Sunday, March 7, 2021
kheliyad
  • Home
  • Cricket
  • Football
  • Other sports
  • Inspirational story
  • Online Chess Puzzle
  • Tennis
No Result
View All Result
  • Home
  • Cricket
  • Football
  • Other sports
  • Inspirational story
  • Online Chess Puzzle
  • Tennis
No Result
View All Result
kheliyad
No Result
View All Result

कविताची फिनिक्स भरारी

Mahesh Pathade by Mahesh Pathade
February 15, 2016
in Inspirational Sport story
0
Share on FacebookShare on Twitter

दक्षिण आशियाई स्पर्धेत (सॅफ) सावरपाडा एक्स्प्रेस कविता राऊतने ऑलिम्पिक पात्रता सिद्ध करीत गोल्ड मेडल मिळवले. गेल्या वर्षापासून तिचा बॅडपॅच सुरू होता. यश हुलकावणी देत होतं. मात्र, जिद्दी कविताने हार मानली नाही. सॅफ स्पर्धेतून फिनिक्स भरारी घेणाऱ्या कविताचा थक्क करणारा हा प्रवास कौतुकास्पदच आहे.

महेश पठाडे,
rhythm00779@gmail.com
Mob. 8087564549

होळी म्हणजे आदिवासींची दिवाळीच. मराठी माघ पौर्णिमेपासून म्हणजे आदिवासींचा दांडू बलन्यू महिना सुरू होतो. हा महिना संपला, की होळी प्रचंड उत्साहात साजरी केली जाते. म्हणून दांडू महिन्यानंतर आदिवासी समाज होळीची आतुरतेने वाट पाहत असतो. कविताने ऑलिम्पिकची पात्रता पूर्ण केल्याने सावरपाड्यात असाच होळीचा माहोल असेल. ऑलिम्पिक ज‍वळ येईपर्यंत कदाचित त्यांचा ‘दांडू बलन्यू संपणार नाही. पौर्णिमेच्या चंद्राला दांडू दिसला, की होळीचे जसे जोरदार स्वागत होते, तसे कविताचा मेडलरूपी चंद्र दिसला, की महाराष्ट्रात दिवाळी अन् सावरपाड्यात होळीचाच जल्लोष असेल.

जिद्द, दुर्दम्य इच्छाशक्ती, विजिगीषू वृत्ती म्हणजेच कविता राऊत! दहा हजार, पाच हजार मीटरवर हुकूमत असलेल्या कविताचे हे शर्यतीचे प्रकार पाहिल्यानंतर लक्षात येतं, की हिच्या स्पर्धेचं आयुष्य कधीच छोटं असू शकत नाही. डोक्यावरून दोन-दोन किलोमीटर रस्ता तुडवत पाणी आणणारी कविता कदाचित अडथळ्यांची शर्यतही सहज जिंकली असती! लहानपणापासून खाचखळग्याचं आयुष्य पाहिलेल्या कविताला म्हणूनच आयुष्यातील चढ-उतार नवीन नाहीत. गेल्या वर्षीपर्यंत तिला यशाने सातत्याने हुलकावणी दिली. स्थानिक स्पर्धांतही तिची कामगिरी लौकिकाला साजेशी होत नव्हती. अगदी यंदाच्या मुंबईच्या हाफ मॅरेथॉनमध्येही तिला तेराव्या स्थानावर समाधान मानावे लागले. भारतीय महिलांमध्येच ती पाचवी होती! जी धावपटू गेल्या वर्षी मुंबई मॅरेथॉनची विजेती होती, ती हाफ मॅरेथॉनमध्ये अगदी तेराव्या स्थानावर घसरली होती. मात्र, जोपर्यंत तुम्ही शर्यत संपली नाही असं म्हणत नाही तोपर्यंत ती संपलेली नसते. कविताचीही शर्यत संपलेली नव्हती. सॅफ स्पर्धेतून आता ती सुरू झाली आहे.

