या निश्चयावर ठाम होत्या. पुरुषांच्या नावे असलेली जवळपासची जमीन या महिलांनी विकत घेतली. सुरुवातीला सगळंच नवीन असल्यामुळे जम बसविताना त्रास झाला. इतरांकडून भाजीपाला खरेदी करून या महिला आसपास विकू लागल्या; पण हा व्यवसाय दुसऱ्यांवर अवलंबून होता आणि त्यांना स्वत:ला शेती करण्याचे पूर्ण ज्ञान नसल्यामुळे त्या भाजीपाला पिकवू शकत नव्हत्या. परिणामी, हा व्यवसाय बारगळला. नंतर त्यांनी पारंपरिक हस्तकलेच्या वस्तू पर्यटकांना विकण्याचा नामी मार्ग शोधून काढला. रंगीत खड्यांचे दागिने, कमी अल्कोहोल असलेली घरगुती बीअर, इतर हस्तकलेच्या वस्तू या महिला तयार करून पर्यटकांना विकतात. विशेष म्हणजे या वस्तू विकण्यासाठी त्यांनी वेबसाइटही तयार केलेली आहे. त्यांची ही धडपड पाहून केनिया वाइल्डलाइफ सर्व्हिसेसने त्यांना ‘मसाई मारा’ अभयारण्यातील काही महिला गटांकडून प्रशिक्षण देण्यास मदत केली. याशिवाय केनियाच्या पुरातत्त्व आणि सांस्कृतिक मंत्रालयानेही या महिलांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यास मदत केली.

आदिवासी संस्कृतीची झलक

महिलांचे गाव उमोजा
महिलांचे गाव- उमोजा | गावातील घरे.

भारतातील आदिवासी पाड्यांप्रमाणेच येथील घरेही शेणामातीची आहेत. गोवऱ्यांनी किंवा शेणामातीच्या मिश्रणाने लिंपलेल्या भिंती, वर गवत वा चटईचे छप्पर अशी टुमदार गोलाकार घरे पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. येथील महिलांचे जीवनमान उंचावणे, गरिबीतून वर आणणे हा या गावातील महिलांचा सर्वांत महत्त्वाचा उद्देश आहे. गावातील सर्व महिलांना विशिष्ट ड्रेस कोड आहे, अर्थातच पारंपरिक. आदिवासी पद्धतीचा, कलाकुसर केलेला पोशाख, पारंपरिक पद्धतीचे दागिने परिधान करणे त्यांना सक्तीचे आहे. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे मुलींची ‘सुंता’ ही बाब या गावातून हद्दपार करण्यात आलेली आहे. 2005 मध्ये या गावात 30 महिला आणि 50 मुले होती. दहा वर्षांत म्हणजे 2015 मध्ये 47 महिला आणि 200 मुले येथे राहत होती.

हे आहे फक्त महिलांचं उमोजा गाव…
[jnews_element_embedplaylist playlist=”https://www.youtube.com/watch?v=UrnmBLB-UX4″ column_width=”4″]

महिलांचे गाव उमोजा | शिक्षणाचा हक्क

प्रत्येक महिलेला आपल्या उत्पन्नातील दहा टक्के हिस्सा कर म्हणून द्यावा लागतो, जो शाळा आणि इतर सार्वजनिक सुविधांसाठी वापरला जातो. इतर गावांतील मुलांवर लहान वयातच गायी-गुरे चारण्याची जबाबदारी येऊन पडते. मात्र, उमोजातील सर्व मुलांना शिक्षण सक्तीचे आहे. त्यांना कामाला जुंपले जात नाही. येथील प्राथमिक शाळेत ५० मुले शिक्षण घेतात. गावात नर्सरी स्कूलही सुरू करण्यात आले आहे. गावातील महिला इतर गावांमध्ये जाऊन महिला हक्कांविषयी जागृती करतात. गावातीलच एका झाडाखाली सरकार चालतं. ज्याला ‘ट्री ऑफ स्पीच’ (Tree of Speech) म्हंटले जाते. या झाडाखाली सभा घेतल्या जातात. सभांच्या अध्यक्षस्थानी अर्थातच रिबेका असते. गावाच्या विकासासाठी येथे चर्चा केली जाते, निर्णय घेतले जातात. अत्याचार करणाऱ्या समाजापुढे तोंड न उघडणाऱ्या, साध्या-सोज्वळ बायकांच्या सहनशक्तीची परिसीमा होते, तेव्हा अशी क्रांतीची ठिणगी पडते आणि या स्त्रीशक्तीपुढे पुरुषी ताकदही निष्प्रभ ठरते हे या महिलांनी दाखवून दिलं आहे. त्यामुळेच रणचंडिकांचे हे गाव आज जगभरातील पर्यटकांसाठी कुतूहल बनलेले आहे.

