All SportsSports HistoryTokyo Olympic 2020

सोव्हिएत संघ आणि अमेरिका या दोन राष्ट्रांतील शीतयुद्ध आणि क्रीडा क्षेत्र

सोव्हिएत संघ (आताचा रशिया) आणि अमेरिका या दोन राष्ट्रांतील शीतयुद्ध संपूर्ण विश्वाने अनुभवलं. त्याचे परिणाम अनेक क्षेत्रांना भोगावे लागले असं म्हंटलं तर चूक ठरणार नाही. त्याला क्रीडा क्षेत्रही अपवाद ठरले नाही. अमेरिकेतील स्पर्धांवर सोव्हिएत युनियनच्या गटाचा बहिष्कार, तर सोव्हिएत युनियनच्या स्पर्धांवर अमेरिकेच्या गटांचा बहिष्कार… यातच क्रीडा क्षेत्र भरडलं गेलं. आजही (2022) परिस्थिती पुन्हा त्याच वळणावर येऊन ठेपली आहे. रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्याने पुन्हा रशिया आणि अमेरिका यांच्यात बहिष्कारसत्र सुरू झालं आहे. रशियाच्या खेळाडूंना विम्बल्डनमध्ये खेळू न देण्याच्या निर्णयाचा नोव्हाक जोकोविचने कडाडून विरोध केला. एवढेच नाही, तर त्याने या स्पर्धेत न खेळण्याचा इशारा दिला आहे. त्याला इतरही खेळाडूंनी समर्थन दिले आहे. त्यामुळेच शीतयुद्धाची धग आता नव्या वळणावर येऊन ठेपली आहे.

शीतयुद्धाचा काळ 12 मार्च 1947 ते 26 डिसेंबर 1991 दरम्यान होता. नव्वदच्या दशकानंतर अनेक बदल झाले. सोव्हिएत युनियनही पूर्वीसारखा अखंड राहिला नाही. त्याची अनेक शकले उडाली. त्यापैकीच एक म्हणजे युक्रेन. रशियाच्या अंकित राहिलेला युक्रेन अमेरिकेकडे झुकला. रशिया आणि युक्रेनमधील युद्धाची ठिणगी इथेच पडली आणि अमेरिका आणि रशियातील संबंध आणखी ताणले गेले. या दोन्ही देशांनी आपला प्रभाव असलेल्या देशांवर ‘इमोशनल ब्लॅकमेलिंग’ सुरू केलं आहे. काही देशांना इशारेही मिळाले हा भाग अलाहिदा. त्याचे पडसाद आता क्रीडा क्षेत्रावरही उमटू लागले आहेत.

शीतयुद्ध काळात सोव्हिएत संघाची क्रीडा क्षेत्रातली प्रगती कशी झाली?

सोव्हिएत संघ आणि अमेरिका या दोन राष्ट्रांतील शीतयुद्ध क्रीडा क्षेत्रात अनेक बदल घडविण्यास कारणीभूत ठरलं. ऑलिम्पिक खेळात त्याचे पडसाद प्रकर्षाने पाहायला मिळाले. तसं पाहिलं तर सोव्हिएत संघ दोन जागतिक महायुद्धांदरम्यान झालेल्या ऑलिम्पिक खेळांमध्ये कुठेही नव्हता. 1948 मध्ये लंडन ऑलिम्पिकमध्ये सोव्हिएत संघाला आमंत्रित करण्यात आलं. त्या वेळी सोव्हिएत संघाचे अध्यक्ष होते जोसेफ स्टॅलिन. स्टॅलिनने हे आमंत्रण नाकारलं. कारण त्यांना वाटतं होतं, की आपले खेळाडू जागतिक दर्जाचे नाहीत. अर्थात, अमेरिका आणि सोव्हिएत संघ या दोन महासत्ता उदयास येत असताना क्रीडाभूमीत त्या आमनेसामने येण्यासाठी 1952 साल उजाडलं. मॉस्कोने त्यासाठी पुढाकार घेत 1952 च्या हेलसिंकी (फिनलंड) ऑलिम्पिकची तयारी सुरू केली. पहिली ऑलिम्पिक स्पर्धा सोव्हिएत संघासाठी उभारी देणारी ठरली. हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये सोव्हिएत संघाचं 300 खेळाडूंचं पथक सहभागी झालं होतं. त्यांनी 22 सुवर्णपदकांसह तब्बल 71 पदकांची लयलूट केली.

