All SportsCricketSports Historysports news

क्रिकेट इतिहासातील विद्रोही दौरे

क्रिकेट इतिहासातील विद्रोही दौरे

1982 ते 1990 दरम्यान दक्षिण आफ्रिका वर्णभेद आणि त्यानंतर सात देशांनी केलेल्या बंडखोर दौऱ्यांनी चर्चेत आला. ते क्रीडाविश्वात विद्रोही क्रिकेट दौरे म्हणून ओळखले गेले. काय होते हे विद्रोही क्रिकेट दौरे?

आंतरराष्ट्रीय स्तरावर बंदी घातल्यानंतरही या काळात ज्या देशांनी दौरे केले, त्या देशांतील खेळाडूंनाही कारवाईला सामोरे जावे लागले. यात अनेक क्रिकेटपटूंची कारकीर्दच संपुष्टात आली. हे दौरे त्या वेळी वादाच्या भोवऱ्यात सापडले. संपूर्ण क्रीडाविश्वात हा संवेदनशील विषय बनला होता. विद्रोही क्रिकेट दौरे समजून घेताना त्यामागचा काळा इतिहासही समजून घेणे आवश्यक आहे.

दक्षिण आफ्रिकेला 1964 च्या ऑलिम्पिकमध्ये बहिष्काराला सामोरे जावे लागले. अगदी 1968 मधील डी’ओलिव्हेरा प्रकरणापर्यंत दक्षिण आफ्रिकेला वर्णद्वेषाने पोखरले होते. केवळ गोऱ्यांनाच आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळण्याची परवानगी होती. दक्षिण आफ्रिकेत 1948 पासून वर्णद्वेष पराकोटीला गेला होता.

दक्षिण आफ्रिकेत प्रत्येक क्षेत्रात वर्णभेद स्पष्टपणे दिसत होता. क्रीडाविश्वातही गोऱ्यांशिवाय कुणालाच प्रवेश नव्हता. त्यामुळेच 1971 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध क्रीडा बहिष्काराचे अभियानच सुरू झाले. दक्षिण आफ्रिका जागतिक स्पर्धांत विटाळ ठरला. त्यांना ऑलिम्पिक, फिफा वर्ल्डकप, कसोटी क्रिकेट आणि इतर अनेक खेळांपासून बहिष्कृत करण्यात आलं.

या बहिष्काराचा परिणाम असा झाला, की दक्षिण आफ्रिकेच्या क्रीडा धोरणात हळूहळू बदल जाणवू लागले. विशेषत: क्रिकेटमध्ये. 1976 मध्ये मिश्र वर्णांच्या लोकांचा, गुणवत्तेवर आधारलेला दक्षिण आफ्रिकन क्रिकेट संघ (एसएसीयू) स्थापन करण्यात आला. मात्र, ही वरवरची मलमपट्टी ठरली. गोऱ्यांच्या मनातून कृष्णवर्णीयांविषयीची घृणा तशीच होती. कारण केवळ क्रिकेटमध्ये बदल घडवून दक्षिण आफ्रिका समानतेच्या वाटेवर आलाय, असं अजिबात नव्हतं. जोपर्यंत दक्षिण आफ्रिकेत सर्वांना समान न्याय मिळत नाही तोपर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावर हा देश पूर्णतः स्वीकारला जाणार नव्हता. म्हणूनच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्थान मिळविण्यासाठी आफ्रिकेचे प्रयत्न पुरेसे नव्हते.

लोकशाही व्यवस्थेत ‘सामान्य क्रिकेट’वर अनेक अश्वेत लोकांनी नाराजी व्यक्त केली. कारण गोऱ्यांच्या क्रिकेटमध्ये कृष्णवर्णीय, अर्थात अश्वेतांना सहभागी केले तर तो क्रिकेट संघ दुर्बळ समजला जायचा. म्हणजे अश्वेत खेळाडूंविषयीची घृणा गोऱ्यांच्या मनातून पूर्णतः गेलेली नव्हती. म्हणून अश्वेतांनी विशेषतः आशियाई, कॅरेबियन देशांनी या क्रिकेटवर बहिष्कार टाकला.

जोपर्यंत वर्णद्वेष संपुष्टात येत नाही तोपर्यंत भारत, पाकिस्तान आणि वेस्ट इंडीज या आयसीसीसीचे पूर्ण सदस्यत्व असलेल्या देशांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध न खेळण्याचा निर्णय घेतला.

जवळपास एक दशक वेगळा पडलेला दक्षिण आफ्रिका क्रिकेटमध्ये दुर्बळ ठरत होता. या उलट इतर देशांमध्ये विश्वकरंडक आणि जागतिक मालिकांमुळे खेळात क्रांती आणली होती. मात्र, एकटा पडलेला दक्षिण आफ्रिका व्यापारी आणि स्पर्धात्मक पातळीपासून वंचितच राहिला.

