All SportsEnvironmentalsports news

आशियात चित्ता नामशेष का झाला?

आशियात चित्ता नामशेष का झाला?

आशियामध्ये तर चित्त्यांची प्रजाती नामशेषच झाली. अपवाद फक्त इराणचा म्हणावा लागेल. इराणमध्ये चित्त्याच्या संरक्षणासाठी अनेक उद्याने आहेत. त्यांची विशेष काळजीही घेतली जाते. भारतात 70 वर्षांपासून चित्ता नामशेष आहे. आता इराणनंतर भारताने चित्त्यांच्या संरक्षणासाठी पुढाकार घेतला आहे. 17 सप्टेंबर 2022 रोजी आफ्रिकेतील नामीबियातून भारतात 8 चित्ते आणण्यात आले. हे चित्ते मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय अभयारण्यात सोडण्यात आले. यात पाच माद्या, तर तीन नर चित्त्यांचा समावेश आहे. त्यामुळे भारतात 70 वर्षांनी पुन्हा चित्त्यांची म्याव म्याव ऐकायला मिळणार आहे. त्या निमित्त जगभरातील चित्त्यांवर टाकलेला प्रकाश….

चित्ता नामशेष होण्याची वेगवेगळी कारणे आहेत. शिकार हे त्यामागील प्रमुख कारण आहे. भौतिक विकासामुळे चित्त्याची अधिवासाची स्थाने धोक्यात आल्यानेही चित्ता नामशेष झाला आहे. केवळ इराणमध्ये चित्त्यासाठी ठोस पावले उचलली गेली. अन्यत्र आलबेलच आहे. आता भारतात चित्त्याचं अस्तित्व टिकून राहील अशी अपेक्षा करूया.

  • 6,500 ते 7,100 : धोक्यात असलेल्या प्राण्यांच्या यादीत, जगातील चित्त्यांची संख्या 6,500- 7100 पर्यंत आहे. (सोर्स- इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचर)
  • 91% : आफ्रिकेतून चित्ते 90 टक्क्यांपेक्षा अधिक लुप्त. इराणचा अपवाद वगळता आशियातून तर चित्ते जवळजवळ नामशेष.
  • 1952 : भारतात सन 1952 मध्ये चित्त्यांची प्रजाती नामशेष झाल्याची घोषणा, आता 2022 मध्ये आठ चित्त्यांना नामीबियातून भारतात आणण्यात आले आहे.
  • 79% : चित्त्यांच्या एकूण संख्येत 100 किंवा त्यापेक्षा कमी एकल चित्त्यांचे प्रमाण 79 टक्क्यांपर्यंत आहे.

चित्ता नामशेष होण्याची तीन कारणे

  1. पशुधनावर हल्ले होतात म्हणून शेतकऱ्यांच्या हल्ल्यात चित्त्यांची हानी. वास्तविक चित्त्यांकडून पशुधनाचे नुकसान तुलनेने कमी आहे.
  2. मानवाकडून होणारी शिकार आणि शेती व इतर कारणांसाठी जमिनीचा विकास यामुळे चित्त्यांवर गंभीर परिणाम.
  3. आफ्रिकेच्या काही भागात कातडीसाठी शिकार होत असल्याने चित्त्यांच्या संख्येत घट. तसेच बछडे आणि प्रौढ चित्त्यांचा बेकायदेशीर व्यापार हेही एक कारण आहे. या बेकायदेशीर व्यापारात वाहतुकीदरम्यान चित्त्यांचा मोठ्या प्रमाणावर मृत्यू होतो.

चित्त्याच्या संवर्धनासाठी काय आहेत प्रयत्न?

