मिल्खा सिंग (फ्लाइंग सिख) हे दोन शब्द भारतीयांच्या मनात प्रेरणा निर्माण करणारे आहेत. मिल्खा सिंग यांचं जगणं म्हणजे खुल्या पुस्तकाची सुवर्णपाने आहेत. कोरोनोत्तर आजाराने वयाच्या ९१ व्या वर्षी त्याचं शुक्रवारी, १८ जून २०२१ रोजी रात्री साडेअकराला चंडीगड येथे निधन झालं. पाच दिवसांपूर्वीच त्यांची पत्नी निर्मलकौर यांचेही कोरोनोत्तर आजाराने निधन झाले होते. ऑक्सिजनची पातळी खालावल्याने मिल्खा सिंग यांना 3 जून रोजी आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांची करोना चाचणी 19 मे 2021 रोजी पॉझिटिव्ह आली होती. त्यांच्या आठवणींची सुवर्णपाने उलटताना भारतीय क्रीडाविश्वाला शोक अनावर झाला…
मिल्खा सिंग यांचा जन्म 20 नोव्हेंबर 1929 रोजी गोविंदपुरा (आता हा पाकिस्तानचा भाग आहे) येथे शीख परिवारात झाला. भारत-पाकिस्तान फाळणीनंतर मिल्खा सिंग भारतात परतले आणि सैन्यात दाखल झाले. मिल्खा सिंग यांच्या जीवनाचा उद्देश आणि अर्थ त्यांच्या संघर्षातून डोकावतो. आपादमस्तक हादरून टाकणारं त्यांचा जीवनसंघर्ष आहे. अशा परिस्थितीत ते खचले नाहीत, तर नव्याने अमरगाथा लिहिली. भारतीय क्रीडाविश्वातले ते युगपुरुष बनले. भलेही ते कारकिर्दीतील महत्त्वाच्या शर्यती हरले असतील, पण भारतीय ट्रॅक अँड फिल्डच्या इतिहासात त्यांनी आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरले.
मिल्खा सिंग (फ्लाइंग सिख) यांच्या आयुष्यातील साठच्या दशकातील असंच एक आठवणींतलं सुवर्णपान. अवघ्या 0.1 सेकंदांनी त्यांचं पदक हुकलं होतं. ते चौथ्या स्थानावर राहिले. साठच्या दशकात भारत क्रीडाविश्वात हॉकीपुरताच मर्यादित होता. नाही म्हंटलं, तरी पहिलवान खाशाबा जाधव यांच्या रूपाने पहिलं वैयक्तिक ऑलिम्पिक पदक भारताला मिळालं होतं. या पदकावर भारत अनेक वर्षे समाधान मानत होता… मात्र, मिल्खा सिंग यांनी ट्रॅक अँड फिल्डच्या रूपाने भारतासाठी आणखी नव्या खेळाची दारे किलकिली केली. रोम ऑलिम्पिकपूर्वी 1958 मध्ये ब्रिटिश आणि राष्ट्रकुल स्पर्धेत त्यांनी सुवर्णपदक जिंकत भारताला जागतिक अॅथलेटिक्समध्ये स्थान मिळवून दिले. लढणे हे त्यांच्या स्वभावातच होतं. म्हणूनच करोना संसर्गानंतर महिनाभर ते या आजाराशी लढत होते. अखेर 19 जून 2021 रोजी वयाच्या 91 व्या वर्षी त्यांनी चंडीगडमध्ये अखेरचा श्वास घेतला.
