रॉजर फेडरर- ‘फेडएक्स’चा प्रवास थांबला…
महान टेनिसपटू रॉजर फेडरर याने 15 सप्टेंबर 2022 रोजी निवृत्तीची घोषणा केली. त्याची निवृत्ती अनपेक्षित नव्हती, पण अपेक्षितही नव्हती. वयाच्या चाळिशीनंतरही त्याचा फॉर्म अगदीच काही ढासळलेला नव्हता. तीच चपळता, तोच जोश… त्यामुळे इतक्यात काही तो निवृत्त होण्याची चिन्हे नव्हती. मात्र, या स्विस वस्तादाने थांबण्याचा निर्णय घेतला. ‘फेडएक्स’ या टोपणनावाने ओळखला जाणारा रॉजर फेडरर अखेरची लेव्हर कप स्पर्धा खेळेल. त्यानंतर तो पुन्हा कोर्टवर दिसणार नाही. मात्र, त्याच्या आठवणी सतत जाणवत राहतील…
आपल्या निष्णात खेळामुळे ‘फेडएक्स’चं क्रीडाविश्वावर गारूड होतं. साधारणपणे कोणताही खेळाडू वयाच्या पस्तिशीपर्यंत खेळत असतो. मात्र, लिएंडर पेससारखे बोटावर मोजण्याइतके काही खेळाडू अपवादात्मक असतात. त्यापैकी रॉजर फेडरर एक. वयाची चाळिशी ओलांडल्यानंतरही टेनिसमध्ये अंतिम फेरी गाठणारा रॉजर फेडरर हार मानणारा खेळाडू नव्हताच. मात्र, कुठे थांबायचं, याचा अंदाज खेळाडूलाच असतो. रॉजर फेडररला तो अंदाज आला. लेव्हर कप टेनिस स्पर्धेनंतर त्याने अखेर स्पर्धात्मक टेनिसचा निरोप घेण्याचा निर्णय घेतला.
‘फेडएक्स’च्या निवृत्तीने टेनिसमधील एका युगाचा अखेर होईल. कारण गेल्याच आठवड्यात त्याच्या पिढीतील सेरेना विल्यम्सनेही अमेरिकन ग्रँडस्लॅम स्पर्धेद्वारे निवृत्तीचे स्पष्ट संकेत दिले आहेत. 2021 च्या विम्बल्डन स्पर्धेनंतर फेडरर टेनिस कोर्टवर परतला नाही. 41 वर्षीय फेडररने 20 ग्रँडस्लॅम किताब जिंकले आहेत.
विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या सेंटर कोर्टला जुलै 2022 मध्ये शंभर वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्त या ग्रँडस्लॅम स्पर्धेने हयात असलेल्या आपल्या सगळ्या विजेत्या टेनिसपटूंना निमंत्रित करण्यात आले होते. ही स्पर्धा आठ वेळा जिंकणारा रॉजर फेडररही या निमंत्रितांमध्ये होताच. पायाच्या दुखापतीवर उपचार घेत असल्याने त्याने 2022 या मोसमातल्या विम्बल्डन स्पर्धेत भाग न घेण्याचा निर्णय घेतला होता. जगभरातील निमंत्रितांमध्ये रॉजर फेडरर याने आवर्जून नमूद केले, की ‘मला या विम्बल्डन स्पर्धेच्या कोर्टवर पुन्हा खेळण्याची आस आहे.’ त्याच वेळी आपण स्विस इंडोअर स्पर्धेत खेळणार असल्याचेही फेडररने जाहीर केले होते. मात्र दुखापतीतून सावरण्यासाठी लागणारा वेळ, वाढते वय यामुळे फेडररने स्पर्धात्मक टेनिस थांबविण्याचा निर्णय घेतला. तसे ट्वीट करीत फेडररने संपूर्ण जगापुढे निवृत्त होत असल्याचा निर्णय जाहीर केला. पुढील आठवड्यात रंगणारी लेव्हर कप स्पर्धा फेडररची अखेरची एटीपी स्पर्धा असेल. लेव्हर कप ही सांघिक स्पर्धा असून, या स्पर्धेचे आयोजन फेडररचीच व्यवस्थापन कंपनी करते.
