All SportsIPL

मयंती लँगर ही सुंदर निवेदिका आयपीएलमध्ये का नाही?

ही सुंदर निवेदिका यंदाच्या आयपीएलमध्ये दिसणार नाही…

मयंती लँगर

यंती लँगर… हे नाव कदाचित ऐकलं नसेल, पण तो गोड चेहरा अनेकांच्या लक्षात असेल. होय, हीच ती मयंती लँगर, जी आयपीएलमध्ये आपल्या जादुई सूत्रसंचालनाने अनेकांना भुरळ घालायची. 2020 च्या आयपीएलपासून ती क्रिकेटच्या निवेदक पॅनलमधून गायब झाली आहे. अर्थात, नव्या निवेदकांना संधी देण्यात आली आहे.

आयपीएलची अधिकृत प्रसारण वाहिनी स्टार स्पोर्टसने ट्विटरवर ही माहिती दिली. आयपीएलच्या 13 व्या मोसमात मयंती लँगर सूत्रसंचालन करताना दिसली नाही. 2020 ची आयपीएल संयुक्त अरब अमिरातमध्ये 19 सप्टेंबर 2020 मध्ये झाली.  

आयपीएलची ब्रॉडकास्टर ‘स्टार स्पोर्ट्स’ने जाहीर केले, की आयपीएलचे सूत्रसंचालन पॅनल जाहीर करण्यात आले आहे. या पॅनलमध्ये सुरेन सुंदरम, किरा नारायणन, सुहेल चंढोक, नशप्रीत कौर, संजना गणेशन, जतीन सप्रू, तान्या पुरोहित, अनंत त्यागी. धीरज जुनेजा, भावना बालकृष्णन (तमिळनाडू), अंजुम चोप्रा, लिसा स्थळेकर आणि नेरोली मिडोज यांचा समावेश आहे. 

स्टार स्पोर्ट्समध्ये मयंतीचा Mayanti Langer | सुंदर चेहरा दिसणार नाही. तिच्याऐवजी ऑस्ट्रेलियाच्या टीव्हीवर झळकणारी नेरोली मिडोज हा नवा चेहरा झळकला. त्याचबरोबर किरा आणि तान्या पुरोहित या दोन बॉलिवूडच्या तारकाही निवेदन करताना दिसल्या. मात्र, त्यांनी फारशी छाप पडली नाही.

अनुष्का शर्माचा ‘एनएच-१०’ चित्रपट पाहिला असेल तर तुमच्या लक्षात येईल, की या चित्रपटात मंजू नावाची भूमिका याच तान्या पुरोहित हिने साकारली. अर्थात, तत्पूर्वी मयंतीने Mayanti Langer | आपल्या अनोख्या निवेदनशैलीने वेगळी ओळख निर्माण केली होती. भारतातच नव्हे, तर जगातील उत्तम सूत्रसंचालकांच्या यादीत तिने स्थान मिळवले होते. मात्र, 2020 मध्ये तिच्या चाहत्यांनी आयपीएलच्या मोसमात नक्कीच मिस केले असेल. 

सुनील गावस्कर मुलगा रोहन गावस्करसोबत समालोचन करताना दिसले, तर माजी क्रिकेटपटू कृष्णमाचारी श्रीकांत आणि एमएसके प्रसाद या दोघांनी तमिळ आणि तेलुगूमधून समालोचन केले.

मयंतीने अनेक वर्षांपासून क्रीडावाहिनीवर निवेदन केले आहे. सुंदर निवेदनशैलीने तिने क्रिकेटप्रेमींची मनेही जिंकली होती. तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची (ICC) वर्ल्डकप, इंडियन क्रिकेट लीग (ICL) याबरोबरच विविध मोसमांमध्ये इंडियन प्रीमियर लीगमध्येही निवेदन केले आहे.

टी-२० स्पर्धा नियोजित कार्यक्रमाप्रमाणे 29 मार्च ते 24 मे 2020 दरम्यान होणार होती. मात्र, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ही स्पर्धा करोना महामारीमुळे स्थगित केली होती. अखेर ही स्पर्धा 19 सप्टेंबर 2020 पासून संयुक्त अरब अमिरातमध्ये (UAE) झाली. 

क्रिकेटपटूसोबत लग्नगाठ

मयंती लँगरमयंतीचीही एक लव्हस्टोरी आहे. क्रिकेटचे सूत्रसंचालन करणाऱ्या मयंतीवर क्रिकेटपटू फिदा होणार नाही तरच नवल. अशाच क्रिकेटपटूंमध्ये एक होता स्टुअर्ट बिन्नी. भारताचा माजी क्रिकेटपटू रॉजर बिन्नी यांचा हा मुलगा. 

मयंती आणि स्टुअर्ट यांच्यातील ओळखीचा दुवा अर्थातच क्रिकेट. एका मुलाखतीत हे दोघे भेटले. क्रिकेट हा त्यांच्या संवादाचा प्रमुख बिंदू होताच. मात्र, याच क्रिकेटने त्यांची मैत्री घट्ट केली आणि पुढे त्याचे रूपांतर प्रेमात झाले. हे प्रेम लग्नाच्या निष्कर्षापर्यंत पोहोचलं आणि सप्टेंबर 2012 मध्ये हे दोघेही विवाहबद्ध झाले. 

मयंतीने क्रिकेट स्पर्धांचेच सूत्रसंचालन केले असे नाही, तर अनेक फुटबॉल स्पर्धांमध्येही तिने आपल्या सूत्रसंचालनाची छाप सोडली. 