आयसीसीचा ब्रिटिश प्रतिनिधी डग इनसोल (Doug Insole) याने 1979 मध्ये ‘एसएसीयू’चे अली बाचर यांना सांगितलं होतं, की “जोपर्यंत वर्णद्वेष संपुष्टात येत नाही, तोपर्यंत दक्षिण आफ्रिकेने जागतिक क्रिकेटमध्ये पुनरागमन करणं विसरावं. हा इशारा दिल्यानंतर दक्षिण आफ्रिका आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून वंचित झाला. ना कुणाचे दौरे, ना दक्षिण आफ्रिकेला दौरे करता येत होते. मात्र अशा नाजूक परिस्थितीत काही देशांनी दक्षिण आफ्रिकेचे दौरे केलेच. हेच ते विद्रोही क्रिकेट दौरे. त्याचे भयंकर परिणाम खेळाडूंना भोगावे लागले. अनेकांची क्रिकेट कारकीर्दच संपुष्टात आली. मात्र, त्याची कोणीही पर्वा केली नाही. विद्रोही क्रिकेट दौरे सुरूच राहिले. श्रीलंकेलाही त्याचे दूरगामी परिणाम भोगावे लागले.

सुरुवातीच्या दौऱ्यांमध्ये माइक प्रॉक्टर, पीटर कर्स्टन यांच्या नेतृत्वाखाली बॅरी रिचर्ड्स, ग्रॅमी पोलॉक, क्लाइव्ह राइस, गॅर्थ ली रोक्स आदी खेळाडूंचा समावेश असलेला संघ स्थानिक स्तरावरच खेळत राहिला. 1990 चं दशक येईपर्यंत यातील अनेक खेळाडू निवृत्त झाले, तर काही निवृत्तीच्या उंबरठ्यावर होते. त्यानंतर हॅन्सी क्रोनिए आणि ॲलन डोनाल्ड यांचं नेतृत्व उभं राहिलं.

80 च्या दशकातील इंग्लंडचा विद्रोही दौरा

विद्रोही क्रिकेट दौरे
विद्रोही क्रिकेट दौरे | दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेलेले हेच ते इंग्लंडचे डर्टी डझन.

ग्रॅहम गूच याच्या नेतृत्वाखालील मार्च 1982 मध्ये इंग्लंड संघाने दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. मात्र, हा दौरा वादाच्या भोवऱ्यात सापडला. ज्या देशावर संपूर्ण जगाने बहिष्कार टाकला, त्या देशाचा दौरा इंग्लंडने आखला होता. इंग्लंडच्या 12 जणांच्या संघात 11 जण कसोटीपटू होते. हा एक महिन्याचा दौरा गुप्तपणे आखण्यात आला होता. जेव्हा इंग्लंडचा संघ जोहान्सबर्गला पोहोचला तेव्हा जगाला कळलं, की इंग्लंड दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आला आहे. ही आयसीसीला मोठी चपराक होती. कारण आयसीसीने बहिष्कार टाकल्यानंतरही इंग्लंडने दौरा करण्याचं धाडस केलं होतं. एक प्रकारे हा विद्रोह होता. त्यामुळे इंग्लंडवर चौफेर टीका सुरू झाली. याशिवाय इंग्लंडचा संघ पत्रकार आणि राजकीय प्रतिनिधींमध्ये तर संतापाचा विषय बनला होता. इंग्लंडमधील संसदेच्या सभागृहात तर इंग्लंड संघाला ‘डर्टी डझन’ संबोधले गेले.

दक्षिण आफ्रिकेतही यापेक्षा वेगळी प्रतिक्रिया नव्हती. मात्र, तिथं सरकार गोऱ्यांचं होतं. दक्षिण आफ्रिका सरकार आणि श्वेत समर्थक वृत्तपत्रांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या पुनरागमनाचं भरभरून स्वागत केलं.

तसं पाहिलं तर दक्षिण आफ्रिकेच्या तुलनेत इंग्लंडचा संघ अनुभवी होता. (वास्तविकपणे टेलर आणि नंतर हम्पेज आणि साइडबॉटम इंग्लंडकडून कधीही कसोटी सामना खेळलेले नव्हते.) अशा संघाला दक्षिण आफ्रिकेने पराभूत केले. दक्षिण आफ्रिका जरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून वंचित असला तरी या देशातलं क्रिकेट उच्च दर्जाचं होतं. त्या वेळी जिमी कूक आणि विन्सेंट व्हॅन डर बिजी यांनी चमकदार खेळी केली होती. माइक प्रॉक्टरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडला व्हाइटवॉश दिला. आफ्रिकेने कसोटी मालिका 1-0, तर वन डे मालिका 3-0 अशी दणदणीत जिंकली.

