• Latest
  • Trending
The story of Billie Jean King

बिली जीन किंग : महिलांच्या अस्तित्वासाठी लढणारी टेनिसपटू

April 3, 2021

विक्रमवीर नोव्हाक जोकोविच

February 5, 2023
हॉकी वर्ल्ड कप जर्मनी

वर्ल्ड कप हॉकी : जर्मनी 17 वर्षांनी विश्वविजेता

February 5, 2023
खेलो इंडिया

खेलो इंडिया : कुणाल, उमर, देविकाला सुवर्ण

February 5, 2023
महिला क्रिकेट वर्ल्ड कप

महिला टी20 क्रिकेट वर्ल्ड कप : कोण आहेत या जगज्जेत्या भारतीय कन्या?

February 3, 2023
ऑस्ट्रेलियन ओपन अरिना सबालेन्का

ऑस्ट्रेलियन ओपन : अरिना सबालेन्का विजेती

January 29, 2023

हॉकीपटू नीना असईकर राणे यांचे निधन

January 25, 2023
महिला कुस्तीगिरांचे शोषण

महिला कुस्तीगिरांचे शोषण होतेय?

January 23, 2023
महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे

दीड मिनिटात शिवराज राक्षे ‘महाराष्ट्र केसरी’

January 16, 2023
भारतीय क्रिकेट 2022

भारतीय क्रिकेट 2022 : संघर्षाचं वर्ष

January 23, 2023
कसे बनले महान फुटबॉलपटू पेले?

कसे बनले महान फुटबॉलपटू पेले?

January 16, 2023
टेबल टेनिस 2022

टेबल टेनिस 2022- शरथ आणि मनिकाची चमक

December 27, 2022
साहसी, प्रेरणादायी- ग्लेन कनिंघम (Glenn Cunningham)

साहसी, प्रेरणादायी- ग्लेन कनिंघम (Glenn Cunningham)

December 24, 2022
Wednesday, February 8, 2023
kheliyad
  • Home
  • Cricket
  • All Sports
  • Inspirational story
  • Online Chess Puzzle
  • Raanwata
  • Video
  • sports quiz
No Result
View All Result
  • Home
  • Cricket
  • All Sports
  • Inspirational story
  • Online Chess Puzzle
  • Raanwata
  • Video
  • sports quiz
No Result
View All Result
kheliyad
No Result
View All Result

बिली जीन किंग : महिलांच्या अस्तित्वासाठी लढणारी टेनिसपटू

The story of Billie Jean King | इतिहासात अनेक लढाया लढल्या गेल्या... मात्र, टेनिसच्या इतिहासातली ही एकमेव लढाई होती, जी महिलांच्या अनेक पिढ्यांना समृद्ध करून गेली. ही लढाई होती ‘बॅटल ऑफ सेक्सेस’.

Mahesh Pathade by Mahesh Pathade
April 3, 2021
in All Sports, Autobiography, Inspirational Sport story, Inspirational story, Tennis, Women Power
0
The story of Billie Jean King
Share on FacebookShare on TwitterShare on LinkedinShare on TelegramShare on WhatsappShare on PinterestShare on RedditShare on Email

बिली जीन किंग : महिलांच्या अस्तित्वासाठी लढणारी टेनिसपटू

The story of Billie Jean King | इतिहासात अनेक लढाया लढल्या गेल्या… मात्र, टेनिसच्या इतिहासातली ही एकमेव लढाई होती, जी महिलांच्या अनेक पिढ्यांना समृद्ध करून गेली. ही लढाई होती ‘बॅटल ऑफ सेक्सेस’.

पुरुष आणि महिलेत झालेल्या या लढाईतली विजेती होती बिली जीन किंग. ही बिली जीन किंग (Billie Jean King) लढावू महिला टेनिसपटू. टेनिस कोर्टवर आणि कोर्टबाहेरही महिलांच्या समान हक्कासाठी तिने लढा दिला.. तिचाच हा प्रेरणादायी प्रवास खास खेळियाडच्या वाचकांसाठी…

ही कहाणी आहे ४७ वर्षांपूर्वीची. तारीख होती २० सप्टेंबर १९७३. हुस्टन टेनिस कोर्टची (Houston tennis court) प्रेक्षक गॅलरी कधी नव्हे एवढी खचाखच भरलेली होती. तेवढ्यात एक रुबाबदार एंट्री झाली…

