FootballWomen Power

महिला खेळाडू असाल तर सावधान, तालिबान तुम्हाला सोडणार नाही!

हिला खेळाडूंनो, जाळून टाका तुमचं ते क्रीडासाहित्य, सोशल मीडियावरील प्रोफाइलही बंद करा! हे आवाहन आहे एका माजी फुटबॉलपटूचं. ही माजी फुटबॉलपटू आहे खलिदा पोपाल. अफगाणिस्तान फुटबॉल संघाची माजी कर्णधार असलेली खलिदा देशातील तालिबान राजवटीने अस्वस्थ झाली आहे. तिला माहीत आहे, की तालिबान राजवटीत महिला, तसेच खेळाडूंना स्वत:चं अस्तित्व नाही. जर त्यांना कळलं, की तुम्ही खेळाडू आहात, तुम्ही सोशल मीडियावर आहात, तर तालिबानी तुम्हाला जिवंत सोडणार नाही.

खलिदा सध्या डेन्मार्कमधील कोपेनहेगनमध्ये वास्तव्यास आहे. अफगाणिस्तानमध्ये जेव्हा तालिबानची राजवट आली, त्याच वेळी तिला महिला खेळाडूंच्या काळजीनं घेरलं. महिलांमध्ये तालिबानी दहशत भयंकरच आहे. खलिदाच्या आवाहनात ही दहशत स्पष्टपणे व्यक्त होते. खलिदा म्हणाली, “महिला खेळाडूंनी आपली खेळातली ओळख मिटविण्यासाठी तातडीने पहिलं पाऊल उचलावं.”

तालिबान दहशतवाद्यांना महिला खेळाडू, मुलींना मुक्तपणे खेळू दिले जाणार नाही, हे स्पष्टच आहे. महिला खेळाडू कशा पद्धतीने तिथे घुसमटत आहेत, हे खलिदाने अफगाणिस्तानात तालिबान राजवटीत अनुभवलेलं आहे. 

“आज मी तुम्हा सर्व महिला खेळाडूंना आवाहन करते, की तुमचं नाव मिटवा, ओळख मिटवा. सोशल मीडियावरील फोटोही हटवा. एवढंच नाही, तर खेळाच्या पोशाखासह तुमचं क्रीडासाहित्यही जाळून टाका.” खलिदाच्या या आवाहनात तालिबान्यांची किती दहशत आहे, याची प्रचीती येते.

एक कार्यकर्ती म्हणून महिलांच्या अस्तित्वासाठी लढणं, महिला फुटबॉल संघात खेळण्यासाठी धडपडणं, छातीवर खेळाचं प्रतीक लावून खेळणं, देशाचं प्रतिनिधित्व करण्याचा अभिमान बाळगणं यासाठी किती तरी प्रयत्न केले. मात्र, आता तुम्हाला तुमची ओळख मिटविण्यासाठी आवाहन करावं लागत आहे, हे जास्त वेदनादायी आहे, असं खलिदाला खेदाने म्हणावं लागत आहे.

देशातील सायकलिंग फेडरेशनलाही खलिदाने आवाहन केलं आहे, की महिला खेळाडूंना घरातच राहायला सांगा आणि सोशल मीडियावरील कोणतीही पोस्ट करण्यास रोखा, असंही खलिदा म्हणते.

“सध्या तरी महिला खेळाडू सुरक्षित आहेत. मात्र, काही महिन्यांनी, कदाचित एक किंवा दोन महिन्यांनी महिलांच्या जिवाची कोणतीही हमी देता येणार नाही. कारण तालिबान्यांचा कोणताही भरवसा नाही. त्यामुळे सायकल किंवा बाइक चालवण्याचं स्वातंत्र्य आता तुम्हाला नाही,  हे खलिदा अनुभवांती सांगते.

