प्रत्येक भारतीयाच्या मनात लतादीदी या नावाने अढळ स्थान मिळवलं यात कोणतेही दुमत नाही. अलौकिक दैवी गळा लाभलेल्या लता मंगेशकर यांचं क्रिकेटशीही घनिष्ठ नातं होतं. अनेक आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांना त्यांनी हजेरी लावलेली आहे. एवढंच नाही, तर 80 च्या दशकात बीसीसीआयने लता मंगेशकर यांच्याकडे मदत मागितली होती. याच मदतीमुळे कपिलदेव यांच्या नेतृत्वाखालील क्रिकेट संघाला प्रत्येकी एक लाख रुपये मिळाले होते. म्हणूनच लता मंगेशकर क्रिकेटच्या तारणहार देखील ठरल्या. लता मंगेशकर आणि क्रिकेट हे नातं कसं होतं, यावर प्रकाशझोत….
लता मंगेशकर क्रिकेटच्या तारणहार
ही घटना आहे 1983 नंतरची. कपिलदेव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने लॉर्डसवर वर्ल्डकप जिंकला होता.
त्या वेळी बीसीसीआयचे तत्कालीन अध्यक्ष आणि इंदिरा गांधी सरकारमध्ये मंत्री असलेले एनकेपी साळवे यांच्यासमोर एक मोठा प्रश्न पडला होता.
तो म्हणजे हा विजय साजरा करण्यासाठी पैसे कसे उभे करायचे? त्या वेळी भारतीय क्रिकेट आतासारखं श्रीमंत अजिबातच नव्हतं.
आज क्रिकेटपटूंवर जो पैशांचा पाऊस पडतो, तशी स्थिती पूर्वी नव्हती. आज तर बीसीसीआयकडे पाच अरब डॉलरच्या टीव्ही प्रसारणाचे करार आहेत.
80 च्या दशकात मोठ्या मुश्किलीने 20 पाउंडचा दैनिक भत्ता मिळत होता.
साळवे यांनी याबाबत राजसिंह डुंगरपूर यांच्याशी संपर्क साधला. डुंगरपूर यांनी एक शक्कल लढवली.
त्यांनी स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर एक कॉन्सर्ट करण्याचा प्रस्ताव दिला.
लता मंगेशकर यांना ऐकण्यासाठी पाहता पाहता स्टेडियम खचाखच भरले. लतादीदींनी त्या वेळी दोन तासांचा कार्यक्रम सादर केला.
बीसीसीआयने या कॉन्सर्टमधून बराच पैसा मिळवला. याच पैशातून सर्व खेळाडूंना प्रत्येकी एक लाख रुपये देण्यात आले.
सुनील वाल्सन यांनी सांगितले, ‘‘त्या वेळी ही रक्कम खूपच मोठी होती. एका क्रिकेट दौऱ्यासाठी मिळणारा पैसा आणि दैनिक भत्ता वाचवून मोठ्या मुश्किलीने बीसीसीआयकडे 60,000 रुपये शिल्लक राहायचे.’’
वाल्सन यांनी सांगितले, ‘‘काही लोकांनी तर 5,000 किंवा 10,000 रुपये देण्याची आश्वासने दिली होती. ही रक्कम फारच अपमानजनक होती. अशा कठीण प्रसंगात लतादीदींचा कॉन्सर्ट यादगार ठरला. लतादीदींचे हे योगदान बीसीसीआय कधीच विसरणार नाही. या योगदानाबद्दल सन्मान म्हणून लतादीदींना भारतातील आंतरराष्ट्रीय सामन्याची दोन व्हीआयपी तिकिटे राखीव ठेवली जात होती.
मुंबईचे एक वरिष्ठ क्रीडा पत्रकार मकरंद वैंगणकर यांनी सांगितले, ‘‘लताजी आणि त्यांचे बंधू हृदयनाथ मंगेशकर ब्रेबॉर्न स्टेडियमवर नेहमीच कसोटी सामना पाहायला येत होते. लतादीदी कितीही व्यस्त असो, सत्तरच्या दशकात त्या प्रत्येक सामना पाहायला येत होत्या.’’