The story of Billie Jean King
The story of Billie Jean King

फ्लेमिंगोचे गुलाबी पंख लावलेल्या सुवर्णपालखीतून एका २९ वर्षीय टेनिससम्राज्ञीने दिमाखात प्रवेश केला. या पालखीचे भोई होते उघड्या देहाचे चार पुरुष. टाळ्यांचा प्रचंड कडकडाट सुरू झाला. ही टेनिससम्राज्ञी होती बिली जीन किंग (Billie Jean King). तिचा प्रतिस्पर्धी कोणी महिला नाही, तर तो होता ५५ वर्षीय माजी अव्वल टेनिसपटू बॉबी रिग्स.

हा काही सामना नव्हता, तर ती एक स्त्रीच्या अस्तित्वाची, कर्तृत्वाची, अस्मितेची लढाई होती. पुरुषी अहंकाराविरुद्ध पुकारलेलं एक युद्ध होतं. होय, हेच ते युद्ध, जे टेनिसच्या इतिहासात ‘बॅटल ऑफ सेक्सेस’ (Battle of the Sexes) म्हणून अजरामर ठरलं…

हे युद्ध पाहण्यासाठी जमले होते तब्बल ३० हजार प्रेक्षक. एकही जागा रिकामी नव्हती. टेनिसच्या इतिहासातली ही विक्रमी प्रेक्षकसंख्या होती. एवढा प्रतिसाद विम्बल्डनच्या फायनललाही कधी मिळालेला नव्हता!

हे प्रेक्षक आता दोन गटांत विभागले गेले होते. एक गट बिली जीन किंगला चीअरअप करणारा, तर दुसरा बॉबी रिग्सला…

The story of Billie Jean King | टेनिस कोर्टचा माहोल एरव्हीपेक्षा वेगळा होता. प्रेक्षक शँपेनचा आनंद घेत होते, चीअरलीडर्स नृत्यात दंग होत्या, तर बँड पथक दोन्ही खेळाडूंचं थीम साँग गात होते… ‘मी पुरुषवादी’ (I am a male chauvinist) असं काही पुरुषांच्या टी-शर्टवर लिहिलेलं होतं… साहजिकच ते बॉबी रिग्सचं समर्थन करीत होते, तर काही महिलांच्या हातातल्या फलकांवर लिहिलेले होते… ‘आय लव्ह बीजेके’ (I love BJK).

बिलीने टेनिस पेहरावावर वूलनचा कार्डिगन परिधान केलेला होता, तर डोळ्यांवर गोल काचांचा चष्मा… ती प्रेक्षकांना अभिवादन करीत होती… टीव्हीवर या स्पर्धेचं लाइव्ह समालोचन सुरू होते.

समालोचक म्हणाला, “बिली आकर्षक तरुणी आहे…” हे वाक्य त्या वेळी टीव्हीसमोर असलेल्या ९० मिलियन अमेरिकींच्या कानावर पडलं… ७० च्या दशकातील प्रत्येकाला या लिंगसमराचा शब्दन् शब्द आणि प्रसंग अजूनही आठवत असेल…

निळ्या रंगाचे रनिंग शूज आणि साधे कपडे परिधान करणारी बिली फारसे आकर्षक कपड्यांच्या भानगडीत पडत नाही… बॉबी मात्र पिवळ्या जॅकेट परिधान करून कोर्टवर उतरला होता. जॅकेटच्या मागे लिहिलेले होते… शुगर डॅडी (Sugar Daddy).

बिली एकदम साधी होती. तिच्या मनात कोणतीही कूटनीती किंवा कुणाविषयी असूया नव्हती. तिला माहिती होतं, की ही लढत एखादी सर्कस आहे. तिला हेही माहीत होतं, की ही लढत प्रत्येक महिलांचा दृष्टिकोन बदलून टाकणारी आहे…

कारण जेव्हा बॉबी रिग्सने बिलीला आव्हान दिलं होतं, तेव्हा तिने ते धुडकावलं.. बॉबी रिग्स एकेकाळचा अव्वल टेनिसपटू होता. मात्र, त्याला पुरुषी अहंकार होता. तो नेहमी म्हणायचा, माझ्यासमोर कोणतीही अव्वल महिला टेनिसपटू आली तरी मी तिला या वयातही हरवू शकेन. म्हणूनच त्याने बिली जीन किंगलाही डिवचले होते. त्याने अव्वल क्रमांकाची टेनिसपटू मार्गारेट कोर्टलाही आव्हान दिलं.

