• Latest
  • Trending
मित्रविहार क्लब Mitra vihar

शतायुषी प्रवासातला नाशिकचा मित्रविहार…

July 10, 2021
ऑस्ट्रेलियन ओपन अरिना सबालेन्का

ऑस्ट्रेलियन ओपन : अरिना सबालेन्का विजेती

January 29, 2023

हॉकीपटू नीना असईकर राणे यांचे निधन

January 25, 2023
महिला कुस्तीगिरांचे शोषण

महिला कुस्तीगिरांचे शोषण होतेय?

January 23, 2023
महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे

दीड मिनिटात शिवराज राक्षे ‘महाराष्ट्र केसरी’

January 16, 2023
भारतीय क्रिकेट 2022

भारतीय क्रिकेट 2022 : संघर्षाचं वर्ष

January 23, 2023
कसे बनले महान फुटबॉलपटू पेले?

कसे बनले महान फुटबॉलपटू पेले?

January 16, 2023
टेबल टेनिस 2022

टेबल टेनिस 2022- शरथ आणि मनिकाची चमक

December 27, 2022
साहसी, प्रेरणादायी- ग्लेन कनिंघम (Glenn Cunningham)

साहसी, प्रेरणादायी- ग्लेन कनिंघम (Glenn Cunningham)

December 24, 2022
कतार विश्वचषक फुटबॉल स्पर्धा

कतार विश्वचषक फुटबॉल स्पर्धा- हे माहीत आहे काय?

December 16, 2022
लवलिना बोर्गोहेन भारतीय बॉक्सिंग

2022- भारतीय बॉक्सिंग आणि लवलिना बोर्गोहेन वाद

January 29, 2023
नोव्हाक जोकोविच कोरोना लसीकरण

वर्ष 2022- नोव्हाक जोकोविच आणि कोरोना लसीकरण

December 5, 2022
कतार फिफा वर्ल्ड कप

कतार फिफा वर्ल्ड कप वेळापत्रक 2022

November 21, 2022
Thursday, February 2, 2023
kheliyad
  • Home
  • Cricket
  • All Sports
  • Inspirational story
  • Online Chess Puzzle
  • Raanwata
  • Video
  • sports quiz
No Result
View All Result
  • Home
  • Cricket
  • All Sports
  • Inspirational story
  • Online Chess Puzzle
  • Raanwata
  • Video
  • sports quiz
No Result
View All Result
kheliyad
No Result
View All Result

शतायुषी प्रवासातला नाशिकचा मित्रविहार…

History of Mitravihar Club which has completed one hundred years | किंग जॉर्ज कोरोनेशन क्लब नाशिकमध्ये कुठे, असा प्रश्न आज कोणी विचारणार नाही. हा किंग जॉर्ज कोरोनेशन क्लब म्हणजेच आजचा मेहेर चौकातला मित्रविहार क्लब Mitra vihar.

Mahesh Pathade by Mahesh Pathade
July 10, 2021
in All Sports, Sports History
4
मित्रविहार क्लब Mitra vihar
Share on FacebookShare on TwitterShare on LinkedinShare on TelegramShare on WhatsappShare on PinterestShare on RedditShare on Email

शतायुषी प्रवासातला नाशिकचा मित्रविहार…

नाशिकची क्रीडासंस्कृती शेकडो वर्षांची आहे. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे या शहराला लाभलेला गोदाकाठ आणि नऊ टेकड्यांची रांग. याच नाशिकने कुस्ती, कबड्डी, खो-खोसारखे भारतीय खेळ जसे जपले, तसे ब्रिटिशांच्या काळात काही विदेशी खेळही जपले. त्याची साक्ष नाशिकच्या शतायुषी क्रीडा संस्था आजही देत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे मित्रविहार क्लब. तब्बल 109 वर्षांचा वारसा लाभलेल्या या मित्रविहारचा (Mitravihar Club) प्रवास रंजक आहे…

किंग जॉर्ज कोरोनेशन क्लब नाशिकमध्ये कुठे, असा प्रश्न आज कोणी विचारणार नाही. विचारलाच तर नाशिककरांना तो सांगता येणार नाही. हा किंग जॉर्ज कोरोनेशन क्लब म्हणजेच आजचा मेहेर चौकातला मित्रविहार. मित्रविहार (Mitravihar Club) आणि ब्रिटिशांचा तसा कोणताही संबंध नाही. एक मात्र खरं, की हा क्लब ब्रिटिशांच्या काळात स्थापन झाला, म्हणूनच या या क्लबचं नाव किंग जॉर्ज असं ठेवण्यात आलं असावं. किंग जॉर्जचंच नाव का ठेवलं, हा प्रश्न आहेच. कारण नाशिक जिमखान्याचं नाव तर किंग एडवर्डच्या नावाने होतं. मिग मित्रविहारचं नाव किंग जॉर्ज का ठेवण्यात आलं? त्याचं कारण म्हणजे 1911 मध्ये किंग जॉर्ज (पंचम) याचा दिल्ली दरबारात राज्याभिषेक झाला. त्याची बायको क्वीन मेरी भारताची महाराणी झाली. त्याच्या एक वर्षाने 12 डिसेंबर 1912 रोजी नाशिकमध्ये ही वास्तू उभी राहिली, जिचं नाव किंग जॉर्ज कोरोनेशन क्लब असं ठेवण्यात आलं. या नावामागचा इतिहास आज नाशिककरांकडे उपलब्ध नाही. मात्र, ब्रिटिशांची सत्ता असताना एखादा क्लब उभा करायचा असेल तर तो ब्रिटिशांना डावलून उभा राहूच शकत नाही. म्हणूनच त्या वेळी किंग जॉर्जच्या नावाने हा क्लब उभा राहिला असावा.  

