All SportsSports History

ऑलिम्पिक इतिहासातला म्युनिक नरसंहार : भाग 1

ऑलिम्पिक इतिहासातला म्युनिक नरसंहार

ऑलिम्पिक इतिहासाची पाने खेळाडूंच्या विक्रमांनी समृद्ध होत असली तरी यातील एक पान असेही आहे, जे खेळाडूंच्या रक्ताने माखलेले आहे! होय, 1972 च्या म्युनिक ऑलिम्पिकमध्ये दहशतवाद्यांनी ११ इस्राईली खेळाडूंना निर्दयपणे गोळ्या घातल्या… ऑलिम्पिकच्या इतिहासातली (Olympic history) ही घटना ‘म्युनिक नरसंहार’ (Munich massacre) म्हणूनही ओळखली जाते. नेमकी काय आहे ही घटना?

बीएमडब्लू कार माहीतच असेल… त्याचा जनक आहे जर्मनीचे म्युनिक शहर. याच शहराला 1972 च्या ऑलिम्पिकचे यजमानपद मिळाले. त्या वेळी या ऑलिम्पिकची टॅगलाइन होती… ‘आनंदी खेळ’ (The cheerful Games). मात्र, पुढे अशा काही घटना घडल्या, की ही टॅगलाइन कोणाच्याच लक्षात राहिली नाही. लक्षात राहिला तो म्युनिक नरसंहार (Munich massacre).

म्युनिक ऑलिम्पकचा कालावधी होता २६ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर १९७२ दरम्यानचा. नाझी सत्ताकाळात १९३६ मध्ये बर्लिन ऑलिम्पिकनंतर जर्मनीला १९७२ मध्ये मिळालेले हे दुसरे ऑलिम्पिकचे यजमानपद. दुसऱ्या महायुद्धाच्या आठवणी ताज्या होत्या. त्या पुसण्यासाठी जर्मनी नव्या उमेदीने उभा राहिला होता. ऑलिम्पिकचे यजमानपद हे त्या प्रयत्नाचं पहिलं पाऊल. स्पर्धेची उत्कंठा वाढत असतानाच ५ सप्टेंबर १९७२ हा दिवस इस्राईलच्या खेळाडूंसाठी काळा दिवस ठरला…

जर्मनीत ऑलिम्पिकच्या रंगमंचावर नाट्यमय घडामोडी घडत होत्या, तर दुसरीकडे पॅलेस्टाइनमध्ये दहशतवादी याच ऑलिम्पिकची ‘ब्लॅक सप्टेंबर’ (Black september) नावाने वेगळी स्क्रीप्ट लिहीत होते. ही घटना होती ५ सप्टेंबर १९७२ ची. १२१ देशांतील खेळाडूंनी भरलेलं ऑलिम्पिक गाव (क्रीडाग्राम)- ‘कोनोली स्ट्रास ३१’ (Connolly Strasse 31) ४ सप्टेंबर १९७२ रोजी रात्री गाढ निद्रेत होतं.

क्रीडाग्राममध्ये असे घुसले दहशतवादी

पहाटेचे चार वाजले होते. पॅलेस्टाइनचं आठ जणांचं आत्मघातकी पथक ‘कोनोली स्ट्रास ३१’ या क्रीडाग्रामजवळ या ऑलिम्पिक गावात घुसलं. आठही दहशतवादी सहा फुटांच्या तारेच्या कुंपणावर चढले. प्रेक्षकांनी दिवसभर डोक्यावर घेतलेलं क्रीडाग्राम पहाटे शांत पहुडलं असलं तरी अचानक दहशतवाद्यांना कुणी तरी असल्याची जाणीव झाली. ते अमेरिकेचे खेळाडू होते…! ते मद्यधुंद असल्याचे जाणवत होते. (या कटात सामील असलेल्या जमाल गाशी नावाच्या दहशतवाद्यानेच हा खुलासा केला.) मात्र, 2012 मध्ये स्पष्ट झाले, की ते अमेरिकेचे नसून, कॅनडाचे खेळाडू होते. त्यांना वाटलं, दुसऱ्या देशाचे खेळाडू असतील. त्यांनी या दहशतवाद्यांना कुंपणावरून उतरण्यास मदत केली. कारण दहशतवाद्यांनी अगदी खेळाडूंसारखाच ट्रॅकसूट परिधान केला होता. नंतर हे खेळाडू निघून गेले.