 गंमत पुढे होती. इंग्लंडचे तीन खेळाडू जखमी झाल्याने नव्या तीन खेळाडूंना पाचारण करण्यात आलं. त्यामुळे बंडखोर खेळाडूंची संख्या 15 झाली. या सर्व 15 खेळाडूंवर आयसीसीने तीन वर्षांची बंदी घातली. म्हणजे तीन वर्षे या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळता आलं नाही. या बंदीमुळे झालं काय, की इंग्लंड संघातील निम्म्या खेळाडूंची क्रिकेट कारकीर्दच संपुष्टात आली. यात जगातला सर्वाधिक कसोटी धावा करणारा जेफ्री बॉयकॉट याचा समावेश होता. लीवर, साइडबॉटम, टेलर, विली आणि लार्किन्स यांना खेळण्याची संधी मिळाली. मात्र, बंदीनंतर ते फार कसोटी सामने खेळू शकले नाहीत. मात्र, गूच आणि एम्बुरे सुदैवी म्हणावे लागेल. बंदीनंतर त्यांना जास्त कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली. नंतर त्यांनी संघाच्या कर्णधारपदाचीही धुरा वाहिली. एम्बुरे 1988 मध्ये दोन कसोटी सामन्यांसाठी कर्णधार होता. अखेरच्या तिसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यासाठी मात्र गूच कर्णधार होता. त्यानंतर गूच याच्याकडेच कर्णधारपद कायम राहिलं. बंदीनंतर एम्बुरेने संघात पुनरागमन केल्यानंतर 1985 पासून तो सातत्याने इंग्लंडकडून खेळला. 

या वादग्रस्त दौऱ्याचं कवित्व संपत नाही, तोच इंग्लंडने 1989 मध्ये पुन्हा दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. हाही दौरा विद्रोहीच ठरला. या संघात एम्बुरे होता. त्यामुळे संघावर आयसीसीने पुन्हा तीन वर्षांची बंदी घालण्यात आली. नंतर एम्बुरेचं संघात पुनरागमन झालं; पण त्याचं संघातलं स्थान पहिल्यासारखं नियमित राहिलं नाही.

हा होता ‘डर्टी डझन’ संघ

ग्रॅहम गूच (कर्णधार), डेनिस ॲमिस, जेफ्री बॉयकॉट, जॉन एम्बुरे, माइक हेंड्रिक, जॉफ हम्पेज, ॲलन नॉट, वेन लार्किन्स, जॉन लीवर, ख्रिस ओल्ड, अमोल्ड साइडबॉटम, लीस टेलर, डेरेक अंडरवूड, पीटर विली, बॉब वूल्मर. (ग्रॅहम डिली सुदैवी म्हणावा लागेल. याचाही संघात समावेश होता. मात्र, दौरा सुरू होण्यापूर्वीच त्याने नाव मागे घेतलं. त्यामुळे तो बंदीपासून बचावला.)

वेस्ट इंडीजचा विद्रोही दौरा (1982-83 आणि 1983-84)

विद्रोही क्रिकेट दौरे
विद्रोही क्रिकेट दौरे | 80 च्या दशकातील कॅरेबियन किंग.

ऐंशीच्या दशकातील वेस्ट इंडीजच्या क्रिकेटची सर कोणत्याच संघाला नव्हती. प्रतिभावान खेळाडूंनी भरलेल्या या वेस्ट इंडीज संघात स्थान मिळविण्यासाठीही चढाओढ असायची.

त्या काळातही वेस्ट इंडीजच्या प्रथमश्रेणी क्रिकेटपटूंना फार काही मोबदला मिळत नव्हता. आजही तीच स्थिती आहे. बर्‍याच जणांना तर ऑफ-सिझनमध्ये काहीच मिळत नव्हतं. मिळालं तरी अनियमित. त्यांना दोन दौऱ्यांसाठी फार फार तर एक लाख ते सव्वा लाख डॉलरच्या दरम्यान मानधन मिळायचं. विंडीजचा संघ इतका मजबूत होता, की क्लाइव्ह लॉइडला लॉरेन्स रोवे, कॉलिस किंग, सिल्व्हेस्टर क्लार्क यांची फारशी गरजही भासत नव्हती. रोवेने त्या वेळी वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डावर नाराजी व्यक्त केली होती. तो म्हणाला होता, की माझ्यासह इतर खेळाडूंनी चांगली कामगिरी करूनही संघात निवड करण्यात आली नव्हती.

दुसरीकडे दक्षिण आफ्रिकाही मजबूत संघ होता. त्या वेळी त्यांना वेस्ट इंडीज वगळता कुणीच आव्हान देऊ शकणारं नव्हतं. आंतरराष्ट्रीय सामन्यांत मात्र आफ्रिकेला कॅरेबियन बेटांची ताकद कळली.

झालं काय, की जो देश दक्षिण आफ्रिकेला वर्णद्वेषी म्हणून हिणवत होता, त्या विंडीजलाच दक्षिण आफ्रिकेचा दौरा का करावासा वाटला हे कोडंच आहे. जोपर्यंत वर्णद्वेष संपत नाही तोपर्यंत आम्ही दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट दौरा करणार नाही, असं म्हणणारा वेस्ट इंडीजचा संघ अचानक कसा बदलला हे त्यांचं त्यांनाच माहीत. मात्र, क्रिकेटमध्ये आमच्यापेक्षा कुणी श्रेष्ठ नाही, ही खुमखुमी असेल कदाचित. कारण दक्षिण आफ्रिका हा एकमेव तुल्यबळ संघ विंडीजला आव्हान देऊ शकणारा होता. त्यामुळे कदाचित विंडीजने दौरा आखला असावा.. असो. 

