All SportsHockey

केशव दत्त नावाचा हॉकी खेळातील अखेरचा सुवर्णस्तंभही ढासळला…

हॉकीचा अखेरचा सुवर्णस्तंभही ढासळला…

भारतीय हॉकी संघाचे माजी खेळाडू केशव दत्त यांचे निधन

ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय हॉकी संघाचे माजी खेळाडू केशव दत्त यांचे वृद्धापकाळाने बुधवारी, 7 जुलै 2021 रोजी निधन झालं. ते 95 वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. भारतीय हॉकीचे सर्वोत्तम हाफ बॅकपैकी केशव दत्त एक होते. बंगभूमीतील 95 वर्षांच्या या अखेरच्या ‘सुवर्णस्तंभा’ने बुधवारी, 7 जुलै 2021 रोजी कोलकात्यातील संतोषपूरमधील आपल्या निवासस्थानी रात्री साडेबारा वाजता अखेरचा श्वास घेतला. त्यांच्याविषयी…

ब्रिटनला हरवून स्वतंत्र भारताला ऑलिम्पिकचं सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या संघातील आणखी एक सुवर्णस्तंभ ढासळला. 1948 च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाचे सदस्य असलेले केशव दत्त यांच्या निधनाने क्रीडाविश्वाला मोठा धक्का बसला आहे.

केशव दत्त यांचा जन्म लाहोरचा. 29 डिसेंबर 1925 रोजी जन्मलेले केशव दत्त 1952 च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्येही खेळले. त्या वेळी ते भारतीय हॉकी संघाचे उपकर्णधार होते. हेलसिंकीतही भारतीय हॉकीने सुवर्णपदक जिंकले. गेल्या वर्षीच बलबीरसिंग सीनियर यांचं निधन झालं. त्यानंतर स्वतंत्र भारताच्या पहिल्या सुवर्णविजेत्या संघातील हयात असलेले केशव दत्त अखेरचे सदस्य होते.

ऑलिम्पिक सुवर्णपदक दोन वेळा जिंकणारे दत्त

ऑलिम्पिक सुवर्णपदक दोन वेळा जिंकणारे केशव दत्त भारतीय हॉकी संघातील उत्तम हॉकीपटूंपैकी एक होते. ब्रिटिशांच्या गुलामगिरीच्या विळख्यातून मुक्त झालेला भारत प्रथमच 1948 च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये तिरंगा ध्वजाखाली खेळत होता. ही लढत होती वेम्बले स्टेडियमवर ब्रिटिशाच्यांच विरुद्ध. भारताने ब्रिटनला त्यांच्याच भूमीत 4-0 असा दणदणीत पराभव करीत ऑलिम्पिकचे सुवर्णपदक जिंकले. हा विजय भारतीय हॉकीच्या सुवर्णयुगाची नांदी होती. त्यानंतर पुढच्या सलग दोन ऑलिम्पिकमध्ये भारताने आपली सुवर्णमोहीम सुरू ठेवली. या दोन्ही ऑलिम्पिकमध्ये दत्त भारतीय संघात होते. हेलसिंकीत 1952 मध्ये भारताने नेदरलँडला 6-1 असे पराभूत करीत सलग पाचवे सुवर्णपदक जिंकले. यापूर्वी मेजर ध्यानचंद यांच्या उमद्या खेळाच्या जोरावर भारताने तीन वेळा सुवर्णपदक जिंकले होते. मात्र, ही तिन्ही सुवर्णपदके जिंकणारा भारतीय हॉकी संघ स्वातंत्र्यापूर्वीचा होता. लंडन ऑलिम्पिकपूर्वी केशव दत्त यांनी ध्यानचंद यांच्या नेतृत्वाखाली पूर्व आफ्रिकेचा दौरा केला.