हे सगळे दहशतवादी पॅलेस्टाइन लिबरेशन ऑर्गनायझेशनशी संबंधित होते. एकेक करीत सर्व जण तारेच्या कुंपणावरून सुरक्षितपणे उतरले आणि क्रीडाग्राममधील इस्रायली खेळाडूंच्या फ्लॅटकडे निघाले. प्रत्येकाच्या खांद्यावर स्पोर्ट्स बॅग होती. त्यात कपड्यांखाली ‘कॅलिशनिकोव असॉल्ट रायफल’सारख्या अत्याधुनिक रायफली, पिस्तूल, हातबॉम्ब दडवलेेले होते.

(थोडेसे रायफलींविषयी ः असं म्हणतात, की या ‘कॅलिशनिकोव असॉल्ट रायफली’चा (Kalashnikov rifle) आविष्कार एका सैबेरियन शेतकऱ्याने केला होता. या रायफलीत 7.62 एमएम गोळ्यांच्या 30 फैरी असतात. ही ऑटोमॅटिक मोडवर लावली तर मिनिटाला १०० गोळ्या फायर होतात, इतक्या घातक आणि अत्याधुनिक रायफली दहशतवाद्यांकडे होत्या.)

प्रत्येक दहशतवाद्यावर जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या होत्या. सात दहशतवादी फ्लॅटमध्ये घुसले, तर एक जण इमारतीबाहेर थांबला होता.

म्युनिक ऑलिम्पिक

कुस्ती प्रशिक्षकाने रोखले दहशतवाद्यांना, पण…

इमारतीत सर्व इस्राइली खेळाडू गाढ झोपलेले होते. नाही म्हंटलं, तरी कुस्तीचा प्रशिक्षक तेवढा अर्धवट झोपलेला होता. या प्रशिक्षकाचं नाव होतं योसेफ गतफ्रीयंद (Yossef Gutfreund). काही तरी संशयास्पद हालचालींची त्यांना जाणीव झाली. कोणी तरी दरवाजावर करकर असा घासत असल्याचा आ‌वाज आला. डोळ्यांवर झोप असली तरी योसेफ यांनी किलकिल्या डोळ्यांनी पाहिलं, तर बाहेर त्यांना दहशतवाद्याचा डोळा व कॅलिशनिकोव रायफलचा (Kalashnikov rifle) दस्ता दिसला. त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली. सहा फूट तीन इंच उंचीचा आणि 140 किलो वजनाच्या धिप्पाड देहयष्टीचे योसेफ हे पाहून ओरडलेच. ते हिब्रूतच ओरडले… ‘चेवरेतिसतात्रू’ (जीव वाचवा पोरांनो).

योसेफ ज्या रूममध्ये होते ती होती प्रशिक्षकांची. योसेफ यांनी आपली सगळी शक्ती पणाला लावत दरवाजा दाबून धरला. दहशतवादी दरवाजा उघडण्यासाठी जोर लावत होते, तर इकडे योसेफ जीव वाचविण्यासाठी आपलं संपूर्ण शरीर दरवाजावर झोकून दिलं होतं. प्रसंग बाका होता. दहशतवाद्यांना समजून चुकलं, की योसेफ नावाचा भीमकाय माणूस आपल्याला आवरणार नाही. मग तेथे असलेल्या सातही दहशतवाद्यांनी दरवाजावर एकाच वेळी धक्के दिले. तरीही योसेफ यांनी दहा सेकंदांपर्यंत दरवाजा रोखून धरला होता.

म्युनिक ऑलिम्पिक 1972
म्युनिक ऑलिम्पिक नरसंहार

सोकोलोस्की जीव वाचविण्यात यशस्वी

तोपर्यंत दुसरा इस्रायली तुविया सोकोलोस्की (Tuvia Sokolovsky) याला बाहेर पडण्यासाठी एवढा वेळ तर पुरेसा होता. सोकोलोस्की वेटलिफ्टिंगचा प्रशिक्षक. मात्र त्याने खिडकी तोडून उडी घेतली नि एखाद्या 100 मीटर शर्यतीतल्या धावपटूसारखा जीव मुठीत धरून पळाला. एका दहशतवाद्याने त्याचा पाठलाग केला. त्याने बंदुकीतून फायरही केलं. सोकोलोस्कीच्या कानाजवळून गोळी सूं सूंं…जात होती. त्याला ते जाणवत होतं. पण सोकोलोस्कीने मागे वळून पाहिलंच नाही. तो फक्त जिवाच्या आकांताने पळत होता. सोकोलोस्की वाचला, पण त्याचे सहकारी दहशतवाद्यांच्या हाती लागले.