अखेरचे शब्द… ‘माझी चिंता करू नका; मी ठीक आहे…’
रुग्णालयात दाखल झाल्यानंतर पीटीआयने त्यांच्याशी संवाद साधला. हा त्यांचा अखेरचा संवाद. त्या वेळी ते म्हणाले होते, ‘‘चिंता करू नका. मी ठीक आहे. मला हे समजत नाही, की मला कोरोना झाला कसा? मी घरातच होतो. फक्त सकाळी जॉगिंग आणि व्यायामासाठी बाहेर जात होतो. आशा करतो, की मी लवकरच चांगला होईन.’’ वयाच्या ९१ व्या वर्षीही हार न मानणं, जिंदादिल राहणं हे त्यांच्या या वाक्यातून दिसून येतं… त्यांची पत्नी निर्मलसिंग म्हणाल्या, ‘‘आयुष्यात पहिल्यांदाच त्यांनी दुर्बलता आणि शारीरिक वेदनेची तक्रार केली.’’ मिल्खा सिंग यांना आपल्या आयुष्यात अनेकदा संघर्ष करावा लागला. काही घाव शरीरावर, तर बरेचसे घाव त्यांच्या मनावर झाले. मात्र, या जखमा क्रीडापथात अडथळा कधी ठरू दिल्या नाहीत. भारत- पाकिस्तान विभाजनादरम्यान त्यांच्या आईवडिलांची हत्या झाली. त्या वेळी मिल्खा अगदीच लहान होते. या चिमुकल्या मिल्खाने दिल्लीत शरणार्थींच्या शिबिरात दिवस काढले. काही छोटे-मोठे गुन्हे करीत त्यांनी गुजराण केली. यामुळे त्यांना जेलवारीही झाली.
चौथ्या प्रयत्नात सैन्यात दाखल
मिल्खा सिंग (फ्लाइंग सिख) यांना सैन्यात जायची इच्छा होती. सेनेत दाखल होण्यासाठी पहिला प्रयत्न अपयशी ठरला. दुसरा प्रयत्नही वाया गेला. तिसऱ्या प्रयत्नातही अपयशच आले. मात्र, त्यांनी हार मानली नाही. अखेर चौथ्या प्रयत्नात ते यशस्वी झाले. त्या वेळी अशी कल्पनाही कोणी केली नसेल, की हाच मिल्खा पुढे जाऊन ‘फ्लाइंग सिख’ बनेल. ते ट्रॅकवर उतरायचे तेव्हा त्यांच्यासाठी ते मंदिर होते. धावणे हेच त्यांच्यासाठी देव आणि प्रेम होते. त्यांची जीवनकहाणी खडतर होती. मात्र, त्यांनी खेळाच्या जोरावर ही कहाणी एका परिकथेसारखी केली. आशियाई स्पर्धेत चार सुवर्ण आणि 1958 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले. मात्र, कारकिर्दीतली सर्वांत मोठी शर्यत ते हरले होते. 1960 ची रोम ऑलिम्पिकमध्ये 400 मीटर शर्यतीत ते चौथ्या स्थानावर राहिले. त्यांनी ज्या वेळेची नोंद केली, ती राष्ट्रीय स्तरावर ३८ वर्षे विक्रमी कामगिरी राहिली. त्यांना 1959 मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. राष्ट्रकुल स्पर्धेत वैयक्तिक प्रकारात पद मिळविणारे ते पहिले भारतीय खेळाडू होते. मिल्खा यांनी आपल्या कारकिर्दीत 80 शर्यतीत भाग घेतला. त्यापैकी 77 शर्यती त्यांनी जिंकल्या आहेत. रोम ऑलिम्पिकमधील पदक हुकल्याची सल त्यांना कायम सलत राहिली.
