जेतेपदाचा ‘आनंद’ देईल का, याच प्रश्नाभोवती सध्या चर्चा रंगली आहे.
मायदेशातच विश्वविजेतेपदाचे मनसुबे रचणाऱ्या विश्वनाथन आनंदला नॉर्वेचा ग्रँडमास्टर मॅग्नस कार्लसन याच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. त्या वेळी कार्लसन आनंदचा आव्हानवीर होता.
कारण जो विश्वविजेतेपद मिळवतो त्याला पात्रता फेरी खेळावी लागत नाही. गेल्या वर्षी कार्लसनने सर्व अडथळे पार करत आनंदला पराभूत करत प्रथमच विश्वविजेतेपदावर नाव कोरले.
आता पुन्हा याच दोघांमध्ये बुद्धिबळाचे माहेरघर रशियातच विश्वविजेतेपदासाठी शनिवारपासून रस्सीखेच सुरू झाली आहे. मात्र, या वेळी आनंद कार्लसनचा आव्हानवीर आहे.
रशियातील सोची येथे स्पर्धेचा शानदार उद्घाटन सोहळा झाला. विशेष म्हणजे या सोहळ्यात एका प्रसिद्ध जादुगाराला बोलावले होते. मॅग्नस कार्लसन आणि आनंद या दोघांच्या हातात चेंडूच्या आकाराची वस्तू देण्यात आली.
त्याने दोघांनाही विचारलं, की यात काय आहे पाहा. त्यात काही आहे का? दोघेही म्हणाले, ‘‘काहीही नाही.’’ काही आवाज येतोय का, असे विचारले तर दोघांनीही नकारार्थी उत्तर दिले. मात्र, काही वेळातच त्या दोन्ही वस्तू गायब झाल्या आणि त्यातून दोन पक्षी बाहेर पडले.
हा प्रसंग उद्घाटनापुरता सीमित होता. मात्र, स्पर्धेचा पहिला डाव संपल्यानंतर त्यांना गमतीने विचारण्यात आले, की डाव बरोबरीत सुटण्यामागे जादूगाराने मोहरे गायब केले होते का?
आनंद लगेच विनोदाने म्हणाला, १९९८च्या चेस ऑस्कर सोहळ्यात एका जादूगाराने माझ्या हातातले घड्याळ चोरले होते. मात्र, या वेळी तसे काही झाले नाही! कार्लसन जागतिक बुद्धिबळातला क्रमांक एकचा खेळाडू आहे.
त्याचे एलो रेटिंग २८६३ आहे, म्हणजे आनंदपेक्षा (२७९२) ७१ गुणांनी जास्त आहे. त्यामुळे कार्लसनला आनंदविरुद्ध ड्रॉ करणे परवडणारे अजिबात नाही. कारण एका ड्रॉमुळे त्याच्या रेटिंगमधून एक गुण वजा होऊ शकतो, तर याउलट आनंदला एका ड्रॉमुळे एक गुण वाढू शकतो. कार्लसनला पहिल्याच डावात बरोबरीत रोखल्यानंतर आनंद समाधानी नक्कीच असेल.
कार्लसन आणि आनंद या दोघांचीही शैली भिन्न आहे. आक्रमक गॅरी कास्पारोव आणि अभेद्य बचावाचा शैलीदार खेळाडू अनातोली कारपोव याचं कॉम्बिनेशन म्हणजे कार्लसन, असं म्हटलं जातं. गेल्या वर्षी आनंदला त्याची प्रचीती आली.
मात्र आनंदही कास्पारोवनंतरचा सर्वोत्तम खेळाडू आहे. क्षमता, दर्जा आणि सातत्यपूर्ण कामगिरीमुळे आनंदचा बुद्धिबळविश्वात अजूनही दबदबा कायम आहे. आनंदची आक्रमक शैली पाहिल्यानंतर एक चर्चा अशीही रंगली आहे, की जर आनंदने विजेतेपद पटकावलेच तर पुढची विश्व बुद्धिबळ स्पर्धाही पुन्हा या दोघांतच होईल का? गेल्या वर्षी आनंदचा पराभव झाला असला तरी त्याच्यापेक्षा सरस खेळाडू कार्लसनशिवाय दुसरा नाही.