सोव्हिएत संघाचा आत्मविश्वास दुणावला होता. मॉस्कोने आता 1956 च्या हिवाळी ऑलिम्पिकवर लक्ष केंद्रित केलं. त्यामुळे अमेरिकेसह पश्चिमेतील देशांसमोर सोव्हिएत संघाने कडवे आव्हान उभे केले. इटलीमध्ये 1956 मध्ये झालेल्या हिवाळी ऑलिम्पिकमध्ये सोव्हिएत संघाने 16 पदके जिंकली. सोव्हिएत संघाने उन्हाळी ऑलिम्पिकमध्येही पदकांच्या यादी अव्वल स्थान मिळवले. ऑस्ट्रेलियातील मेलबर्न ऑलिम्पिकमध्ये सोव्हिएत संघाने 37 सुवर्णपदकांसह 98 पदके जिंकली. ऑलिम्पिकच्या इतिहासात एवढी पदकं अद्याप कोणत्याही एका राष्ट्राने जिंकलेली नव्हती. अमेरिकेने एका ऑलिम्पिकमध्ये 78 (32 सुवर्ण) पदके जिंकली होती. हा विक्रम सोव्हिएत संघाने मोडीत काढला. सोव्हिएत संघ केवढा आनंदित झाला असेल याची कल्पना करता येणार नाही. त्या वेळी निकिता ख्रुश्चेव सरकारची सत्ता होती. सोव्हिएत संघाचे खेळाडू मेलबर्नवरून जेव्हा मायदेशी परतले तेव्हा ते राष्ट्रीय हिरो झाले होते. त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. 17 जणांना तर ‘ऑर्डर ऑफ लेनिन’ या सर्वांत प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं.

खेळात गुंतवणूक वाढली

ऑलिम्पिक जिंकणं म्हणजे जगावर वर्चस्व मिळवणं ही धारणा त्या वेळी अनेक देशांमध्ये झाली होती. सोव्हिएत संघाने तर जग जिंकल्याच्या अविर्भावात खेळाकडे आणखी लक्ष केंद्रित केलं. ऑलिम्पिकमध्ये यशस्वी होण्यासाठी खेळाडूंवर वारेमाप खर्च केला. जो राष्ट्रीय, विश्वविक्रम प्रस्थापित करेल त्याला रोख रकमेचं, तसेच महत्त्वाचे पुरस्कार देण्याचं जाहीर करण्यात आलं. क्रीडा सुविधा, मोठमोठ्या अकादमी, प्रशिक्षण आणि सराव शिबिरांवर भर देत सोव्हिएत संघाने भरपूर पैसा ओतला. 1960 ते 1980 दरम्यान सोव्हिएत संघाने क्रीडा क्षेत्रातील पायाभूत सुविधांवर प्रचंड खर्च केला. स्टेडियम आणि जलतरण तलावांची संख्या दुपटीने वाढवली. तब्बल 60,000 जिम्नॅशिअम हॉल बांधले. याचा परिणाम असा झाला, की माध्यमांनी यशस्वी खेळाडूंना जास्तीत जास्त कव्हरेज देण्यास सुरुवात केली. त्यामुळे सामान्य माणसालाही खेळाकडे वळण्यास प्रोत्साहित करण्यात आलं. शाळेत तर खेळ अनिवार्यच करण्यात आले. उत्तम खेळाडूंचा शोध घेतला जाऊ लागला. त्यांना सरकारी खर्चातून प्रशिक्षण दिले जाऊ लागले. शिष्यवृत्त्या दिल्या जाऊ लागल्या. शीतयुद्धाच्या काळात सोव्हिएत संघ अनेक आंतरराष्ट्रीय क्रीडा महासंघांच्या स्पर्धांत सहभागी होऊ लागला. सोव्हिएत संघाचे क्रीडाकौशल्य विकसित होत गेले. बास्केटबॉल, व्हॉलिबॉल, फुटबॉल हे खेळ सोव्हिएत संघात फारसे लोकप्रिय नव्हते. मात्र, या खेळांतही सोव्हिएत संघाने प्रगती केली. अमेरिका आणि सोव्हिएत संघ या दोन राष्ट्रांतील शीतयुद्ध काहीअंशी खेळांना चालना देऊन गेलं. विशेषतः युरोप खंडातील क्रीडाकौशल्य विकसित होण्यास पूरक ठरलं.