तिने ते स्वीकारलं, पण ती पराभूत झाली.. बिलीला वाईट वाटलं. कारण महिलांना पुरुषांइतकाच समान हक्क आहे. आणि हे सिद्ध करण्यासाठी हा चुकीचा मार्ग आहे. तिने ठरवलं, की बॉबीला टेनिस कोर्टवर हरवूनच महिला पुरुषांपेक्षा कमी नाहीत हे त्याला त्याच्याच भाषेत सांगावंच लागेल.

बॉबीने महिलांविरुद्ध अनेक वादग्रस्त विधानेही केली होती. तो म्हणायचा, महिलांची जागा बेडरूम आणि स्वयंपाकघरातच आहे…

बॉबीला धडा शिकवण्यासाठीच बिली कोर्टवर परतली. हुस्टन टेनिस कोर्टवर प्रत्येक जण डोळ्यांत प्राण आणून तो सामना याचि देही याचि डोळा अनुभवत होता…

the-story-of-billie-jean-king
1973 च्या बॅटल ऑफ सेक्सेस प्रदर्शनीय सामन्यात बॉबी रिग्सला पराभूत करून बिली जीन किंगने महिलांना सन्मान मिळवून दिला. या स्पर्धेतला हा क्षण.

बिलीने पहिली सर्व्हिस केली ती निश्चयानेच. खेळाडू ते गृहिणी… कोणतीही महिला दुर्बल नाही हे तिला सिद्ध करायचे होते… आणि ते तिने सिद्ध केलेही… बिली जिंकली, तेही सरळसेटमध्ये! बॉबी रिग्सचा 6-4, 6-3, 6-3 असा दणदणीत पराभव झाला…

विजयानंतर बिली म्हणाली, “मी जर हा सामना हरले असते तर महिला टेनिसला फटका बसला असता. अनेक स्पर्धा जिंकल्यानंतरही मला हा पराभव अधिक वेदनादायी ठरला असता. महिला आंदोलनाचंही नुकसान झालं असतं…”

“मला माहीत आहे, की हा विजय किती महत्त्वाचा होता. मी लोकांना आवाहन करते, की महिला टेनिस आणि महिला याकडे गांभीर्याने पाहा…” बिलीने व्यक्त केलेली भावना बरंच काही सांगून जाते…

1973 मध्येच बिलीने महिला टेनिस संघटनेची (Women’s Tennis Association) स्थापना केली. ‘यूएस ओपन’ या महत्त्वाच्या ग्रँड स्लॅम स्पर्धेत पुरुषांइतकेच बक्षीस महिलांना देण्याचे जाहीर झाले. बिली जीन किंगच्या ‘बॅटल ऑफ सेक्सेस’ने महिलांना दिलेली ही समानतेची पहिली भेट. मात्र, अजूनही महिलांना इतर अनेक खेळांत पुरुषांइतके मानधन किंवा बक्षीस मिळत नाही हेही तितकेच खरे आहे.

कोण ही बिली जीन किंग?


The story of Billie Jean King |  बिली जीन किंग साठच्या दशकातली अव्वल अमेरिकन टेनिसपटू. तिने ३९ ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. यातील १२ एकेरीत, १६ दुहेरीत, तर ११ मिश्र दुहेरीतले विजय आहेत. बिली टेनिस कोर्टवरच लढत नव्हती, तर महिलांच्या न्यायहक्कासाठी कोर्टात लढणारी वकीलही होती. दोन्ही कोर्टवर ती लढत होती. महिला टेनिस संघटना (Women’s Tennis Association) आणि वूमेन्स स्पोर्ट्स फाउंडेशनची (Women’s Sports Foundation) ती संस्थापक आहे. महिला टेनिसला प्रायोजकत्व देण्यासाठी कंपन्या राजी होत नसायच्या. ७० च्या दशकातली स्थिती. अशा वेळी महिला टेनिसला प्रायोजकत्व देण्यासाठी तिने व्हर्जिनिया स्लिम्स या अमेरिकेतल्या सिगारेट ब्रँडला राजी केले होते. २००० मध्ये फिलिप मॉरिस या आपल्या घरच्याच कंपनीच्या संचालक मंडळावरही तिने काम केले.