कारणे काहीही असोत, पण 1982-83 मध्ये हे दोन दिग्गज संघ भिडले. अनौपचारिक आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या चार आठवड्यांच्या मालिकेने या दोन संघांत वरचढ कोण, याचं उत्तरही अनौपचारिकच मिळणार होतं. हिरव्या कोटाला सुवर्णकिनार असलेल्या पेहरावातल्या स्रिंगबोक्स दक्षिण आफ्रिकन संघाने वन डे मालिका 4-2 ने जिंकली, तर कसोटी मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली.

विंडीजच्या धारदार माऱ्यामुळे आफ्रिकेला घालावे लागले हेल्मेट

अर्थात, यामुळे आफ्रिकन संघात आनंदाचे धुमारे फुटले असतीलही. मात्र, वेस्ट इंडीज संघाने दक्षिण आफ्रिकेला घाम फोडला होता एवढं मात्र खरं. कारण वेस्ट इंडीजची खरी ताकद गोलंदाजीत होती. कॉलिन क्रॉफ्टचा संघ प्रमुख चार विश्वविजेत्यांपैकी एक होता. त्यांच्या धारदार गोलंदाजीत क्लार्क, क्रॉफ्ट, स्टीफेन्सन, बर्नार्ड ज्युलियन, एझ्रा मोसले अशी एकापेक्षा एक अस्रे होती. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांमध्ये विंडीजच्या गोलंदाजीची दहशत बसली होती. इतकी, की त्यांनी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदा हेल्मेट परिधान करावे लागले होते.

तरीही वेस्ट इंडीजचा दरारा पहिल्या दौऱ्यात म्हणावा तसा दिसला नाही. यामुळेच कदाचित वेस्ट इंडीजने पुन्हा एक गुप्त दौरा आखला. विंडीजने पुन्हा दक्षिण आफ्रिकेच्या भूमीत पाय ठेवले. पुन्हा क्लार्कनेच गोलंदाजीची धुरा सांभाळली आणि दक्षिण आफ्रिकेचे चार-पाच फलंदाज तंबूत धाडत कसोटी मालिका 2-1 अशी खिशात घातली. 

वेस्ट इंडीजने वन-डे मालिकेतही दणका देत 4-2 असा दणदणीत विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेची दुबळी बाजू या दोन मालिकांमुळे समोर आली. अर्थात, दक्षिण आफ्रिकेचा अगदीच वाईट पराभव झाला नाही. तसेही त्यांचे अनेक शिलेदार निवृत्तीच्या उंबरठ्यावर पोहोचले होते. तरीही विंडीजला टक्कर दिली हेही नसे थोडके. आफ्रिकेचे बॅरी रिचर्ड्स आणि व्हिन्स व्हॅन डर बिज 1983 मध्ये निवृत्त झाले, तर माइक प्रॉक्टर वयाच्या 36 व्या वर्षी विंडीजविरुद्धच्या दोन्ही दौऱ्यांत केवळ एकच वन-डे सामना खेळू शकला. हेन्री फोदरिंघम, केन मॅकवान, रुपर्ट हॅन्ले, डेव्ह रिचर्डसन आणि मँडी याचड यांनी दक्षिण आफ्रिकेच्या संघात पदार्पण केले. 

वनडे मालिका गमावल्याने पीटर कर्स्टनला कर्णधारपदावरून हटवण्यात आले. त्याच्याऐवजी क्लाइव्ह राइस याच्याकडे तिसऱ्या आणि चौथ्या कसोटी सामन्यासाठी कर्णधारपद सोपविण्यात आले. कर्स्टनने संघातलं आपलं स्थान कायम राखलं आणि पुढच्याच सामन्यात त्याने सर्वाधिक धावा केल्या. दोन्ही दौऱ्यांदरम्यान ग्रॅहम गूच वेस्ट इंडीजविरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या प्रांतीय संघाकडून खेळला.

दक्षिण आफ्रिका मैदानावर प्रगती करीत असला तरी मैदानाबाहेर याउलट परिस्थिती होती. दक्षिण आफ्रिकेत गृहयुद्ध पेटलं. कारण पीडब्लू बोथाच्या जुलमी सरकारने बहुसंख्य कृष्णवर्णीय नागरिकांवर दडपशाही सुरू केली. नव्या ‘बहु-वांशिक’ संसदेपासून त्यांना वंचित ठेवले. अशा परिस्थितीत वेस्ट इंडीज संघाने दक्षिण आफ्रिकेचा दौरा केल्याने चौफेर टीका सुरू झाली.

अखेर 1983 मध्ये वेस्ट इंडीज संघातील खेळाडूंवर आजीवन बंदी घालण्यात आली. एवढेच नाही, तर विंडीजच्या खेळाडूंना सामाजिक आणि व्यावसायिक बहिष्कारालाही सामोरे जावं लागलं.