 गंमत म्हणजे हा क्लब (Mitravihar Club) ब्रिटिशांनी अजिबात स्थापन केलेला नाही. या क्लबच्या उभारणीमागे भारतीयच होते. या जागेचे मालक होते वासुदेव बापूजी आकूत. त्या वेळी जागेचं महत्त्व आजच्यासारखं अजिबातच नव्हतं. आकूत यांचे वकील मित्र इथे पत्ते खेळायला येत असत. त्या वेळी रमी आणि ब्रिज या पलीकडे दुसरा कोणताही खेळ खेळला जात नव्हता. रमी म्हणजे पैशांचाच डाव. सोबतीला उंची मद्याचे पेग. असं असलं तरी त्याला जुगार म्हंटला जात नव्हता किंवा थिल्लरपणाही नव्हता. सुशिक्षितांचे उंची शौक होते ते. थोडक्यात म्हणजे नामांकित वकिलांची खेळण्याची, मजेत घालविण्याची हक्काची ही जागा. त्या वेळी आकूत यांनी कोणालाही आडकाठी केली नाही. जो येईल त्याने इथं खेळावं. मित्र परिवाराची ही खेळण्याची जागा म्हणून पुढे हा क्लब मित्रविहार (Mitravihar Club) नावाने नावारूपास आला. कदाचित स्वातंत्र्यानंतर हे नाव या क्लबने धारण केलं असावं. आकूत यांनी ही जागा खास मित्रांच्या खेळण्यासाठी दान केली. 

ज्याला हौस आहे तो इथं खेळायचा. त्या वेळी व्यावसायिक खेळाडू फारसे नव्हतेच. बापू नाडकर्णी आणि आणखी एक क्रिकेटर सोडला तर फारसं कोणी व्यावसायिक खेळाडू नव्हता. त्या वेळी व्यावसायिक खेळ क्रिकेटशिवाय दुसरा नव्हता. बाकी खेळ आनंदासाठीच होते. पहाटेपासून मित्रविहारमध्ये व्यायामासह इतर खेळ खेळण्यासाठी लोकांचं येणं-जाणं होतं.

मित्रविहारमध्ये हळूहळू खेळ विस्तारले. रमी आणि ब्रिज या खेळांपुरताच हा क्लब उरला नाही. जे पत्ते खेळत नव्हते, त्यांनी क्रिकेट, टेनिस वगैरे खेळ सुरू केले. हौशी खेळाडूंचाच इथं विशेषकरून राबता होता. आनंदासाठी खेळणे या पलीकडे या क्लबचा विशेष उपयोग नव्हताच. आश्चर्याची बाब म्हणजे या मित्रविहारला 1972 पर्यंत घटनाच नव्हती. सध्या ज्यूदोचे प्रशिक्षण देणारे डॉ. रत्नाकर पटवर्धन यांच्या वडिलांचा मित्रविहारपासून जवळच सराई लॉज होता, तर मित्रविहारच्या (Mitravihar Club) समोरच त्यांचा बंगला होता. ‘गोळे बंगला’ म्हणूनच तो ओळखला जायचा. आज गोळे कॉलनी म्हणून नाशिकमध्ये तो भाग ओळखला जातो. त्या वेळी गप्पा व्हायच्या. त्यात असाच विषय निघाला, की अरे, ‘मित्रविहार’ला घटना आहे का? तेव्हा सगळे म्हणाले, की नाही…! तेव्हा पटवर्धन यांचे वडील म्हणाले, अरे असं करू नका. तुमच्याकडे पैसे आहेत. तुम्ही आधी घटना नोंदवा. मग १९७२ नंतर मित्रविहारची घटना अस्तित्वात आली. त्याच वेळी ज्यूदो संघटनेचीही घटना नोंदविण्यात आली. म्हणजे मित्रविहारच्या पंखाखाली जन्मलेली ही तिसरी संघटना म्हणता येईल. तत्पूर्वी ब्रिज आणि टेबल टेनिसच्या संघटना या मित्रविहारमध्येच जन्मल्या. या सगळ्याच खेळांना मित्रविहारने सढळ हस्ते मदत केली.

