All SportsCricket

भारत-वेस्ट इंडीज क्रिकेट मालिका ः भारताचा दणदणीत विजय

पोर्ट ऑफ स्पेन

भारत- वेस्ट इंडीज क्रिकेट मालिका सर्वार्थाने यशस्वी म्हणावी लागेल. मालिकेत अखेरच्या सामन्यात शुभमन गिलचे कारकिर्दीतील पहिले आंतरराष्ट्रीय शतक पावसामुळे अवघ्या दोन धावांनी हुकले खरे.. मात्र, त्याच्या नाबाद 98 धावा आणि त्यानंतर गोलंदाजांच्या सुरेख कामगिरीमुळे भारताने तिसऱ्या आणि शेवटच्या वनडेत वेस्ट इंडीजचा पराभव केला. पावसामुळे डकवर्थ-लुईस पद्धतीचा अवलंब करण्यात आला. या सामन्यात 28 जुलै 2022 रोजी वेस्ट इंडीजला 119 धावांनी पराभूत करून भारताने मालिका 3-0 अशी जिंकली.

भारताच्या डावातील 24 षटके पूर्ण झाल्यानंतर पावसामुळे सामना थांबवण्यात आला आणि सामना 40 षटकांचा करण्यात आला. दुसऱ्यांदा, भारतीय डावाची 36 षटके पूर्ण झाल्यानंतर पावसाने हजेरी लावली आणि पाहुण्या संघाचा डाव तीन बाद 225 धावांत संपुष्टात आला. त्यानंतर डकवर्थ लुईस पद्धतीने वेस्ट इंडीजला 35 षटकांत 257 धावांचे लक्ष्य मिळाले.

भारत- वेस्ट इंडीज क्रिकेट मालिका | गिलचे शतक हुकले

गिलने 98 चेंडूंत दोन षटकार आणि सात चौकारांच्या मदतीने नाबाद 98 धावांची खेळी केली. त्याने कर्णधार शिखर धवन (58) सोबत पहिल्या विकेटसाठी 113 आणि श्रेयस अय्यर (44) सोबत दुसऱ्या विकेटसाठी 86 धावांची भागीदारी रचली. प्रत्युत्तरात युझवेंद्र चहल (17 धावांत 4 बळी), मोहम्मद सिराज (14 धावांत 2 बळी) आणि शार्दूल ठाकूर (17 धावांत 2 बळी) यांच्या भेदक गोलंदाजीसमोर वेस्ट इंडीजचा संघ 26 षटकांत 137 धावांत गारद झाला. अवघ्या 18 धावांत वेस्ट इंडीजने शेवटच्या पाच विकेट गमावल्या. संघासाठी फक्त ब्रेंडन किंग (42) आणि कर्णधार निकोलस पूरन (42) फलंदाजी करू शकले. त्यांचे चार फलंदाज भोपळाही फोडू शकले नाहीत.

दुसऱ्याच षटकात सिराजने सलामी जोडी शून्यावर केली बाद

भारत- वेस्ट इंडीज क्रिकेट मालिका | लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडीजची सुरुवात खराब झाली. दुसऱ्याच षटकात काईल मायर्स (0) आणि शेमार ब्रुक्स (0) यांना विकेट गमवावी लागली. संघाचे खातेही उघडू शकले नाही. सिराजने पहिल्याच चेंडूवर मायर्सला बाद केल्यानंतर तिसऱ्या चेंडूवर ब्रुक्सला पायचीत केले. किंगने पाचव्या षटकात अक्षर पटेलच्या चेंडूवर षटकार ठोकत डावातला पहिला चौकार लगावला. सलामीवीर शाई होपनेही सिराजचा चेंडू प्रेक्षकांत भिरकावला. होप मात्र 33 चेंडूंत 22 धावांत बाद झाला. तो यष्टिरक्षक संजू सॅमसनच्या गोलंदाजीवर यष्टिचीत झाली. सिराजने त्याचा झेल सोडला, तेव्हा पूरन एक धाव काढण्यास भाग्यवान होता. किंगने सलग तीन चौकार मारून प्रसिद्ध कृष्णावरचे दडपण कमी करण्याचा प्रयत्न केला मात्र, अक्षरचा सरळ येणारा चेंडू हुकल्याने तो बाद झाला. त्याने 37 चेंडूंत पाच चौकार आणि एक षटकार ठोकला. यानंतर पूरनने आघाडी घेतली आणि दीपक हुडाच्या लागोपाठ चेंडूवर चौकार आणि षटकार खेचला.