पूर्व जर्मनी

सोव्हिएत युनियनपाठोपाठ इतर कम्युनिस्ट देशांनीही खेळात गुंतवणूक वाढवली. पूर्व जर्मनीही त्याला अपवाद नव्हता. पूर्व जर्मनीने क्रीडाकौशल्य विकसित करण्यावर अधिक भर दिला. त्यामागची प्रेरणा म्हणजे पश्चिम जर्मनीशी असलेली वाढती स्पर्धा. खरं तर हे दोन्ही देश वेगळे नव्हतेच. मात्र, पूर्व जर्मनीचे सत्ताधीश पश्चिमेचा द्वेष करण्यातच धन्यता मानू लागले. या जर्मनीच्या विभागणीला अधिकृत मान्यता नव्हती. 1948 च्या ऑलिम्पिकमध्ये दोन्ही जर्मनी सहभागी होऊ शकले नाहीत. 1952 च्या ऑलिम्पिकमध्ये जर्मनीला संधी होती. मात्र, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (IOC) पूर्व आणि पश्चिम या दोन जर्मनीऐवजी एकच अखंड जर्मनीला मान्यता दिली. त्यामुळे पूर्व जर्मनीचा सहभाग नाकारत समितीने त्यांच्या सहभागावर बंदी घातली. मेक्सिकोतील 1968 च्या ऑलिम्पिकमध्ये पूर्व जर्मनीने पहिल्यांदा स्वत:चा संघ पाठवला. या ऑलिम्पिकमध्ये पूर्व जर्मनीने 9 सुवर्ण पदकांसह 25 पदके मिळवत पदकतालिकेत पाचवे स्थान मिळवले. 1972 मध्ये पश्चिम जर्मनीने ऑलिम्पिकचे यजमानपद भूषवले. या स्पर्धेत पूर्व जर्मनीने 18 खेळांत सहभाग घेतला. यात 26 सुवर्ण पदकांसह तब्बल 40 पदकं जिंकत पूर्व जर्मनी तिसऱ्या स्थानी राहिली. मात्र, यजमान पश्चिम जर्मनीला केवळ 26 पदकांवर समाधान मानावे लागले. पूर्व जर्मनी फार काही मोठा देश नव्हता. अवघी १६ मिलियन म्हणजे १ कोटी साठ लाख लोकसंख्या. मात्र, तरीही या देशाने 70-80 च्या दशकात ऑलिम्पिकमध्ये यशस्वी देश म्हणून लौकिक मिळवला. विशेषत: अॅथलेटिक्स, जलतरण, रोइंग आणि जिम्नास्टिक हे खेळ या देशात विशेष लोकप्रिय होते. शीतयुद्धाच्या काळात पूर्व जर्मनीने खेळात इतकी प्रगती केली होती, की तीन ऑलिम्पिकमध्ये (1976, 1980, 1988) हा देश पदकतालिकेत सोव्हिएत संघानंतर दुसऱ्या स्थानी होता. 1984 मध्ये लॉस एंजिल्स ऑलिम्पिकवर सोव्हिएत संघ आणि पूर्व जर्मनीने बहिष्कार टाकला होता. हिवाळी ऑलिम्पिकमध्येही पूर्व जर्मनीने कौशल्याची छाप सोडली. ते प्रत्येक वेळी पहिल्या किंवा दुसऱ्याच स्थानी राहिले. असं असलं तरी पूर्व जर्मनीला डोपिंगचे गालबोट लागलेच. पूर्व जर्मनीच्या खेळाडूंवर उत्तेजक द्रव सेवन केल्याचे अनेक आरोप झाले. मात्र, त्यापैकी फारच थोड्या प्रमाणात ते सिद्ध होऊ शकले.