‘मित्रविहार’ची (Mitravihar Club) खासियत अशी आहे, की इथं आजही कुणीही येऊन ब्रिज खेळू शकतं. त्याला शुल्क नाही की सभासदत्वाची गरज नाही. म्हणजे ब्रिज खेळायला कोणाही हौशी माणसाला इथं आडकाठी नाही. मित्रविहारवगळता नाशिकमध्ये ब्रिज फारसं कुठं खेळलं जातच नव्हतं. म्हणूनच ब्रिज असोसिएशनची मुहूर्तमेढ याच मित्रविहारच्या छत्राखाली रोवली गेली. हल्ली ब्रिज हा खेळ फारसा कुणाला माहिती नाही. डॉ. रत्नाकर पटवर्धन यांना मित्रविहारचा साठच्या दशकातील सगळा प्रवास आठवतो. आजच्या पिढीकडे पाहिलं, की त्यांना एक खंत वाटते. ते म्हणतात, आजच्या पिढीची कमालच आहे. इतर खेळ तर सोडाच, पण हल्ली कुणी पत्तेसुद्धा खेळत नाही. मग ही लोकं करता काय? 

तेही खरंच आहे म्हणा… 

तर असा मित्रविहार क्लब(Mitravihar Club). या क्लबचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथं मुलांकडून कधीच शुल्क आकारले गेले नाही. मित्रविहारमध्ये (Mitravihar Club) इतर खेळ हळूहळू सुरू झाले. साधारणपणे साठच्या दशकानंतरच या क्लबमध्ये नवे खेळ आले. म्हणजे पत्ते हा इथला मुख्य खेळ आजही कायम आहे. दादासाहेब वडनगरे अध्यक्ष असताना ज्यूदोचे प्रशिक्षण सुरू झाले. टेबल टेनिसही होते आधी. 

मित्रविहारची (Mitravihar Club) आणखी एक ओळख गेल्या तीस-पस्तीस वर्षांत निर्माण झाली. ती म्हणजे गुलाबच्या हातचं ऑम्लेट आणि चहा. मित्रविहारमध्ये मुंबईतील ओळखीची लोकं यायची, ती हमखास इथलं ऑम्लेट मागायची. आता गुलाब हयात नाही. मात्र, त्याची ही आठवण ‘मित्रविहार’मध्ये आजही होते. मित्रविहारची ब्रिटिशकालीन ओळख किंवा इतिहास सांगणारा एकही व्यक्ती आज हयात नाही. डॉ. रत्नाकर पटवर्धन यांच्या आजोबांचा जन्म १९०० मधला. मित्रविहारची स्थापना १९१२ मधली. पटवर्धन यांचे आजोबा विशीत असताना मित्रविहारमध्ये खेळायला जात असतील. आज त्यांचे आजोबा हयात नाहीत. अशीच अवस्था इतर सदस्यांची असेल. त्यामुळे मित्रविहारच्या इतिहासाची पाने जवळजवळ धूसर झाली आहेत.

ज्यूदोची सुरुवात…

मित्रविहारमध्ये ज्यूदोची सुरुवात अगदी सहज झाली. डॉ. पटवर्धन त्या वेळी पुण्यातल्या फर्ग्युसन महाविद्यालयात शिक्षण घेत होते. नाशिकमध्ये आले, की मित्र विचारायचे, तू काय करतो रे तिकडे? ज्यूदो काय असतं? मग या ज्यूदोची प्रात्यक्षिके दाखवायची असेल तर घरून झोपायची गादी घेऊन यावी लागायची. नाशिकमध्ये तसा ज्यूदो खेळला जायचा. तत्पूर्वी देशपांडे ड्रायव्हिंग स्कूलचे विजय देशपांडे यांच्या हॉलमध्ये बरीच वर्षे ज्यूदो सुरू होता. मित्रविहारमध्ये डॉ. पटवर्धन यांनी ज्यूदोची माहिती देण्यास सुरुवात केली, तेव्हा लक्षात आलं, की इथंच ज्यूदो सुरू करायला काय हरकत आहे. मग १९७२-७३ मध्ये मित्रविहारमध्ये ज्यूदोचं प्रशिक्षण सुरू झालं, जे आजतागायत सुरू आहे. तेव्हापासून आतापर्यंत डॉ. रत्नाकर पटवर्धनच प्रशिक्षण देत आहे.