हा दौरा एवढा अंगलट आला असताना खेळाडूंनी उफराटं मत मांडलं. म्हणाले, “दक्षिण आफ्रिकेत आमचं कृष्णवर्णीय आणि गोऱ्यांनी उत्स्फूर्त स्वागत केलं. दौर्‍याचा दोघांमधील संबंधांवर सकारात्मक प्रभाव पडला असावा.” अर्थात, ही दुर्मिळ घटना होती, जेथे काळे आणि गोरे एकमेकांविरुद्ध खेळले होते.

1989 मध्ये खेळाडूंवरील बंदी मागे घेण्यात आली. मात्र, त्याचा खेळाडूंना फार काही फायदा मिळाला नाही. तत्पूर्वीच अनेक जण निवृत्त झाले होते. मोसेले हा वेस्ट इंडीजकडून खेळणारा एकमेव खेळाडू होता. त्या वेळी त्याचं वय होतं 32 वर्षे. 1989-90 मध्ये घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत तो खेळला खरा, पण फार काही विकेट मिळवू शकला नाही. मात्र, इंग्लंडचा कर्णधार ग्रॅहम गूच याला त्याने जायबंदी केलं होतं. गूच याचा हात फ्रॅक्चर झाल्याने त्याला मालिकेपासून मुकावे लागले.

दक्षिण आफ्रिकेतील प्रथमश्रेणी आणि इंग्लंडच्या स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये वेस्ट इंडीजचे फ्रँकलिन स्टीफन्सन आणि क्लार्क प्रचंड यशस्वी ठरले. एवढं करूनही स्टीफन्सन मात्र दुर्दैवीच ठरला. त्याला कसोटी सामन्यासाठी विंडीजच्या संघात संधी मिळू शकली नाही. याउलट मोसेलेची इंग्लिश कौंटीतली कामगिरी यथातथाच होती. तरीही त्याला संघात संधी मिळाली. या सगळ्या घटनाक्रमात दक्षिण आफ्रिका दौरा विंडीजच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून गेला. बरीच टीका झाली आणि हा दौरा विंडीजसाठी एक जखम करून गेला, जी सतत चिघळत राहिली.

विंडीजचा 1982-83 चा संघ

लॉरेन्स रोवे (कर्णधार), रिचर्ड ऑस्टिन, हर्बर्ट चँग, सिल्व्हेस्टर क्लार्क, कॉलिन क्रॉफ, आल्विन ग्रीन्ज, बर्नार्ड ज्युलिअन, आल्विन कालिचरण, कॉलिस किंग, एझ्रा मोसेले, डेव्हिड मरे, डेरिक पॅरी, फ्रँकलिन स्टीफन्सन, एमर्सन ट्रॉटमन, रे विंटर, अल्बर्ट पद्मोरे. (अल्बर्ट पद्मोरे हा खेळाडूही होता आणि संघ व्यवस्थापकही)

विंडीजचा 1983-84 चा संघ

लॉरेन्स रोवे (कर्णधार), हार्टली अॅलिन, फौड बॅचुस, सिल्व्हेस्टर क्लार्क, कॉलिन क्रॉफ, आल्विन ग्रीन्ज, बर्नार्ड ज्युलिअन, आल्विन कालिचरण, कॉलिस किंग, माँटे लिंच, एव्हर्टन मॅटिस, एझ्रा मोसेले, डेव्हिड मरे, डेरिक पॅरी, फ्रँकलिन स्टीफन्सन, एमर्सन ट्रॉटमन, रे अल्बर्ट पद्मोरे. (अल्बर्ट पद्मोरे हा खेळाडूही होता आणि संघ व्यवस्थापकही)

ऑस्ट्रेलियन संघ ठरला देशद्रोही (1985-86 आणि 1986-87)

ऐंशीच्या दशकात कांगारूंचाही दक्षिण आफ्रिका दौरा वेदनादायीच म्हणावा लागेल. किम ह्यजेसच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाच्या संघाने कसोटी मालिका खेळली. दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला व्हाइटवॉश देत मालिका खिशात घातली. या संघात कसोटी स्तरावर ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अनेक चांगल्या खेळाडूंना वंचित ठेवलं. 

वेगवान गोलंदाज टेरी ॲल्डेमन, रॉडनी हॉग, कार्ल रॅकेमन, फिरकी गोलंदाज ट्रेव्हर होन्स, टॉम होगन, सलामीचा फलंदाज जॉन डायसन, स्टीव स्मिथ यांची उणीव प्रकर्षाने जाणवली. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान बॉब हॉक यांनी तर या संघाला ‘देशद्रोही’च म्हंटलं. हा दौरा ‘ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट इतिहासातील सर्वांत वेदनादायी क्षण’ असल्याचे ते म्हणाले.