टेनिसकडे वळली पालकांमुळे…


कॅलिफोर्नियातील लाँग बीच येथे मॉफिट (Moffitt) घराण्यात बिली जीनचा जन्म झाला. मॉफिट घराणं परंपरावादी होतं. तिच्या आईचं नाव बेट्टी (Betty). ती गृहिणी होती, तर वडील बिल मॉफिट (Bill Moffitt) अग्निशामक दलात कर्मचारी. तसं हे मॉफिट दाम्पत्य उत्तम खेळाडू. आई बेट्टी जलतरणपटू, तर वडील बास्केटबॉल आणि बेसबॉलपटू. ते उत्तम धावपटूही होते. बिलीचा मोठा भाऊ रँडी मॉफिट बेसबॉलचा उत्तम पिचर (Baseball pitcher) होता. क्रिकेटमध्ये जसा गोलंदाज असतो, तसा बेसबॉलमध्ये पिचर असतो. अनेक महत्त्वाच्या लीग सामन्यांत तो सॅन फ्रान्सिस्को जायंट्स ( San Francisco Giants), हुस्टन अस्ट्रोस (Houston Astros) आणि टोरोंटो ब्लू जेज (Toronto Blue Jays) या संघांकडून तो खेळला आहे. बिलीही बालपणी भावासारखीच सॉफ्टबॉल आणि बेसबॉल खेळायची. ती आपल्यापेक्षा चार-पाच वर्षांनी मोठ्या मुलींमध्ये खेळायची. वयाच्या दहाव्या वर्षीच तिने एका संघाचं प्रतिनिधित्वही केलं. त्या वेळी तिच्या संघाने लाँग बीच सॉफ्टबॉल चॅम्पियनशिपही जिंकली होती.

मात्र, तिच्या नशिबात हे खेळ नव्हते. पालकांनी तिचे हे खेळ थांबवले. कारण ते मुलींशी जुळणारे नव्हते. त्यामुळे तिला मुलींना साजेशा अशा टेनिसकडे वळवले. त्या वेळी तिचं वय होतं 11. बिलीने लहानपणी पैन् पै साठवत 8 डॉलर जमा केले होते. त्यातूनच तिने टेनिसची पहिली रॅकेट खरेदी केली.

लाँग बीच येथे अनेक सार्वजनिक कोर्ट होते. या कोर्टवर क्लाइड वॉकर ही महिला मुलींना मोफत प्रशिक्षण देत होती. तेथेच बिलीही प्रशिक्षण घेऊ लागली. बालपणी ती अतिशय आक्रमक खेळायची. त्यामुळे कधी कधी तिच्या आक्रमकतेचा तिलाच फटकाही बसला.

The story of Billie Jean King | बिलीला तारुण्यात एक मोठा धक्का बसला. एकदा टेनिस स्पर्धेत सहभागी होणाऱ्या टेनिसपटूंच्या ग्रुपचा फोटो काढायचा होता. त्या वेळी ती आईने शिवलेला शॉर्ट टेनिस ड्रेस परिधान करायची. त्यामुळे इतर मुलींसारखा व्हाइट टेनिस ड्रेस नसल्याने तिला फोटो काढण्यास मनाई केली होती.

एकदा मॉफिट परिवार लाँग बीचमधील ब्रीदरेन चर्चमध्ये एका कार्यक्रमासाठी आला होता. या कार्यक्रमात मंत्र्याने हजेरी लावली होती. हा मंत्री एकेकाळचा माजी खेळाडू व दोन वेळचा पोल व्हॉल्ट ऑलिम्पिक चॅम्पियन होता. बॉब रिचर्ड्स असं त्याचं नाव.

बिली त्या वेळी अवघी 13-14 वर्षांची होती. रिचर्ड्स यांनी तिला विचारले, “तू भविष्यात काय करणार आहेस?”

बिली म्हणाली, “रेव्हरंड, मला जगातली सर्वोत्तम टेनिसपटू व्हायचंय..!”

The story of Billie Jean King
The story of Billie Jean King | लायब्ररीत तिची लॅरी किंग नावाच्या तरुणाशी भेट झाली. या पहिल्या भेटीतच ते प्रेमात पडले.