डॉ. पटवर्धन यांच्या ज्यूदोची सुरुवात १९६६ मधली. त्या वेळी ते फर्ग्युसन कॉलेजला एसवाय बीएस्सीचं शिक्षण घेत होते. त्या वेळी पहिल्यांदाच तोडफोडीचे सिनेमे आले. ‘अवर मॅन इन इस्तंबुल’सारखे चित्रपट त्यांना आजही आठवतात. आता तर सर्रास तोडफोडीचे सिनेमे पाहायला मिळतात. मात्र, डॉ. पटवर्धन यांच्यावर हा चित्रपटांचा प्रभाव खचितच नव्हता. डॉ. पटवर्धन यांचा प्रकाश शर्मा नावाचा एक मित्र होता. ते थोडी फार कुस्तीही खेळायचे. पण बॉक्सिंगचीही त्यांना विशेष आवड होती. ते घरीच ग्लव्हज लावून प्रॅक्टिस करायचे. ग्लव्हजही त्या काळी कुठे होते.. हातालाच काही तरी गुंडाळून सराव करायचे. नंतर त्यांनी पुण्यात शेकडो चित्रपट पाहिले. मित्राला सिनेमा पाहून आणखी उत्साह आला. मग ही दोघं नदीकाठी जाऊन तसे प्रयोग करू लागली. नंतर त्यांना कळलं, की ज्यूदोचा क्लास आपल्या फर्ग्युसनमध्येच आहे. होस्टेलपासून अवघ्या शंभर पावलांवर हा क्लास होता. तेथे ते ज्यूदो खेळू लागले. डॉ. पटवर्धन पुढील शिक्षणासाठी १९६९ मध्ये मुंबईच्या आयआयटीला गेले. तेथेही थोडा फार सराव करायला मिळाला. त्यांचा धाकटा भाऊ भास्कर पटवर्धन ज्यूदो उत्तम खेळायचा. १९७० मध्ये तो राष्ट्रीय स्पर्धा खेळला. त्या वेळी विजय देशपांडे, दादासाहेब वाकचौरेंचा मुलगा, प्रा. सोहोनींची मुलं हे सगळे डॉ. पटवर्धन यांच्यासोबतच फर्ग्युसनला ज्यूदो खेळायची. नाशिकमध्ये आले, की त्यांची जुनी मित्रमंडळी भेटायची. सुधीर कुलकर्णी, डॉ. वसंतराव पवार हे पटवर्धनांचे चांगले मित्र. ते गप्पा मारताना म्हणायचे, आम्हालाही सांग, कसं ज्यूदो खेळतात ते. तेव्हा त्यांना समजावताना लक्षात आलं, की मित्रविहारमध्येच ज्यूदोचं प्रशिक्षण सुरू केलं तर काय हरकत आहे… तेव्हापासून देशपांडेंच्या हॉलमधून ज्यूदो प्रशिक्षणाचं स्थानांतर मित्रविहारमध्ये झालं, जे आजतागायत सुरू आहे.

नाशिकमध्ये ज्यूदोचे उत्तम खेळाडू होते. भास्कर पटवर्धन, पोंक्षे, सुरेश कापडिया, शरद पवार, विजय पाटील अशी काही नावं होती. यापैकी विजय पाटील सध्या मुंबईतील कांदिवलीत प्रशिक्षक आहे. साठच्या दशकातील नाशिककर उत्तम खेळाडू असायचा. त्याला काहीही येत नसलं तरी पोहायला हमखास यायचं. म्हणजे नाशिकची ही एक ओळख होती. गोदाकाठी असल्याने प्रत्येक नाशिककराला पोहण्याचं कौशल्य अवगत होतं.  नाशिकच्या गोल्फ क्लबचा उल्लेख सॉमरसेटच्या एका पुस्तकात आहे. आता जे अभीक्षणगृह आहे, तेथे तीन टेकड्या होत्या. तिथे लोक फिरायला जायचे. नऊ शिखरांचं म्हणजे नवशिखरांचं ते नाशिक. मुघल काळात औरंगजेबाने नाशिकला गुलशनाबाद म्हंटलं होतं. नाशिक नावामागे रामायणाचा उल्लेख जोडला जात असेलही, पण नवशिखरांचं म्हणून नाशिक हीच या नावामागची खरी ओळख.

मित्रविहार  (Mitravihar Club) पूर्वी जरी किंग जॉर्जच्या नावाने ओळखला जात असला तरी या क्लबमध्ये इंग्रजांचा कधीही वावर नव्हता. जुन्याजाणत्यांच्या तरी तसं काही ऐकिवात नाही. डॉ. रत्नाकर पटवर्धनांचा जन्मच १९४८ चा. म्हणजे स्वातंत्र्यानंतरचा. मात्र, इंग्रजांचा मित्रविहारशी संबंध होता, असं त्यांच्याही ऐकिवात नाही. त्या वेळी त्यांना गोरा माणूसही कधी इथं दिसला नाही. कुंभमेळ्यात तेवढे गोरे दिसायचे. मित्रविहारची जागा डॉ. महादेव आकूतांचीच होती. मित्रविहारच्याच मागे आकुतांचा वाडा होता. महात्मा गांधी रोडच्या बाजूला सरदार राजेबहाद्दरांच्या जागा होत्या. हत्तीखाना रोड म्हणूनच तो ओळखला जायचा. त्या वेळी शिंगाडा तलावासारखं तळं सीबीएसच्या जागेवर होतं. राजेबहाद्दरांच्या हत्तीखान्यातले हत्ती अंघोळीला तळ्याकडे जायचे. म्हणून हत्तीखाना रोड असं नाव पडलं. 

