All Sportssports news

इस्रायल-हमास संघर्ष

इस्रायल-हमास संघर्ष टोकाला पोहोचला आहे.इस्रायलच्या हल्ल्यात गाझा पट्टीतील अनेक इमारती बेचिराख झाल्या आहेत. मात्र, यात अनेक निष्पाप नागरिकांचा बळी जात आहे. बालकेही यातून सुटली नाहीत. गंभीर जखमी अवस्थेतील बालकांची अवस्था काळजाचा थरकाप उडविणारी आहे. रक्ताने माखलेल्या या बालकांना उपचारही वेळेत मिळत नसल्याची स्थिती केविलवाणी आहे. कारण हल्ल्यात अनेक रुग्णालये बेचिराख झाली आहेत. छायाचित्रांतून समोर आलेला इस्रायल –  हमास संघर्ष.

मुलीसाठी आईची तगमग

रिकार्डा लौक यांची मुलगी शानी ७ ऑक्टोबरपासून बेपत्ता आहे. रिकार्डा २२ वर्षांची आहे. दक्षिण इस्रायलमध्ये ७ ऑक्टोबर रोजी दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर ती बेपत्ता झाली आहे. हमासच्या दहशतवाद्यांनी मुलीचं अपहरण केल्याचा आरोप रिकार्डा लौक यांनी मंगळवारी, 17 ऑक्टोबर 2023 रोजी केला आहे. रिकार्डा लौक हिच्या समर्थनार्थ नागरिकांनी जर्मनीचे चॅन्सलर ओलाफ शॉल्झ यांनी या प्रकरणात शानीला मदत करावी, अशी मागणी तेल अविव येथील जर्मन दूतावासासमोर करण्यात आली. या वेळी समर्थकांच्या हातात मदतीचे फलक होते. शानी लौक दक्षिण इस्रायलमधील संगीत सोहळ्याला गेली असताना हमासच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यानंतर ती कोणालाच दिसली नाही. हमासने अपहरण केलेले नागरिक सुरक्षित परत येतील, अशी अपेक्षा जगभरातील अनेक नेत्यांनी केली आहे. मात्र, दोन आठवडे उलटले तरी हे नागरिक सुरक्षित आहे किंवा नाही, याची कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

बॉम्बच्या आतषबाजीत विवाहसोहळा

अदिर (Adir) आणि तमार (Tamar) हे राखीव दलातील दोन जवान मंगळवारी, 17 ऑक्टोबर 2023 रोजी विवाह करीत सर्वांना चकित केले. दक्षिण इस्रायलमधील सुरक्षा सैनिकांच्या (आयडीएफ) तळावर हा विवाह सोहळा पार पडला. ते यापूर्वीच विवाहबद्ध होणार होते. मात्र, दहशतवाद्यांच्या हल्ल्यामुळे हे लग्न मंगळवारी पार पडले. अदिर आणि तमार यांची सात वर्षांपासून मैत्री होती. मात्र, दहशतवाद्यांच्या हल्ल्यामुळे या दोघांचे लग्न लांबणीवर पडले. अखेर लष्करी सेवेत दाखल झाल्यानंतर दोघेही एकाच सैन्यतळावर आल्याने दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला आणि मंगळवारी बॉम्ब, रॉकेटहल्ल्याच्या आतषबाजीतच त्यांचं लग्न धडाक्यात पार पडलं.

रक्ताच्या थारोळ्यातही निरागस हास्य

गाझा पट्टीत इस्रायलने केलेल्या हल्ल्यात अनेक लहान मुले जखमी झाली आहेत. रुग्णालयाच्या खाटा कमी पडत असून, रुग्णांवर जमिनीवरच उपचार केले जात आहेत. त्यामुळे रुग्णालयाच्या भिंती, जमीनही रक्ताने माखलेली आहे. मध्य गाझा पट्टीतील अल शिफा रुग्णालयात जखमी अवस्थेतही चिमुकल्याच्या चेहऱ्यावरील हास्य हृदयाला घरे पाडत होतं.

अश्रूंतून रक्ताची ओघळ

मध्य गाझा पट्टीतील अल शिफा रुग्णालयात उपचाराच्या प्रतीक्षेत असलेले मायलेक. इस्रायलच्या हल्ल्यात १७ ऑक्टोबर २०२३ रोजी मायलेक जखमी झाले. आईच्या मांडीवर बसलेल्या या चिमुकल्याच्या चेहऱ्यावरून रक्त ओघळत होतं.. वेदनेने लेकरू रडत होतं. मात्र, हतबल आई त्याचं सांत्वन करून थकल्याअवस्थेत उपचाराच्या प्रतीक्षा करीत होती. गाझा पट्टीतील अनेक रुग्णालये जमीनदोस्त झाली आहेत. एकमेव अल शिफा रुग्णालयाची अवस्था किमान चांगली असून, तेथे उपचारासाठी गंभीर जखमींची प्रचंड गर्दी झाली आहे. फरशीवरच रुग्णांवर उपचार सुरू असून, रक्ताच्या थारोळ्यातील रुग्णांमुळे जमीनही लाल झाली आहे.

[jnews_block_8 first_title=”Read more at…” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”60″]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!