  • चित्ता संरक्षण : 1 जुलै 1975 पासून चित्त्याला वन्यजीव आणि लुप्तप्राय प्रजातींंच्या आंतरराष्ट्रीय व्यापारापासून परिशिष्ट I नुसार संरक्षित करण्यात आले आहे. म्हणजे वन्यस्रोत असलेल्या चित्त्याच्या व्यावसायिक आंतरराष्ट्रीय व्यापाराला प्रतिबंध आहे.
  • मानव- वन्यजीव संघर्ष कमी करणे : चित्त्यांची त्यांच्या संपूर्ण रेंजमध्ये कमी घनता म्हणजे त्यांना अशा प्रमाणात संवर्धनात्मक कृतीची आवश्यकता आहे. ही कृती क्वचितच स्थलीय संवर्धनामध्ये दिसून येते. या संवर्धनात सीमेपलीकडून सहकार्य, अधिवास कनेक्टिव्हिटी राखण्यासाठी मोठ्या लँडस्केपमध्ये जमिनीच्या वापराचे नियोजन आणि मानव- वन्यजीव संघर्ष कमी करणे समाविष्ट आहे. बहुतांश चित्ता श्रेणी (76%) असुरक्षित जमिनीवर आहे, जिथे पशुधनावरील हल्ल्याचा बदला म्हणून त्यांचा छळ केला जातो.
  • राष्ट्रीय संवर्धन कृती नियोजन : आफ्रिकेमध्ये, जवळपास सर्व रेंजमधील राज्ये चित्ता आणि आफ्रिकन जंगली कुत्र्यांसाठी (RWCP) रेंज वाइड कंझर्व्हेशन प्रोग्राममध्ये सक्रिय सहभागी आहेत. प्रादेशिक फ्रेमवर्क प्रदान करण्याबरोबरच, या धोरणांमध्ये राष्ट्रीय संवर्धन कृती नियोजनासाठी एक फ्रेमवर्कदेखील उपलब्ध करण्यात आली आहे.
  • स्थळ-आधारित संवर्धन : दक्षिण आणि पूर्व आफ्रिकेत वेगवेगळे प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. हे प्रकल्प चित्त्यांच्या संरक्षण व संशोधनासाठीच आहेत. यापैकी बरेच प्रकल्प चित्त्यासाठी लाभदायी असून, त्यावर महत्त्वाच्या स्थळ-आधारित संवर्धनाचे उपक्रम राबवले जातात. काही राष्ट्रीय वन्यजीव प्राधिकरणांच्या क्षमता विकासासाठी समर्थनदेखील देतात.
  • इराणमधील चित्ता संरक्षण उपक्रम : इराणमध्ये आशियाई चित्ता सुरक्षित आहे. या प्रजातीसाठी अनेक संरक्षक क्षेत्रे आहेत. त्यात मुख्यत्वे कविर राष्ट्रीय उद्यान, खार तौरन राष्ट्रीय उद्यान, नायबंदन वन्यजीव अभयारण्य, बाफग (Bafgh) संरक्षक क्षेत्र आणि डार अंजीर वन्यजीव अभयारण्यांचा समावेश आहे.

चित्त्याविषयी हे माहिती आहे काय?