साठच्या दशकातील नाशिकचं टेबल टेनिस

नाशिकच्या टेबल टेनिसला साठच्या दशकात वैभव मिळवून देणाऱ्या खेळाडूंमध्ये नंदू दामले, संजय मोडक अशी काही नावाजलेली नावं होती. या आठवणी नंदू दामलेंना आजही आठवतात. साधारणपणे 64-65 सालची गोष्ट. मित्रविहारमध्ये एक पत्र्याचा हॉल होता.. तेथेच टेबल टेनिस बहरलं. त्याला कारण म्हणजे प्रशिक्षक अरविंद वैद्य. ते ‘गावकरी’त नोकरी करायचे. त्यांनी टेबल टेनिस चांगलंच मनावर घेतलं. किंबहुना नाशिकमध्ये त्यांनीच टेबल टेनिस रुजवलं. मित्रविहारमुळेच नाशिकचं नाव देशभरात गाजलं. महाराष्ट्राच्या संघात दोन-तीन तर नाशिकचेच असायचे. पुणे विद्यापीठाचा संघ तर जवळजवळ नाशिकचाच असायचा. कुठलीही अपेक्षा न ठेवता वैद्यांनी मित्रविहारमध्ये प्रशिक्षण दिलं. ते सकाळी सहा ते सात वॉर्मअप घ्यायचे. सात ते साडेआठपर्यंत सराव, नंतर सायंकाळीही सहा ते सात सराव घ्यायचे. त्या वेळी अरुण फाळके, राजा कोचरगावकर अशी काही मंडळी उत्तम टेबल टेनिस खेळायचे. त्यांना पहिला शह बसला तो वैद्य यांच्या मुशीत तयार झालेल्या बॅचच्या रूपाने. हा धक्का इतका मोठा होता, की जुन्या खेळाडूंची सद्दी संपली. त्यामुळे पुढचं दशक वैद्यांच्या खेळाडूंनीच गाजवायला सुरुवात केली. राजा वर्टी, रवींद्र बोडस,  नरेंद्र छाजेड, नंदू दामले, महिलांमध्ये नीता नवाथे असे खेळाडू याच ‘मित्रविहार’मधून पुढे आले. नंदू दामले महाराष्ट्राकडून खेळले. त्यांना भारतीय मानांकनही मिळालं होतं. वैद्यांनी मित्रविहारमध्ये टेबल टेनिस वाढवलाच नाही, तर त्याला आणखी विस्तार दिला. टेबल टेनिसचा दर्जा आणखी वाढवायचा असेल तर मुंबईला जाऊन खेळलं पाहिजे, असा विचार त्यांना साठच्या दशकात मांडला होता. वर्षातून किमान चार सामने तरी मुंबईला जाऊन खेळायला पाहिजे. त्याप्रमाणे ‘मित्रविहार’चे खेळाडू मुंबईतही खेळू लागले. त्यातून त्यांचा खेळ अधिक बहरला. त्यामुळे महाराष्ट्रात नाशिकचा दबदबा निर्माण झाला. 

मोडक यांनी गाजवले टेबल टेनिस

संजय मोडक यांनी नाशिकचा लौकिक आणखी वाढवला. त्यांनी पाच वेळा राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं. नंतर अरविंद वैद्य औरंगाबादला गेले. तेथे ते दैनिक मराठवाडामध्ये नोकरी पत्करली. नंतर ते औरंगाबादलाच स्थायिक झाले. वैद्य नाशिकमधून गेल्यानंतर टेबल टेनिसला काही वर्षे अवकळाच आली. मध्यंतरीची बरीच वर्षे टेबल टेनिस फारसं कोणी खेळलं नाही. नंदू दामले यांच्यानंतर संजय मोडक खेळले. नंदू दामले काही काळ महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षकही होते. त्यांनी काही काळ नााशिकमध्ये प्रशिक्षणही दिलं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. रणजित थत्ते, आताची सायली वाणी असे काही खेळाडू घडले.

ए व बी टीमची रचना

त्या वेळी मुंबईची ए टीम, तर उर्वरित महाराष्ट्राची बी टीम म्हणून ओळखली जात होती. ए टीम म्हणजे उत्तम, तर बी टीम म्हणजे साधारण. गंमत म्हणजे मित्रविहारमध्येही अशीच रचना होती. पत्र्याच्या शेडमधील जे दोन टेबल होते, ते ए व बी या नावाने होते. बी टेबलवर उत्तम खेळला तर ए टेबलवर अशा खेळाडूला खेळण्याची संधी दिली जात होती. त्यामुळे ए टेबलवर येण्यासाठी चुरस असायची. 

