रॉजर फेडरर याचा तो अखेरचा सामना…
गेल्या आठवड्यातच (15 सप्टेंबर 2022) टेनिसचा राजा अर्थात रॉजर फेडरर याने निवृत्ती जाहीर केली होती. लेव्हर कप ही त्याची अखेरची स्पर्धा. या स्पर्धेत तो दुहेरीत खेळणार होता. रॉजर फेडरर याचा हाच तो अखेरचा सामना. त्याचा जोडीदार होता स्टार टेनिसपटू रफाएल नदाल. नदालही हलक्या हलक्या पावलांनी निवृत्तीकडेच चाललाय. एरव्ही एकमेकांविरुद्ध ज्या ताकदीने, जिद्दीने खेळले, ती ताकद, जिद्द या वेळी जाणवली नाही. ती जागा एका हळव्या कोपऱ्याने घेतली. गहिवर अनावर होता. या वेळी फोरहँड, बॅकहँडपेक्षा त्याचे निरोपाचे अनामिक ‘परतीचे फटके’ डोळ्यांच्या कडा पाणावून गेले. टेनिस कोर्टवर एकमेकांशी निकराने झुंजणारे रॉजर फेडरर आणि रफाएल नदाल या दोन दिग्गजांचे हे वेगळेच रूप संपूर्ण विश्व 24 सप्टेंबर 2022 च्या त्या रात्री याचि देही याचि डोळा अनुभवत होते. अखेरच्या सामन्यात ही स्टार जोडी हरली… मात्र त्यांना जे अनावर गहिवरून आलं, त्याने टेनिस कोर्टही गलबलून गेला.
कधी काळी बॉलबॉय म्हणून वावरणारा रॉजर फेडरर 25 सप्टेंबरच्या शुक्रवारी स्टार टेनिसपटू म्हणून निवृत्त होत होता. तो अशा कारकिर्दीची अखेर अनुभवत होता, जी पुढच्या पिढीतल्या अनेक खेळाडूंसाठी प्रेरणादायी असेल. मला सर्वांत जास्त भावलं ते रफाएल नदालचं मित्रप्रेम. रॉजर फेडरर आणि रफाएल नदाल दोघेही एकमेकांविरुद्ध किती तरी वेळा आमनेसामने उभे ठाकले असतील, या दोन दिग्गजांतील द्वंद्व मैदानावर इतकं सुरेख भासायचं, की तो टेनिस कोर्ट नव्हे, तर कुठल्या तरी महान नाटकाची रंगमंच भासायचा. राकट भासणाऱ्या नदालचं रूप कोर्टवर मात्र अनोखं होतं. रॉजर फेडररच्या डोळ्यांतून अश्रू घळाघळा वाहत होते, तेव्हा नदाललाही गहिवरून आलं. दोघे ढसाढसा रडले. जवळच उभ्या असलेल्या नोव्हाक जोकोविचलाही गहिवरून आलं.
या निरोपाच्या सामन्यासाठी लंडनच्या ‘ओटू अॅरेना’ खचाखच भरलेले होते. त्या प्रेक्षकांनीही हुंदके दिले. अनेक चाहते तर ढसाढसा रडले. हा निरोप एका ‘दिग्विजयी’ टेनिस राजाचा होता. पुन्हा कोर्टवर या राजाला आपण पाहू शकणार नाही, हीच प्रजेला वाटणारी रुखरुख अश्रूंवाटे मोकळी करून दिली. फेडररच्या कारकिर्दीतला हा अविस्मरणीय ‘सेंडऑफ’ होता. किती तरी दिग्गजांनी टेनिस कोर्ट गाजवले. मात्र, इतका भावनिक सेंडऑफ मला नाही वाटत, फेडररशिवाय कुणाच्या वाट्याला आला असेल.
स्वित्झर्लंडचा महान टेनिसपटू रॉजर फेडरर 25 सप्टेंबरच्या रात्री लेव्हर कप स्पर्धेत कारकिर्दीतील अखेरचा सामना स्पेनच्या रफाएल नदालच्या साथीने खेळला. जागतिक संघाच्या फ्रान्सिस टियाफो व जॅक सॉक या जोडीने फेडरर-नदाल जोडीचा 4-6, 7-6 (2), 11-9 असा पराभव केला. मात्र, नदाल आणि फेडररने प्रेक्षकांची मने जिंकल्याने पराभव खूपच दुय्यम ठरला. मुळात इथं जय-पराजयाची कोणालाही उत्सुकता नव्हती. सगळ्यांच्या नजरा केवळ आणि केवळ फेडररकडे होत्या. सामना संपला आणि अखेरचा तो भावनिक क्लायमॅक्स आला. फेडररने दीर्घकाळचा प्रतिस्पर्धी आणि जीवलग मित्र रफाएल नदाल याला आलिंगन दिलं. त्यानंतर टियाफो आणि सॉक यांचीही भेट घेतली. ही वेळ होती निरोपाची. एका महान टेनिससम्राटाने राजप्रासाद त्यागावा तसा हा क्षण होता. समोर प्रेक्षक होते, कुटुंबीय होते… त्यांच्याकडे पाहिलं तेव्हा फेडररचा भावनांचा बांध फुटला… अश्रू घळाघळा वाहू लागले. केवढा हा ऋणानुबंध! थोडाथोडका नव्हे, तर तब्बल वीस वर्षांपेक्षा जास्त काळ तो प्रेक्षकांच्या मनात बसला होता. एक असं अनोखं नातं तो विणून गेला, की ते ना प्रेक्षकांना कळलं, ना फेडररला. संवेदनशील मनाचा फेडरर इथं भावूक झाला.
सामन्यानंतर लेव्हर कप स्पर्धेत खेळणाऱ्या युरोपीय आणि जागतिक संघामधील खेळाडूंनी फेडररला खांद्यावर उचलून घेतलं. हा अखेरचा सामना पाहण्यासाठी होते, वडील रॉबर्ट, आई लिनेट, पत्नी मिर्का आणि त्याची मुले. युरोपीय संघाबरोबर छायाचित्र काढण्याची वेळ आली त्या वेळी तर फेडररचा हात हातात दाबून नदालच रडायला लागला. या दोघांचे हे छायाचित्र क्षणात व्हायरल झाले. जगभरातील अनेक खेळाडू आणि सेलिब्रिटींनी या दोन महान टेनिसपटूंच्या भावनिक नात्याचे तोंडभरून कौतुक केले. ‘स्पोर्टिंग स्पिरिट’ नेमकं काय असतं, हे फेडरर आणि नदालच्या या क्षणातून उलगडतं..
- 20 एकूण ग्रँडस्लॅम
- 103 एकूण विजेतीपदे
- 08 विम्बलडन
- 06 ऑस्ट्रेलियन ओपन
- 05 अमेरिकन ओपन
- 01 फ्रेंच ओपन
रॉजर फेडरर याने वसूल केलेले संस्मरणीय गुण
#रॉजर-फेडरर-अखेरचा-सामना