केसी कार्टीने अतिशय संथ फलंदाजी करत 17 चेंडूंत पाच धावा केल्यानंतर ठाकूरचा चेंडू विकेटवर खेळला. त्यानंतर मिडऑनवर कृष्णाच्या चेंडूवर पूरनला धवनने झेलबाद केले. त्यामुळे वेस्ट इंडीजच्या विजयाच्या आशांना मोठा धक्का बसला. त्याने 32 चेंडूंचा सामना करीत पाच चौकार आणि एक षटकार लगावला. ठाकूरने पुढच्याच षटकात अकील हुसेनला (०१) मिडऑनला धवनकरवी झेलबाद करून वेस्ट इंडीजला सातवा धक्का दिला. चहलने कीमो पॉलला खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्यानंतर हेडन वॉल्श ज्युनियर (10) देखील स्लिप्सवर धवनकरवी झेलबाद झाला. त्याने जेडेन सील्सला (00) गिलकडे झेलबाद करून भारताला विजय मिळवून दिला.

तत्पूर्वी, धवनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि गिलच्या साथीने संघाला चांगली सुरुवात करून दिली. धवनने जेसन होल्डरच्या चेंडूवर चौकार मारून खाते उघडले, तर गिलने जेडेन सील्सच्या चेंडूवर चौकार खेचून खाते उघडले. दोन्ही सलामीवीरांनी सुरुवातीलाच सावधगिरी दाखवत 12 व्या षटकात संघाच्या धावांचे अर्धशतक पूर्ण केले. गिलने हेडन वॉल्शच्या (57 धावांत 2 बळी) चेंडूवर डावातला पहिला षटकार खेचला, तर धवननेही फिरकी गोलंदाजाला चौकार ठोकला. त्याने किमो पॉलच्या चेंडूवर 62 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. भारताचे धावांचे शतक 20 व्या षटकात पूर्ण झाले. गिल आणि धवनची मालिकेतील ही दुसरी शतकी भागीदारी ठरली. गिलनेही आपले अर्धशतक ६० चेंडूंत सील्सच्या चेंडूवर पूर्ण केले. हेडन वॉल्शच्या गुगलीवर धवनने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करीत चेंडू हवेत फिरवला. पूरनने मिड-विकेटवर त्याचा झेल टिपण्यात कोणतीही चूक केली नाही. त्याने 74 चेंडूंत सात चौकार खेचले. या डावात वेस्ट इंडीजविरुद्ध 1000 धावा पूर्ण करणारा धवन जगातील 22 वा फलंदाज ठरला. सामना पुन्हा सुरू झाला तेव्हा वॉल्शच्या पहिल्याच षटकात गिल आणि अय्यरने षटकार ठोकला. गिलने सील्सवर लागोपाठ दोन चौकार मारले तर अय्यरने होल्डर आणि अकिल हुसेन (43 धावांत 1 बळी) यांना चौकार लगावला. अय्यर मात्र हुसेनच्या चेंडूवर पॉलकडे झेल देऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने 34 चेंडूंचा सामना करत चार चौकार आणि एक षटकार लगावला. सहा चेंडूंत आठ धावा करून सूर्यकुमार यादव हा वॉल्शचा दुसरा बळी ठरला. त्यानंतर काही वेळातच पुन्हा पावसाने हजेरी लावली. भारतीय डाव तिथेच संपुष्टात आला.

युवा संघाने जोश दाखवला, आव्हानांचे संधीत रूपांतर केले : धवन

भारत- वेस्ट इंडीज क्रिकेट मालिका | वेस्ट इंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत कर्णधाराला हवी असलेली कामगिरी भारतीय खेळाडूंनी दाखवली आणि युवा खेळाडूंनी त्यांचा जोश दाखवत आव्हानांना संधींमध्ये बदलले, अशी भावना शिखर धवन याने व्यक्त केली. भारताने तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 3-0 असा विजय नोंदवत क्लीन स्वीप केला. धवन हा पहिला कर्णधार ठरला आहे, ज्याच्या नेतृत्वाखाली भारताने वेस्ट इंडीजला त्यांच्याच भूमीवर पराभूत केले. शुभमन गिलच्या नाबाद 98 धावांच्या जोरावर भारताने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात 119 धावांनी दणदणीत विजय नोंदवला. सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत धवन म्हणाला, “आम्ही संपूर्ण मालिकेत ज्या प्रकारे कामगिरी केली त्याबद्दल मला संघाचा अभिमान आहे. प्रत्येक सामन्यात आम्ही आमचा उत्साह दाखवला आणि आव्हानांना संधीत रूपांतरित केले. प्रत्येक खेळाडूने ज्या प्रकारे योगदान दिले आहे, त्यामुळे मी खूप आनंदी आहे. एक कर्णधार म्हणून मला ज्या प्रकारची कामगिरी हवी होती, ती खेळाडूंनी दाखवली, असेही तो म्हणाला. वेस्ट इंडीजविरुद्ध भारतीय फलंदाजांनी शानदार कामगिरी केली. गिल, धवन, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन आणि अक्षर पटेल यांनी उत्कृष्ट कामगिरी केली.