लतादीदी यांनी 1983 च्या वर्ल्ड कपची अंतिम लढत लॉर्ड्सच्या गॅलरीतून बघितली होती. त्या वेळी दीदी कॉन्सर्टच्या निमित्ताने लंडनमध्येच होत्या.
भारताने उपांत्य फेरीत इंग्लंडचा धूळ चारल्यानंतर तर त्यांना अंतिम फेरीची खूपच उत्सुकता होती. ही लढत लॉर्ड्सला जाऊन बघण्याचे त्यांनी ठरविले.
भारतीय क्रिकेट संघाच्या विजयासाठी लता मंगेशकर यांनी ठेवले व्रत
क्रिकेटवरील लता मंगेशकर यांचं प्रेम जगजाहीर आहे. हे प्रेम इतकं होतं, की त्यांनी भारतीय क्रिकेट संघाच्या विजयासाठी व्रत ठेवलं होतं. ही घटना 2011 च्या विश्वकप स्पर्धेची आहे.
त्या वेळी उपांत्य फेरीत भारताचा पाकिस्तानविरुद्ध सामना होता. या सामन्यात भारताच्या विजयासाठी लता मंगेशकर यांनी निर्जल व्रत ठेवले होते.
भारतरत्न स्वरकोकिळा लता मंगेशकर यांनीच एका मुलाखतीत हा प्रसंग सांगितला होता. त्या वेळी त्या म्हणाल्या होत्या, ‘‘मी पूर्ण सामना पाहिला. मी खूप तणावात होते. जेव्हा भारतीय संघ खेळायचा तेव्हा घरात प्रत्येकाची काही ना काही अंधश्रद्धा असायचा. मी, मीना आणि उषा आम्ही तिघींनी या उपांत्य सामन्यादरम्यान काहीच खाल्लंपिलं नाही. मी सारखी भारताच्या विजयासाठी प्रार्थना करीत होते. भारताच्या विजयानंतरच आम्ही अन्नपाणी घेतलं.’’
1983 मधील विश्व कप स्पर्धेची आठवण सांगताना लतादीदी म्हणाल्या, ‘‘मी त्या वेळी लंडनमध्येच होते. त्या वेळी कपिलदेव आणि त्यांच्या संघाला इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यापूर्वी मी रात्रीच्या जेवणासाठी बोलावले होते. मी संघाला शुभेच्छा दिल्या. वर्ल्ड कप जिंकल्यानंतर कपिलदेव यांनी मला लंडनमधील हॉटेलमध्ये रात्रीच्या भोजनासाठी आमंत्रित केले होते.’’
सचिन तेंडुलकर यांना लतादीदी मुलगाच मानत होत्या. सचिनही त्यांना आई सरस्वती म्हणत होता. योगायोग असा, की सरस्वतीपूजेच्या दुसऱ्याच दिवशी भारताच्या सरस्वतीने देवलोकात प्रस्थान केले.
सचिन ‘आई’ म्हणाला…
सचिन तेंडुलकर याच्यावर तर लतादीदींची आपल्या मुलाप्रमाणे माया.. सचिनही त्यांना आई म्हणून संबोधत.
‘सचिन कायम मला त्याच्या आईप्रमाणेच मानतो अन् मीदेखील आईप्रमाणेच त्याच्या यशासाठी प्रार्थना करते.
सचिन यांनी सर्वप्रथम मला आई अशी हाक मारली तो क्षण मी कधीच विसरू शकरणार नाही.
असा मुलगा लाभणे हे मी माझे भाग्य समजते’, असेही लता मंगेशकर प्रमाने म्हणाल्या होत्या.
थकवा पळविणारी गाणी
लतादीदी यांची गाणी आपला थकवाच दूर करतात, असे सचिन तेंडुलकर कायम म्हणतो.