पाण्यातील रक्तपात

सोव्हिएत संघ आणि अमेरिका या दोन राष्ट्रांतील शीतयुद्ध केवळ ऑलिम्पिक बहिष्कारापुरतेच मर्यादित राहिलेले नव्हते, तर ते आणखी टोकदार बनत गेले. 1956 ची मेलबर्न ऑलिम्पिक त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणता येईल. ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्याला अवघे दोन आठवडे शिल्लक असताना सोव्हिएत संघाने हंगेरीवर हल्ला केला. तेथील सुधारणावादी इम्र नेगी सरकार हटविण्यात आलं आणि 2,000 पेक्षा अधिक हंगेरियन निदर्शकांना ठार केले. हा रक्तपात अशा वेळी झाला, ज्या वेळी हंगेरीची वॉटर पोलो टीम काही दिवसांतच उपांत्य फेरीत सोव्हिएत संघाविरुद्ध भिडणार होती. अखेर हा सामना येऊन ठेपला. यात हल्ल्याचे पडसाद उमटलेच. दोन्ही संघांमध्ये लाथाबुक्क्यांनी एकमेकांना डिवचण्यात आले. हा सामना ब्लड इन दि वॉटर म्हणून ऑलिम्पिकच्या इतिहासात काळ्या अक्षरांनी नोंदला गेला. झालं काय, की हंगेरियन संघाने उग्र रणनीती अवलंबत सोव्हिएत संघाला जेरीस आणले. हंगेरीच्या संघाने तब्बल चार गोल नोंदवले. सोव्हिएत संघाला एकही गोल करता आला नाही. त्यामुळे सोव्हिएत संघाच्या खेळाडूंमध्ये हंगेरियनविरुद्ध प्रचंड खदखद होती. अखेरच्या टप्प्यात हंगेरीचा खेळाडू एर्विन झाडोर याच्या डोक्यात सोव्हिएत संघाच्या एका खेळाडूने हल्ला केला. या हल्ल्यात झाडोरच्या डोळ्याजवळ खोच पडली. भळाभळा रक्त वाहू लागले. झाडोर तलावातून बाहेर आला. या हल्ल्यामुळे प्रेक्षकही स्तब्ध झाले. सामना एक मिनिटासाठी थांबविण्यात आला. ही घटना कोणालाही रुचली नव्हती. विशेषतः ऑस्ट्रेलियन प्रेक्षक सोव्हिएत संघाच्या खेळाडूंवर जाम भडकले होते. सोव्हिएत संघाचे खेळाडू तलावातून बाहेर आल्यानंतर संतापलेल्या प्रेक्षकांनी त्यांना बडवलेच, शिवाय त्यांच्यावर थुंकलेही. हंगेरीचा संघ अंतिम फेरीत दाखल झाला आणि युगोस्लाव्हियावर 2-1 ने विजय मिळवत ऑलिम्पिक सुवर्ण पदकावर मोहोर उमटवली. सोव्हिएत संघाला ब्राँझ पदकावर समाधान मानावे लागले.