साठच्या दशकात नाशिकमध्ये आले होते विदेशी खेळाडू

हॉलची अवस्था तशी फारच वाईट होती. पत्र्याला भोकं होती. तरी इथेच टेबल टेनिस अधिक चांगलं बहरलं. वैद्य यांनी नाशिककरांना टेबल टेनिस पाहायला मिळावं, म्हणून मोठमोठ्या स्पर्धा आयोजित केल्या. वेस्टर्न इंडिया, जिल्हा स्तरावरील स्पर्धा घेतल्या. 66-67 मध्ये नाशिकमध्ये झेकोस्लाव्हाकियाचे खेळाडूं नाशिकमध्ये आले होते. विशेष म्हणजे वैद्य यांनी महाराष्ट्र संघटनेशी बोलून या खेळाडूंना नाशिकमध्ये आणलं होतं. त्या वेळी नाशिकमध्ये कुठलाच उत्तम हॉल नव्हता. मित्रविहारचा तर मुळीच नव्हता. ते तर एक पत्र्याचं शेड होतं. म्हणून एचपीटी महाविद्यालयाच्या ऑडिटोरियम हॉलमध्ये या खेळाडूंना आणलं होतं. लोकं येऊन पाहतील असा प्रशस्त हॉल त्या वेळी नाशिकमध्ये नव्हता.

स्पर्धा पाहण्यासाठी पाच रुपये तिकीट 

त्या काळात म्हणजे साठ-सत्तरच्या दशकात पाच रुपये म्हणजे खूपच होते. विशेष म्हणजे ऑडिटोरियममध्ये वेस्टर्न इंडिया ही राष्ट्रीय स्तरावरची टेबल टेनिस स्पर्धा पहिल्यांदा नाशिकमध्ये वैद्य यांनीच आयोजित केली. देशभरातील खेळाडू या स्पर्धेला हजेरी लावत असत. या स्पर्धेचा खर्च उचलण्यासाठी त्या काळात प्रेक्षकांकडून पाच रुपये तिकीट आकारण्यात येत होतं. ही स्पर्धा नाशिकमध्ये आयोजित करण्यात आली होती. नाशिकमधील ही पहिलीच स्पर्धा होती, ज्या स्पर्धेला तिकीट आकारण्यात आलं होतं. नाशिकमध्ये टेबल टेनिसचा हा वैभवाचा काळ मित्रविहारनेच आणला. मात्र, आज याच मित्रविहारमध्ये टेबल टेनिस नावालाही शिल्लक नाही. वहीच्या पानात मोरपीस जपावं तसा आठवणींतच हा मित्रविहारचा टेबल टेनिस शिल्लक राहिला आहे.

मित्रविहार क्लब Mitra vihar

मित्रविहारमध्ये व्हॉलिबॉलने अस्तित्व टिकवलं…

मित्रविहारचा व्हॉलिबॉल साठच्या दशकापासून आहे. अरुण फाळके, सचिन देसाई, दिवाकर गायकवाड, बळीराम शिंत्रे यांनी मित्रविहारच्या व्हॉलिबॉलला चालना दिली. मित्रविहारमध्ये एके काळी जिल्हा अजिंक्यपद व्हॉलिबॉल स्पर्धा लोकप्रिय होत्या. या स्पर्धेसाठी त्या वेळी एचएएलचा संघ सहभागी व्हायचा. त्यात रशियन खेळाडूंचा सहभाग असायचा. तोही एक आकर्षणाचा विषय होता. व्हॉलिबॉलनंतर टेनिस कोर्टही सुरू झालं.

फाळकेंच्या आठवणीतला मित्रविहार…

अरुण फाळके… आज वयाच्या 85 तही कडक आहेत. वयोमानानुसार थोडं ऐकायला कमी येतं, पण आवाज अजूनही खणखणीत आहे. ते मित्रविहारमध्ये व्हॉलिबॉल खेळायला यायचे. त्या वेळी इथं पत्त्यावाल्यांचाच क्लब होता, असं ते सांगतात. सांगताना त्यांचा स्वर काहीसा संतापी होता. फाळके साधारण 1960 च्या सुमारास मित्रविहारमध्ये आले. 1972 पर्यंत ते मित्रविहारमध्ये रमले. फाळकेंचं मित्रविहारशी नातं तसं घट्ट होतं. नंतर काय कुणास ठाऊक, पण ते काहीसे मित्रविहारवर नाराज आहेत. 1967-68 मध्ये ते या क्लबचे सरचिटणीस होते. सरचिटणीस कसा झालो हे त्यांनाच माहीत, असं ते उद्वेगाने सांगतात. मी मात्र कधीही पत्ते खेळलेलो नाही, यावर जे विशेष जोर देतात. नानासाहेब, पांडे लस्सीचे मालक, सरकारी वकील मनोहर शिंदे, देवळाणकर वकील हे नियमित खेळणारे. आज ही नावं नाशिककरांच्या विस्मरणात गेली असतील. पूर्वी मित्रविहारमध्ये जो बंगला होता त्यात रमी आणि ब्रिजचा खेळ रंगायचा. फाळकेंना ते अजिबात आवडत नव्हतं. तेथे जाण्याचा माझा संबंध फक्त तो कपाटात ठेवलेला व्हॉलिबॉल घेण्यापुरता आणि ठेवण्यापुरता एवढाच होता, असं ते सांगतात. किंग जॉर्ज क्लबवरून मित्रविहार हे नाव कोणी केलं हे फाळकेंनाही माहीत नाही. मित्रविहारमध्ये रमी हा पैशांवर खूप चालायचा. ब्रिज खेळणारे त्या वेळीही कमीच होते. अगदी सात-आठ जण खेळायचे. मित्रविहारचा संपूर्ण कारभारच रमीवर चालायचा.