योसेफचा एकाकी लढा संपुष्टात

सोकोलोस्की पळाला, पण तोपर्यंत दहशतवाद्यांनी योसेफ गतफ्रीयंद (Yossef Gutfreund) यांच्यावर नियंत्रण मिळवलं. योसेफ यांच्याबरोबरच तेथे आणखी चार इस्रायलींनाही दहशतवाद्यांनी बंदुकीचा धाक दाखवत ओलीस ठेवले. हे चार इस्रायली प्रशिक्षक होते- केहेत शोर (Kehat Shorr- नेमबाजीचा प्रशिक्षक), अमित्ज़र शपिरा (Amitzur Shapira- ट्रँक अँड फिल्डचा प्रशिक्षक), आंद्रे स्पित्झर (Andre Spitzer) आणि याकोव स्प्रिंगर (Yakov Springer- वेटलिफ्टिंग प्रशिक्षक व पूर्वाश्रमीचा पहिलवान). योसेफ यांचा एकाकी लढा संपुष्टात आला होता. त्यांचे सहकारीही दहशतवाद्यांच्या हाती लागले होते. मात्र, दहशतवाद्यांना दुसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या इमारतीतील इतर इस्रायलींपर्यंत पोहोचता आलं नाही. कारण योसेफ यांनी दिलेला लढा इतरांचे प्राण वाचविण्यात यशस्वी झाला. पण दहशतवाद्यांना तिसऱ्या क्रमांकाच्या इमारतीपर्यंत पोहोचण्यात यश आलं. तिथं त्यांनी पहिलवान एलिझर हाल्फिन (Eliezer Halfin), ग्रीको-रोमनचा पहिलवान मार्क स्लावीन (Mark Slavin), फ्रीस्टाइलचा पहिलवान गाद ज़ोबारी (Gad Tsobari), मूळचा अमेरिकी असलेला वेटलिफ्टर डेविड मार्क बर्गर (David Berger), फ्लायवेटमधील वेटलिफ्टर झीव फ़्रीडमन ( Ze’ev Friedman) आणि लीबियात जन्मलेला, परंतु इस्रायली संघातला वेटलिफ्टर योसेफ रोमानो (Yossef Romano) यांनाही ओलिस धरलं.

मोशे वेनबर्गने लोळवले दहशतवाद्याला…

या दहशतवाद्यांचा प्रमुख ईसा होता. एव्हान योसेफ गतफ्रियंदने आरडाओऱड करीत इतरांना सावध केलं होतंच. कुस्ती प्रशिक्षक मोशे वेनबर्गच्या (Moshe Weinberg) गालावर गोळी झाडल्याने तो जखमी झाला. त्याच्यावर बंदूक रोखत इतर इस्रायली खेळाडूंपर्यंत घेऊन जाण्यास सांगितलं. मोशेनेच दुसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या अपार्टमेंटमध्ये इस्रायली नसल्याचं सांगितलं. मात्र, तीन नंबरच्या अपार्टमेंटमध्ये इस्रायली असल्याचं सांगितलं. त्याचा हेतू हा होता, की ते सगळे पहिलवान आहेत. त्यांनी एकाच वेळी या दहशतवाद्यांवर हल्ला केला तर दहशतवाद्यांपासून सुटका होऊ शकेल. पण तसं काहीही झालं नाही. कारण सगळे झोपेच्या धुंदीत होते. त्यांना काही कळण्याच्या आतच दहशतवाद्यांनी त्यांना ओलिस ठेवलं. अपार्टमेंट 1 वरून परतताना मोशे किचनच्या दिशेने पळाला. त्याला एकूणच परिस्थितीची कल्पना आली होती. त्याला माहीत होतं, की जीव वाचणं शक्य नाही. तो मल्लच. त्यामुळे शरण जाण्यापेक्षा लढून मरावं, म्हणून त्याने फळे कापण्याचा चाकू घेत कानोसा घेत असतानाच दहशतवाद्यांचा म्होरक्या ईसा हा दहशतवादी घुसला. त्याच वेळी त्याने चाकूने त्याच्यावर हल्ला चढवला. अनपेक्षित हल्ल्याने ईसा जमिनीवर कोसळला. त्याची रायफलही हातातून निसटली. मात्र, त्याच्या मागे इतरही दहशतवादी होते. त्यातल्या एकानेक्षणाचाही विलंब न लावता वेनबर्गच्या डोक्यातच गोळी झाडली. वेनबर्गचा जागीच मृत्यू झाला. मोशेच्या धाडसामुळे मात्र फ्रीस्टाइलचा पहिलवान गाद ज़ोबारी (Gad Tsobari) पळून जाण्यात यशस्वी ठरला. वेटलिफ्टर योसेफ रोमानो (Yossef Romano) हा पूर्वी सैनिक होता. त्याने इस्राईलकडून युद्धातही भाग घेतलेला होता. तोही मोशेसारखाच लढला. एका दहशतवाद्याला जखमीही केले. अखेर गोळी लागून रोमानोही मृत्युमुखी पडला.