तालिबानने अवघ्या ४८ तासांत अफगाणिस्तानवर कब्जा मिळवला आहे. त्यामुळे महिलांना आता बाहेर पडण्याची कोणतीही संधी नाही. कोणालाही बाहेर पडता येत नाही. आठवडाभराने शेजारच्या देशात आश्रय घेण्याचा विचारही धूसर आहे. कारण विमानतळ बंद आहेत. प्रत्येक ठिकाणी दहशतवादी बंदूक घेऊन उभे आहेत.

अफगाणिस्तानची रोबोटिक टीमच्या मुलींनी प्रथमच काबूलमधून व्यावसायिक विमानाने कतार गाठलं होतं. अफगाण टेकची उद्योजक रोया मेहबूब यांना सध्या मुलींची काळजी वाटत आहे. ‘अफगाणी ड्रीमर्स’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या सर्व मुली 12 ते 18 वयोगटातील आहेत. गेल्या वर्षी कोविड-19 महामारीत त्यांनी कारच्या सुट्या भागांचा वापर करीत व्हेंटिलेटर बनवले होते. या सर्व मुली अफगाणिस्तानच्या पश्चिमेतील हेरत शहरातील आहेत.

मेहबूब म्हणाल्या, की काही मुली कतारला असून, तेथे त्या शिक्षण घेत आहेत, तर काही मुली अफगाणिस्तानात आहेत. शरियत कायद्यानुसार मुलींना शिक्षण देण्याची मुभा देण्याचे आश्वासन तालिबान्यांनी दिले आहे. मात्र, नेमके कशा पद्धतीने ते नियम लागू करतात, याकडे आमचे लक्ष लागले आहे.

1996 ते 2001 दरम्यान तालिबान्यांच्या राजवटीत महिलांना आणि मुलींना नोकरी आणि शिक्षणाच बंदी होती. एकट्यानेच खेळण्यास मुभा होती. बाहेर जाताना महिलांना बुरखा घालणे सक्तीचे, तसेच सोबत घरातलाच पुरुष असणे आवश्यक केले होते.

पोपाल म्हणाली, “भीतिदायक आहे सगळं. ते भयंकर चिंतेत आहे, भयावह वातावरणात आहेत. हे फक्त खेळाडूंबाबतच नाही, तर कार्यकर्त्यांबाबतही आहे. त्यांना सुरक्षितता नाही. तालिबानी भयंकर आहेत. अफगाणी नागरिकांना भीती वाटते, की कधीही, कोणत्याही क्षणी दरवाजावर ते दस्तक देतील.”

अफगाणिस्तानातील महिला सायकलिस्टवर अलीकडच्या काही वर्षांत हल्लेही झाले होते आणि अर्वाच्य शब्दांत शिवीगाळही झाली आहे. आता तालिबानी राजवट आल्याने ते सायकलीही काढून घेतील, अशी भीती या महिला सायकलिस्टने बोलून दाखवली.

खलिदा म्हणाली, “मी प्रार्थना करते, की त्या सर्व सुरक्षित असतील. जशी मी इथे (डेन्मार्क) सहजपणे सायकल चालवू शकते, तसं तिथेही मुक्तपणे त्या सायकल चालवू शकतील. अर्थात, हे शक्य नाही. मला खात्री आहे, की तालिबानी अजिबात महिलांना नोकरी, मुलींच्या शिक्षणास परवानगी देणार नाही. त्यामुळे सायकल चालविणे तर दूरच.”

‘फिफा’ या जागतिक फुटबॉल महासंघाने सांगितले, की अफगाणी फुटबॉलपटूंबद्दल आमची सहानुभूती आहे. तेथील फुटबॉल संघटनेशी आम्ही बोलत आहोत. सध्याच्या परिस्थितीबद्दलही जाणून घेत आहोत. आम्ही त्यांना पुढच्या आठवड्यात किंवा महिनाभरात त्यांना मदत करू.

[jnews_block_9 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”103″ sort_by=”oldest”]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!