टेबल टेनिसचा फसलेला हॉल

फाळकेंचा राग 60 च्या दशकातील मित्रविहारच्या (Mitravihar Club) कारभारावर होता. ते म्हणतात, त्यांचा वार्षिक सर्वसाधारण सभा खेळखंडोबासारखी असायची. त्यांचा रस पत्ते खेळण्यातच खूप. त्यांना मतदान, निवडणूक याच्याशी काहीही घेणंदेणं नव्हतं. त्यांना बाहेरच्या कोणत्याही गोष्टीशी काहीही देणंघेणं नव्हतं. तुम्ही फक्त आम्हाला खेळू द्या, असा त्या वेळच्या कार्यकारिणीचा आग्रह असायचा. फाळके यांनी टेबल टेनिसचा एक किस्सा सांगितला…त्या वेळी त्यांच्याकडे पैसे आले म्हणून टेबल टेनिसचा हॉल बांधण्याचा निर्णय झाला. चला मग एक टेबल घेऊया. किती असतो तो टेबल.. 9 बाय 4.5 फूट. चला मग पंधरा फुटाचा हॉल बांधू. त्या वेळच्या कार्यकारिणीचं इतर खेळांविषयी ज्ञान होतं, यावर फाळकेंनी बोट ठेवलं. फाळके उद्वेगाने म्हणाले, त्यांच्या बापजन्मात टेबल टेनिस कधी पाहिलेला नव्हता. मात्र त्यांचा जोशी नावाचा एक आर्किटेक्ट होता. त्याने हा हॉल त्यांच्या पद्धतीने बांधला. एवढ्याशा हॉलमध्ये टेबल टेनिस बसूच शकत नव्हता हे त्यांना कळत नव्हतं. त्यांना कोण सांगणार.. ती मंडळी म्हणायची, जोशींना माहितीये सगळं… मग हॉल तर बांधला, पण उपयोग काही झाला नाही. कारण टेबल टेनिसचा टेबलच काही तिथे बसला नाही. फाळकेंसह इतर मंडळी त्या हॉलला उपहासाने ‘पाकिस्तान’ म्हणायचे. तो हॉल ‘पाकिस्तान’ आणि पत्ते खेळण्याचा जनरल क्लब.

त्या वेळी मित्रविहारला कुंपण होतं. व्हॉलिबॉलची दोन कोर्ट होती. आम्ही श्रमदान करून तेथे टेनिस कोर्ट बांधलं. तेथे एक चौकोन छान होता. चारही बाजूंनी गारवेल होती. मध्ये बसण्यासाठी लोड, गाद्या, पांढरी चादर होती. तेथे जयराम नावाचा एक शिपाई होता. तो त्या वेलीवर पाणी मारायचा. त्यामुळे उन्हाळ्यातही छान गारवा जाणवायचा. खाली पांढरी चादर बसायला होती. फार छान वाटायचं, ही आठवणही फाळके नमूद करतात. ‘पाकिस्तान’च्या समोरच ही जागा होती. या पाकिस्तानमध्ये नंतर पत्ते सुरू झाले. हा पाकिस्तान समजून सांगताना फाळकेंनी आकृती काढून दाखवली. त्यातून त्यांनी टेबल टेनिसचा हॉल फारच लहान होता हे समजून सांगितलं. ती आकृती त्यांनी हाताने काढलेली होती. मी ती संगणकावर फाळकेंनी जशी आकृती काढली तशीच चितारली आहे. त्या वेळी मित्रविहारमध्ये हजार- हजार रुपयांची देवाणघेवाण व्हायची. साठ-सत्तरच्या दशकात ही फारच मोठी रक्कम होती. मला काही मित्रविहारची धोरणं काही पटली नाही. जवळच मामा दामले राहायचे. त्यांनाही त्रास व्हायचा. ते तक्रार करायचे. मित्रविहार पत्त्यांसाठी ठीक आहे, इथं पंडित वकील खेळायला यायचे. हे पंडित वकील म्हणजे अरविंद पंडित व डॉ. सुभाष पंडित यांचे वडील. त्यांना सामाजिक कार्यात खूप रस होता. आम्ही खेळायचो तेव्हा ते बाकावर येऊन आमचा खेळ बघायचे. बरोबरीच्या नात्याने ते वागवायचे. पण पत्तेबाजांना त्याच्याशी काहीही घेणंदेणं नाही. निवडणूक आली, की काय किती पाहिजे, तीन हजार का… हं हे घ्या. झालं का… हं आता काढा पत्ते… असं ते चालायचं. ही सगळी परिस्थिती 60-70 च्या दशकातील.

