All SportsIPL

आयपीएल संघांतील मुख्य खेळाडू रिटेन करणार की कायम राहणार?

यपीएलचे मुख्य खेळाडू बदलायचे की कायम ठेवायचे, हा प्रश्न फ्रँचायजींना भेडसावतोय. आयपीएल खेळाडूंच्या रिटेन कालमर्यादेपूर्वीच काही खेळाडूंबाबत फ्रँचायजींमध्ये ही द्विधा मन:स्थिती आहे. इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल) आठ फ्रँचायजींसाठी खेळाडूंना रिटेन करण्याची कालमर्यादा 30 नोव्हेंबर 2021 रोजी संपत आहे. रिटेन म्हणजे खेळाडूंना आपल्यासोबत कायम ठेवणे. कदाचित काही संघ आपल्या मुख्य खेळाडूंना कायम ठेवतीलही. मात्र, काही संघ खेळाडूंना रिटेन करण्याची शक्यता नाही. कदाचित काही खेळाडू आयपीएल लिलावातून रिटेन करायचे आणि काही नव्या खेळाडूंना घेऊन संघाची नव्याने बांधणी करण्याची शक्यता आहे. आयपीएल मोसमाची ही लिलावप्रक्रिया पुढच्या वर्षी 2022 मध्ये होणार आहे. अखेरच्या क्षणी लिलावापूर्वी बहुतांश संघ आपल्या आवडीच्या खेळाडूंना सोबत कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहतील हे नक्की.

आयपीएल खेळाडू रिटेन

सध्या आठ आयपीएल संघांतील रिटेन होणाऱ्या खेळाडूंना अंतिम रूप दिल्यानंतर दोन नव्या फ्रँचायजींना (लखनौ आणि अहमदाबाद) 1 ते 25 डिसेंबर 2021 दरम्यान प्रत्येकी तीन खेळाडूंना निवडण्याची संधी दिली जाणार आहे. त्यानंतर जानेवारी 2022 मध्ये लिलावप्रक्रिया होईल. सध्याचे जे आठ आयपीएल संघ आहेत, ते प्रत्येकी चार खेळाडूंनाच रिटेन करू शकतील. त्यातही एक अट आहे. ते म्हणजे यात तीनपेक्षा अधिक भारतीय खेळाडू, तर दोनपेक्षा अधिक विदेशी खेळाडू रिटेन करू शकणार नाहीत.

कालमर्यादा संपण्यापूर्वी काही संभाव्य खेळाडूंच्या नावांबाबत आठ संघ काय विचार करीत आहेत, यावर टाकलेला प्रकाशझोत…

दिल्ली कॅपिटल्स : अश्विन, रबाडाला सोडावे लागणार


दिल्ली कॅपिटल्स द्विधा मन:स्थितीत असेल. कारण चारच खेळाडू रिटेन करण्याची संधी त्यांना आहे. मात्र, कर्णधार ऋषभ पंत, पृथ्वी साव, अक्षर पटेल आणि दक्षिण आफ्रिकेचा एनरिच नॉर्किया या चार प्रमुख खेळाडूंना सोडण्याची फ्रँचायजीकडून शक्यता कमीच आहे. म्हणजे या चार खेळाडूंना संघात रिटेन करण्याची शक्यता आहे. मात्र, त्यांना एक दु:ख असेल. आर. अश्विन आणि कॅगिसो रबाडा यांच्यासारख्या चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना सोडावे लागेल. मात्र, लिलावप्रक्रियेत त्यांच्यावर पुन्हा बोली लावून खरेदी करण्यासाठी हा संघ प्रयत्नशील राहील. ते आव्हानात्मकही असेल. या खेळाडूंवर इतर संघही बोली लावतील, यात शंका नाही. हुकमी खेळाडू श्रेयस अय्यर मात्र संघात पुन्हा येण्याची शक्यता कमी आहे. त्याचं दुखणं दुहेरी आहे. हे दुहेरी दुखणं म्हणजे शारीरिक आणि मानसिक आहे. खांद्याच्या दुखापतीमुळे संघात परतलेल्या श्रेयसला कर्णधारपद पुन्हा मिळालं नाही. त्यामुळे संघात राहण्याची त्याची मानसिकता नाही. तो स्वत:च दिल्लीला सोडणार आहे.