सात जुलै 2021 रोजी फेडरर व्यावसायिक खेळाडू म्हणून अखेरच्या सामन्यात खेळला. विम्बल्डन स्पर्धेच्या सेंटर कोर्टवर झालेल्या या उपांत्यपूर्व लढतीत हुबर्ट हुर्काझकडून त्याला पराभवाचा सामना करावा लागला होता. या पराभवानंतर लगेचच फेडररच्या उजव्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर त्याच्या दुखऱ्या गुडघ्यावर तीन वेळा शस्त्रक्रिया झाली.
निरोप घेताना…
‘तुम्ही सगळेच (पाठीराखे, मीडिया) गेल्या तीन वर्षांतील माझा संघर्ष जाणता. गेल्या दीड वर्षांत दुखापती, शस्त्रक्रिया यांची आव्हाने समोर उभी ठाकली होती. आंतरराष्ट्रीय टेनिसमध्ये पुनरागमन करण्याचा मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न केला. मात्र मला माझ्या क्षमता, मर्यादा ठाऊक आहेत. मी स्वप्नातही विचार केला नव्हता, एवढे या खेळाने मला भरभरून दिले. मी आता 41 वर्षांचा झालो आहे. मलाही कळते की, कुठे थांबायचे आहे. पुढील आठवड्यात लंडनला रंगणारी लेव्हर कप ही स्पर्धा माझ्या कारकिर्दीतील अखेरची एटीपी स्पर्धा असेल. यापुढेही मी खूप टेनिस खेळणार आहे. मात्र ग्रँडस्लॅम किंवा एटीपी स्पर्धांमध्ये मी नसेन.’ निरोप घेण्यापूर्वी रॉजर फेडरर याची ही भावनिक पोस्ट टेनिसप्रेमींना सद्गदित करून गेली.
रॉजर फेडरर याची टेनिस कारकिर्दीतील कामगिरी
सेरेना म्हणाली, ‘निवृत्ती क्लबमध्ये स्वागत!’
‘फेडरर, तुझे निवृत्ती क्लबमध्ये स्वागत…!,’ अशा शब्दांत अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सने स्वित्झर्लंडचा महान टेनिसपटू रॉजर फेडरर याच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. निवृत्तीची घोषणा केल्यानंतर फेडररबद्दल अनेकांनी सोशल मीडियाद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या. वय हा केवळ आकडा आहे, हे फेडररने वेळोवेळी आपल्या खेळातून दाखवून दिले. यानंतर या वर्षीच्या विम्बल्डनमध्येही फेडररने पुनरागमनाची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे फेडरर तडकाफडकी निवृत्ती जाहीर करील, यावर कोणाचाही विश्वास नव्हता.
‘मला हे सांगण्याचा आणखी चांगला मार्ग हवा होता. मात्र, तू अचानक निवृत्तीचा निर्णय घेतला. अर्थात, तुझ्या कारकिर्दीप्रमाणे तू हे कामही लीलया पार पाडेल. मी नेहमीच तुझ्याकडे बघत आले आणि नेहमीच तुझे कौतुक वाटले. आपल्या वाटा नेहमीच सारख्या राहिल्या होत्या. तू अगणित, असंख्य लोकांना प्रेरणा दिली. अगदी माझ्यासह. तुझे हे योगदान आम्ही कधीच विसरू शकणार नाही. तुझे कौतुक आहेच. भविष्यात तू काय करणार, याची उत्सुकताही आहे. निवृत्त लोकांच्या क्लबमध्ये तुझे स्वागत आहे,’ अशी भावनिक पोस्ट सेरेनाने सोशल मीडियावर शेअर केली आहे. सेरेनानेही लवकरच निवृत्त होणार असल्याचे संकेत दिले आहेत. महिला एकेरीत सेरेनाच्या नावावर 23 ग्रँड स्लॅम विजेतीपदे आहेत.