टेनिस हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट असलेली माजी महिला टेनिस स्टार क्रिस एवर्ट यांना अंडाशयाचा कर्करोग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. क्रिस एवर्ट यांनीच 15 जानेवारी 2022 रोजी ही माहिती दिली. मात्र, हा कर्करोग पहिल्याच टप्प्यात असल्याचेही एवर्ट यांनी नमूद केले आहे. क्रिस एवर्ट 67 वर्षांच्या आहेत. एवर्ट यांनी ईएसपीएन डॉटकॉम या संकेतस्थळावर ही माहिती दिली. क्रिस एवर्ट ऑन एअर उद्घोषकही आहेत. या क्रिस एवर्ट आजच्या पिढीला फारशा माहीत नसतील… टेनिस विश्वात विक्रमी कामगिरी करणाऱ्या क्रिस एवर्ट यांच्याविषयी…

क्रिस एवर्ट यांना गेल्या महिन्यात डिसेंबर 2021 रोजी कर्करोगाविषयी माहिती मिळाली. या आठवड्यातच त्यांच्यावर किमोथेरपी सुरू झाली आहे. एवर्ट म्हणाल्या, ‘‘मी आयुष्य छानपैकी जगले आहे. आता पुढे काही आव्हानांचा सामना करायचा आहे.’’ क्रिस एवर्ट यांनी 18 वेळा टेनिस ग्रँडस्लॅम एकेरीचे विजेतेपद मिळवले आहे. जगातील अव्वल क्रमांकावर राहिलेल्या या टेनिसपटू आहेत. 1995 मध्ये त्यांना टेनिस हॉल ऑफ फेममध्ये स्थान मिळाले होते. क्रिस एवर्ट यांची बहीण जीन एवर्ट डुबिन यांचे 62 व्या वर्षी फेब्रुवारी 2020 मध्ये कर्करोगाने निधन झाले होते.
कोण आहेत क्रिस एवर्ट?
ऐंशीच्या दशकातील अव्वल महिला टेनिसपटू म्हणून क्रिस एवर्ट यांना ओळखले जाते. ‘क्रिस एवर्ट लॉयड’ या नावाने त्या प्रसिद्ध आहेत. त्या जगातील अव्वल क्रमांकावर सात वेळा (1974–78, 1980, 1981) विराजमान होत्या. कारकिर्दीत त्यांनी एकेरीत 157, तर दुहेरीत ३२ विजेतीपदे जिंकली आहेत. व्यावसायिक टेनिसमध्ये 34 वेळा ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. टेनिस इतिहासातला हा विक्रम 13 वर्षे त्यांच्या नावावर होता. एवर्ट यांची आणखी थक्क करणारी कामगिरी म्हणजे ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या एकेरीत त्या कधीही पहिल्या किंवा दुसऱ्या फेरीत पराभूत झालेल्या नाहीत. तिसऱ्या फेरीत त्या फक्त दोनच वेळा पराभूत झाल्या आहेत. महिला टेनिसच्या इतिहासात त्यांनी सात वेळा फ्रेंच ओपन स्पर्धेचे विजेतेपद जिंकले आहे. अमेरिकन ओपन स्पर्धेचे विजेतेपद सहा वेळा जिंकले आहे. अमेरिकन ओपनच्या विजेतेपदांच्या विक्रमाची बरोबरी सेरेना विल्यम्सने केली आहे.
क्रिस एवर्ट यांच्याविषयी न ऐकलेल्या गोष्टी
जिमी कॉनर्ससोबत प्रेमप्रकरण चर्चेत
क्रिस एवर्ट हिचं 1970 च्या दशकात जिमी कॉनर्स याच्याशी असलेलं प्रेमप्रकरण अधिक चवीनं चघळलं गेलं होतं. दोघेही यशाच्या शिखरावर असल्याने या लोकप्रिय जोडगोळीची चर्चा सार्वजनिक होणे स्वाभाविकच होते. 1974 मध्ये या दोघांनी एकेरीतील विम्बल्डनचं विजेतेपद जिंकलं. त्यानंतर या दोघांचं प्रेमप्रकरण अधिक चर्चेत आलं. एवर्ट आणि कॉनर्स हे दोघे मिश्र दुहेरीतही खेळले. अखेर या दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. त्या वेळी एवर्ट अवघी 19 वर्षांची होती. लग्नाची 8 नोव्हेंबर 1974 ही तारीखही निश्चित झाली. मात्र हे प्रेमप्रकरण फार काळ टिकलं नाही. त्यामुळे नियोजित तारखेला होणारा विवाहही रद्द झाला. असं असलं तरी त्यांचं प्रेमप्रकरण पुढेही काही वर्षे सुरू होतं. 2013 मध्ये कॉनर्स याने आपल्या आत्मचरित्रात एवर्टशी असलेल्या प्रेमप्रकरणाचा उल्लेख केला आहे. त्यात त्याने म्हंटले आहे, की एवर्ट गर्भवती राहिली होती. मात्र तिने एकतर्फी निर्णय घेत गर्भपात केला. आपलं खासगी आयुष्य अशा पद्धतीने उघड केल्यानं एवर्ट प्रचंड नाराज झाली. माझं खासगी आयुष्य चुकीच्या पद्धतीने सादर केल्याची नाराजीही तिने स्पष्टपणे नोंदवली होती.
क्रिस एवर्टचं वैवाहिक आयुष्य
क्रिस एवर्टच्या प्रेम प्रकरणाबरोबरच वैवाहिक आयुष्यही टेनिस विश्वात नेहमीच चर्चेत राहिलं. तिचे तीन विवाह झाले होते. मात्र एकही टिकलं नाही. जिमी कॉनर्ससोबतचं प्रेमप्रकरण विवाहाच्या मांडवापर्यंत पोहोचलं नाही. मात्र, 1979 मध्ये एवर्ट ब्रिटनचा टेनिसपटू जॉन लॉयड याच्याशी विवाहबद्ध झाली. त्यामुळे ती क्रिस एवर्ट लॉयड या नावाने ओळखली जाऊ लागली. मात्र, हा विवाहही फार काळ टिकला नाही. त्याला कारण ठरलं ब्रिटनचा गायक आणि अभिनेता अॅडम फेथ याच्यासोबतचे विवाहबाह्य संबंध. त्यामुळे लॉयड याच्यापासून ती विभक्त झाली. मात्र, ‘लॉयड ऑन लॉयड’ या तिच्या आत्मकथेची सहलेखिका कॅरोल थॅचर हिने या दोघांना पुन्हा एकत्र आणले. अर्थात, त्याचा फारसा उपयोग झाला नाही. एप्रिल 1987 मध्ये त्यांनी विभक्त होण्याचा ठाम निर्णय घेतला.
1988 मध्ये एवर्ट स्की खेळाडू (बर्फावरचा खेळ) अँडी मिल याच्याशी विवाहबद्ध झाली. हा तिचा दुसरा विवाह. या दोघांना तीन मुलं झाली. अलेक्झांडर (1991), निकोलस (1994) आणि कॉल्टन (1996) ही मिल दाम्पत्याची तीन मुलं. हा विवाह अर्ध्यावरच मोडला. 13 नोव्हेंबर 2006 मध्ये एवर्टने घटस्फोटाचा अर्ज दाखल केला आणि 4 डिसेंबर 2006 रोजी दोघे विभक्त झाले. तडजोडीपोटी एवर्टने मिल याला 7 मिलियन डॉलरची रक्कम (आज हीच रक्कम भारतीय रुपयांत 52 कोटी 7 लाख 5 हजार 500 एवढी असती) मोजावी लागली होती.
मिलपासून विभक्त झाल्यानंतर एवर्टने बहामास येथे 28 जून 2008 रोजी तिसरा विवाह गोल्फर ग्रेग नॉर्मन याच्याशी केला. हा विवाह दीड वर्षही टिकला नाही. हे दोघे 15 महिन्यांतच विभक्त झाले. 8 डिसेंबर 2009 रोजी या दोघांनी घटस्फोटावर शिक्कामोर्तब केले.
एवर्ट सध्या काय करते?
क्रिस एवर्ट हिने भाऊ जॉन याच्यासोबत एवर्ट टेनिस अकादमी स्थापन केली आहे. फ्लोरिडातील बोका रॅटन येथे ही अकादमी असून, सेंट अँड्र्यू शाळेच्या संघाला ती प्रशिक्षण देत आहे. टेनिस मासिकातही ती लिहिते. ईएसपीएन वाहिनीवर ग्रँडस्लॅम स्पर्धांचे ती समालोचनही करते.
विजेतीपदे
क्रिस एवर्ट यांचे या कट्टर प्रतिस्पर्ध्यांविरुद्धचे जय-पराजय
Follow on Twitter @kheliyad