All SportsOther sportsTokyo Olympic 2020

भारतीय तिरंदाजांची विश्वकपमधील कामगिरी टोकियोतही पाहायला मिळेल?

भारतीय तिरंदाजांची विश्वकपमधील कामगिरी टोकियोतही पाहायला मिळेल?

धनुर्विद्या (तिरंदाजी) भारतासाठी नवी नाही. किंबहुना विश्वातल्या सर्वांत प्राचीन खेळांपैकी एक धनुर्विद्या आहे. असं असलं तरी ऑलिम्पिकमध्ये या खेळाला तब्बल 52 वर्षांनी समाविष्ट केले. जगातील सर्वोत्तम तिरंदाजांमध्ये भारतीय खेळाडूंची गणती होत असली तरी भारताला ऑलिम्पिक पदकाचा वेध घेता आलेला नाही. विशेष म्हणजे गेल्या ३३ वर्षांपासून भारत या खेळात सहभागी होत आला आहे.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे चार धनुर्धारी सहभागी होणार आहेत. पॅरिसमध्ये नुकत्याच झालेल्या विश्वकपमध्ये तीन सुवर्णपदके मिळविणारी दीपिका कुमारीही ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. असं असलं तरी तिला अद्याप ऑलिम्पिकमध्ये पदकाचा वेध घेता आलेला नाही. भारतीय तिरंदाजांचा आतापर्यंतच्या ऑलिम्पिकवारीचा विचार केला तर फारशी ‌उल्लेखनीय कामगिरी नाही. भारत, तिरंदाजी आणि ऑलिम्पिक हे समीकरण 33 वर्षांंपासूनचं आहे. म्हणजेच आतापर्यंत भारताच्या 21 तिरंदाजांनी 1988 पासून 2016 पर्यंत ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला आहे. यात 13 पुरुष व आठ महिला तिरंदाजांचा समावेश आहे.

1972 मध्ये ऑलिम्पिकमधून वगळले होते तिरंदाजीला

प्राचीन खेळ असला तरी ऑलिम्पिकमध्ये तिरंदाजीला 1900 मध्ये समाविष्ट करण्यात आले होते. त्यानंतर 1904, 1908 आणि 1920 मध्येही तिरंदाजी ऑलिम्पिकमध्ये होता. मात्र, त्यानंतर हा खेळ ऑलिम्पिक खेळातून हटविण्यात आला. 1972 पर्यंत हा खेळ ऑलिम्पिकबाहेरच होता. अखेर 1972 च्या म्युनिक ऑलिम्पिकमध्ये म्हणजे तब्बल 52 वर्षांनी तिरंदाजीने वापसी केली. ही वापसी एकेरी प्रकारापुरतीच होती. नंतर हा खेळ दुहेरी आणि सांघिक प्रकारातही खेळविला जाऊ लागला.

तिरंदाजीत भारत पहिल्यांदा ऑलिम्पिक केव्हा खेळला?

भारतात धनुर्विद्येला पौराणिक, तसेच ऐतिहासिक महत्त्व आहे. रामायणात प्रभू रामचंद्राचं प्रमुख शस्त्र धनुर्विद्याच होतं. महाभारतात अर्जुन, कर्ण, भीष्म अशा अनेक व्यक्तिरेखा धनुर्विद्येतल्या सर्वोत्तम योद्ध्याच्या रूपाने वर्णिल्या आहेत. भारताबरोबरच जगातल्या प्राचीन खेळांपैकी एक असलेल्या तिरंदाजीत भारताचे हात मात्र रिकामेच राहिले. भारताने तिरंदाजीत पहिल्यांदा 1988 च्या सिओल ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला. त्यानंतर सिडनी ऑलिम्पिक (2000) वगळता सर्वच ऑलिम्पिकमध्ये तिरंदाजांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. लिंबाराम, संजीव सिंह आणि श्यामलाल हे ऑलिम्पिकमध्ये भाग घेणारे पहिले भारतीय तिरंदाज होते. लिंबारामने 1992 ची बार्सिलोना ऑलिम्पिक आणि 1996 च्या अटलांटा ऑलिम्पिकमध्येही भाग घेतला होता. बार्सिलोनात त्याचं कांस्यपदक केवळ एका गुणाने हुकले होते. 2004 च्या अथेन्स ऑलिम्पिकमध्ये प्रथमच तीन भारतीय महिला तिरंदाजांनी सहभाग नोंदवला होता. या तिरंदाज होत्या डोला बॅनर्जी, रिना कुमारी आणि सुमंगला शर्मा. 2008 च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये पुरुष एकेरीत मंगलसिंह चंपिया या खेळाडूने फायनलच्या दुसऱ्या फेरीपर्यंत मजल मारली होती. 2016 च्या रियो ऑलिम्पिकमध्ये अतनू दासने पुरुष एकेरीच्या फायनलमध्ये स्थान मिळवले होते. महिला एकेरीत दीपिका कुमारी आणि लेशराम बोम्बायलादेवी नवव्या स्थानावर फेकल्या गेल्या.

दीपिका कुमारी भारताचं प्रतिनिधित्व करणारी एकमेव महिला तिरंदाज

टोकियो ऑलिम्पिकमध्ये दीपिका कुमारी भारताचं प्रतिनिधित्व करणारी एकमेव महिला तिरंदाज असेल. ही तिची तिसरी ऑलिम्पिक असेल. गेल्या दोन ऑलिम्पिकप्रमाणेच ती उत्तम लयीत टोकियोमध्ये पाऊल ठेवेल. दीपिकाकुमारी नुकत्याच विश्वकप स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत वैयक्तिक रिकर्व्ह, दुहेरी आणि सांघिक प्रकारात सुवर्णपदक जिंकले आहे. दीपिकाकुमारी व्यतिरिक्त पुरुष गटात भारताचे तीन रिकर्व्ह तिरंदाज तरुणदीप राय, अतनू दास आणि प्रवीण जाधवसुद्धा आपले कौशल्य आजमावणार आहेत. तिरंदाजीत ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत दक्षिण कोरियाचाच दबदबा राहिला आहे. टोकियोतही हा देश पहिल्या स्थानावर राहण्याचा प्रयत्न करील यात शंका नाही. दक्षिण कोरियाने ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत 23 सुवर्णपदकांसह एकूण 39 पदके जिंकली आहेत. त्या खालोखाल अमेरिका (14 सुवर्ण) आणि बेल्जियम (11 सुवर्ण) या देशांचा क्रमांक लागतो. बेल्जियमने सर्व पदके 1900 ते 1920 दरम्यान जिंकली आहेत.

Follow us

ऑलिम्पिक तिरंदाजी भारत ऑलिम्पिक तिरंदाजी भारत ऑलिम्पिक तिरंदाजी भारत ऑलिम्पिक तिरंदाजी भारत ऑलिम्पिक तिरंदाजी भारत ऑलिम्पिक तिरंदाजी भारत

[jnews_block_9 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ exclude_category=”95″]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!