आज काय चालतं, हे फाळकेंना माहीत नाही. मात्र, ते म्हणतात, की मी जर तेथे गेलो तर मला कोणीही ओळखणार नाही. मी नंतर मित्रविहारमध्ये पाऊल ठेवलेलं नाही. मी 72 मध्ये मित्रविहार सोडलं. त्या वेळी एकाही गृहस्थाने म्हंटलं नाही, की का रे बाबा का चालला आहेस… काय कारण आहे… एकानेही विचारलं नाही. जाताय तर जा… असा त्या मंडळींचा अॅप्रोच होता. तेथे जुगाराशिवाय कशाशीही देणंघेणं नाही. मी नंतर नाशिक जिमखान्यात गेलो. तेथे अनेक बदल केले. नाशिक जिमखान्याचा बॅडमिंटन हॉल आम्ही बांधला, असे फाळके आवर्जून नमूद करतात. मित्रविहारविषयी फाळकेंचा राग साठ-सत्तरच्या दशकातला. मित्रविहारने कोणत्याही खेळाला त्या वेळी तरी काहीही मदत केली नाही. आता केली असेल तर मला माहीत नाही. मात्र मी होतो तोपर्यंत तरी काहीही मदत केलेली नाही. मात्र ब्रिज त्यांनी चांगला जोपासला. त्याच्या स्पर्धा घेतात. व्हॉलिबॉलच्याही स्पर्धा ते दरवर्षी घेत होते. व्हॉलिबॉल खेळायला मिलिटरीचे लोक यायचे. बाकीचे फार कोणी येत नव्हतं. अॅड. नानासाहेब प्रधान यांच्याकडेच सगळी व्यवस्था असायची. जनूभाऊ कोतवाल आता 95 चे. त्यांचाही मित्रविहारशी जवळचा संबंध होता. इतर मंडळी कुठे आहेत सांगता येणार नाही… मित्रविहारमध्ये लॉन उत्तम होतं. आता काहीही नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

शंभर वर्षांच्या या प्रवासात मित्रविहारमध्ये व्यक्तीनिहाय अनेक आठवणी आहेत. या आठवणींची फुले ओंजळीत आता मावत नाहीत.. 

Follow us

मित्रविहार क्लब Mitra vihar मित्रविहार क्लब Mitra vihar मित्रविहार क्लब Mitra vihar मित्रविहार क्लब Mitra vihar मित्रविहार क्लब Mitra vihar मित्रविहार क्लब Mitra vihar

तुमच्याकडेही मित्रविहारच्या काही आठवणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला अवश्य कळवा…

हेही वाचा...

साहसी, प्रेरणादायी- ग्लेन कनिंघम (Glenn Cunningham)
All Sports

साहसी, प्रेरणादायी- ग्लेन कनिंघम (Glenn Cunningham)

December 24, 2022
लिस हार्टेल
All Sports

लिस हार्टेल- एका डॅनिश महिलेची ‘घोडदौड’

October 20, 2022
सोव्हिएत संघ आणि अमेरिका या दोन राष्ट्रांतील शीतयुद्ध आणि क्रीडा क्षेत्र
All Sports

सोव्हिएत संघ आणि अमेरिका या दोन राष्ट्रांतील शीतयुद्ध आणि क्रीडा क्षेत्र

May 6, 2022
19 वर्षांखालील क्रिकेट वर्ल्डकप भारताने असा जिंकला
All Sports

पाचव्यांदा विजेता- 19 वर्षांखालील क्रिकेट वर्ल्डकप भारताने असा जिंकला

February 12, 2022
Tags: Mitravihar Clubमित्रविहार क्लब नाशिक
Mahesh Pathade

Mahesh Pathade

Next Post
Olympic-athletics-India

यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये तरी अॅथलेटिक्समध्ये मिळणार का भारताला पदक?

Comments 4

  1. RAVINDRA CHHAGANRAO NAIK says:
    2 years ago

    Great historical sport information
    Thanks …

    Reply
    • Mahesh Pathade says:
      2 years ago

      🙂

      Reply
  2. सरला देशमाने says:
    2 years ago

    मित्रविहार याविषयी अतिशय सखोल माहिती वाचायला मिळाली.खूपच सुंदर लेखन

    Reply
    • Mahesh Pathade says:
      2 years ago

      thank you 🙂

      Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

CONTENT

  • All Sports
  • Women Sports
  • Cricket
  • Tennis
  • Environment
  • Jagjit Singh Gazal
  • Online Chess

INFORMATION

  • Sports History
  • About Us
  • Sports Quiz
  • Inspirational Sports Story

LEGAL

  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Contact
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Home
  • About US
  • Gallery
  • Contact

© 2020 Kheliyad Copyright © 2020 Website The "kheliyad" is not responsible for the content of external sites.

No Result
View All Result
  • Home
  • Cricket
  • All Sports
  • Inspirational story
  • Online Chess Puzzle
  • Raanwata
  • Video
  • sports quiz

© 2020 Kheliyad Copyright © 2020 Website The "kheliyad" is not responsible for the content of external sites.

error: Content is protected !!