ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत रफाएल नदाल याने रचला इतिहास.. स्पेनचा रफाएल नदाल की रशियाचा दानिल मेदवेदेव… दोघेही इतिहास घडविण्याच्या ईर्षेने 30 जानेवारी 2022 रोजी आमनेसामने उभे ठाकले होते. मात्र, रफाएल नदाल याने ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेचे विजेतेपद मिळवत विक्रमाला गवसणी घातली. त्याने रशियाच्या दानिल मेदवेदेव याचा 2-6, 6-7, 6-4, 6-4, 7-5 असा पराभव केला. ही लढत 5 तास 24 मिनिटे चालली. या जेतेपदामुळे 35 वर्षीय नदाल आता विक्रमी 21 ग्रँडस्लॅम जिंकणारा जगातला एकमेव टेनिस खेळाडू ठरला आहे. त्याने सर्बियाचा नोव्हाक जोकोविच आणि स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर (प्रत्येकी 20 ग्रँडस्लॅम) या दिग्गज टेनिसपटूंना या शर्यतीत मागे टाकले. रशियाचा दानिल मेदवेदेव याचे स्वप्न मात्र भंगले आहे.
करोनालाही हरविले
कारकिर्दीतील पहिली दोन ग्रँडस्लॅम जेतीपदे लागोपाठच्या ग्रँडस्लॅम स्पर्धांमध्ये जिंकण्याचे मेदवेदेव याचे मनसुबे धुळीस मिळाले आहेत. जर तो जिंकला असता तर अशी कामगिरी करणारा तो जगातला पहिलाच टेनिसपटू ठरला असता. याशिवाय 21 ग्रँडस्लॅम विजेतेपदाच्या शर्यतीत आधी जोकोविच आणि मग नदाल अशा धुरिणांना रोखण्याचा पराक्रमही मेदवेदेवच्या नावावर जमा झाला असता. मात्र, आता हिरो नदाल आहे. रफाएल नदाल याने 2009 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर 2022 मध्ये त्याने पुन्हा ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम जिंकले आहे. नदाल 2022 च्या मोसमात अपराजित असणाऱ्या नदालने गुडघ्याच्या प्रदीर्घ दुखापतीवर मात केलीच, पण करोनालाही हरविले. ऑस्ट्रेलियन स्पर्धेत येण्याआधी नदालने अडीचशे गुणांची एटीपी स्पर्धाही जिंकली आहे.
21 वे ऐतिहासिक ग्रँडस्लॅम जेतेपद
अर्थात, नदाल आणि त्याचे 21 वे ऐतिहासिक ग्रँडस्लॅम जेतेपद यामध्ये रशियाचा मेदवेदेव उभा ठाकला होता. नदाल आणि मेदवेदेव यांच्या वयात तब्बल दहा वर्षांचे अंतर. म्हणजे मेदवेदेव नदालपेक्षा दहा वर्षांनी तरुण. गेल्या सप्टेंबर 2021 मध्येच याच मेदवेदेवने जोकोविचचा दुहेरी स्वप्नभंग केला होता. 21 वे ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावण्याचे जोकोविचचे स्वप्न मेदवेदेव याने धुळीस मिळविलेच; पण कॅलेंडर ग्रँडस्लॅम जिंकण्याचे (एकाच मोसमात सगळ्या ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकणे) जोकोविचचे मनसुबेही धुळीस मिळवले होते. आता नदालच्या बाबतीतही मेदवेदेव ‘खलनायक’ ठरणार का, हीच उत्सुकता होती. मात्र, तसे काहीही घडले नाही.
राखेतून फिनिक्स भरारी
स्पर्धा सुरू होण्यापूर्वी टेनिस जाणकार, तज्ज्ञांच्या मते मेदवेदेव हाच फेव्हरिट होता. त्याचे कारण म्हणजे तरुण मेदवेदेवचा फिटनेस दर्जेदार आहे. विशेष म्हणजे त्याचे लक्ष सहसा विचलित होत नाही. तिसरे महत्त्वाचे कारण म्हणजे प्रतिस्पर्धी बडा खेळाडू आहे की नवखा, याचा मेदवेदेव कधीही विचार करीत नाही. मात्र, रफाएल नदाल याने तज्जांचे सगळे आडाखे चुकवले. अनुभव आणि कौशल्य काय असते, याचे धडेच त्याने मेलबर्नच्या कोर्टवर दिले. पहिले दोन सलग सेट गमावल्यानंतर राफा हरला असं प्रेक्षकांनी गृहीतच धरलं होतं. मात्र, राफा राखेतून फिनिक्स भरारी घेणारा स्टार आहे, हे अनेक जण विसरले. त्याची आठवण करून देत नदालने सलग तीन सेट जिंकत मेदवेदेव याचा पराभव केला.
आमनेसामने
5 | जागतिक क्रमवारी | 2 |
35 (3 जुलै 1986) | वय | 25 (11 फेब्रुवारी 1996) |
स्पेन | जन्मस्थळ | रशिया |
6 फूट 1 इंच (185 सेंमी) | उंची | 6 फूट 6 इंच (198 सेंमी) |
85 किलो | वजन | 83 किलो |
डावखुरा | खेळण्याची शैली | उजवा |
दोन्ही हातांनी | बॅकहँड | दोन्ही हातांनी |
2001 | टेनिस पदार्पण | 2014 |
3/0 | वर्षभरात जय/पराजय | 3/1 |
1 | वर्षभरातील जेतीपदे | 0 |
1031/209 | कारकिर्दीत जय/पराजय | 225/100 |
89 | कारकिर्दीतील जेतीपदे | 13 |
$125,050,235 | कारकिर्दीतील बक्षीस रक्कम | $22,126,356 |
रफाएल नदाल याच्याविषयी न ऐकलेल्या गोष्टी
- ऑस्ट्रेलियन ओपन जिंकणारा रफाएल नदाल याचं टोपणनाव राफा आहे.
- रफाएल नदाल जेव्हा लहान होता, तेव्हा तो शाळेला दांडी मारून गोकू (ड्रॅगन बॉल) पाहायला जायचा.
- टेनिस विश्वात 2005 पासून रॉजर फेडरर आणि रफाएल नदाल या दोघांनी आपला दबदबा राखला आहे. दोघांनी मागील दशकात प्रेक्षकांना उत्तम टेनिसने रोमांचित केले आहे.
- रफाएल नदाल याने टेनिस खेळाचे बारकावे काका टोनी नदाल यांच्याकडून शिकले. रफाएल नदाल याने तीन वर्षांचा असतानाच टोनी काकांकडून टेनिसचे धडे शिकण्यास सुरुवात केली
- रफाएल नदाल टेनिस कोर्टवर डाव्या हाताने खेळतो. मात्र, लिहितो उजव्या हाताने. जॉन मॅकेनरो याच्यानंतर नदाल पहिलाच डावखुरा खेळाडू आहे, जो जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावरही राहिला आहे.
Read more : Rafael Nadal Won The French Open 2020
Follow on Facebook Page kheliyad