‘सचिन आपल्या कामाबाबत खूप सजग, चोख असतो. मीदेखील माझ्या कामाबाबत तशीच आहे. बघा ना, त्याला संगीत आवडते आणि मी क्रिकेटची चाहती आहे. सचिन सद्गृहस्थ आहे. देवाला मानणारा सचिन आपल्या यशाचं श्रेयही कायम ईश्वर आणि आपल्या वडिलांना देतो. हे मला खूप आवडतं’, असे लता मंगेशकर आवर्जून सांगत.
लता मंगेशकर यांचं अखेरचं गाणं…
भारतीय क्रिकेट संघाने काळी पट्टी लावून लता मंगेशकर यांना श्रद्धांजली
भारतीय क्रिकेट संघ 6 फेब्रुवारी 2022 रोजी गुजरातमध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध ऐतिहासिक हजारावा वन-डे सामना खेळत आहे.
याच दिवशी सूरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनाची बातमी धडकली. रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघाने त्यांना श्रद्धांजली वाहताना काळी पट्टी लावून हा सामना खेळला.
वन-डे मालिकेतील वेस्ट इंडीजविरुद्धचा हा पहिलाच सामना होता.
देशातील महान व्यक्तिमत्त्वांपैकी एक असलेल्या लता मंगेशकर यांचं वयाच्या 92 व्या वर्षी 6 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात निधन झाले.
लतादीदींच्या निधनावर बीसीसीआयने ट्वीट केले आहे.
त्यात नमूद केले आहे, ‘‘लता मंगेशकर यांच्या निधनामुळे भारतीय क्रिकेट संघ आज काळी पट्टी बांधून खेळेल. लतादीदी यांना क्रिकेट खूप आवडायचे. त्यांनी नेहमीच क्रिकेट आणि टीम इंडियाचे समर्थन केले होते.’’ गुजरात क्रिकेट संघटनेच्या (जीसीए) एका अधिकाऱ्याने सांगितले, की स्टेडियममध्ये भारतीय तिरंगा अर्ध्यावर उतरवला. राज्य क्रिकेट संघटनेकडून कोणतेही सेलिब्रेशन केले जाणार नाही.
महान गायिका सूरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनावर क्रीडाविश्वाने श्रद्धांजली अर्पण केली. लतादीदी नेहमीच लोकांच्या मनात राहतील, अशा शब्दांत आदरांजली वाहण्यात आली.
क्रीडाविश्वाने वाहिली लता मंगेशकर यांना श्रद्धांजली
- लतादीदींच्या निधनाचे वृत्त ऐकून दु:ख झालं. त्यांची सुरेल गीते जगभरातील लोकांसाठी हृदयस्पर्शी आहेत. – विराट कोहली, माजी कर्णधार
- तुमचं संगीत आमच्या आत्म्याला भिडलं. लता मंगेशकर यांच्या आत्म्याला देव शांती देवो. तुम्ही दिलेलं हे वैभव प्रत्येक पिढीसाठी प्रेरणादायी राहील. – शिखर धवन, सलामीचा फलंदाज
- भारताची आज स्वरकोकिळा हरपली. या कठीण प्रसंगात लतादीदींच्या परिवाराप्रति माझ्या संवेदना. – अजिंक्य रहाणे
- लता मंगेशकर यांचा मधुर आवाज लोकांना नेहमीत प्रेरणादायी ठरेल. – अनिल कुंबळे, माजी फिरकी गोलंदाज
- भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाचे वृत्त ऐकून खूप दुःख झालं. त्यांचा आवाज आणि सुरेल गीते अमर राहतील. – व्हीव्हीएस लक्ष्मण
- भारताची स्वरकोकिळा एक असा आवाज आहे जो जगभरातील कोट्यवधी लोकांना आनंद देत होता. – वीरेंद्र सेहवाग
- महान लोक अनंतकाळ जिवंत राहतात. त्यांच्यासारखा दुसरा कोणी नाही. – गौतम गंभीर
- लता मंगेशकर यांचे निधन भारतासाठी धक्का आहे. त्यांची जादुई आवाज अमर राहील. – मिताली राज
झिम्बाब्वेविरुद्ध भारताकडून ‘देव’ खेळला…!