मुंबई इंडियन्स : हार्दिक पंड्याला सोडावे लागणार!


आयपीएलमध्ये पाच वेळा विजेतेपद मिळविणाऱ्या मुंबई इंडियन्सला कोणते खेळाडू गमवावे लागणार हे लिलावप्रक्रियेतच समजेल. मात्र, कर्णधार रोहित शर्मा, वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळणारा जसप्रीत बुमराह या दोन खेळाडूंना घेऊन नव्या संघाची बांधणी करण्याचा विचार मुंबई करीत असेल. सूर्यकुमार यादव आणि अनुभवी किरोन पोलार्ड या दोघांना संघ सोडणार नाही. हे दोन्ही खेळाडू संघाचे हुकमी खेळाडू आहेत. रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि पोलार्ड या तिघांना संघ रिटेन करू शकेल. मात्र, सूर्यकुमार यादवला रिटेन करताना ईशान किशनला सोडायचे की यादवला सोडून किशनला घ्यायचे, याबाबत संघात द्विधा मन:स्थिती आहे. कारण या दोघांमधून एकाला निवडणे संघासाठी तसे आव्हानात्मक आहे. हार्दिक पंड्याबाबत संघाचा विचार फारसा समाधानकारक दिसत नाही. कारण तो गोलंदाजी करू शकलेला नाही. त्यामुळे तो पहिल्यासारखा अष्टपैलू राहिलेला नाही. मात्र, लिलावप्रक्रियेत त्याला पुन्हा खरेदी करण्याचा प्रयत्न संघ जरूर करेल.

चेन्नई सुपरकिंग्स : आयपीएल खेळाडू रिटेन करणार?


मुंबईला कडवी टक्कर देणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्सचे खेळाडूंबाबतचे धोरण स्पष्ट आहे. कोणते चार खेळाडू रिटेन करायचे, याचा विचार त्यांनी आधीच केला आहे. मात्र, त्याला अंतिम रूप ठामपणे देता आलेले नाही हेही तितकेच खरे आहे. कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि रवींद्र जडेजा या दोघांना रिटेन केले जाईल ही काळ्या दगडावरची रेघ आहे. मात्र, गेल्या मोसमात संघाच्या विजेतेपदात महत्त्वाची भूमिका वठवणारा ऋतुराज गायकवाड यालाही संघ सोडण्याच्या विचारात नाही. राहिला विदेशी खेळाडूंचा प्रश्न. अष्टपैलू मोईन अली आणि दीर्घकाळापासून संघात असलेला फाफ डुप्लेसिस यांच्यापैकी कोणाला निवडायचे, याबाबत काहीशी द्विधा मन:स्थिती आहे. दोघेही संघातील उत्तम खेळाडू असल्याने कोणाची निवड केली जाते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

पंजाब किंग्स : संघाच्या पुनर्बांधणीवर असेल भर


लिलावप्रक्रियेत संघाच्या पुनर्बांधणीकडेच पंजाब किंग्सचा काहीसा कल असेल. कारण कर्णधार लोकेश राहुल याचे लिलावप्रक्रियेत उतरणे जवळजवळ नक्की झाले आहे. त्यामुळे पंजाब किंग्स नव्याने सुरुवात करण्याचा प्रयत्न करील. कदाचित अर्शदीप आणि रवी बिश्नोई यांच्यासारख्या खेळाडूंना रिटेन करण्याचा संघाचा प्रयत्न राहील. मात्र, या दोन्ही खेळाडूंनी अद्याप तरी एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. आंतरराष्ट्रीय सामने खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये मयंक अग्रवाल, मोहम्मद शमी आणि निकोलस पूरन यांच्यापैकी एकाला निवडण्याचे आव्हान संघासमोर आहे.