भारत- वेस्ट इंडीज क्रिकेट मालिका | धवन म्हणाला, “मी ज्याप्रकारे माझे शॉट्स खेळले, ते पाहता मी माझ्या फलंदाजीवर खूप समाधानी आहे. इतक्या अनुभवानंतर मला शांतपणे कसे खेळायचे हे कळते. जेव्हा मी शांत मनाने दबाव झेलतो, तेव्हा मला ते आवडते.” “संघाच्या बाबतीत आमच्यासाठी सर्व काही सकारात्मक आहे. प्रत्येकाने फलंदाजीत योगदान दिले. गिल, श्रेयस अय्यर, संजू, अक्षर या सर्वांनी चांगली फलंदाजी केली. बॅटिंग युनिटसाठी हे खूप चांगले लक्षण आहे. सर्व तरुण आहेत आणि त्यांनी प्रत्येक सामन्यात आपले कर्तव्य चोख बजावले आहे. धवन म्हणाला, “मोहम्मद सिराज, प्रशांत कृष्णा, शार्दूल ठाकूर आणि युझवेंद्र चहल हे गोलंदाजीत अनुभवी गोलंदाज आहेत. अक्षरनेही चांगली गोलंदाजी केली. दीपक हुडानेही चांगली गोलंदाजी केली. गोलंदाजी युनिटने सर्वोत्तम कामगिरी केली. तुमचे खेळाडू खेळाच्या दोन्ही विभागांत चांगली कामगिरी करीत आहेत हे पाहून आनंद झाला.

धवनने विशेषतः 22 वर्षीय गिलचे कौतुक केले आणि त्याच्या फलंदाजीच्या कौशल्याची रोहित शर्माशी तुलना केली. “त्याचे (गिल) तंत्र खूप चांगले आहे आणि तो एक उत्कृष्ट फलंदाज आहे. मला वाटतं, त्याच्यात रोहितची झलक आहे. त्याची फलंदाजी पाहता त्याच्याकडे भरपूर वेळ आहे. आज त्याने ९८ धावा केल्या हे पाहून आनंद झाला. अर्धशतकांचे मोठ्या धावसंख्येमध्ये रूपांतर कसे करायचे हे त्याला माहीत आहे. कर्णधाराने सिराज आणि अष्टपैलू दीपक हुड्डा यांच्या गोलंदाजीचेही कौतुक केले. धवन म्हणाला, “सिराज हा उत्तम गोलंदाज आहे. त्याचा आत्मविश्वास खूप वाढला आहे. त्याला काय करायचे ते माहीत आहे. तो स्वतःला प्रेरित करतो, ज्यामुळे कर्णधार म्हणून तुमचे काम सोपे होते. खेळाडूंना त्यांची जबाबदारी समजली, की कर्णधाराचे काम सोपे होते. “दीपक अष्टपैलू खेळाडूची भूमिका बजावू शकतो हे मला मालिकेपूर्वीच माहीत होते आणि पहिल्या सामन्यात त्याने ज्याप्रकारे कामगिरी केली त्यामुळे त्याला गोलंदाज म्हणून आत्मविश्वास मिळाला. तो केवळ डाव्या हाताच्या फलंदाजांनाच नव्हे तर उजव्या हाताच्या फलंदाजांनाही चांगली गोलंदाजी करतो.

युवा भारतीय संघासाठी चांगले संकेत : द्रविड

भारत- वेस्ट इंडीज क्रिकेट मालिका | एकदिवसीय मालिकेत वेस्ट इंडीजला 3-0 ने पराभूत करणाऱ्या भारतीय युवा संघाच्या ‘व्यावसायिकते’चे कौतुक केले. हे भारतीय युवा संघासाठी चांगले संकेत असल्याचे कौतुक प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी व्यक्त केले. शिखर धवन हा पहिला भारतीय कर्णधार ठरला, ज्याच्या नेतृत्वाखाली संघाने त्यांच्याच भूमीत वेस्ट इंडीजचा सुपडासाफ केला. द्रविडने शेवटच्या एकदिवसीय सामन्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये सांगितले, की “आम्ही येथे एका तरुण संघासह आलो. इंग्लंडमध्ये मालिका खेळणारे बहुतेक खेळाडू इथे नव्हते, पण तुम्ही सर्वांनी चांगली कामगिरी केली. तिन्ही सामन्यांमध्ये उत्तम व्यावसायिकता दाखवली. काही सामने जवळचे होते आणि असे सामने जिंकणे हे युवा संघासाठी चांगले लक्षण आहे, असे तो म्हणाला. कर्णधार धवनचे कौतुक करताना द्रविड म्हणाला, “शिखरने चांगले नेतृत्व केले. उत्तम कामगिरीबद्दल तुम्हा सर्वांचे अभिनंदन.”