ह्युजेसने तर थेट ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डावरच आरोप केले. बोर्डाने खेळाडूंमध्ये असंतोषाचे बीज पेरत विद्रोही दौऱ्यासाठी संघात सामील केले, अशी टीका ह्युजेसने केली.

ह्युजेस 1988 मध्ये ‘शेफिल्ड शील्ड’ या प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये परतला; मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेट तो पुन्हा खेळू शकला नाही. त्यामुळे तो नताल या दक्षिण आफ्रिकेतील प्रथमश्रेणी संघात परतला. नंतर 1989 मध्ये सुरू झालेल्या मालिकेत अल्डेमन, होन्स आणि रॅकेमन यांना ऑस्ट्रेलिया संघाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. केपलर वेसल्स याची जन्मभूमी दक्षिण आफ्रिका, मात्र खेळला ऑस्ट्रेलियाकडून. त्याचं कारण म्हणजे दक्षिण आफ्रिकेवर क्रीडा बहिष्कार. आंतरराष्ट्रीय खेळच बंद असल्याने केपलर वेसल्स याने ऑस्ट्रेलियाकडून खेळण्याचा निर्णय घेतला. नंतर बंदी उठल्यानंतर तो दक्षिण आफ्रिकेकडूनही खेळला. विश्वातला तो पहिलाच खेळाडू आहे, जो दोन देशांकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला. (The Crying Game)

ऑस्ट्रेलियाचा पहिला दक्षिण आफ्रिका दौरा 1985-86 मध्ये झाला. त्या वेळी ह्युज पेज आणि कॉरी व्हॅन झिल या दोन गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिका संघात पदार्पण केलं. ऑस्ट्रेलियाने 1986-87 मध्ये केलेल्या दुसऱ्या दौऱ्यात फलंदाज ब्रायन व्हिटफिल्ड आणि फिरकी गोलंदाज ओमर हेन्री यांचा संघात समावेश झाला. ओमर हेन्री हा दुसरा अश्वेत खेळाडू, ज्याने दक्षिण आफ्रिका संघात स्थान मिळवलं. याच काळात अष्टपैली ब्रायन मॅकमिलन आणि वेगवान गोलंदाज अॅलन डोनाल्ड यांनी संघात पदार्पण केलं. केपलर वेसल्स ऑस्ट्रेलियाकडून दुसऱ्या दौऱ्यात खेळला होता.

दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलिया संघाची पिसं काढली. कारण दोन्ही कसोटी मालिकांबरोबरच, वन-डे व प्रकाशझोतातील मालिकाही त्यांनी खिशात घातली. मात्र, वर्णद्वेष या देशातून अजूनही हद्दपार झालेला नव्हता. या दौऱ्याला निधी दिला जात नव्हता. तरीही दक्षिण आफ्रिकेत क्रिकेट सामने होतच राहिले. ऑस्ट्रेलियाचे दोन विद्रोही क्रिकेट दौरे क्रीडाविश्वात चर्चेत आले, तरीही त्याचा बोध इतर देशांनी घेतला नाही. आयसीसीने बंदी घालण्याच्या कारवाईची कुणीही पर्वा केली नाही. त्यामुळे विद्रोही क्रिकेट दौरे थांबले नाहीत. भारत मात्र आपल्या भूमिकेवर ठाम राहिला. त्याने मात्र दक्षिण आफ्रिकेचा दौरा प्रकर्षाने टाळला.

ऑस्ट्रेलिया संघ (1985-86)

किम ह्युजेस (कर्णधार), टेरी अॅल्डेमन, जॉन डायसन, पीटर फोकनर, माइक हेसमन, टॉम होगन, रोडनी हॉग, ट्रेव्हर होन्स, जॉन मग्वायर, रॉड मॅककर्डी, कार्ल रॅकेमन, स्टीव्ह रिक्सन, ग्रेग शिपर्ड, स्टीव्ह स्मिथ, मिक टेलर, ग्रॅहम यालोप.

ऑस्ट्रेलिया संघ (1986-87)

किम ह्युजेस (कर्णधार), टेरी अॅल्डेमन, जॉन डायसन, पीटर फोकनर, माइक हेसमन, टॉम होगन, रोडनी हॉग, ट्रेव्हर होन्स, जॉन मग्वायर, रॉड मॅककर्डी, कार्ल रॅकेमन, स्टीव्ह रिक्सन, ग्रेग शिपर्ड, स्टीव्ह स्मिथ, मिक टेलर, केपलर व्हेसल्स, ग्रॅहम यालोप.

90 च्या दशकात इंग्लंडचा पुन्हा दौरा

साधारण आठ वर्षांनी 1990 मध्ये इंग्लंडने पुन्हा दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. या वेळी परिस्थिती वेगळी होती. दक्षिण आफ्रिकेतली वर्णद्वेषी सत्ता संपुष्टात आली होती. मात्र, तरीही या संघाला टीकेला सामोरे जावे लागले. अल्पसंख्य गोऱ्यांनी मात्र इंग्लंडचं दणक्यात स्वागत केलं. संघाचं नेतृत्व होतं इंग्लंडचा माजी कर्णधार माइक गॅटिंगकडे. संघात इंग्लंडच्या माजी आणि समकालीन खेळाडूंचा समावेश होता. फलंदाज टिम रॉबिन्सन, बिल एथे आणि ख्रिस ब्रॉड, यष्टिरक्षक ब्रुस फ्रेंच आणि वेगवान गोलंदाज पॉल जार्विस, ग्राहम डिली आणि नील फोस्टर यांचा समावेश होता.