कोण ही ‘रिबेल’ ठरलेली रिबेका?

महिलांचे गाव उमोजावाम्बा नावाच्या गावात 1962 मध्ये जन्मलेली रिबेका. सगळे मिळून सहा भाऊ-बहिणी. 1971 मध्ये तिने वाम्बा येथील प्राथमिक शाळेत प्रवेश घेतला. प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने कॅथोलिक नर्सिंग ट्रेनिंग सेंटरमध्ये प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. मात्र, शुल्क भरण्यास पालक असमर्थ ठरल्याने कोर्स पूर्ण होण्याच्या सहा महिने आधीच तिला घरी बसावे लागले. वयाच्या अठराव्या वर्षी तिचं फॅबियानो डेव्हिड लोलोसोली या तरुणाशी लग्न लावून देण्यात आलं. हुंडा म्हणून तब्बल 17 गायी देण्यात आल्या. रिबेका हुशार होती. त्यामुळे तिने गावामध्ये वस्तू विक्रीचा व्यवसाय सुरू केला. याबरोबरच ती महिलांच्या अधिकारांसाठीही उभी राहू लागली. तिच्या नवऱ्याने लवकरच तिच्या व्यवसायातून काढता पाय घेतला. यानंतर तिचे दुर्दैवाचे दशावतार सुरू झाले. चार लोकांनी तिला मारमार मारलं आणि तिचे पैसे घेऊन पोबारा केला. नवऱ्याला आपल्या जिवाशी, आपल्या व्यवसायाशी काहीच देणंघेणं नाही हे लक्षात आल्यानंतर तिने त्याच्यापासून काडीमोड घेण्याचा निर्णय घेतला. 1990 मध्ये तिच्यासह नवऱ्याच्या अत्याचाराला वैतागलेल्या काही बायकांनी एकत्र येत नवीन ठिकाणी वस्ती केली. तेच हे उमोजा. 1995 मध्ये उमोजा गावच्या महिलांनी रिबेकाला त्यांच्या संघटनेचं अध्यक्ष निवडलं. त्यानंतर तब्बल दहा वर्षे ती त्या पदावर होती. तिची ख्याती जगभरात पसरू लागली. संयुक्त राष्ट्राकडून तिला एका कॉन्फरन्सचे आमंत्रण आले. तिने तेथे जाऊ नये म्हणून तिला ठार मारण्याच्या धमक्याही आल्या. पण ती डगमगली नाही. तिने तेथे जाऊन आपले विचार मांडले. संयुक्त राष्ट्रांना भेट दिल्याने आसपासच्या पुरुषांनी गाव बंद करण्यासाठी तिच्याविरोधात कोर्टात खटलाही भरला. याउपरही ती डगमगली नाही. 2009 मध्ये रिबेकाच्या पतीने बंदुकीसह उमोजावर हल्ला केला. सुदैवाने रिबेका तेथे नव्हती म्हणून वाचली. तिने महिलांना स्वतंत्र करण्याचं, त्यांना अधिकार मिळवून देण्याचं, आनंद वाटण्याचं काम सुरूच ठेवलं. रिबेकाच्या या कामाची दखल जगाने घेतली. 2010 मध्ये तिला ग्लोबल लीडरशिप अ‍ॅवॉर्डने गौरविण्यात आलं.

बिली जीन किंग : महिलांच्या अस्तित्वासाठी लढणारी टेनिसपटू

Umoja Film

[jnews_block_8 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”1632″]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!