बिलीने 1961 मध्ये लाँग बीट पॉलिटेक्निक हायस्कूलचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हर्सिटीच्या लॉस एंजिल्स महाविद्यालयात प्रवेश घेतला. याच सुमारास तिने आपल्या आयुष्याचा जोडीदार निवडला. 1963 ची ही गोष्ट. एकदा लायब्ररीत तिची लॅरी किंग नावाच्या तरुणाशी भेट झाली. या पहिल्या भेटीतच ते प्रेमात पडले. त्या वेळी बिली २० वर्षांची होती, तर लॅरी १९ चा. बिली मात्र पुढे पदवी पूर्ण करू शकली नाही. प्रेमप्रकरणामुळे नाही, तर टेनिसवर अधिकाधिक लक्ष केंद्रित केल्याने. नंतर बिलीने लॅरीशी 17 सप्टेंबर 1965 रोजी विवाह केला.

बिलीची कामगिरी


  • बिली जीन किंगने 1972 मध्ये महिला टेनिसच्या इतिहासात चारही ग्रँडस्लॅमची विजेतीपदे जिंकली. चारही ग्रँडस्लॅम जिंकल्यास त्याला ‘करिअर ग्रँड स्लॅम’ (career Grand Slam) किंवा ‘ग्लोल्डन स्लॅम’ अशी कामगिरी करणारी ती जगातली पाचवी महिला ठरली. अशीच कामगिरी तीन दुहेरीतही केली. मात्र, मिश्र दुहेरीत तिला ऑस्ट्रेलियन ओपन जिंकता आली नाही.

  • बिलीने कारकिर्दीत 20 विम्बल्डन स्पर्धा जिंकल्या. यातील सहा एकेरीत, 10 महिला दुहेरीत, तर चार मिश्र दुहेरीतल्या आहेत.

  • 1959 ते 1983 या चोवीस वर्षांच्या कारकिर्दीत बिली जीन किंग 51 ग्रँडस्लॅम स्पर्धा खेळली. यात 27 वेळा तीन उपांत्य फेरी, ४० उपउपांत्य फेरी गाठली. ग्रँड स्लॅम स्पर्धांत ती सहा वेळा उपविजेती ठरली.

  • बिलीने कारकिर्दीत 129 एकेरीची विजेतीपदे मिळविली आहेत. यातील ७८ विजेतीपदे डब्लूटीएची आहेत. कारकिर्दीत तिने एकूण 19,66,487 अमेरिकी डॉलरची बक्षिसे जिंकली.

The story of Billie Jean King

Follow us :


Read more at:

कसे बनले महान फुटबॉलपटू पेले?
All Sports

कसे बनले महान फुटबॉलपटू पेले?

January 16, 2023
लिस हार्टेल
All Sports

लिस हार्टेल- एका डॅनिश महिलेची ‘घोडदौड’

October 20, 2022
बोस्टन मॅरेथॉन- कॅथरिन स्वित्झरची कहाणी
All Sports

बोस्टन मॅरेथॉन- कॅथरिन स्वित्झरची कहाणी

August 27, 2022
एलिसन फेलिक्स
All Sports

‘कोंबडीच्या पायाची…’ एलिसन फेलिक्स

October 12, 2022

 

Tags: Battle of the SexesBillie Jean KingThe story of Billie Jean Kingबिली जीन किंगमहिलांच्या अस्तित्वासाठी लढणारी टेनिसपटू
Mahesh Pathade

Mahesh Pathade

Next Post
Who holds the world record in the 100 meter race

100 मीटर शर्यतीत विश्वविक्रम कोणाच्या नावावर आहे?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

CONTENT

  • All Sports
  • Women Sports
  • Cricket
  • Tennis
  • Environment
  • Jagjit Singh Gazal
  • Online Chess

INFORMATION

  • Sports History
  • About Us
  • Sports Quiz
  • Inspirational Sports Story

    SOCIAL MEDIA

    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Home
    • About US
    • Gallery
    • Contact

    © 2020 Kheliyad Copyright © 2020 Website The "kheliyad" is not responsible for the content of external sites.

    No Result
    View All Result
    • Home
    • Cricket
    • All Sports
    • Inspirational story
    • Online Chess Puzzle
    • Raanwata
    • Video
    • sports quiz

    © 2020 Kheliyad Copyright © 2020 Website The "kheliyad" is not responsible for the content of external sites.

    error: Content is protected !!