ऑस्ट्रेलियाचे माजी यष्टिरक्षक रोड मार्श (Rod Marsh) यांचे शुक्रवारी, 4 मार्च 2022 रोजी सकाळी निधन झाले. ते 74 वर्षांचे होते. आठवडाभरापूर्वी क्वीन्सलँड येथे एका धार्मिक कामासाठी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता.
रोड मार्श (Rod Marsh) यांच्या मागे तीन मुलगे आहेत. त्यापैकी डेन स्थानिक क्रिकेटमध्ये खेळला आहे. त्याच्या नेतृत्वाखालील तस्मानिया संघाने शेफील्ड शील्ड या सर्वांत प्रतिष्ठेच्या स्थानिक क्रिकेटचे विजेतेपद जिंकले. वेगवान गोलंदाज डेनिस लिली यांच्यासोबत मार्श यांची जोडी कायम लक्षात राहील. या दोघांनी मिळून कसोटी क्रिकेटमध्ये 95 गडी बाद केले. म्हणजे गोलंदाजीवर लिली यांनी, तर यष्टिरक्षक म्हणून मार्श यांनी.
मार्श आणि लिली या दोघांनी एकाच वेळी कसोटी पदार्पण केले. ते म्हणजे इंग्लंडविरुद्ध 1970-71 मध्ये. अॅशेस मालिकेतून या दोघांनी कसोटीत पाऊल ठेवले आणि पुढे इतिहास रचला. रोड मार्श आणि डेनिस लिली या दोघांनीही एकाच वेळी निवृत्तीही घेतली. ते वर्ष होतं 1984 आणि हा अखेरचा कसोटी सामना होता पाकिस्तानविरुद्ध. दोघांच्याही नावावर त्या वेळी 355 गडी बाद करण्याचा विक्रम होता.
रोड मार्श यांनी पहिला एकदिवसीय (वनडे) आंतरराष्ट्रीय सामना पाच जानेवारी 1971 रोजी मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळला. फेब्रुवारी 1984 मध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध कारकिर्दीतला 92 वा वनडे आंतरराष्ट्रीय सामना खेळून निवृत्ती घेतली. 1970 च्या दशकात ते विश्व सीरीज ऑफ क्रिकेटमध्येही सहभागी झाले होते. यातूनच त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला नवी कलाटणी दिली. यानंतर व्यावसायिक खेळाडू आणि चाहत्यांसाठी खेळात नवी क्रांती आली.
उजव्या हाताचे फलंदाज असलेले रोड मार्श कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकावणारे पहिले ऑस्ट्रेलियन यष्टिरक्षक (विकेटकीपर) होते. त्यांनी एडीलेडमध्ये 1972 मध्ये पाकिस्तानविरुद्ध ही कामगिरी केली होती. त्यांनी आपल्या कारकिर्दीत तीन कसोटी शतके झळकावली.
मार्श ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुखही राहिले. दुबईत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या विश्व कोचिंग अकादमीचे पहिले प्रमुखही होते. 2014 मध्ये दोन वर्षे ऑस्ट्रेलियाच्या निवड समितीचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले आहे.
ऑस्ट्रेलिया संघ 4 मार्च 2022 पासून तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी पाकिस्तान दौऱ्यावर आहे. मार्श यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना ऑस्ट्रेलिया संघ काळी पट्टी बांधून पाकिस्तानविरुद्ध कसोटी सामना खेळणार आहे. रोड मार्श यांचा मोठा भाऊ ग्राहम मार्श व्यावसायिक गोल्फर होता.
Follow on