या वेळच्या बंडखोर दौऱ्यात इंग्लंडने गृहीत धरलं होतं, की फार फार तर तीन वर्षांच्या बंदीला सामोरं जावं लागेल. कारण 1982 मध्ये संघाने तशीही निर्बंधाची फळे भोगली आहेत. 1989 च्या उन्हाळ्यात या दौऱ्याचा खुलासा झाल्यानंतर ब्रिटिश पत्रकार परिषदेत खेळाडूंवर प्रश्नांचा भडीमार झाला. तिकडे दक्षिण आफ्रिकेतील स्थितीही बिघडलेली होती. सरकारविरुद्ध प्रचंड आक्रोश होता.

इंग्लंडचं दक्षिण आफ्रिकेतील आगमन तसं अप्रासंगिकच होतं. कारण सरकारविरोधी आंदोलन तीव्र झालं होतं. या दौऱ्याने या आंदोलनाला आणखी धार चढली. आंदोलन आता इंग्लंड दौऱ्याविरुद्ध सुरू झालं. त्यामुळे राष्ट्राध्यक्ष एफडब्लू डी क्लार्क यांच्याविरुद्धच्या निदर्शनांवर एकदोन आठवड्यांची विश्रांती मिळाली.

आफ्रिकेत सुरुवातीपासून क्रिकेट गौण होतं. इंग्लंड संघ विमानाने जोहान्सबर्गला उतरल्यानंतर आंदोलनाला जोर चढला. या आगीत माइक गॅटिंगने आणखी तेल ओतले. तो खोचकपणे म्हणाला, “काही लोक गाणे म्हणत होते, नृत्य करीत होते. तसंच होतं.” गॅटिंगचाच सहकारी जॉन एम्बुरी जो दोन्ही विद्रोही दौऱ्यांत होता, तो म्हणाला, “लोकांमध्ये कसं बोलायचं याचं गॅटला भान नसतं.”

एवढं सगळं सुरू असतानाही इंग्लंड संघाला हा दौरा सामान्य होईल असंच वाटत होतं. मात्र, दुसऱ्या दिवशी जाणवलं, की आपण दुसऱ्याच पृथ्वीतलावर आलो आहोत. झालं काय, की ते ज्या हॉटेलमध्ये उतरले होते, त्या हॉटेलमधील कृष्णवर्णीय कर्मचाऱ्यांनी संघाला सेवा देण्यास स्पष्टपणे नकार दिला. एका हॉटेलमध्येही अशाच प्रकाराला सामोरं जावं लागलं. गॅटिंगने अखेर हॉटेलच्या किचनमध्ये जाऊन स्वत:च स्वयंपाक केला. मॅथ्यू मायनार्ड गमतीने म्हणाला, की “नशिबाने भाज्या चांगल्या शिजल्या होत्या. गॅटने जुन्या शेफच्या टोपीला हात लावला आणि मी अॅलन वेल्स आणि पॉल जार्विससह टेबलवर त्याची वाट पाहत बसलो होतो.”

दोन्ही संघ अशा भूमीवर खेळत होते, जेथे वर्णद्वेषाविरुद्ध लढे तीव्र झाले होते. दक्षिण आफ्रिकेचा यष्टिरक्षक ब्रुस फ्रेंचने किम्बर्ली येथील सुरुवातीच्या सामन्यातला आपला अनुभव सांगितला. मैदानाबाहेरील दंगलीच्या गोंधळात सामना सुरू होता. तो म्हणाला, “आम्ही बाहेर पाहिलं तर धुळीचे लोट आसमंतात उठले होते. हळूहळू बाहेरील गोंधळ स्पष्टपणे कानी ऐकू येऊ लागला. ‘उम्बा उम्बा’चा आवाज करीत जमाव मैदानात घुसला.”

विद्रोही क्रिकेट दौरे
विद्रोही क्रिकेट दौरे |इंग्लंड संघाविरुद्ध आंदोलन करताना दक्षिण आफ्रिकेचे नागरिक. या वेळी माइक गॅटिंग चले जावच्या घोषणाही देण्यात आल्या.