प्रवास चढ-उतारांचा..
जानेवारी २००८ मध्ये कविताने मुंबई मॅरेऑन जिंकली होती. त्या वेळी तिची आव्हानवीर प्रिजा श्रीधरन दुसऱ्या स्थानावर होती. २००९ मध्ये स्टँडर्ड चार्टर्ड मुंबई मॅरेथॉनमध्ये तिने हाफ मॅरेथॉनमध्ये विजेतेपद मिळवले. कविताच्या यशाचा आलेख सातत्याने उंचावत गेला. याच वर्षी फेब्रुवारी २००९ मध्ये कविताने कोलकाता मॅरेथॉन स्पर्धाही जिंकली. ऑगस्ट २०१० मध्ये कविताने कॉमनवेल्थ स्पर्धेत १० हजार मीटर स्पर्धेत ब्राँझ मेडल जिंकले. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदक जिंकणाऱ्या कविताला या पदकाने आत्मविश्वास दिला. या स्पर्धेनंतर तीन महिन्यांनंतर कविताने चीनमधील गाँग्झौ येथे नोव्हेंबर २०१० मध्ये १६ व्या आशियाई स्पर्धेत १० हजार मीटर शर्यतीत सिल्व्हर मेडल मिळविले. या वेळी प्रिजा श्रीधरनने तिला मागे टाकत गोल्ड मेडल मिळवले होते. मात्र, सिल्व्हर मेडलमुळे तिने कारकिर्दीतली आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सर्वोच्च कामगिरी साकारली होती. सप्टेंबर २०११ मध्ये तिने ट्रॅक बदलला आणि बेंगलुरूच्या साल्टलेक स्टेडियमवर झालेल्या राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेत पाच हजार मीटरमध्ये तिने गोल्ड मेडल मिळविले. या वेळी तिची आव्हानवीर प्रिजा श्रीधरन तिसऱ्या स्थानावर, तर एल. सूर्या दुसऱ्या स्थानावर राहिली. जून २०११ मध्येही तिने वर्ल्ड १० के रन स्पर्धेचे गोल्ड मेडल मिळवले होते. सप्टेंबर २०१२ मध्ये दिल्लीतील हाफ मॅरेथॉन स्पर्धेत तिला सिल्व्हर मेडलवर समाधान मानावे लागले. या वेळी तिला सुधा सिंहने मागे टाकले होते. २०१५ मधील मुंबई मॅरेथॉनमध्ये कविताने हाफ मॅरेथॉनचे विजेतेपद मिळवले असले तरी  यंदा जानेवारीत झालेल्या याच स्पर्धेत पूर्ण मॅरेथॉनमध्ये ती भारतीय महिलांमध्येच पाचव्या स्थानी राहिली. मात्र, एकूण महिलांमध्ये मात्र १३ व्या स्थानावर घसरली. कविताच्या कामगिरीचा थोडक्यात घेतलेला हा आढावा चढ-उतारांचं गणित सर्व काही सांगून जातो. लांब पल्ल्याच्या शर्यतींचा ट्रॅक बदलून मॅरेथॉनमध्ये कौशल्य आतमावणाऱ्या कविताला हा मोठा धक्का होता. तिची कामगिरी ढासळली होती की स्पर्धकांचा दर्जा उंचावला होता? मात्र, क्रीडा मानसशास्त्रज्ञ भीष्मराज बाम यांनी तिचे मनोबल वाढवले. या मनोबलातूनच तिने पुन्हा एकदा फिनिक्स भरारी घेतली आहे. दिल्ली मॅरेथॉनची तयारी करीत असतानाच सॅफ स्पर्धेच्या आठ दिवस आधी तिला ट्रॅकवर उतरण्यास सांगितलं. दिल्ली मॅरेथॉनसाठी केलेली तयारी तिने सॅफ स्पर्धेच्या ट्रॅकवर आजमावली आणि आता त्याचा रिझल्ट समोर आहेच.

ऑलिम्पिक पात्रता मिळविणारी कविता भारतातली चौथी अॅथलिट आहे. यापूर्वी ओपी जैशा, ललिता बाबर और सुधा सिंह रियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरल्या आहेत. या चारपैकी तीन खेळाडू ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करतील. ऑलिम्पिकमध्ये मॅरेथॉनसाठी किमान दोन तास ४२ मिनिटांची पात्रता आवश्यक आहे. कविताने दोन तास ३८ मिनिटे आणि ३८ सेकंदांची वेळ नोंदवली. कविताच्या जिंकण्यामागे जिद्द होती. तिशीतल्या कविताला पुढच्या स्पर्धा खेळण्यावर प्रचंड मर्यादा आल्या असत्या. वय आणि कामगिरी दोन्हींशी समतोल साधणे कोणत्याही खेळाडूला सोपे मुळीच नाही. कविताही त्याला अपवाद नाही. कदाचित याचमुळे कविताने सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. आता तिला ऑलिम्पिकवर लक्ष केंद्रित करावं लागणार आहे. आताच भोसला मिलिटरी स्कूलतर्फे तिचा मिरवणूक काढून सत्कार करण्यात आला. त्या वेळी क्रीडा मानसशास्त्रज्ञ भीष्मराज बाम म्हणाले होते, की आता किमान आठवडाभर तरी सत्कार सोहळ्यांवर आवर घाल. कारण तुझी खरी कसोटी ऑलिम्पिकमध्ये लागणार आहे. त्यासाठी एकेक तास महत्त्वाचा असेल. कविताला याची जाणीव नक्कीच असेल.

नाशिककरांसमोर आदर्श
नाशिकच्या नवोदित खेळाडूंसमोर कविता आदर्श आणि प्रेरणादायी खेळाडू असेल. अपयशातून यशाचा मार्ग प्रशस्त होऊ शकतो. तिच्या यशाने नाशिकच्या धावपटूंसाठीही ऑलिम्पिकचे दार आता खुणावत असेल. दुर्गा देवरे, किसन तडवी, संजीवनी जाधव असे किती तरी ज्युनिअर गटातील आंतरराष्ट्रीय स्पर्धांवर नाव कोरणारे खेळाडू कविताच्या पाऊलावर पाऊल ठेवत यशासाठी सज्ज आहेत. त्यांच्यासाठीही कविता ही प्रेरणा आहे. तिचे प्रशिक्षक विजेंदर सिंग यांना कवितावर आत्मविश्वास आहे. त्यांनी यापुढेही सांगितले, की २०२० मध्ये ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळवून देणाऱ्यांत सर्वांत जास्त वाटा नाशिकचा असेल. विजेंदर सिंह यांनी अप्रत्यक्षपणे नाशिकचा केनिया करण्याचं ठरवलं आहे. मुळात नाशिकच्या ट्रॅकवरूनही ऑलिम्पिकची धाव घेता येते हा आत्मविश्वासच नाशिककरांना उभारी देणारा आहे. 

(Maharashtra Times, Nashik & Jalgaon : 15 Feb. 2016)
Mahesh Pathade

Mahesh Pathade

Next Post

वेध बुद्धिबळातील प्रश्नांचा...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Home
  • About US
  • Contact

© 2020 Kheliyad Copyright © 2020 Website Development Divesh Consultancy-9028927697

No Result
View All Result
  • Home
  • Cricket
  • Football
  • Other sports
  • Inspirational story
  • Online Chess Puzzle
  • Tennis

© 2020 Kheliyad Copyright © 2020 Website Development Divesh Consultancy-9028927697

error: Content is protected !!