‘मोहन बागान रत्न’ने गौरव

मेजर ध्यानचंद आणि केडी सिंह बाबू यांच्यासारख्या दिग्गजांकडून केशव दत्त यांनी हॉकीचे धडे गिरवले.  त्यांनी आपलं शिक्षण पश्चिम पंजाब शहरात पूर्ण केलं. त्या वेळी भारत-पाकिस्तान फाळणीही झालेली नव्हती. अखंड भारतातील राष्ट्रीय स्पर्धेत ते पंजाबकडून खेळायचे. फाळणीनंतर ते बॉम्बे (मुंबई) येथे आले. नंतर 1950 मध्ये पुन्हा कोलकात्यात स्थायिक झाले. राष्ट्रीय स्पर्धेत ते बॉम्बे आणि बंगालकडून खेळले आहेत. केशव दत्त यांनी 1951-1953 आणि नंतर 1957-1958 मध्ये मोहन बागानच्या संघाचंही नेतृत्व केलं आहे. त्यांच्या कारकिर्दीतच मोहन बागानने 10 वर्षे हॉकी लीगचा किताब जिंकला. कलकत्ता लीग सहा वेळा, तर बेटन कप तीन वेळा जिंकला आहे. त्यांना 2019 मध्ये ‘मोहन बागान रत्न’ पुरस्कारानेही गौरविण्यात आले. हा पुरस्कार मिळविणारे ते फुटबॉल न खेळणारे पहिलेच खेळाडू होते.

नंतरच्या अनेक पिढ्यांनी हा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न केला. त्यापैकीच एक होते धनराज पिल्ले. ते जेव्हा बेटन कप खेळण्यासाठी कोलकात्याला जायचे, तेव्हा केशव दत्त यांच्याविषयी लोकांचं प्रेम पाहून थक्क व्हायचे. लेस्ली क्लाउडियस (1948 च्या संघातील सदस्य) आणि केशव दत्त यांची मैत्रीही विलक्षण होती. ती दोघं नेहमीच सोबत असायची. धनराज यांना त्यांच्या मैत्रीचं विशेष अप्रूप वाटायचं.

मृदू स्वभावाचे केशव दत्त 

केशव दत्त मृदू स्वभावाचे होते. त्यांना कधीच मोठ्याने बोलताना कुणी पाहिलेलं नाही. कुणाशीही बोलताना ते आरामशीर आणि प्रेमानेच संवाद साधायचे. त्यांनी आपल्या हयातीत एकही वादग्रस्त विधान केलं नाही. संघाची कामगिरी खालावली तर खेळाडूंवर टीकेची झोड उठते. माजी खेळाडू यात नेहमीच पुढे असतात. मात्र, केशव दत्त यांनी अशाप्रसंगी एकही नकारात्मक टिप्पणी केलेली कोणी ऐकलेली नाही. हॉकी महासंघातील वादावर ते म्हणायचे, स्थिती हीच आहे आणि यातच उत्तम खेळायचं, असा सल्ला ते देत असत. धनराज पिल्ले यांना त्यांच्या या स्वभावांचं कमालीचं आश्चर्य वाटायचं. दिलीप तिर्की यांनाही यापेक्षा वेगळा अनुभव नाही. तिर्की यांनी भारतासाठी तीन ऑलिम्पिकसह 412 आंतरराष्ट्रीय सामने खळले आहेत. भारतीय हॉकीच्या सुवर्णकाळातील एक हिरा आम्ही गमावला आहे, अशी भावना तिर्की यांनी व्यक्त केली.

लंडन, हेलसिंकी आणि मेलबर्न ऑलिम्पिकचे (1956) सुवर्णपदक विजेते बलबीरसिंग सीनियर यांचे गेल्या वर्षी निधन झाले. त्यानंतर यंदा भारतीय हॉकीने मॉस्को ऑलिम्पिकचे (1980) सुवर्णपदक विजेते एम. के. कौशिक, मोहम्मद शाहीद, रविंदर पाल सिंहसारखे महान खेळाडू गमावले आहेत.

Follow us

केशव दत्त हॉकी ऑलिम्पिक केशव दत्त हॉकी ऑलिम्पिक केशव दत्त हॉकी ऑलिम्पिक केशव दत्त हॉकी ऑलिम्पिक केशव दत्त हॉकी ऑलिम्पिक केशव दत्त हॉकी ऑलिम्पिक

[jnews_block_9 first_title=”हेही वाचा…” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”94″]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!