पुढचा सामना ब्लोएमफाँतेनमध्ये झाला. या वेळी गॅटिंग पुन्हा चर्चेत आला. मात्र, या वेळी या चर्चेला तोंड देण्यास गॅटिंग सक्षम नव्हता. जेव्हा आंदोलकांनी त्याला त्याला बोलावले, तेव्हा पोलिसांनी गर्दी पांगवण्यासाठी अश्रुधूर आणि रबराच्या गोळ्यांचा मारा केला. जेव्हा गॅटिंग पत्रकारांसमोर असताना एका निदर्शकाने (जॉन सोगोनीको त्याचं नाव) शर्ट वर करून पाठीवरचे वळ दाखवले. पोलिसांनी मात्र आपली बाजू झटकत लाठीमार केला नसल्याचा दावा केला. त्या वेळी गॅटिंग म्हणाला होता, की “या घटनेशी आमचा काहीही संबंध नाही. मैदानाबाहेर घडणाऱ्या कोणत्याही घटनेशी आम्हाला जबाबदार ठरवलं जाऊ शकत नाही.”

पिटर्समेरिट्झबर्गमध्ये तीन फेब्रुवारी रोजी गॅटिंगने मैदानाबाहेर सुमारे चार हजार संतप्त जमावात जाऊन त्यांचं म्हणणं ऐकण्याचं धाडस केलं. मात्र, परतताना त्याच्यावर दगडफेक झाली. कोकचे रिकामे डबे फेकण्यात आले. अर्थात तंबूत परतताना त्याने झपझप पावले टाकली हेही तितकंच खरं.

माजी खेळाडू व प्रशासक अली बाचर या घटनेचा अनुभव सांगताना म्हणाला, “मला वाटलं, की आता गॅटिंगचं काही खरं नाही.”

“मला पहिल्यांदा जाणवलं, की दौरा केवळ शांतिपूर्ण असेल. कारण जर निदर्शने होत असते तर त्या लोकांना जेलमध्ये टाकण्यात आलं असतं.” ड्रेसिंग रूममध्ये पोहोचल्यानंतर गॅटिंगने टोपी उचलली आणि मोठ्या आवाजात म्हणाला, “चला मित्रांनो, आपण निघूया.” आणि आपल्या खेळाडूंना पुन्हा मैदानात आणले.

धक्कादायक म्हणजे, क्रिकेट दौऱ्याच्या अहवालात मात्र निषेधाचा उल्लेख टाळत ‘सर्वत्र छळ’ झाल्याचा उल्लेख नमूद करण्यात आला. मात्र पुढे एक हास्यास्पद टिपणी जोडण्यात आली, की गॅटिंग क्रिकेटप्रेमींमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे.”

पाच दिवसांच्या आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्याला आठ फेब्रिवारी रोजी सुरुवात झाली. मात्र, तीन दिवसांत इंग्लंड पराभूत झाला. या सामन्यात काळे-गोरे भेद नाही असा आभास निर्माण करण्यात आला. कॅमेऱ्यासमोर बहुवांशिक प्रेक्षक असल्याचे दाखवण्यासाठी शेकडो कृष्णवर्णीयांना बसवण्यात आले होते. मात्र, एका स्थानिक वृत्तपत्राने दिलेल्या बातमीने या दिखाव्याची पोल खुलली. तब्बल दोन हजार निदर्शकांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून पांगवण्यात आल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर हा बनाव उघड झाला.

दौरा अगदीच सुरळीत नव्हता, हे काही घटनांवरून समोर आलं होतं. त्यात आणखी एका घटनेची भर पडली. न्यूलँड्स मैदानाबाहेर 12 फेब्रुवारी रोजी बॉम्बस्फोट झाला. घटना गंभीर होती. चोवीस तासांनी एक घोषणा करण्यात आली, की हा दौरा पंधरवड्याने कमी करण्यात येणार आहे. हा निर्णय गॅटिंगच्या बाजूचा (इंग्लंड संघाचा) सल्ला न घेता घेण्यात आला होता.

अखेर इंग्लंडचा संघ 24 फेब्रुवारी रोजी मायदेशी परतला. दौऱ्यावेळी बाचरने साहसी चेहरा ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोन दशकांनंतर त्याने खरा चेहरा उघड केला. “मी कबूल केले पाहिजे, की त्या दौऱ्यामुळे होणारा संताप आणि वेदना मला माहीत असत्या, तर मी दौऱ्याचा दोनदा विचार केला असता. हा दौरा माझ्यासाठी खूप वेदनादायी होता. मी आयुष्यात उदारमतवादी होतो.”

मेनार्ड म्हणाला, “जे आम्हाला दाखवले गेले होते त्यापेक्षा खूपच वेगळे ते दृश्य होते. अनेक आश्वासने पूर्ण झाली नाहीत.”

या संपूर्ण घटनेच्या केंद्रस्थानी असलेला गॅटिंग या संबंधावर कधीही विस्ताराने बोलला नाही. “मी फक्त एवढंच सांगू शकतो, की हा दक्षिण आफ्रिका दौरा आमच्यासाठी चांगला राहिला,” असे ‘संडे टेलिग्राफ’ला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला. “असं नाही, की त्याच्याशी आमचे काही देणेघेणे नाही. स्पष्टच आहे, की नेल्सन मंडेला एक महान व्यक्ती आहेत.”

दक्षिण आफ्रिका आणि वर्णभेद-1

[jnews_block_9 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”77″]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!