All SportsTokyo Olympic 2020

बिंद्रा, चोपडामुळे मिळाली हॉकीव्यतिरिक्त ऑलिम्पिक सुवर्ण पदक जिंकण्याची ऊर्जा

टोकियो ऑलिम्पिकचा समारोप झाला. मला वाटतं, जगातील सर्व देशांमध्ये आपापल्या खेळाडूंच्या कामगिरीवर समीक्षा होत असेल. भारत त्याला अपवाद नाही. किंबहुना भारत ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदके का जिंकत नाही, हा विषय आता चावून चोथा झाला आहे. प्रश्न हा नाही, की सुवर्ण पदक का जिंकत नाही? प्रश्न हा आहे, की आपण कामगिरी उंचावत का नाही? साठच्या दशकात हॉकीचा अपवाद सोडला तर ऑलिम्पिकमधील सहभागच खूप मोठा मानला जायचा. हॉकीमध्ये ऑलिम्पिक सुवर्ण पदक आणि भारत हे समीकरण घट्ट बसलं होतं. त्यामुळे एखाद्या ऑलिम्पिक स्पर्धेत हॉकीचं सुवर्ण पदक हुकलं तर आजही भुवया उंचावतात. ही स्थिती इतर खेळांमध्ये का नाही?

मात्र, दीर्घ कालावधीनंतर आधी अभिनव बिंद्राने, तर या वेळी नीरज चोपडाने वैयक्तिक सुवर्ण पदक जिंकले. त्यांनी दाखवून दिलं, की आपण इतर खेळांतही सुवर्ण पदक जिंकू शकतो. नीरज चोपडाने भालाफेक स्पर्धेत 87.58 मीटर भाला फेकत सुवर्ण पदकावर मोहोर उमटवली. गेल्या शंभर वर्षांत ऑलिम्पिक स्पर्धेत अॅथलेटिक्स प्रकारात भारत प्रथमच सुवर्ण पदक जिंकला आहे. विशेष म्हणजे ऑलिम्पिक इतिहासात भारताचं हे दहावं सुवर्ण पदक आहे. यातील आठ पदके तर हॉकी या खेळातलीच आहेत. जरी नॉर्मन प्रिचार्डचं 1900 च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील रौप्य पदक बाजूला ठेवलं तरी गेल्या 100 वर्षांत भारताने ऑलिम्पिक स्पर्धेत 10 सुवर्ण, सात रौप्य आणि 16 कांस्य पदकांसह 33 पदके जिंकली आहेत.

यातील सहा ऑलिम्पिक असेही आहेत, ज्यात भारताला एकही पदक जिंकता आलेलं नाही. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारत एक सुवर्ण पदक, दोन रौप्य आणि चार कांस्य पदकांसह सात पदके जिंकू शकला. अर्थात, भारताचा हाही एक विक्रमच आहे. भारताने ऑलिम्पिकमध्ये प्रथमच 1020 च्या अँटवर्प ऑलिम्पिक स्पर्धेत सहभाग घेतला होता. तेव्हापासून अॅथलेटिक्स स्पर्धेत भारताने सुमारे 180 खेळाडू ऑलिम्पिकमध्ये पाठवले होते. मात्र, मिळालं काहीच नाही. आता चोपड़ाने याच अॅथलेटिक्समध्ये (भालाफेक) सुवर्णपदक जिंकले. यापूर्वी भारताचे फक्त दोनच खेळाडू गुरतेज सिंग (1984) आणि जगदीश बिश्नोई (2000) यांनी भाग घेतला होता.

ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या सुवर्णकाळाची सुरुवात 1928 च्या अॅम्सस्टरडॅम ऑलिम्पिकपासून झाली. त्या वेळी भारतीय हॉकी संघाने प्रथमच सहभाग घेतला होता. त्यानंतर भारत सहा ऑलिम्पिक स्पर्धांत सुवर्ण पदक जिंकत गेला. यावरून भारताचं हॉकीतलं वर्चस्व स्पष्ट होतं. अॅम्सस्टरडॅम ऑलिम्पिक स्पर्धेत भारत अंतिम फेरीत नेदरलँडकडून 3-0 असा पराभूत झाला. त्यानंतर चार वर्षांनी लॉस एंजिल्समध्ये केवळ तीन संघ सहभागी झाले होते. ध्यानचंदच्या नेतृत्वाखाली भारताने आपल्या दोन्ही सामन्यांत मोठ्या अंतराने विजय मिळवत सुवर्ण पदकावर नाव कोरले.

