All SportsCricketsports rules

टी-20 मध्ये ‘इम्पॅक्ट प्लेअर’ कसा काम करणार?

टी-20 मध्ये ‘इम्पॅक्ट प्लेअर’ कसा काम करणार?

टी-20 नवा नियम लागू होणार असून, ‘इम्पॅक्ट प्लेअर’ म्हणून हा नियम असेल. मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धेपासून प्रायोगिक तत्त्वावर हा नियम लागू होणार आहे. जर हा नियम यशस्वी ठरला तर तो 2023 मधील आयपीएलमध्ये अमलात आणला जाईल.

क्रिकेटला रोमांचक, मनोरंजक करण्यासाठी अनेक बदल करण्यात येत आहेत. व्यावसायिक स्तरावर काही बदल यशस्वी ठरले तर काही बदल न रुचल्याने मागे घेण्यात आले आहेत. असाच एक नियम टी-20 क्रिकेट स्पर्धेतही येत असून, तो म्हणजे ‘इम्पॅक्ट प्लेअर’. 11 ऑक्टोबर 2022 पासून होणाऱ्या सईद मुश्ताक अली राष्ट्रीय टी-20 क्रिकेट स्पर्धेद्वारे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) ‘इम्पॅक्ट प्लेअर’ ही नवी संकल्पना प्रायोगिक तत्त्वावर आणण्याची शक्यता 17 सप्टेंबर 2022 रोजी सूत्रांकडून वर्तवण्यात आली आहे. सध्या लोकप्रिय असलेला टी-20 क्रिकेट हा प्रकार अधिक आकर्षक, गतिमान आणि मनोरंजक करण्यासाठी बीसीसीआयने हे पाऊल उचलले असले तरी त्याचा किती इम्पॅक्ट होईल हे आताच सांगता येणार नाही. कारण यापूर्वी आयसीसीने याच धर्तीवर ‘सुपर सब’ हा नियम अमलात आणला होता. मात्र, टीका झाल्यानंतर तो मागे घेण्यात आला आहे. बीसीसीआयने याच नियमाचे काहीसे सुधारित रूप आणले आहे.

‘इम्पॅक्ट प्लेअर’ या नियमाबाबत बीसीसीआयने सर्व राज्यांतील क्रिकेट संघटनांना ई-मेलही धाडला आहे. या ई-मेलमधून ‘इम्पॅक्ट प्लेअर’ संकल्पना स्पष्ट करून सांगण्यात आली आहे. ‘ईएसपीएन क्रिकइन्फो’ या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार बीसीसीआय गेल्या काही वर्षांपासून ही संकल्पना राबविण्याच्या विचारात होती. इंडियन प्रीमियर लीग टी-20 स्पर्धेत सर्वप्रथम ‘इम्पॅक्ट प्लेअर’ आणण्याचा बीसीसीआयचा मानस होता. मात्र, ही संकल्पना मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येणार आहे. 2023 पासून ‘इम्पॅक्ट प्लेअर’ आयपीएल क्रिकेट स्पर्धेत ‘पदार्पण’ करेल, असेही समजते. ‘टी-20 क्रिकेटची लोकप्रियता दिवसागणिक वाढत आहेच. यात थोडे नावीन्य आणले तर प्रेक्षकांसह भाग घेणाऱ्या संघांनाही आवडेल. शिवाय डावपेचांचे नियोजन अन् अंमलबजावणी करतानाही नावीन्य येईल’, असे संबंधित सूत्राने सांगितले. हा नियम यशस्वी झाला तर तो 2023 मध्ये अमलात आणला जाणार आहे.

काय आहे ‘इम्पॅक्ट प्लेअर’ संकल्पना?