बास्केटबॉलमधील 1972 चा वाद

ऑलिम्पिकची आणखी एक घटना खेळाला काळिमा फासणारी ठरली. 1972 च्या म्युनिक ऑलिम्पिकमध्ये पुरुष गटात सोव्हिएत संघ आणि अमेरिकादरम्यान बास्केटबॉल सामना होता. शीतयुद्धातल्या या दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांतील सामना वेगळ्या अर्थाने स्मरणीय ठरला. अमेरिकेचा संघ पाहता व्यावसायिक आणि महाविद्यालयीन खेळाडूंचे मिश्रण असल्याने तुलनेने ताकदवान होता. मागच्या सातही ऑलिम्पिकमध्ये अमेरिकेने सुवर्ण पदक जिंकले होते. सोव्हिएतचा संघही अमेरिकेच्या तुल्यबळच होता. ऑलिम्पिक रौप्य पदक आणि युरोपियन स्पर्धेचे विजेतेपद त्यांच्याकडे होते. म्युनिक ऑलिम्पिकमध्ये हे दोन्ही संघ वेगवेगळ्या ग्रुपमध्ये होते. या दोन्ही संघांनी उपांत्य फेरीत आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करीत अंतिम फेरी गाठली. सोव्हिएत संघाने क्युबाला, तर अमेरिकेने इटलीला उपांत्य फेरीत पराभूत केले. या सामन्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. हे दोन्ही देश तगडे आव्हानवीर होतेच, शिवाय राजकीय रस्सीखेचीतही या दोन्ही देशांमध्ये नेहमीच टकरा पाहायला मिळाल्या आहेत. त्यामुळे जगभरातला मीडिया या सामन्याकडे लक्ष ठेवून होता. सामना सुरू झाला. दबाव खेळाडूंवरच नव्हता, तर या सामन्याचे पंच कमालीचे तणावाखाली होते. सुरुवातीपासून सोव्हिएतचा संघ एका गुणाने आघाडीवर होता. मात्र, अखेरच्या टप्प्यात अमेरिकेने एका गुणाने आघाडी घेत विजय मिळवला नि अमेरिकी गोटात प्रचंड जल्लोष पाहायला मिळाला. मात्र, हा आनंद औटघटकेचा ठरला. रेफरी आणि टाइमकीपर यांच्यातील त्रुटी आणि गोंधळामुळे सोव्हिएत संघाला विजयाचा एक शॉट बहाल करण्यात आला. सोव्हिएत संघाने हा सामना 51-50 असा जिंकला. इथंच वादाची ठिणगी पडली. अमेरिकेने आक्षेप घेतला. फायनल शॉटचा निर्णय अयोग्य असल्याचे अमेरिकेचे म्हणणे होते. मात्र, हा आक्षेप निरर्थक ठरल्याने अमेरिकेने आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडे दाद मागितली. त्याचाही फारसा उपयोग झाला नाही. अमेरिकेला पराभव मान्यच नव्हता. त्यामुळेच अमेरिकेने रौप्य पदक स्वीकारण्यास नकार दिला. आता शीतयुद्धाचा काळ लोटून अनेक वर्षे उलटली. अद्याप अमेरिकेने हे पदक स्वीकारलेले नाही.

