क्रिकेटमध्ये गोलंदाजाच्या चेंडूचा स्पीड अर्थात वेग कसा मोजतात, असा प्रश्न अनेक क्रिकेटप्रेमींना पडतो. त्यासाठी तांत्रिक मदत घेतली जाते. एखाद्या कारचा वेग मोजावा, तसा गोलंदाजाच्या चेंडूचा स्पीड मोजला जातो.
गोलंदाजाच्या चेंडूचा स्पीड (वेग) मोजण्यासाठी रडार गन किंवा स्पीड गनचा आधार घेतला जातो. या तंत्रज्ञानाचा शोध 1947 मध्ये जॉन बेकर याने लावला होता. स्पीड गन डॉपलर इफेक्टच्या सिद्धान्तावर काम करते. यात एक रिसीव्हर आणि एक ट्रान्समीटर असतो. या माध्यमातून गोलंदाजाच्या चेंडूचा स्पीड (वेग) मोजला जातो. स्पीड गनच्या साइट स्क्रीनजवळ एक उंच स्तंभ उभारलेला असतो. स्पीड गन खेळपट्टीच्या दिशेने रेडिओ तरंग पाठवते. त्यामाध्यमातून खेळपट्टीवर कोणत्याही वस्तूची गणना केली जाते. स्पीड गन अर्था रडार गन रेडिओ तरंगांचा प्रतिध्वनी पकडतो. कारण चेंडू हवेच्या माध्यमातून प्रवास करतो आणि ‘डॉपलर शिफ्ट’ नावाच्या सिद्धान्ताचा यात उपयोग केला जातो.
आता स्पीड गनच्या माध्यमातून जी माहिती मिळते प्रोसेसिंग सॉफ्टवेअरमध्ये अपलोड केली जाते. हे सॉफ्टवेअर इतर वस्तूंमधील चेंडूची ओळख पटवते. त्यातूनच गोलंदाजाच्या चेंडूचा वेग (स्पीड) स्पष्ट होतो.
रडार गन किंवा स्पीड गनचे फायदे काय?
रडार गन (स्पीड गन) चेंडूच्या वेगाची अचूक नोंद घेतो. कारण कोणत्याही त्रुटीशिवाय फिरणाऱ्या चेंडूची गतीची नोंद या माध्यमातून घेतली जाते. |
चेंडू जसा रडार गनच्या समोरून जातो, त्याच वेळी तो चेंडूच्या गतीची नोंद घेतो. याच कारणामुळे कोणताही गोलंदाज जेव्हा चेंडू फेकतो, त्या वेळी त्याच्या वेगाचे विवरण स्क्रीनवर प्रदर्शित होते. |
खरं तर या रडार गन (स्पीड गन) तंत्राचा शोध लॉन टेनिसमधील खेळाडूंची सर्व्हिस मोजण्यासाठी लावण्यात आला होता. क्रिकेटने हेच तंत्रज्ञान घेत 1999 मध्ये त्याचा पहिल्यांदा प्रयोग केला. |
हॉक आय
हॉक आय तंत्रज्ञान एक संगणकप्रणाली आहे. टेनिस, क्रिकेट, फुटबॉल आणि इतर अनेक खेळांमध्ये या तंत्राचा उपयोग केला जातो. हे तंत्र डॉ. पॉल हॉकिन्स या ब्रिटिश नागरिकाने शोधलं आहे. या तंत्राचा उपयोग सर्वप्रथम 2011 मध्ये करण्यात आला होता. हॉक-आय तंत्राचा आविष्कार खरं तर ब्रेन सर्जरी आणि मिसाइल ट्रॅक करण्यासाठी करण्यात आला होता.
हॉक आय तंत्र आपल्या पाच किलोमीटरच्या परिघातील वस्तूची अचूक नोंद घेतो. खेळामध्ये हे विश्वसनीय तंत्र मानलं जातं. हे तंत्र चेंडूची गतीचा डेटा मिळवण्यासाठी सहा कॅमेऱ्यांचा उपयोग करते. हे तंत्र थ्रीडी फॉरमॅटमध्ये चेंडूची गती (स्पीड) आणि दिशा याची माहिती देते. याशिवाय हॉक आयचं आणखी वैशिष्ट्य म्हणजे तिसऱ्या अंपायरला पायचीत (एलबीडब्लू) संबंधित निर्णय देण्यासाठीही हे तंत्र उपयोगात आणलं जातं.
क्रिकेट विश्वातील सर्वांत वेगवान पाच गोलंदाज
शोएब अख्तर (पाकिस्तान) : 161.3 किलोमीटर प्रतितास (100.2 मैल प्रतितास)
रावळपिंडी एक्स्प्रेस म्हणून ओळखला जाणारा पाकिस्तानचा शोएब अख्तर जगातील सर्वांत वेगवान गोलंदाज ठरला आहे. क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी त्याच्या वेगाचा विक्रम अद्याप कोणीही मोडू शकलेला नाही. असं म्हणतात, की शोएब अख्तर वेगाचा राजा होता. 2003 मध्ये शोएब अख्तर याने 100 मैल प्रतितास वेगाने चेंडू फेकला. यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वांत वेगवान गोलंदाजीचा विक्रम त्याच्या नावावर नोंदवला गेला आहे. शोएब अख्तर याने हा विक्रम इंग्लंडविरुद्ध 2003 च्या वर्ल्ड कपमधील एका सामन्यादरम्यान केला होता.
ब्रेट ली (ऑस्ट्रेलिया) : 161.1 किमी प्रतितास (100.1 मैल प्रतितास)