  • एक खेळाडू बदलण्याची संधी : निवडण्यात आलेल्या संघातील अंतिम अकरा खेळाडूंमध्ये सामन्यातील स्थितीनुसार प्रत्येक संघाला एक खेळाडू बदलण्याची संधी मिळेल.
  • राखीव खेळाडूला मिळणार संधी : प्रत्येक संघाचा कर्णधार नाणेफेकीला येताना आपल्या अंतिम अकरा खेळाडूंसह चार राखीव खेळाडूंची नावे आताही देतोच. आता या चार राखीव खेळाडूंपैकी एकाला ऐन सामन्यात अंतिम अकरामध्ये खेळण्याची संधी मिळेल.
  • 14 षटकांपूर्वीच घ्यावा लागणार निर्णय : हा बदल 14 व्या षटकांपूर्वीच अमलात आणणे अनिवार्य आहे. अंतिम अकरामध्ये दाखल झालेला ‘इम्पॅक्ट प्लेअर’ त्याच्या वाट्याला येणारी पूर्ण षटके गोलंदाजी आणि फलंदाजी करू शकेल.
  • फलंदाजी किंवा गोलंदाजी करता येईल : ‘इम्पॅक्ट प्लेअर या संकल्पनेचा वापर डावपेचाच्या अनुषंगाने करायचा आहे. हा खेळाडू संघात कोणतीही भूमिका पार पाडू शकतो. उदाहरणार्थ बाद झालेल्या फलंदाजाऐवजीही नवा फलंदाज ‘इम्पॅक्ट खेळाडू’ म्हणून संघात येऊ शकतो. अर्थात संघातील अंतिम खेळाडूंची संख्या अकराच असेल.
  • आधीच्या खेळाडूला सामना पूर्ण करता येणार नाही… : हा ‘इम्पॅक्ट खेळाडू’ एखाद्या गोलंदाजाऐवजी संघात आला, तर तो नव्याने आपल्या कोट्यातील चार षटके मारा करू शकतो. मात्र, ज्या फलंदाजाच्या किंवा गोलंदाजाच्या जागेवर हा बदल होईल, त्या फलंदाजाला किंवा गोलंदाजाला पुन्हा सामना पूर्ण करता येणार नाही. म्हणजे त्याची त्याच क्षणी सामन्यातली भूमिका संपेल.

नाणेफेकीचा कौल फिका पडणार

खेळपट्टी पाहून नाणेफेकीचा कौल निश्चित केला जातो. त्यामुळे नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा मानला जातो. मात्र, ‘इम्पॅक्ट खेळाडू’ संकल्पनेमुळे नाणेफेकीचा कौल फिका पडण्याची शक्यता आहे. किंबहुना नाणेफेकीचा परिणाम कमी करण्यासाठीच ‘इम्पॅक्ट प्लेअर’ संकल्पना आणली आहे. नाणेफेक गमावल्यावर एखाद्या संघावर दुसऱ्या डावात गोलंदाजी करण्याची वेळ येते. त्या कालावधीत दवाचा परिणाम जाणवतो अन् गोलंदाजी करणे जिकिरीचे होऊन बसते. या वेळी ‘इम्पॅक प्लेअर’ही संकल्पना उपयुक्त ठरू शकते. दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघांना बऱ्याचदा आव्हानात्मक फिरकी गोलंदाजीस तोंड द्यावे लागते. अशा वेळी ही संकल्पना बुडत्या संघास मदतीचा हात देऊ शकेल. काही वेळी खेळाडूदेखील जायबंदी होतात. अशा वेळीदेखील ही संकल्पना फायदेशीर ठरेल. अर्थात, 14 षटकांच्या आतच जायबंदी खेळाडूवर ही मात्रा काम करणार आहे.

मैदानात केव्हा उतरणार ‘इम्पॅक्ट खेळाडू’?