कॅनडियन-सोव्हिएत वादात आइस हॉकीही

अमेरिका हे एकमेव पाश्चात्त्य राष्ट्र नव्हते, जे सोव्हिएत संघाशी टोकाच्या शत्रुत्वाचा आनंद घेत होते. झालं काय, की 1972 मध्ये कॅनडा आणि सोव्हिएत संघाच्या राजकीय पातळीवर दोन देशांदरम्यान आइस हॉकी मालिकेसाठी पुढाकार घेतला. या मालिकेत आठ सामने निश्चित झाले. त्यापैकी चार कॅनडात, तर चार सामने सोव्हिएत संघात होतील. ही स्पर्धा ठरली सप्टेंबर 1972 मध्ये. या मालिकेला ‘फ्रेंडशिप सीरिज’ (Friendship Series) असे नाव देण्यात आले. पुढे ती ‘समिट सीरिज’ (Summit Series) म्हणून ओळखली जाऊ लागली. क्रीडा मोसमात ही ‘समिट सीरिज’ यशस्वी ठरली होती. पुढे या मालिकेने दर्जा आणखी उंचावला. या मालिकेत कॅनडाने फेव्हरिट म्हणूनच पाऊल ठेवले. मात्र, घरच्या मैदानावर त्यांना सोव्हिएत संघाने धक्का दिला. सोव्हिएत संघाने कॅनडाच्या भूमीवरील चार सामन्यांत 2-1 अशी आघाडी घेतली. जगभरातील मीडियाचं लक्ष या मालिकेने वेधलं गेलं. दोन्ही देशांमध्ये राष्ट्रवादीच्या भावना जागृत झाल्या. मालिका आता वेगळ्या वळणावर जाऊन ठेपली. यात पंचांचे पक्षपाती निर्णय, दोन्ही बाजूंकडून खेळाडूंचे वारंवार हस्तक्षेप यामुळे मालिका ‘फायर क्रॅकर’ झाली. ही मालिका नंतर धसमुसळ्या खेळात रूपांतरित झाली. सहाव्या सामन्यात कॅनडाचा खेळाडू बॉबी क्लार्क याने सोव्हिएतच्या व्हॅलेरी खार्लामोव याला जाणीवपूर्वक धक्का देत घोट्याला फ्रॅक्चर केल्याचा आरोप झाला. अखेर ही मालिका कॅनडाने 4-3 अशी जिंकली. काहीही असो, कॅनडासारख्या मातब्बर संघापुढे सोव्हिएत संघाच्या कौशल्याने सर्वांनाच चकित केले होते.

राजकीय आक्षेप

शीतयुद्धात ऑलिम्पिक खेळ नेहमीच चर्चेत राहिले. राजकीय तक्रारींचा तो हक्काचा आखाडा बनला होता. 1968 मधील मेक्सिको ऑलिम्पिकमधील ही घटना आहे. त्या वेळी सोव्हिएत संघाचे राष्ट्रगीत सुरू असताना झेकोस्लाव्हाकियाची (आताचे चेक रिपब्लिक) जिम्नास्ट खेळाडू वेरा कास्लावस्का हिने चक्क डोके फिरवले. ही कृती जगभर चर्चेचा विषय ठरली. कारण वेरा साधीसुधी खेळाडू नव्हती, तर जागतिक विजेती होती. मात्र, झेकोस्लाव्हाकियातील ती सोव्हिएत संघाच्या कम्युनिझमची टोकाची टीकाकार.

आणखी एक कम्युनिस्ट देश चीन मात्र आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीशी संलग्न नव्हता. त्यामुळे तो 1956 ते 1980 दरम्यान एकाही ऑलिम्पिकमध्ये सहभागी होऊ शकला नाही. 1976 च्या ऑलिम्पिकमध्ये यजमान कॅनडाने दि रिपब्लिक ऑफ चायना (तैवान) या देशाचे सार्वभौमत्व अमान्य केले होते. त्यामुळे रिपब्लिक ऑफ चायनाने या स्पर्धेवर बहिष्कार टाकला. हे बहिष्कारसत्र प्रत्येक ऑलिम्पिकमध्ये सुरूच राहिलं. मात्र, सर्वांत मोठ्या बहिष्काराचं रूप 80 च्या दशकात पाहायला मिळालं. याच दशकात सोव्हिएत संघाने अफगाणिस्तानावर हल्ले सुरू केले होते आणि याच काळात 1980 मध्ये सोव्हिएत संघाच्या मॉस्कोने ऑलिम्पिकचे यजमानपद स्वीकारले. अफगाणिस्तानवरील हल्ल्याचा निषेध करीत अमेरिका व त्यांच्या मित्रदेशांनी या ऑलिम्पिकवर बहिष्कार टाकला. त्यानंतर लगेचच अमेरिकेने दि लिबर्टी बेल क्लासिक या नावाने ‘पर्यायी ऑलिम्पिक’चे आयोजन केले. या स्पर्धेला 29 देशांतील खेळाडूंनी सहभाग नोंदवला. सोव्हिएत संघाने या बहिष्काराची परतफेड 1984 च्या लॉस एंजिल्स ऑलिम्पिकमध्ये केली. सोव्हिएत संघासह 14  देशांनी या ऑलिम्पिकवर बहिष्कार टाकला. त्यानंतर सोव्हिएत संघानेही पर्यायी क्रीडाउत्सव घेतला, ज्याला फ्रेंडशिप गेम्स असे नाव दिले.