आक्रमक गोलंदाज म्हणून ऑस्ट्रेलियाचा ब्रेट ली याचंही नाव क्रिकेटविश्वात परिचित आहे. त्याची गोलंदाजी भल्याभल्यांना समजत नाही. फलंदाजांमध्ये त्याची गोलंदाजी धडकी भरवणारीही समजली जाते. ब्रेट ली क्रिकेटविश्वातला दुसरा सर्वांत वेगवान गोलंदाज आहे. त्याने न्यूझीलंडविरुद्ध नेपियर येथे वेगवान गोलंदाजी केली होती. एवढेच नाही, तर ने ऑस्ट्रेलियाने 2003 आणि 2007 मध्ये जिंकलेल्या वर्ल्ड कपमध्येही त्याची महत्त्वाची भूमिका होती.
शॉन टेट (ऑस्ट्रेलिया) : 161.1 किमी प्रतितास (100.1 मैल प्रतितास)

'द वाइल्ड थिंग' नावाने ओळखला जाणारा जगातला तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून शॉन टेट याचे नाव घेतले जाते. शॉन टेट कारकिर्दीच्या सुरुवातीलाच घातक यॉर्करसाठी ओळखला जात होता. याच शॉन टेटने 2010 मध्ये शोएब अख्तर आणि ब्रेट ली यांच्यानंतर 100 मैलांचा वेग तोडणारा तिसरा गोलंदाज ठरला होता. टेटने ही कामगिरी लॉर्डसच्या ऐतिहासिक मैदानावर इंग्लंडविरुद्ध एका वनडे सामन्यात केली होती.
जेफ थॉमसन (ऑस्ट्रेलिया) : 160.6 किमी प्रतितास (99.79 मैल प्रतितास)

महान गोलंदाज जेफ थॉमसन याला क्रिकेट इतिहासातील सर्वांत वेगवान गोलंदाज म्हणून ओळखलं जातं. थॉमसन आणि डेनिस लिली या दोघांनी ऑस्ट्रेलियाला अनेक कसोटी सामन्यांत एकतर्फी विजय मिळवून दिले होते. थॉमसन याने टाकलेला 160.6 किमी प्रतितास वेगाचा चेंडू 28 वर्षे जगातील सर्वांत वेगवान चेंडू ठरला होता. थॉमसनने हा वेगवान चेंडू 1975 मध्ये वेस्टइंडीज संघाविरुद्ध फेकला होता. हा विक्रम शोएब अख्तरने मोडीत काढला.
मिशेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया) : 160.4 किमी प्रतितास (99.7 मैल प्रतितास)

मिशेल स्टार्क ऑस्ट्रेलियातील ब्रेट ली आणि शॉन टेट यांच्यापेक्षा वेगळा आहे. टेट आणि ली हे दोघेही उजव्या हाताचे, तर स्टार्क डावखुरा गोलंदाज आहे. स्टार्क लाइन आणि लेंथसाठी ओळखला जातो. स्टार्कने आपल्या कारकिर्दीतली आणि कसोटी सामन्यातील सर्वांत वेगवान गोलंदाजी 2015 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध पर्थमध्ये केली होती.
Follow on Facebook Page kheliyad
गुलाबी चेंडू का वापरतात डे-नाइट क्रिकेट सामन्यात?