  • 20 पेक्षा कमी षटकांच्या सामन्यातही नियमाची अंमलबजावणी : पावसाच्या व्यत्ययाने किंवा आणखी कोणत्याही कारणाने सामन्यातील षटके कमी झाली तरी ‘इम्पॅक्ट प्लेअर’ ही संकल्पना अमलात येऊ शकते. मात्र, एका डावात किमान दहा षटकांचा खेळ होणे अपेक्षित आहे.
  • 13 व्या षटकातही ‘इम्पॅक्ट प्लेअर’ : लढत 17 षटकांची झाली, तर ‘इम्पॅक्ट प्लेअर’ 13 व्या षटकाच्या अखेरपर्यंत मैदानात येऊ शकतो. सामना 11 षटकांचा झाला, तर ‘इम्पॅक्ट प्लेअर’ नवव्या षटकाच्या अखेरपर्यंत मैदानात येऊ शकतो.
  • …तरीदेखील ‘इम्पॅक्ट प्लेअर’चा अवलंब : लढत ठरल्याप्रमाणे सुरू झाली; पण प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने दहा षटके फलंदाजी केल्यावर सामन्यात अडथळा आला तरीदेखील ‘इम्पॅक्ट प्लेअर’चा अवलंब होऊ शकतो.
  • दहापेक्षा कमी षटकांच्या खेळातही नियम : टी-20 लढत सुरू झाल्यानंतर पहिल्या डावात एका संघाने ‘इम्पॅक्ट प्लेअर’चा फायदा घेतला अन् दुसऱ्या डावात अडथळा आल्याने दहापेक्षाही कमी षटकांचा खेळ करण्याचे ठरले तरी ‘इम्पॅक्ट प्लेअर’ घेता येणार आहे. अशा नऊ षटकांच्या लढतीत सातवे षटक संपण्याआधी हा खेळाडू मैदानात येऊ शकेल अन् अशीच लढत फक्त पाच षटकांची झाली तरी तिसऱ्या षटकाआधी ‘इम्पॅक्ट प्लेअर’ मैदानात येऊ शकेल.
  • षटक सुरू असताना हे आहेत अपवाद…. : ‘इम्पॅक्ट प्लेअर’ षटक आटोपल्यानंतरच मैदानात येईल. षटक सुरू असताना हा खेळाडू मैदानात येऊ शकत नाही. याला दोन परिस्थितींचा अपवाद असेल. पहिला अपवाद- फलंदाज बाद झाल्यावर… अन् दुसरा अपवाद- खेळाडू जायबंदी झाल्यावर.
  • गोलंदाज निलंबित झाल्यास ‘इम्पॅक्ट प्लेअर’ला संधी : एकाच षटकांत दोन ‘बीमर’ टाकल्यास गोलंदाजाचे निलंबन होते. अशा गोलंदाजास ‘इम्पॅक्ट प्लेअर’शी बदलता येईल. मात्र, मैदानात आलेला ‘इम्पॅक्ट प्लेअर’ त्या वेळी लगेच गोलंदाजी करू शकणार नाही.

17 वर्षांपूर्वी झाला होता हा प्रयोग

तसं पाहिलं तर हा काही नवा नियम नाही. यापूर्वी 2005 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) सब्स्टिट्यूटचा नियम आजमावून पाहिला आहे. त्या वेळी हा नियमाला ‘सुपर सब’ असे नाव होते. या नियमानुसार, बाद झालेल्या फलंदाजाच्या जागेवर ‘सुपर सब’ला मैदानात उतरवले जात होते. मात्र, या ‘सुपर सब’ला फलंदाजी करण्याचा अधिकार नव्हता. हाच नियम गोलंदाजीतही होता. गोलंदाजाच्या जागेवर तर खेळवले जात होते. मात्र, गोलंदाजीच्या कोट्यातील षटके मात्र ‘सुपर सब’ला टाकता येत नव्हती. त्यामुळे ‘सुपर सब’ खेळवायचाच कशासाठी, असाही प्रश्न उपस्थित होत होता. या नियमावर बरीच टीकाही झाली. त्यानंतर हा नियम मागे घ्यावा लागला होता. आता याच नियमात बदल करीत ‘इम्पॅक्ट प्लेअर’ ही संकल्पना बीसीसीआयने आणली आहे. या नियमाचा किती इॅम्पॅक्ट होतो, हे समजेलच.

‘बिग बॅश’मध्ये आहे ‘एक्स फॅक्टर’चा नियम

ऑस्ट्रेलियात आयपीएलच्या धर्तीवरच बिग बॅश ही टी-20 लीग स्पर्धा खेळवली जाते. या स्पर्धेत असाच काहीसा नियम आहे. त्याला ‘एक्स-फॅक्टर’ असे म्हंटले जाते. या नियमानुसार प्रत्येक संघाला पहिल्या डावातील 10 व्या षटकापूर्वी 12 व्या किंवा 13 व्या खेळाडूला अंतिम अकरामध्ये खेळवण्यात येते. मात्र, ज्या फलंदाजाच्या जागेवर एक्स फॅक्टर खेळेल, त्या फलंदाजाने फलंदाजी केलेली नसावी. तसेच ज्या गोलंदाजा जागेवर एक्स फॅक्टर खेळणार असेल, त्या गोलंदाजाने एकापेक्षा जास्त षटके गोलंदाजी केलेली नसावी. तरच एक्स फॅक्टरचा नियम अमलात येईल.

[jnews_block_13 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”65″]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!