 

म्युनिक ऑलिम्पिक 1972
म्युनिक ऑलिम्पिक नरसंहार : दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेला कुस्ती प्रशिक्षक मोशे वेनबर्ग याचे पत्नीसोबतचे 1971 मधील छायाचित्र. त्याला एक मुलगा असून, तो सध्या अमेरिकेत अभिनेता व लेखक आहे. (Source : Google)

भारतीयांना वाटलं, पाकिस्तानी दहशतवाद्यांचा हल्ला तर नाही

म्युनिक ऑलिम्पिकमधला हा नरसंहार सुरू होऊन 25 मिनिटे झाली होती. तोपर्यंत पॅलेस्टिनी दहशतवाद्यांनी दोन इस्रायली खेळाडूंची हत्या केली होती. दोन खेळाडू पळून जाण्यात यशस्वी ठरले, पण दहशतवाद्यांनी आठ खेळाडूंना ओलिस धरले होते. या इस्रायली अपार्टमेंटच्या अगदी समोर भारतीय खेळाडूंचा निवास होता. 72 च्या ऑलिम्पिकमध्ये धावपटू एडवर्ड सीक्विरा (Edward Sequeira) भारताचं प्रतिनिधित्व करीत होता. त्या वेळी भारताचा लोकप्रिय धावपटू म्हणून त्याचा लौकिक होता. एडी या टोपणनावाने तो ओळखला जायचा. तो गाढ झोपलेला होता, पण समोरच्या अपार्टमेंटमधून जोरजोरात आवाज कानावर पडल्याने तो जागा झाला. त्याच्याच रूममध्ये श्रीराम सिंह हा 800 मीटरचा धावपटू झोपलेला होता. एडीने त्याला उठवलं. एडीला वाटलं, पाकिस्तानी दहशतवाद्यांनी तर हल्ला केला नाही…

भारतीय गोटात खळबळ

एडीचा संशय स्वाभाविक होता. कारण डिसेंबर १९७१ मध्येच भारत-पाकिस्तान युद्ध भडकलं होतं. याच युद्धातून बांगलादेशाची निर्मिती झाली. ही घटना एकदम ताजी होती. त्याला काही महिनेच उलटले होते. त्यामुळे या युद्धाचा बदला म्हणून पाकिस्तानी दहशतवाद्यांनी भारतीय खेळाडूंवर हल्ला केला असावा. त्यांनी समोरच्या बाल्कनीत चेहरा मास्कने ढकलेला एक दहशतवादी पाहिला. त्याच वेळी हॉकीपटू अशोक कुमार सरावासाठी बाहेर पडले होते. बाहेर येताच त्यांना इस्रायली अपार्टमेंटबाहेर गर्दी दिसली. वरच्या मजल्यावरील एक दहशतवादी पोलिसांशी बोलताना त्यांना दिसला. एव्हाना भारतीय गोटात कमालीची खळबळ उडालेली होती.

दहशतवाद्यांनी इस्राईल, जर्मनीपुढे ठेवल्या मागण्या…

इकडे बचावलेल्या इस्रायली खेळाडूंनी सर्वांत आधी दहशतवादी हल्ला झाल्याचं ओरडून सांगितलं. अर्ध्या तासाने दहशतवाद्यांनी जर्मन प्रशासनासमोर इंग्रजीत टाइप केलेली आपल्या मागण्यांची एक यादी दिली. याच दरम्यान दहशतवाद्यांनी निर्दयतेने मोशे वेनबर्गचा मृतदेह खाली रस्त्यावर फेकला. त्यांनी मागणी केली, की इस्राईलमधील कारागृहांत असलेल्या आमच्या 234 साथीदारांची सुटका करावी. लाल सेने गटाचा संस्थापक आंद्रियस बादेर आणि उल्लिके मीनहोफ जर्मनीतील कारागृहात होते. त्यांनाही मुक्त करण्याची मागणी करण्यात आली. त्यांना सुरक्षित स्थानी घेऊन जाण्यासाठी आम्हाला तीन विमानेही पाठवावीत. या मागण्यांच्या पूर्ततेसाठी सकाळी नऊपर्यंतची मुदत देण्यात आली. नंतर ही मुदत दुपारपर्यंत वाढवण्यात आली. जर्मनी व्यूहरचना रचायची खरी, पण तोपर्यंत जर्मन अपार्टमेंटमधील अनेक पत्रकार टीव्हीवर ब्रेकिंग न्यूज देत स्थितीच्या अप टू डेट घडामोडी देऊ लागले. हा उतावीळपणा नेमका या व्यूहरचनेला खीळ घालत गेला. त्यामुळे दहशतवाद्यांनाही जर्मनची धोरणं कळायची.

