All SportsCricketSports History

हे स्टेडियम आहे मराठी माणसाच्या स्वाभिमानाचं प्रतीक

हे स्टेडियम आहे मराठी माणसाच्या स्वाभिमानाचं प्रतीक

मराठी माणसाला अभिमान वाटावा असं हे वानखेडे स्टेडियम (wankhede cricket stadium). मराठी माणसाचा स्वाभिमान काय असतो, हे जर कुणाला पाहायचं असेल तर त्यांनी वानखेडे स्टेडियम जरूर समजून घ्यावं. This stadium is a symbol of self-respect of Marathi people | 

महाराष्ट्राचे तत्कालीन अर्थमंत्री बॅरिस्टर शेषराव वानखेडे एक राजकीय व्यक्तिमत्त्व; पण क्रिकेटप्रेमीही तेवढेच.

साठच्या दशकात ते बॉम्बे क्रिकेट संघटनेचे तहहयात अध्यक्ष होते. थोडक्यात काय, तर अध्यक्षपद त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत सांभाळलं. १९६३-६४ मध्ये ते अध्यक्षपदी विराजमान झाले. त्यांच्या निधनानंतरच या पदावर दुसरा व्यक्ती नियुक्त झाला. ते बीसीसीआयचे १९७२-७३ ते १९७९-८० दरम्यान उपाध्यक्ष, नंतर १९८०-८१ ते १९८२-८३ मध्ये बीसीसीआयचे अध्यक्षही होते.

वानखेडे केवळ क्रिकेटशीच जोडलेले होते असे नाही, तर इतर खेळांच्या संघटनांवरही ते होते. शेतकरी आणि व्यावसायिक असलेले वानखेडे यांनी अनेक क्षेत्रांत मुशाफिऱ्या केल्या असल्या तरी क्रिकेट हे त्यांचं पहिलं प्रेम.

This stadium is a symbol of self-respect of Marathi people | १९६३ ची ही घटना. मुंबई (त्या वेळी बॉम्बे) क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. वसंतराव नाईक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांच्याकडे आमदारांच्या क्रिकेट सामन्यासाठी एक प्रस्ताव आला होता.

क्रिकेटचा विषय असल्याने अर्थातच त्याला न्याय शेषराव वानखेडेच देऊ शकतील. म्हणून त्यांनी तो वानखेडे यांच्याकडे पाठवला. क्रिकेट म्हंटल्यावर त्यांनी लगेच तो मंजूरही केला. क्रिकेट सामन्यासाठी परवानगी तर मिळाली; पण हा सामना घ्यायचा कुठे?

शेषराव वानखेडे जरी बॉम्बे क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष असले तरी या संघटनेकडे स्वत:चे मैदानही नव्हते. मुंबईत एकमेव क्रिकेटचे मैदान होते, ते म्हणजे ब्रेबॉर्न स्टेडियम.

या स्टेडियमची मालकी होती क्रिकेट क्लब ऑफ इंडियाकडे. अडचण नेमकी इथंच होती. कारण क्रिकेट क्लब ऑफ इंडिया मूळचा दिल्लीचा क्लब. क्लब नि बॉम्बे क्रिकेट संघटनेत फारसं सख्य नव्हतं. दोघांमध्ये छत्तीसचा आकडा.

त्या वेळी क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या (CCI) अध्यक्षपदी होते विजय मर्चंट (Vijay Merchant).

आमदारांचा क्रिकेट सामना तर खेळवायचाच होता. प्रश्न प्रतिष्ठेचा होता. अध्यक्षपद आणि मंत्रिपद असतानाही स्टेडियम मिळत नसेल तर ही पदे काय चाटायची? वानखेडे काही आमदारांना घेऊन विजय मर्चंट यांच्याकडे परवानगी घेण्यासाठी गेले.

मर्चंट यांनी पाहिलं नि परवानगी अजिबात दिली नाही. एवढंच नाही तर त्यांनी शेषराव वानखेडे यांना चक्क ‘घाटी’ म्हंटलं.

वानखेडे यांना हे फारच जिव्हारी लागलं. मराठी माणसाचा असा अपमान त्यांना अजिबात सहन झाला नाही. त्यांनी ठरवलं, आता आपणच भव्य क्रिकेट स्टेडियम उभारायचं.

इथंच मुंबईच्या वानखेडे स्टेडियमचा Wankhede Cricket Stadium | जन्म झाला. अवघ्या १३ महिन्यांत ४५ हजारांची प्रेक्षकक्षमता असलेलं दिमाखदार स्टेडियम उभं राहिलं. अगदी ब्रेबॉर्नच्या नाकावर टिच्चून उभं राहिलेलं हे देखणं स्टेडियम आजही तितकंच रुबाबदार आहे.

वानखेडे स्टेडियमसमोर ब्रेबॉर्न स्टेडियम खुजं ठरावं इतकं ते उत्तम आहे. आणखी महत्त्वाची बाब म्हणजे, या स्टेडियमचा वास्तुविशारदही मराठी माणूसच होता. शशी प्रभू त्यांचं नाव.

या मैदानावर दिग्गज क्रिकेटपटूंच्या नावाने गॅलरी आहेत. आश्चर्य म्हणजे, ज्या विजय मर्चंट यांनी वानखेडे यांचा अपमान केला, त्या मर्चंट यांच्या नावाने या मैदानावर गॅलरीही आहे.

सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, विठ्ठल दिवे यांचीही नावे या गॅलरींना दिलेली आहेत. गरवारे स्टँडसह एमसीए, नॉर्थ, ग्रँड या नावांनीही मैदानावर वेगवेगळ्या गॅलरी आहेत.

तर अशी आहे या वानखेडे स्टेडिमयची कहाणी.

Follow us :


[jnews_block_9 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”cricket”]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!