युवा संघ पुढे जाऊन अधिक यश मिळवू शकतो, असे धवन म्हणाला. “आम्ही सपोर्ट स्टाफ आणि सर्व टीम सदस्यांचे आभार मानतो. तुमच्या सहकार्याबद्दल आभारी आहे. गोलंदाज आणि फलंदाज दोघांनीही चांगली कामगिरी केली,” असे धवन म्हणाला. तो म्हणाला, “हा संघ खूप तरुण आहे आणि त्याने यशाच्या दिशेने एक पाऊल टाकले आहे. तुम्हा सर्वांना खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे.” धवन शेवटी म्हणाला, “आम्ही कोण आहोत?- चॅम्पियन्स.”

पहिल्या दोन सामन्यांमध्ये मी ज्या प्रकारे बाद झालो त्यामुळे निराश होतो : गिल

भारत- वेस्ट इंडीज क्रिकेट मालिका | शुभमन गिल पहिल्या आंतरराष्ट्रीय शतकापासून वंचित राहिला असला तरी त्याला आनंद आहे की त्याने आपल्या चांगल्या सुरुवातीचे मोठ्या धावसंख्येमध्ये रूपांतर केले. ही कामगिरी तो पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये करू शकला नव्हता. वेस्ट इंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांत गिल 64 आणि 43 धावांवर बाद झाला. तो ज्या पद्धतीने बाद झाला त्याबद्दल त्याने निराशा व्यक्त केली. पावसाने प्रभावित झालेल्या तिसऱ्या सामन्यात 98 धावांवर नाबाद राहिलेल्या गिलने सांगितले, की “पहिल्या दोन सामन्यांमध्ये मी ज्या प्रकारे बाद झालो, त्यामुळे मी निराश झालो. गेल्या सामन्यात मी स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न करीत होतो. पावसाच्या शेवटच्या व्यत्ययापूर्वी मला फक्त एक षटक हवे होते.” कारकिर्दीतील सर्वोच्च धावसंख्या करणाऱ्या गिलने सांगितले, की आणखी एक षटक मिळाले असते तर नक्कीच शतक पूर्ण केले असते. या सामन्यानंतर गिल म्हणाला, की मला शतक झळकावण्याची आशा होती; पण पाऊस आला आणि या गोष्टी माझ्या हातात नव्हत्या. मात्र, मी माझ्या खेळीवर खूश आहे. तिन्ही सामन्यांमध्ये विकेट खूपच चांगली होती.

वनडे रँकिंगमध्ये भारत तिसऱ्या स्थानी कायम

दुबई : भारताने वेस्ट इंडीजला त्यांच्याच भूमीत तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 3-0 असे पराभूत केले. त्यामुळे पुरुषांच्या एकदिवसीय संघाच्या रँकिंगमध्ये भारताने तिसरे स्थान कायम राखले आहे. अनेक दिग्गज खेळाडूंच्या गैरहजेरीत शिखर धवन याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने उत्तम कामगिरी करीत वेस्ट इंडीजला क्लीन स्वीप दिला. भारताने तिसऱ्या वनडे सामन्यात 119 धावांनी दणदणीत विजय मिळवला होता. त्यामुळे भारताचे गुणांकन 110 वर पोहोचले आहे. भारत आता चौथ्या स्थानावरील पाकिस्तानपेक्षा (106 गुण) चार गुणांनी पुढे आहे. भारताने 2022 मध्ये दक्षिण आफ्रिकेला त्यांच्याच भूमीत पराभूत केले होते. अशा प्रकारे भारताने गेल्या नऊ वनडे सामन्यांत आठ सामने जिंकले आहेत. न्यूझीलंड वनडे रँकिंगमध्ये अव्वल स्थानी आहे. त्यांचे 128 गुण आहेत. त्या खालोखाल 119 गुणांसह इंग्लंड दुसऱ्या स्थानी आहे.

पाचव्यांदा विजेता- 19 वर्षांखालील क्रिकेट वर्ल्डकप भारताने असा जिंकला

[jnews_block_9 first_title=”हेही वाचा..” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”65″]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!