पिंग-पाँग डिप्लोमसी

पिंग-पाँग म्हणजे टेबल टेनिस. शीतयुद्धाच्या काळात खेळ संघर्षमय बनत असले तरी रचनात्मक नक्कीच होते. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे अमेरिका-चीनमधील टेबल टेनिस स्पर्धा. या दोन देशांतील संबंध उत्तम व्हावेत म्हणून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. 1971 मध्ये अमेरिकेच्या टेबल टेनिस संघाने जपानला भेट दिली आणि चिनी सदस्यांशीही मैत्री वाढवली. चीनच्या अधिकृत सूत्रांनी सकारात्मक प्रतिसाद देत अमेरिकी संघाला चीनमध्ये येण्याचे आमंत्रण दिले. अमेरिकेने हे आमंत्रण स्वीकारले आणि एप्रिल 1971 मध्ये चीनचा दौरा केला.

या दौऱ्यात प्रदर्शनीय सामना खेळणे आणि काही शहरे आणि वॉल ऑफ चायनाला भेट यांचा समावेश होता. या दौऱ्याकडे जगभरातील मीडियाचे लक्ष लागले होते. या दौऱ्यामागे अर्थातच चिनी नेत्यांची महत्त्वाची भूमिका होती. टेबल टेनिसमुळे परस्परविश्वास आणि सद्भावना ठेवून राजकीय कोंडी फुटणार होती. ही ‘पिंग-पाँग डिप्लोमसी’ यशस्वी ठरली आणि दोन्ही देशांमधील उच्चस्तरीय बैठकींचा मार्ग मोकळा झाला. या दोन्ही देशांमध्ये सामंजस्य प्रस्थापित झाले. यानंतर तीन महिन्यांनी अमेरिकेचे सेक्रेटरी हेन्री किसिंजर (Henry Kissinger) चीन दौऱ्यावर आले आणि त्यांनी चीनचे नेते आणि कम्युनिस्ट क्रांतिकारी झोयू एनलाय (Zhou Enlai) यांच्याशी गुफ्तगू केली. किंसिंजर यांच्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी फेब्रुवारी 1972 मध्ये बीजिंगला भेट दिली, तसेच त्यांनी माओ-त्से-तुंग (माओ झेडाँग) यांची भेट घेतली. चीनने नंतर संयुक्त राष्ट्रसंघाचं सदस्यत्व स्वीकारलं. त्यानंतर बीजिंग आणि वॉशिंग्टनदरम्यानचे राजकीय संभाषण पुन्हा सुरू झाले.

सद्भावना खेळ 

शीतयुद्धातील जखमा भरण्यासाठी सद्भभावना खेळाची (Goodwill Games) मलमपट्टी कामी येऊ लागली, असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. अमेरिकेचा ब्रॉडकास्टर टेड टर्नर आणि त्याची कंपनी टाइम वॉर्नरने या सद्भावना खेळाची रुजवात घातली. ऑलिम्पिकवरील बहिष्कारामुळे जी कटुता निर्माण झाली, ती कमी करण्याच्या उद्देशाने 1980 ते 1984 दरम्यान सद्भावना खेळांना (Goodwill Games) चालना दिली.