इस्राईलने धुडकावल्या मागण्या…

त्या वेळी जर्मनीचे चॅन्सेलर होते विली ब्रांट (Willy Brandt) आणि इस्राईलच्या पंतप्रधान होत्या गोल्डा मीर (Golda Meir). गोल्डा मीर जगातल्या चौथ्या, तर इस्रायलच्या पहिल्याच महिला पंतप्रधान होत्या. त्या अतिशय करारी पंतप्रधान होत्या. ब्रांट आणि मीर यांच्यात दूरध्वनीवर चर्चा झाली. मात्र, त्यातून काहीही ठोस निष्कर्ष निघाले नाहीत. अशा प्रसंगात इस्राईलची भूमिका स्पष्ट होती, ती म्हणजे अशा हल्ल्यात दहशतवाद्यांच्या मागण्या अजिबात न स्वीकारणे. म्युनिक ऑलिम्पिकमधील नरसंहार इस्राईलसाठी मोठा धक्का होता. 

(संदर्भ ः वेनजीन्स ः दि ट्रू स्टोरी ऑफ ॲन इस्रायली काउंटर- टेररिस्ट टीम (Vengeance: The True Story of an Israeli Counter-Terrorist Team) लेखक ः जॉर्ज जोनास (George Jonas))

जर्मनांच्या कुचकामी योजना

एकूणच या घटना घडामोडींत दहशतवाद्यांच्या मागण्या पूर्ण करण्यात उशीर होत गेला. दहशतवाद्यांनीही आणखी वेळ देत या दोन्ही देशांना रात्री नऊपर्यंतची मुदत वाढवून दिली. नाही-हो म्हणता अखेर तीन विमानांऐवजी एकाच विमानावर दहशतवादी राजी झाले. रात्री आठ वाजता दहशतवाद्यांना अपार्टमेंटमध्ये जेवण पाठवण्यात आले. जर्मनांनी जाणूनबुजून जेवण भरपूर पाठवलं. हेतू हाच, की जर्मन स्वयंसेवकांना आत जेवण घेऊन जाण्यास सांगितलं जाईल, तेव्हा हीच संधी साधून दहशतवाद्यांना पकडता येईल. जर्मनांचा हा हेतू अगदीच कुचकामी ठरला. कारण दहशतवाद्यांनी जेवण बाहेरच ठेवण्यास सांगितलं. आत कोणालाही येऊ दिलं नाही. जेवण ठेवल्यानंतर त्यांचा प्रमुख ईसा बाहेर आला आणि त्याने एकेक करून जेवणाचे सगळे डबे आत नेले.

जर्मनांची दुसरी योजनाही अयशस्वी

इस्राईलने तर कोणत्याही मागण्या मान्य करण्यास स्पष्ट नकार दिला होता. प्रश्न जर्मनांचा होता. त्यांच्या भूमीत दहशतवादी घुसले होते. दुसरे म्हणजे इतर खेळाडूंमध्येही असुरक्षिततेची भावना बळावली होती. म्युनिक ऑलिम्पिकमधील नरसंहार हे क्रीडाकुंभालाही लागलेले गालबोट होते. त्यामुळे जर्मनांना काही तरी हालचाली करणे भाग होते. दहशतवाद्यांना विमान हवंच होतं. कारण त्यांना सर्व खेळाडूंना इजिप्तला घेऊन जायचं होतं. अखेर जर्मनीने दहशतवाद्यांची एका विमानाची मागणी मान्य केली. मात्र ही मागणी मान्य करताना जर्मनांनी दहशतवाद्यांना पकडण्याची नवी योजना आखली. यामागची योजना अशी होती, की जेव्हा हे दहशतवादी फर्सटेनफेल्डब्रक (Fürstenfeldbruck) या एअर पोर्टवर विमान शिरतील, त्याच वेळी जर्मनीचे कमांडो पथक दहशतवाद्यांवर हल्ला करून इस्रायली खेळाडूंची सुटका करतील.