कोलकाता नाइट रायडर्स : आयपीएल संघातील हुकमी खेळाडू मॉर्गनला रिटेन करणार?


कोलकाता नाइट रायडर्समध्ये बरीच खलबतं झाली असणार. वरुण चक्रवर्ती, आंद्रे रसेल, वेंकटेश अय्यर आणि सुनील नारायण यांना संघात कायम ठेवण्याची शक्यता व्यक्त होत आहे. जर असे असेल तर इंग्लंडला वर्ल्डकप जिंकून देणारा कर्णधार इयॉन मॉर्गन, भारतीय संघात खेळलेला शुभमन गिल या दोन खेळाडूंना लिलावप्रक्रियेला सामोरे जावे लागणार हे नक्की. मॉर्गनच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाइट रायडर्सने गेल्याच वर्षी 2021 मध्ये झालेल्या संयुक्त अरब अमिरातमध्ये उत्तम कामगिरी केली होती. संघाने धडाक्यात पुनरागमन करीत अंतिम फेरी गाठली होती. मॉर्गनची ही कामगिरी पाहता त्याला सोडण्याचा निर्णय सोपा नसेल.

राजस्थान रॉयल्स : स्टोक्स, आर्चरबाबत तळ्यात-मळ्यात


राजस्थान रॉयल्स संघाचे आयपीएलमधील दशावतार संपलेले नाहीत. अगदी संजू सॅमसन याला कर्णधार बनवूनही संघाचं नशीब चमकलं नाही. तरीही सॅमसन आणि इंग्लंड संघाचा स्टार यष्टिरक्षक फलंदाज जोस बटलर याला कायम ठेवण्याची शक्यता अधिक आहे. बेन स्टोक्सबाबत मात्र द्विधा मन:स्थिती आहे. स्टोक्स दुखापत आणि मानसिक स्वास्थ्याशी संबंधित समस्यांमुळे गेल्या मोसमातील अनेक सामने खेळू शकला नाही. दुखापतींचा सामना करणारा आणखी एक खेळाडू जोफ्रा आर्चर याच्याबाबतही संघ द्विधा मन:स्थितीत आहे. आतापर्यंत एकही आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळणारा यशस्वी जयस्वाल हादेखील संघात स्थान मिळविण्याच्या शर्यतीत आहे.

रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू : हर्षल पटेल, देवदत्त पडिक्कलमध्ये चुरस


कर्णधारपद सोडणारा विराट कोहली आणि युझवेंद्र चहल या दोघांचे संघातील स्थान कायम राहू शकते. मात्र, ग्लेन मॅक्सवेलनेही गेल्या मोसमात चांगली कामगिरी करून संघाचा विश्वास जिंकला आहे. आयपीएलनंतर भारताकडून यशस्वी पदार्पण करणारे हर्षल पटेल आणि मोहम्मद सिराज यांच्या संघात स्थान राखण्यासाठी अटीतटी असेल. सलामीचा फलंदाज देवदत्त पडिक्कल याला सोडण्याचा निर्णयही सोपा नसेल.

सनरायझर्स हैदराबाद : भुवनेश्वर, नटराजनचे काय?


केन विल्यमसन आणि राशीद खान यांचे आयपीएलच्या गेल्या मोसमात माजी कर्णधार डेव्हिड वॉर्नरशी मतभेद झाले होते. असे असले तरी विलियम्सन आणि राशीद खान यांना रिटेन करण्याचा निर्णय जवळजवळ निश्चित आहे. वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि टी नटराजन यांना घेऊन संघ पुढे जातो की नवी सुरुवात करतो, हेच पाहणं आता औत्सुक्याचं आहे.

आयपीएल

[jnews_block_37 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”87″]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!