Who is Tushar Deshpande |
फलंदाजांची रांग पाहून देशपांडे बनला गोलंदाज
प्रत्येकाला फलंदाज बनण्याची इच्छा.. तोही फलंदाज बनण्यासाठीच शिवाजी पार्क जिमखान्यात दाखल झाला, पण बघतो तर काय, ज्याला त्याला फलंदाजच व्हायचं होतं. या गर्दीत आपला कसा निभाव लागणार? त्यामुळे तो गोलंदाजांच्या रांगेत उभा राहिला आणि आपली योग्यता इंडियन प्रीमियर लीगच्या यंदाच्या पर्वात सिद्धही केली… हा गोलंदाज आहे कल्याणचा तुषार देशपांडे.
इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) सामन्यात बुधवारी दिल्ली कॅपिटलने राजस्थान रॉयल्सवर 13 धावांनी विजय मिळविला. यात दिल्ली संघाकडून खेळणारा देशपांडे आपली छाप सोडून गेला. किंबहुना त्याच्यामुळेच दिल्लीला राजस्थानवर विजय मिळवता आला.
या कामगिरीनंतर देशपांडेने आपल्या गोलंदाजीच्या प्रवासाची आठवण सांगितली.
Who is Tushar Deshpande?
तो म्हणाला, “2007 मध्ये मी तीन-चार मुलांबरोबर कल्याणहून शिवाजी पार्कच्या मैदानावर निवड चाचणीसाठी गेलो होतो. तिथे पाहिलं तर फलंदाजांची लांब रांग होती. थोडीथोडकी नव्हे, तर 40-45 खेळाडू होते. 20-25 फलंदाज तर पॅड बांधून सज्ज होते. “
एका मराठी चॅट शोमध्ये त्याने ही आठवण सांगितली.
तो म्हणाला, “गोलंदाजांच्या रांगेत फक्त 15-20 खेळाडू होते. दुपारचे साडेतीन वाजले होते. मात्र, निवडीची वेळ होती सहा ते साडेसहापर्यंत.”
“मला वाटलं, फलंदाजीसाठी तर लांबलचक रांग आहे. यात मला संधी कशी मिळेल? मला तर रिकाम्या हाती परतायचं नव्हतं. म्हणून मी गोलंदाजांच्या रांगेत उभा राहिलो.”
हा निर्णय मनाविरुद्ध घेतलेला असला तरी तुषारने Tushar Deshpande | तो योग्य ठरवला आणि आयपीएलच्या पदार्पणातच ३७ धावांत दोन गडी बाद केले.
निवड चाचणीवर बोलताना देशपांडे म्हणाला, ‘‘निवड चाचणीच्या वेळी जेव्हा मला संधी मिळाली तेव्हा कुणालाही वाटलं नाही, की हा इतरांच्या तुलनेत वेगवान गोलंदाजी करू शकेल. गोलंदाजांची रांग हळूहळू पुढे सरकत होती. जेव्हा माझी वेळ आली त्या वेळी सुदैवाने माझ्या हातात नवा चेंडू आला.’’
‘‘मी रनअप घेतला आणि चेंडू टाकला. तो उत्तम आउटस्विंग होता आणि टप्पा घेत तो वेगाने पुढे गेला. पॅडी सर (पदमाकर शिवलकर) म्हणाले, ‘भारी चेंडू टाकलास. पुन्हा एकदा चेंडू टाक.’ ” त्या वेळी देशपांडेचा आत्मविश्वास दुणावला होता.
‘‘मला त्या वेळी हेही माहीत नव्हतं, की हे पॅडी सर कोण होते. मी पुन्हा चेंडू टाकला. सहा-सात वेळा चेंडू टाकल्यानंतर माझी निवड झाली.’’
ज्या दिल्ली कॅपिटल्सकडून आज तुषार देशपांडे खेळत आहे, त्या संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरबरोबर तो लहानपणापासूनच खेळत आला आहे. श्रेयसही शिवाजी पार्कच्या मैदानावर सराव करायचा.
देशपांडे म्हणाला, ‘‘नंतर शिवाजी पार्कवरील तिसऱ्या दिवशीही हीच प्रक्रिया पुढे सुरू राहिली. पॅडी सर आणि संदेश कावळे सरांनी माझं मनोबल वाढवलं आणि मी जिमखान्याकडून खेळण्याचा निर्णय घेतला.”
इथेच तुषार देशपांडेवर वेगवान गोलंदाजीचे पैलू पडत गेले. आज त्याने आयपीएलमध्ये पदार्पणातच दोन विकेट घेत दिल्लीच्या विजयात महत्त्वाची भूमिकाही बजावली.