पहिला सद्भावना खेळ मॉस्कोमध्ये जुलै 1986 मध्ये आयोजित करण्यात आला. या स्पर्धेत 79 देशांतील तब्बल 3,000 खेळाडूंनी सहभाग नोंदवला. खेळाच्या मैदानावर आणि बाहेर या दोन्ही पातळ्यांवर ही यशस्वी सुरुवात होती. असं असलं तरी कटुता काही पातळ्यांवर राहिलीच. म्हणजे राजकीय मुद्द्यांशिवाय घेतलेल्या या स्पर्धेत मॉस्कोने इस्रायल आणि दक्षिण कोरियावर मात्र बंदी घातली. त्यानंतर आणखी चार सद्भावना खेळ झाले. सिएटल (1990), सेंट पीटर्सबर्ग (1994), न्यूयॉर्क (1998), ब्रिस्बेन (2001) येथे या स्पर्धा झाल्या. या सद्भावना खेळांना पुढे भविष्य राहिले नाही. त्याची कारणे म्हणजे टीव्हीवरील या स्पर्धांकडे फिरवलेली पाठ (घटता टीआरपी), खेळाडूंचे संपलेले आकर्षण, सोव्हिएत संघ दुभंगल्याने शीतयुद्धाची समाप्ती आणि आंतरराष्ट्रीय संबंधात झालेली कमालीची सुधारणा यामुळे सद्भावना खेळाचा उद्देशही संपुष्टात आला. मात्र, या गुडविल गेम्समध्ये टर्नरचे लाखो डॉलरचे नुकसान झाले. या नुकसानीचा टर्नरला जराही खेद वाटला नाही. उलट त्याचा दावा आहे, की हे सद्भावना खेळच शीतयुद्धातली धग कमी करण्यास महत्त्वपूर्ण ठरले.

शीतयुद्धातील महत्त्वाच्या बाबी…

  1. शीतयुद्धाच्या काळात अनेक राष्ट्रांनी खेळाचा वापर राजकीय किंवा वैचारिक हेतूंसाठीच केला. उदाहरणार्थ, इतरांपेक्षा आम्हीच कसे श्रेष्ठ याचे प्रदर्शन केले.
  2. 1940 मध्ये सोव्हिएत संघाने क्रीडा क्षेत्रात भरीव आर्थिक तरतूद केली. पायाभूत सुविधा, गुणवंत खेळाडूंचा शोध, अत्याधुनिक प्रशिक्षण यंत्रणा उभारली.
  3. अमेरिकेने पहिल्या दोन ऑलिम्पिकमध्ये खेळाडूंवर मोठा निधी खर्च केला. पूर्व जर्मनीनेही तोच कित्ता गिरवला. त्यामुळेच 1970 मध्ये पूर्व जर्मनी ऑलिम्पिकमध्ये यशस्वी देश ठरला.
  4. शीतयुद्धाने ऑलिम्पिकमध्ये वाद आणि संघर्षात आणखी तेल ओतले. 1956 च्या मेलबर्न ऑलिम्पिकमध्ये सोव्हिएत संघ आणि हंगेरी यांच्यातील ‘ब्लड इन दि वॉटर’ सामना त्याचंच द्योतक.

काही प्रश्न

अमेरिका आणि सोव्हिएत संघ या दोन राष्ट्रांतील शीतयुद्ध ऑलिम्पिकसाठी तारक ठरले की मारक?

सोव्हिएत संघ आणि अमेरिका या दोन राष्ट्रांतील शीतयुद्ध ऑलिम्पिक खेळात कशा प्रकारे प्रतिबिंबित झाले?

शीतकालीन ऑलिम्पिक आणि चीन | Winter Olympics and China

Follow us

[jnews_block_9 first_title=”More read at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”60,95″]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!