  • चित्त्याची लांबी : पूर्ण विकसित असलेल्या चित्त्याची डोक्यापासून लांबी 3 ते 7 फूट असते, तर वजन 21 ते 72 किलो असते.
  • चित्त्याचे काळ्या अश्रूंचे डोळे : चित्त्याच्या नारिंगी केसांवर काळ्या ठिपके असतात. डोळ्यांतून काळी रेघ असते, जिला “काळे अश्रू” म्हंटले जाते. शास्त्रज्ञांच्या मते, हे “काळे अश्रू” चित्त्याला आफ्रिकेतील तीव्र सूर्यप्रकाशापासून बचाव करतात. तसेच त्यांना लांबचे दिसण्यास मदत करतात.
  • शिकारीसाठी चित्ता दिवसा सक्रिय : चित्ता दिवसा सक्रिय राहणारा प्राणी आहे. दिवसा सक्रिय राहण्यामागचे महत्त्वाचे कारण आहे. आफ्रिकेत बहुतांश प्राणी रात्री शिकार करतात. चित्ता इतर आफ्रिकन मार्जार शिकारी प्राण्यांपेक्षा तुलनेने दुबळा आहे. इतर प्राणी सहजपणे त्याची शिकार पळवू शकतात. दिवसा मात्र शिकार गमावण्याची शक्यता फार कमी असते.
  • चित्त्याला या प्राण्यांपासून धोका : चित्ता विविध प्राण्यांची शिकार करतो. रानडुक्कर, ससा, तितर, हरिण, काळवीट, सायाळ, घोडा, शहामृग यांची शिकार करतो. मात्र, सिंह, लांडगे, बिबट्यांपासून चित्त्याला धोका असतो.
  • पाणी पिण्याची अजब सवय : चित्ता शिकार केलेल्या अन्नातून पाणी शोषून घेतो. त्यामुळे तो तीनचार दिवसांआड पाणी पितो.
  • पृथ्वीतलावरील सर्वांत वेगवान प्राणी : चित्ता पृथ्वीतलावरील सर्वांत वेगवान प्राणी आहे. तो 70 मैल प्रतितास वेगाने धावतो. म्हणजे ताशी 90 ते 120 किलोमीटर धावू शकतो. तो तीन सेकंदांत शून्य ते 60 मैल प्रतितासाचा वेग पकडू शकतो. हा वेग घोड्याच्या दुप्पट आहे.
  • वेगवान असला तरी लवकर थकतो : चित्ता वेगवान असला तरी तो जास्त वेळ धावू शकत नाही. 365 ते 550 मीटर धावल्यानंतर त्याला विश्रांतीची गरज भासते. थोडक्यात म्हणजे तो लवकर थकतो. कारण वेगाने धावण्यासाठी जास्त ऊर्जेची गरज लागते. तापमान अधिक असल्याने जास्त वेळ धावणे शक्य होत नाही. जर चित्त्याने पाठलाग करून एखादी शिकार पकडली तर तो आधी आराम करेल.
  • झाडावर चढण्यात सराईत नाही : चित्ता इतर मांजरांइतका सराईतपणे झाडावर चढू शकत नाही. विशेष म्हणजे हा एकमात्र मार्जार प्राणी आहे, जो डरकाळी फोडत नाही. मात्र तो गुरगुरू शकतो, घोरू शकतो.
  • मादी चित्ता एकान्तप्रिय : मादी चित्ता एकान्तप्रिय असते. मात्र, नर चित्ता छोट्या समूहांत राहतात, जे त्याचेच भाऊ असतात. साधारणपणे समूहातला एकच भाऊ विणीच्या हंगामात मादीशी संबंध ठेवतो. चित्ता शुष्क मोसमात मादीशी संबंध ठेवतो. मादीची गर्भावस्था तीन महिन्यांपर्यंत असते. पावसाळ्याच्या सुरुवातीला ती बछड्यांना जन्म देते. हा काळ शिकार मिळण्यासाठी सोपा असतो.
  • बछड्यांचा मृत्यूदर 90%. : मादी केवळ 140 ते 283 ग्रॅम वजनाच्या 3 ते 5 बछड्यांना जन्माला घालते. बछडे पहिला आठवडा आईच्या दुधावरच असतात. हा काळ महत्त्वपूर्ण असतो. कारण शिकारीसाठी आईला बछड्यांना सोडून जावेच लागते. बछड्यांचा मृत्यूदर जास्त आहे. जवळपास 90%.
  • चित्त्यांची आयुमर्यादा : पाच ते सहा आठवड्यांनी बछडे आईसोबत शिकारीला जातात. जवळपास दीड वर्षाची होईपर्यंत बछडे आईसोबतच राहतात. जंगलातील चित्त्यांची आयुमर्यादा 14 वर्षांपर्यंत, पिंजऱ्यातील चित्त्यांची आयुमर्यादा 20 वर्षांपर्यंत असते.
  • चित्ता बिबट्याच्या श्रेणीत नाही : सिंह, वाघ, बिबट आणि जग्वार यांसारखे मोठ्या मार्जार प्राण्यांच्या श्रेणीत मोडतात. कारण ते डरकाळी फोडतात. शास्त्रज्ञांच्या मते, चित्ता मात्र या गटात समाविष्ट होत नाही. कारण तो डरकाळी फोडत नाही.
[jnews_element_embedplaylist playlist=”https://www.youtube.com/watch?v=kTny1iFuTh0″ column_width=”4″]

#चित्ता_नामशेष #चित्ता नामशेष_का_झाला #चित्ता

 

 

[jnews_block_8 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”1636″]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!