जेवढ रॉजर बिन्नींचं नाव क्रिकेटमध्ये घेतलं जातं, तेवढी लोकप्रियता स्टुअर्ट बिन्नीला मिळाली नाही. त्याचा खेळ यथातथाच होता. मात्र मयंतीशी विवाहबद्ध झाल्यानंतर त्याच्या खेळात कमालीची प्रगती झाली. याचं श्रेय त्याने मयंतीलाच दिलं. मयंती आणि स्टुअर्ट हे दोघे एकाच आयपीएलमध्ये दिसले. अर्थात, मयंती सूत्रसंचालकाच्या भूमिकेत होती, तर स्टुअर्ट खेळाडूच्या. एकाच ठिकाणी असूनही त्यांना एकमेकांपासून लांबच राहावे लागले.

कारण खेळाडूला कुटुंबापासून लांब ठेवले जायचे. हेतू हाच, की खेळावरील एकाग्रता ढळू नये. मात्र, या नवपरिणत बिन्नी दाम्पत्याने आपापल्या भूमिका चोख बजावत व्यावसायिक कामाला प्राधान्य दिलं. स्टुअर्ट बिन्नी रणजी स्पर्धेत नागालँड संघाकडून खेळला. त्याने आपल्या सात डावांत २८९ धावा केल्या, तर नऊ विकेट घेतल्या आहेत. 

मयंतीचं बालपण

मयंती ही लष्करी अधिकाऱ्याची मुलगी. तिचे वडील संजीव लँगर भारतीय सशस्त्र दलात लेफ्टनंट जनरल होते, तर आई प्रेमिंदा लँगर शिक्षिका. मयंतीला एक बहीण आहे. तिचं नाव अवलोक. वडील लष्करात असल्याने त्यांचं कुटुंब कोणत्याही एका शहरात स्थिर कधीच राहिलं नाही. त्यामुळे देशभरात अनेक ठिकाणी त्यांची जसजशी बदली व्हायची, तसतसं लँगर कुटुंबही नवनव्या शहरांशी जुळवून घ्यायचं. वडिलांची नियुक्ती संयुक्त राष्ट्रात झाल्यानंतर काही वर्षे लँगर कुटुंबाने अमेरिकेतही घालविली. लष्करी शिस्त घरात असली तरी आवडीनिवडीला पूर्ण स्वातंत्र्य होतं. 

मयंतीने अमेरिकेतील उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं आणि ती मायदेशी परतली. दिल्लीतील हिंदू महाविद्यालयातून तिने आपलं पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. या संपूर्ण शिक्षणप्रवासात तिने खेळात करिअर करण्याचा विचार कधीच केला नव्हता. भलेही तिने महाविद्यालयीन जीवनात फुटबॉल खेळले असले तरी.

मयंतीला ग्राफिक डिझायनर व्हायचं होतं. मात्र, तिच्या करिअरने वेगळेच वळण घेतलं. तिला क्रिकेटपेक्षाही फुटबॉल अधिक आवडायचं. यामुळेच तिला सूत्रसंचालनाची पहिली संधी मिळाली ती फिफा बीच फुटबॉलची. यातूनच तिने नव्या करिअरचा पर्याय निवडला, तो म्हणजे क्रीडा पत्रकारिता आणि सूत्रसंचालनाचा.

मयंती महाविद्यालयीन जीवनात फुटबॉल खेळलीच नाही, तर दिल्लीतील सुपर सॉकर अकादमीत रीतसर व्यावसायिक प्रशिक्षणही घेतलं होतं. फिफा बीच फुटबॉलमध्ये तिचं सूत्रसंचालन अनेकांना भावलं. तिला लोकप्रियता मिळाली. यामुळे तिला खेळाशी संबंधित अनेक कार्यक्रमांत सूत्रसंचालनाच्या ऑफर्स येऊ लागल्या. अशाच एका ऑफर्सपैकी एक होती ‘झी स्पोर्ट्स’ची. या वाहिनीवर तिला शो फुटबॉल कॅफेमध्ये सहाय्यक निर्मात्याची संधी मिळाली. नंतर ती झी नेटवर्कवरील अनेक फुटबॉल शोमध्ये झळकली.

‘झी स्पोर्ट्स’च्याच इंडियन क्रिकेट लीगसाठीही (ICL) तिने सूत्रसंचालन केले आहे. फिफा विश्वचषक स्पर्धेतही तिने भारतात प्रसारित होणाऱ्या ईएसपीएन वाहिनीवर हाफ टाइममध्ये बाइट घेतल्या आहेत. 

मयंतीला नंतर खेळासाठी अनेक पर्याय खुले झाले. तिने 2013 मध्ये इंडियन बॅडमिंटन लीगमध्येही सूत्रसंचालन केले आहे. 2011 मध्ये भारतीय संघाने जिंकलेल्या वर्ल्डकप सामन्यातही सूत्रसंचालन करण्याचा मान मयंतीला मिळाला आहे. तिने चारू शर्मासोबत 2010 मध्ये दिल्लीतील कॉमनवेल्थ गेममध्ये सूत्रसंचालन केले आहे.

करोना महामारीमुळे 2020 मध्ये क्रीडाविश्वावर आर्थिक मंदीचे सावट निर्माण झाले. अनेक प्रतिष्ठित स्पर्धा स्थगित झाल्याने सूत्रसंचालनासाठी फारशा संधी नाहीत. आयपीएलसारख्या महत्त्वाच्या इव्हेंटमध्ये यंदा मयंती दिसली नाही तरी भविष्यात ती अन्य स्पर्धांमध्ये नक्कीच दिसेल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही.

Follow us

Facebook Page kheliyad

आयपीएल 2022 च्या मोसमासाठी खेळाडूंवरील रकमा ऐकाल तर डोळे विस्फारतील

[jnews_block_22 first_title=”Mount Everest stories” header_text_color=”#dd0000″ header_line_color=”#dd0000″ include_category=”76″]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!