हे स्वप्न अधुरेच…
त्यांच्यावर ‘भाग मिल्खा भाग’ हा बायोपिक आल्यानंतर ते म्हणाले, ‘‘एका पदकासाठी मी संपूर्ण कारकीर्द पणाला लावली होती. मात्र, एका छोट्याशा चुकीमुळे हे पदक माझ्या हातून निसटले.’’ मिल्खा यांचं आणखी एक एक स्वप्न आहे, जे अद्याप अधुरेच आहे. त्यांचं स्वप्न होतं, की भारतीय खेळाडूने ट्रॅक अँड फिल्डमध्ये ऑलिम्पिक पदक जिंकावं. अविभाजित पंजाबच्या गोविंदपुरा गावात वयाच्या पंधराव्या वर्षी मिल्खा यांना पळावं लागलं. भारत-पाकिस्तान फाळणीतच उसळलेल्या दंगलीत त्यांच्या आईवडिलांची हत्या झाली. मिल्खा तेथून दिल्लीत आले. जुन्या दिल्ली रेल्वे स्टेशनबाहेर बूटपॉलिश केली. रेल्वेतील सामान चोरून गुजराणही करावी लागली. ते जेलमध्ये गेले. त्यांच्या बहिणीने दागिने विकून त्यांना जेलमधून सोडवले. मिल्खा चौथ्या प्रयत्ना सैन्यात दाखल झाल्यानंतर त्यांची पहिली नियुक्ती सिकंदराबादमध्ये झाली. तेथे त्यांनी शर्यतीत भाग घेतला. त्यांचे प्रशिक्षक गुरदेव सिंग यांनी सांगितले, की पहिल्या दहात येशील तर तुला एक ग्लास दूध मिळेल. मिल्खा शर्यतीत सहावे आले आणि नंतर 400 मीटर शर्यतीसाठी खास प्रशिक्षण घेतले. त्यानंतर जे झालं, ते ऐतिहासिक असंच होतं.
त्यांच्या कहाणीची सुरुवात 1960 मधील भारत-पाकिस्तान स्पोर्ट मीटशिवाय अधुरीच राहील. त्यांनी रोम ऑलिम्पिकपूर्वी पाकिस्तानच्या अब्दुल खालिकला हरवले होते. या स्पर्धेसाठी मिल्खा पाकिस्तानला जाणार नव्हते. त्यांची अजिबातच इच्छा नव्हती. कारण जेथे त्यांच्या आईवडिलांची हत्या झाली, त्या भूमीत त्यांना पुन्हा पाऊल ठेवायचे नव्हते. मात्र, पंतप्रधान पंडित नेहरू यांनी सांगितल्यानंतर ते तयार झाले. त्यांनी खालिकला हरवले. त्याच्या कामगिरीने पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्रपती जनरल अयूब खानही प्रभावित झाले. त्यांनी त्याला ‘उड़न सिख’ अशी पदवी दिली. अशा या महान खेळाडूबाबत धक्कादायक बाब म्हणजे, 2001 मध्ये त्यांना अर्जुन पुरस्कार जाहीर केला. त्यांनी हा प्रस्ताव नाकारला. मिल्खा यांची कहाणी केवळ पदकांपुरती किंवा कारकिर्दीपुरती नाही, तर स्वतंत्र भारतातील ट्रॅक अँड फिल्डमधील एका अध्यायाचीही आहे. हा अध्याय पुढच्या अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
रंधावा यांनी जागवल्या आठवणी
1960 च्या रोम ऑलिम्पिकची आठवण गुरबचनसिंग रंधावा आजही विसरू शकत नाहीत. मिल्खा सिंग (फ्लाइंग सिख) यांच्या निवडक सहकाऱ्यांपैकी एक असलेले रंधावा आज आपल्यात आहेत. साठची रोम ऑलिम्पिक आणि 1964 मधील टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय पथकात मिल्खा सिंग आणि गुरबचनसिंग रंधावा दोघेही सहभागी होते. रंधावा हर्डल्समधील धावपटू. त्यांनी मिल्खा यांची ती 400 मीटर शर्यत पाहिली होती. हीच ती शर्यत जी मिल्खा यांच्यासाठी शापित ठरली. मिल्खा यांच्या आयुष्यातील ही सर्वांत मोठी शर्यत