बर्लिन ऑलिम्पिक स्पर्धेत तर दस्तूरखुद्द हिटलरही भारतीय हॉकीच्या प्रेमात पडला. त्या वेळी भारताने अंतिम फेरीत जर्मनीचा 8-1 असा धुव्वा उडवत हॅटट्रिक मिळवली. 1948 च्या लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत एकही संघ भारतासमोर टिकू शकला नाही. यजमान ग्रेट ब्रिटनवर भारत 4-0 ने जिंकला आणि चौथ्यांदा सुवर्ण पदक मिळवले. यानंतर 1952 ची हेलसिंकी ऑलिम्पिक आणि 1956 च्या मेलबर्न ऑलिम्पिक स्पर्धेत भारत हाच कित्ता गिरवत होता. या दोन्ही स्पर्धांत अनु्कमे नेदरलँडला 6-1 आणि पाकिस्तानला अटीतटीच्या लढतीत 1-0 असे पराभूत केले. भारताला पुढचं सुवर्णपदक जिंकण्यासाठी आठ वर्षांची वाट पाहावी लागली. 1964 च्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकीने पाकिस्तानचा 1-0 असा पराभव केला. मात्र, पुढच्या तीन ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकीला आपली छाप पाडता आली नाही. त्यानंतर भारत एकदाही सुवर्ण पदक जिंकू शकलेला नाही.

मॉस्को ऑलिम्पिक स्पर्धेत सहा संघ सहभागी झाले होते. राउंड रॉबिन पद्धतीने ही स्पर्धा खेळविण्यात आली. यातील पहिले दोन संघ अंतिम फेरीत खेळले. हे दोन संघ होते भारत आणि स्पेन. भारताने स्पेनला 4-3 असे पराभूत करीत पुन्हा सुवर्णगाथा लिहिली. यानंतर भारताला जी ओहोटी लागली, त्यातून आजही सावरलेलो नाही. कारण पुढच्या तीन ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदक लांबच, मात्र भारत इतर कोणत्याही खेळात पदक जिंकू शकला नाही. 1996 च्या अटलांटा ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे हात रिकामेच राहिले. हॉकीनंतर भारताला सुवर्ण पदकासाठी तब्बल 28 वर्षे वाट पाहावी लागली. ही दीर्घ प्रतीक्षा अभिनव बिंद्राने 2008 मध्ये संपुष्टात आणली. तो सुवर्णदिवस होता 11 ऑगस्ट 2008. बीजिंगच्या शूटिंग रेंजवर बिंद्राने सुवर्णवेध घेतला. हे भारताचे ऐतिहासिक सुवर्णपदक होतं. तो भारताचा एकमेव खेळाडू होता, ज्याने ऑलिम्पिक स्पर्धेत वैयक्तिक सुवर्ण पदक जिंकले. बिंद्राने क्वालिफाइंग राउंडमध्ये 596 गुणांसह चौथे स्थान मिळवत अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत त्याने 104.5 गुण मिळवले आणि एकूण 700.5 गुणांसह सुवर्ण पदकावर नाव कोरले.

आता 13 वर्षांनी नीरजने टोकियो ऑलिम्पिकच्या भालाफेक स्पर्धेत 7 ऑगस्ट 2021 रोजी सुवर्ण पदक जिंकत भारतीय क्रीडा इतिहासात आपलं नाव कायमचं संस्मरणीय केलं.

इतिहास रचणाऱ्या भारतीय खेळाडूंचं उत्साहात स्वागत

ऑलिम्पिक सुवर्ण पदक जिंकणाऱ्या नीरज चोप्रासह भारतीय पथकाचं 9 ऑगस्ट 2021 रोजी मायदेशी उत्स्फूर्त स्वागत करण्यात आलं. देशातील या नायकांना पाहण्यासाठी विमानतळावर प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. ही गर्दी इतकी उसळली, की ती नियंत्रणात आणण्यासाठी सुरक्षा व्यवस्थेची कसोटी पणाला लागली होती.

भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे (साइ) महानिदेशक संदीप प्रधान यांच्या अध्यक्षतेखालील प्रतिनिधी मंडळाने खेळाडूंचं स्वागत केलं. या खेळाडंसोबत भारतीय अॅथलेटिक्स संघटनेचे प्रमुख आदिल सुमारीवालाही होते. खेळाडूंचं स्वागत करताना त्यांचे समर्थक आणि माध्यम प्रतिनिधींची प्रचंड गर्दी उसळली होती. या गर्दीतून खेळाडूंना बाहेर काढणे अवघड झाले होते. करोना महामारीमुळे गर्दी टाळण्याचं आवाहन चाहत्यांनी केव्हाच झुगारलं होतं. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगची कोणीही पर्वा केली नाही. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने सात पदके जिंकली. ऑलिम्पिकच्या इतिहासातील भारताची ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. नीरज चोप्राने भालाफेकमध्ये सुवर्ण पदक, भारतोलक मीराबाई चानू आणि पहिलवान रवीकुमार दहियाने रौप्य पदक जिंकले. मुष्टियोद्धा लवलीना बोरगोहेन, बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू, पुरुष हॉकी संघ आणि पहिलवान बजरंग पुनियाने कांस्य पदक जिंकले. चानू आणि सिंधू या दोन्ही खेळाडू पदक जिंकल्यानंतर यापूर्वीच भारतात परतल्या होत्या. कारण कोव्हिड-19 च्या प्रोटोकॉलमुळे खेळाडूंना पदक वितरण सोहळ्यानंतर 48 तासांत टोकियो सोडावं लागलं होतं.

[jnews_block_9 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”95″ sort_by=”oldest”]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!