गेल्या वर्षीचा विजय कार्लसनसाठी दिलासा देणारा असला तरी ती त्याची पुनरावृत्ती करण्याची हमी नाही. यापूर्वी कार्लसन काही चायनीज खेळाडूंकडूनही हरला आहे आणि बुद्धिबळ असा खेळ आहे, की प्रत्येक डाव नवा असतो. काल काय घडलं, याला अजिबात महत्त्व नसतं.
तुलनात्मक दोघेही इक्वल!
तुलनाच करायची झाल्यास, दोघेही समान पातळीवर आहेत. या दोघांमध्ये क्लासिकल प्रकारात एकूण २१ लढती झाल्या आहेत. यात दोघांनी प्रत्येकी चार लढती जिंकल्या आहेत, तर १३ लढती बरोबरीत सुटल्या आहेत. वेगवान लढतींत आनंद किंचित सरस ठरला आहे.
ब्लिट्स, रॅपिड प्रकारात या दोघांमध्ये ३७ लढती झाल्या आहेत. त्यापैकी कार्लसन ९, आनंद १० डाव जिंकला आहे, तर १८ डाव बरोबरीत सुटले आहेत.
आनंदने बदलली शैली
आनंदचे सेकंड्स (मार्गदर्शक) या वेळी आनंदची शैली बदलण्यासाठी प्रयत्नशील असतील. या सेकंड्समध्ये संदिपन चंदा, के. शशिकिरण, हंगेरीचा ग्रँडमास्टर पीटर लेको आणि पोलंडचा रॅडोस्लाव वोतासझेक यांचा समावेश आहे.
यापैकी चंदा कँडिडेट मास्टर्स स्पर्धेतही आनंदचा सेकंड होता. त्या वेळी तो विजेता ठरू शकला. या वेळीही आनंदने काही नव्या कल्पना आणल्या आहेत. त्या काय आहेत, ते त्याने स्पष्ट केले नसले तरी स्पर्धेच्या पहिल्या लढतीत तो बऱ्याचशा पुस्तकी चाली टाळतोय.
पुस्तकी चाली टाळणार?
वस्पर्धेचा पहिला डाव ग्रुनफेल्ड बचाव पद्धतीने खेळला गेला. मात्र, तो अपेक्षेप्रमाणे बरोबरीत सुटला. कार्लसन सुरुवातीलाच दबावाखाली आढळला. त्याने पहिल्या १२ चालींसाठी तब्बल ४५ मिनिटे घेतली.
मात्र, पांढऱ्या मोहऱ्यांनिशी खेळताना आनंदने पहिल्या बारा चाली अवघ्या चार मिनिटांत संपवल्या. आनंद ओपनिंगमध्ये स्ट्राँग असला तरी कार्लसनचा एंड गेम स्ट्राँग आहे. त्यामुळेच आनंदच्या एक्स्प्रेस चाली अंतिम स्थितीत पॅसेंजर झाल्या.
पहिल्या डावावरून एक बाब स्पष्ट झालीय, की यंदाची स्पर्धा बुद्धिबळाच्या नव्या चालींना जन्म देणाऱ्या ठरतील. दोघांनीही बऱ्याचशा पुस्तकी चाली टाळल्या. आनंदला कार्लसनची शैली एव्हाना समजली असेल.
कारण गेल्या वर्षी विश्व बुद्धिबळ स्पर्धेत बचावात्मक पवित्र्यामुळे त्याला जेतेपद गमवावे लागले होते. मात्र, यंदा आनंद कमालीचा आक्रमक दिसत आहे. गेल्या वर्षी आनंदने पहिल्या चार लढती बरोबरीत सोडवल्या होत्या. मात्र, नंतरच्या लढतीत तो ढेपाळला होता.
कदाचित कार्लसनचे कच्चे दुवे त्या वेळी त्याला हेरता आले नसतील. यंदा मात्र तो पूर्ण तयारीनिशी उतरला आहे. त्यामुळे भारतीयांना पुन्हा जेतेपदाचा ‘आनंद’ मिळेल, अशी आशा बाळगायला काय हरकत आहे?
(Maharashtra Times, Nashik, Jalgaon, 10 Nov. 2014)