होती. मात्र, पापणी लवण्याइतक्या क्षुल्लक अंतराने त्यांचं पदक हुकलं. रोम ऑलिम्पिकची ही शर्यत त्यांच्यासाठी शापितच म्हणावी लागेल. आयुष्यभर त्यांना या शर्यतीतलं हुकलेलं पदक सतावत राहिलं. अवघ्या 0.1 सेकंदाने त्यांचं पदक हुकलं; अन्यथा त्यांनी एक इतिहास रचला असता. रंधावा सध्या 82 वर्षांचे आहेत. ते म्हणाले, ‘‘मी तेथे होते. संपूर्ण भारतीय पथकाला आशा होती, की रोममध्ये इतिहास रचला जाईल. प्रत्येक जण श्वास रोखून या शर्यतीची वाट पाहत होता.’’ रंधावा म्हणाले, ‘‘मिल्खा उत्तम फॉर्मात होते. त्यांनी नोंदवलेल्या वेळा त्या वेळी जगातील उत्तम धावपटूंच्या बरोबरीच्या होती. सुवर्ण किंवा रौप्य कठीण होते; मात्र, कांस्य तरी भारताच्या नावावर होईल, याची खात्री भारतीयांना होती. मिल्खा त्यासाठी सक्षम होता.’’ मिल्खाने ती शर्यत 45.6 सेकंदांत पूर्ण केली. मात्र दक्षिण आफ्रिकेचे मॅल्कम स्पेन्सपेक्षा 0.1 सेकंदांची अधिक वेळ देऊन चुकले. मिल्खा यांनी 1958 मध्ये याच प्रतिस्पर्ध्याला हरवून राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते.
रंधावा म्हणाले, ‘‘संपूर्ण भारतीय पथक त्या वेळी स्तब्ध, नि:शब्द झालं. मिल्खा सिंग तर अचंबित होते. मिल्खा 200 ते 250 मीटरपर्यंत पुढे धावत होते. मात्र, नंतर त्यांनी एक चूक केली. त्यांनी वेग कमी केला. इथेच त्यांचं कांस्यपदक 0.1 सेकंदाने हुकले.’’ मिल्खा यांना आयुष्यभर ही सल बोचत राहिली. आयुष्यात त्यांना दोन घटना नेहमी बोचत राहिल्या. पहिली म्हणजे, फाळणीदरम्यान पाकिस्तानात त्यांच्या डोळ्यांसमोर त्यांच्या आईवडिलांची हत्या आणि दुसरी म्हणजे रोममध्ये थोडक्यात पदक हुकणे. मिल्खा तंदुरुस्तीबाबत खूपच सजग होते. याबाबत रंधावा यांनी सांगितले, ‘‘1962 मधील आशियाई स्पर्धा आणि 1960, 1964 च्या ऑलिम्पिक दरम्यान आमच्यापैकी काही जण इकडेतिकडे फिरून यायचे. मात्र, मिल्खा असे काही करीत नव्हते. ते सराव करायचे. चांगला आहार घ्यायचे आणि आराम करायचे. सैन्यात राहिल्यामुळे ते बरेच शिस्तप्रिय होते. याच कारणामुळे ते भारतातील महान खेळाडू बनले.’’
अर्जुन पुरस्कार नाकारला
मिल्खा सिंग (फ्लाइंग सिख) स्पष्टवक्ते होते. त्यांना 1959 मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले होते. साठच्या दशकानंतर 2001 मध्ये त्यांना अर्जुन पुरस्कार जाहीर झाला. मात्र, त्यांनी हा पुरस्कार घेण्यास स्पष्टपणे नकार दिला. सरकारच्या पुरस्कार धोरणावर त्यांनी कडाडून टीका केली होती. मंदिरात खिरापत वाटावी तसे या पुरस्कार वाटले जात असल्याची टीका त्यांनी केली. त्यामुळेच मिल्खा सिंग यांनी पुरस्कार नाकारला. पद्मश्री पुरस्कार दिल्यानंतर अर्जुन पुरस्कारासाठी त्यांना निवडण्यात आले होते.
56 वर्षे विक्रमादित्य
क्रीडाविश्वाने वाहिली श्रद्धांजली
Follow on Facebook Page kheliyad
हॉकीच्या सुवर्णकाळातील महान हॉकीपटू चरणजीत सिंह यांचे निधन
Read more at: