All SportsHockeyTokyo Olympic 2020

लंडन ऑलिम्पिक 1948 : स्वतंत्र भारताचा 73 वर्षांपूर्वीचा पहिला सुवर्णगोल…!

स्वतंत्र भारताचा 73 वर्षांपूर्वीचा पहिला सुवर्णगोल…!

Olympic Hockey Flashback 1948 | ऑलिम्पिकच्या इतिहासातलं एक सुवर्णपान असंही आहे, ज्यात भारतीय हॉकीची गौरवगाथा नमूद केलेली आहे. ही घटना आहे 1948 ची. भारत पहिल्यांदाच स्वतंत्र झाला होता. गुलामीच्या बेड्या गळून पडल्या होत्या. पहिल्यांदाच भारत तिरंगा ध्वजाखाली ऑलिम्पिकच्या मैदानात उतरला होता. हा भारतीय संघ होता हॉकीचा.

तसंही भारताने तीन ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. मात्र, त्या वेळी देश स्वतंत्र नव्हता. मात्र 1948 मध्ये भारतीय हॉकी संघाने प्रथमच आपला दबदबा सिद्ध केला. याच खेळातून बलबीरसिंग सीनिअर या नव्या ताऱ्याचा उदय झाला. कालांतराने हेच बलबीरसिंग जगातील 16 महान ऑलिम्पियन खेळाडूंपैकी एक निवडले गेले.

गुलामीची जोखडं झुगारून भारत खंबीरपणे उभा राहिलाच नाही, तर दीर्घकाळ सत्ता गाजवणाऱ्या ब्रिटनलाही चारीमुंड्या चीत केले. वेम्बले स्टेडियममध्ये 25,000 प्रेक्षकांच्या उपस्थितीत भारताने ब्रिटनचा 4-0 असा धुव्वा उडवत सुवर्णपदकावर मोहोर उमटवली. फाळणीच्या जखमांनी होरपळलेल्या भारतीय समाजमनावर या विजयाने काहीअंशी फुंकर घातली.

Olympic Hockey Flashback 1948

15 ऑगस्ट 1947 रोजी भारत इंग्रजाच्या गुलामीतून मुक्त झाला. विशेष म्हणजे वर्षभरानंतर 12 ऑगस्ट 1948 रोजी ब्रिटिशांच्याच भूमीवर ऑलिम्पिकच्या महायुद्धात भारताने दोन हात केले. ब्रिटिशांना त्यांच्याच भमीत पराभूतही केले. ही भारताच्या अदम्य साहसाची, विजिगीषू वृत्तीची आणि झुंजार मनोवृत्तीची एक झलक होती.

Olympic Hockey Flashback 1948 | अंतिम फेरीत चारपैकी दोन गोल बलबीरसिंग सीनिअरनेच डागले होते. अंतिम फेरीत सर्वाधिक गोल करण्याचा विक्रमही बलबीरसिंगने नोंदवला. या विक्रमाबरोबरच हेलसिंकी (1952) आणि मेलबर्नमध्येही (1956) भारताने सुवर्णपदक जिंकले.

1948 च्या ऑलिम्पिकच्या आठवणींना बलबीरसिंग यांनी एका मुलाखतीत उजाळा दिला होता. ते म्हणाले होते, ‘‘जसजसा तिरंगा वर जात होता आणि राष्ट्रगीताची धून कानावर पडताच जणू मी हवेत वर वर जात आहे की काय असे वाटले. माझ्या डोळ्यांतील अश्रू थांबत नव्हते. तो क्षण मी कधीच विसरू शकत नाही. जेव्हा आम्ही इंग्लंडला हरवलं, तेव्हा आमची मान अभिमानाने उंचावली होती.’’

बलबीरसिंग यांची कन्या सुशबीर यांनी सांगितले, की त्यांच्या जीवनात लंडन ऑलिम्पिकचे विशेष स्थान होते. त्या म्हणाल्या, ‘‘बलबीरसिंग लहान होते, तेव्हा त्यांचे वडील स्वातंत्र्यसैनिक होते. त्यामुळे आयुष्यातला बराच काळ त्यांनी जेलमध्येच घालवला. त्या वेळी बलबीरसिंग यांना आश्चर्य वाटायचं. नंतर त्यांनीच आम्हाला सांगितलं, की लंडन ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर जाणवलं, की देश आणि तिरंग्यासाठी वडिलांनी केलेला त्याग किती महत्त्वाचा होता!’’

संघनिवडीचीही कहाणी…

Olympic Hockey Flashback 1948 | लंडन ऑलिम्पिकसाठी संघनिवडीमागेही एक विशेष कहाणी दडलेली आहे. कारण अखंड भारतासाठी खेळणारे नियाज खान, अजीज मलिक, अली शाह दारा आणि शाहरूख मोहम्मदसारखे खेळाडू आता पाकिस्तानच्या संघात सहभागी झाले होते. त्या वेळी भारतीय हॉकी महासंघाचे अध्यक्ष नवल टाटा होते. त्यांनी बॉम्बे संघासाठी सराव सामने आणि शिबिरे घेतली होती.

मेजर ध्यानचंद यांच्या कार्यकाळात ऑलिम्पिक खेळण्यासाठी संघाला समुद्रमार्गे जहाजाने हा लांब पल्ल्याचा प्रवास करावा लागायचा. मात्र, किशन लाल यांच्या नेतृत्वाखालील संघाने स्वातंत्र्यानंतर लंडन ऑलिम्पिकचा प्रवास विमानाने केला. या प्रवासाचा अतिरिक्त खर्च टाटांनी उचलला होता. संघात केडी सिंह बाबू, केशव दत्त, लेस्ली क्लाउडियससारखे दिग्गज खेळाडू होते.

अंतर्गत गटबाजीचा बलबीरसिंगांना फटका

क्रीडा संघाला गटबाजीची कीड त्या वेळीही होतीच. याच अंतर्गत गटबाजीमुळे बलबीर यांना पहिल्यांदा संघात निवडले नाही. मात्र, नंतर त्यांची निवड झाली. ही निवड सार्थ ठरली. कारण नंतर तेच या संघाचा हुकमी एक्का ठरले. ऑस्ट्रियाला तब्बल आठ गोलने पराभूत करीत भारताने शानदार विजयी सलामी दिली. पुढचा सामना अर्जेंटिनाविरुद्ध होता. या सामन्यातही भारताने 9-1 असा दणदणीत विजय मिळवला. यात अर्धा डझन गोल एकट्या बलबीरसिंग यांचेच होते.

या सामन्यानंतर संघात आश्चर्यकारक बदल झाला. पुढचा तिसरा सामना स्पेनविरुद्ध होता. मात्र, या सामन्यात बलबीरसिंग यांना खेळविण्यात आलं नाही. नेदरलँडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यातही बलबीरसिंग यांचं नाव भारतीय संघाच्या यादीत नव्हतं. म्हणजे उपांत्य फेरीतही त्यांना खेळविण्यात आलं नाही.

Olympic Hockey Flashback 1948 | याबाबत सुशबीर यांनी सांगितले, ‘‘लंडनमध्ये शिक्षण घेत असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना हे अजिबात रुचलं नाही. त्यांनी थेट तत्कालीन भारतीय उच्चायुक्त व्ही. के. कृष्णा मेनन यांच्याकडेच धाव घेतली. विद्यार्थ्यांनी उच्चायुक्तांना सांगितलं, की फायनल सामन्यात बलबीरसिंगला ब्रिटनविरुद्ध खेळवा. अखेर बलबीरसिंग यांना अंतिम फेरीत खेळविण्यात आलं.’’

अशा भारतीय संघाने ऑलिम्पिकमध्ये विजेतेपद मिळवले, जो जागतिक हॉकीत पहिल्यांदाच पाऊल ठेवत होता. पाच सामन्यांत भारतीय संघाने फक्त दोन गोल दवडले होते.

स्वतंत्र भारताला हॉकीने दिली सुवर्णभेट

1948 च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताच्या झोळीत एवढेच एक पदक आले होते. इतर क्रीडा प्रकारांत भारताचे हात रिकामेच राहिले. भारताने यापूर्वीही 1928 (अॅम्सटरडॅम), 1932 (लॉस एंजिलिस) आणि 1936 (बर्लिन) मध्ये सुवर्णपदक जिंकले होते. मात्र, तिरंगा ध्वजाखाली लंडनमध्ये जिंकलेल्या पहिल्या विजेतेपदाने भारतीय हॉकीने नवा इतिहास लिहिला. त्यानंतरच्या पुढच्या दोन्ही ऑलिम्पिकमध्येही भारताने सुवर्णपदक जिंकले. भारतीय हॉकीच्या या सुवर्णकाळाची पुनरावृत्ती टोकियो ऑलिम्पिकपासून नव्याने लिहिली जावी, अशी अपेक्षा भारतीयांना आहे.

Follow us

Olympic Hockey Flashback 1948 Olympic Hockey Flashback 1948 Olympic Hockey Flashback 1948 Olympic Hockey Flashback 1948 Olympic Hockey Flashback 1948 Olympic Hockey Flashback 1948

[jnews_block_9 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”94″]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!