All SportsCricket

हार्दिक पंड्या याला अष्टपैलू म्हणण्यास कपिलदेव यांचा का आहे आक्षेप?

हार्दिक पंड्या अष्टपैलू कसा काय, असा प्रश्न भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिलदेव यांनी केला आहे. स्पष्टवक्ते असलेले कपिलदेव यांनी शुक्रवारी, 26 नोव्हेंबर 2021 रोजी म्हंटले आहे, की हार्दिक पंड्या अष्टपैलू असूच शकत नाही. कारण तो पुरेशी गोलंदाजी करीत नाही. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारतीय संघातील हुकमी खेळाडू असलेल्या पंड्याने विश्वकप टी-20 स्पर्धेत फक्त दोन सामन्यांत गोलंदाजी केली. या स्पर्धेत भारत साखळीतच बाद झाला होता.

आपल्या तंदुरुस्तीशी संबंधित अनेक मुद्द्यांवर खुलासा न केल्यानेही त्याच्यावर टीका होत आहे. न्यूझीलंडविरुद्ध टी-20 मालिकेतही त्याला स्थान मिळू शकले नाही. भारताने ही मालिका 3-0 अशी जिंकली. कपिलदेव यांनी रॉयल कलकत्ता गोल्फ कोर्सवर सांगितले, ‘‘अष्टपैलू हे बिरूद लावण्यासाठी त्याला दोन्ही कामे करावी लागतील. तो गोलंदाजी करीत नाही. त्याला तुम्ही अष्टपैलू कसं काय म्हणू शकता? तो दुखापतीतून बरा झाला, तर त्याला आधी गोलंदाजी करू द्या.’’

कपिलदेव म्हणाले, ‘‘तो भारतीय संघाचा महत्त्वपूर्ण फलंदाज आहे. गोलंदाजीसाठी त्याला बरेच सामने खेळावे लागतील. चांगली कामगिरी करावी लागेल. त्यानंतरच त्याला अष्टपैलू म्हणता येईल.’’ भारतीय संघाला पहिल्यांदाच विश्वविजेतेपद मिळवून देणारे कर्णधार कपिलदेव यांनी राहुल द्रविडचे कौतुक केले. ते म्हणाले, ‘‘तो चांगला माणूस आहे आणि उत्तम क्रिकेटपटूही आहे. एक क्रिकेटपटू म्हणून तो जितका यशस्वी राहिला, तेवढाच प्रशिक्षक म्हणूनही तो यशस्वी राहील.’’

तुमचे आवडते अष्टपैलू खेळाडू कोण, या प्रश्नावर कपिलदेव यांनी रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांची नावे घेतली. ते म्हणाले, ‘‘सध्या मी क्रिकेटचा फक्त आनंद घेण्यासाठी जातो. माझं तेवढंच काम आहे. मी तुमच्या दृष्टीने त्याकडे पाहत नाही.’’

आवडत्या अष्टपैलू खेळाडूंबाबत ते म्हणाले, ‘‘मी अश्विनचे नाव आवर्जून घेईन. तो जबरदस्त खेळाडू आहे. जडेजाही उत्तम क्रिकेटपटू आहे. मात्र, त्याची फलंदाजी उत्तम झाली; गोलंदाजी खराब झाली.’’ कपिलदेव यांनी पहिल्या कसोटी सामन्यात शतक झळकावणाऱ्या श्रेयस अय्यरचे कौतुक केले. ते म्हणाले, ‘‘जेव्हा तरुण फलंदाज पदार्पणातच शतक करतो, तेव्हा खेळ योग्य दिशेने जात आहे, असे खुशाल समजा. आम्हाला त्याच्यासारख्याच क्रिकेटपटूंची गरज आहे.’’

हार्दिक पंड्या उजव्या हाताचा मध्यमगती गोलंदाज, तसेच उत्तम फलंदाज आहे. हार्दिक पंड्याच्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात टी-20 क्रिकेटपासून झाली. त्याने 26 जानेवारी 2016 रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याच्या पुढच्याच वर्षी 2017 मध्ये हार्दिकने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अंतिम फेरीत पाकिस्तानविरुद्ध धडाकेबाज फलंदाजी केली होती. 

[jnews_block_37 header_icon=”fa-arrow-circle-down” first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”65″]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!