गंमत पाहा, फर्सटेनफेल्डब्रक (Fürstenfeldbruck) एअरपोर्ट कुठे, तर म्युनिक शहरापासून 32 किलोमीटरवरील बवारिया (Bavaria) शहरात. या एअरपोर्टवर दहशतवादी आणि ओलिस ठेवलेल्या इस्रायली खेळाडूंना या दोन हेलिकॉप्टरमधून घेऊन जायचे आणि तिथे नेल्यानंतर दहशतवाद्यांवर हल्ला करून ओलिसांची सुटका करायची… वाह..! किती बोगस प्लॅन…! रात्री 10 वाजून 20 मिनिटांनी क्रीडाग्रामजवळच्या हेलिपॅडवर जर्मनीने दोन हेलिकॉप्टर उतरवले. आठ दहशतवादी आणि नऊ ओलिसांना एका बसने हेलिपॅडपर्यंत आणण्यात आले. रात्री 10 वाजून 35 मिनिटांनी हे दोन्ही हेलिकॉप्टर फर्सटेनफेल्डब्रक (Fürstenfeldbruck) एअरपोर्टवर आधीच उभ्या असलेल्या 727 बोइंग विमानापासून 300 फुटांवर उतरले.

जर्मन सैनिकांचा हलगर्जीपणा

हेलिकॉप्टर एअरपोर्टवर उतरत असतानाच जर्मनांच्या नियोजनातल्या उणिवा उघड झाल्या. जर्मनांनी नियोजन आखताना विमानात आधीच आपले शस्त्रसज्ज सैनिक तैनात केले होते. म्हणजे जेव्हा दहशतवादी विमानात येतील तेव्हा जर्मन सैनिक त्यांच्यावर तुटून पडतील. हे नियोजन किमानपक्षी ठीक मानूया. मात्र, जेव्हा हेलिकॉप्टर लँड करण्यापूर्वी आकाशात घिरट्या घालत होतं, तेव्हा खाली उभ्या असलेल्या 727 बोइंग विमानातील तैनात असलेले 17 जर्मन सैनिक विमानाबाहेर आले. हा बावळटपणाचा कळस होता.. दहशतवाद्यांना लगेच लक्षात आलं, की इथं आपल्याला सैनिकांनी घेरलं आहे. दहशतवादी सावध झाले आणि त्यांनी कॅलिशनिकोव रायफलीतून जी फायरिंग केली त्यात ओलिस ठेवलेले सगळे इस्रायली खेळाडू मारले गेले. म्युनिक ऑलिम्पिकमधील हा नरसंहार क्रीडा इतिहासातला सर्वांत काळा अध्याय ठरला.
(संदर्भ ः वन डे इन सप्टेंबर लेखक ः सायमन रीव (One Day in September ः The Full Story of the 1972 Munich Olympics Massacre and the Israeli Revenge Operation “Wrath of God”- Simon Reeve))

म्युनिक ऑलिम्पिक
म्युनिक ऑलिम्पिक नरसंहार : ऑलिम्पिक क्रीडाग्राममध्ये दहशतवाद्यांना टिपण्यासाठी जर्मन सैनिक असे टेहळणी करीत होते. (Source : Google)

जर्मनचे शार्प शूटर सैनिक नावालाच होते. त्यांच्याकडे अशा मोहिमांचा ना अनुभव होता, ना प्रशिक्षण. बुलेटप्रूफ जॅकेट, शस्त्रेही अद्ययावत नव्हती. अगदीच नवशिके. गंमत म्हणजे, जिथे जर्मन सैनिक लपून बसलेले होते, नेमकी तिथंच या शार्प शूटर गोळ्या झाडत राहिले. नंतर कळलं, की आपल्या सैनिकांच्या दिशेनेच गोळ्या जाताहेत… एवढ्या अंदाधुंद गोळीबारीत फक्त एका दहशतवाद्याच्या पायाला गोळी लागू शकली. बंदुकीने कबुतरं उडवावीत तसे या सैनिकांचे नेम हवेतच गेले. त्यामुळे दहशतवाद्यांविरुद्धची मोहीम सपशेल फसली. अखेर तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात जर्मनांना यश आलं. मात्र, दहशतवाद्यांच्या हल्ल्यात एक पोलिस अधिकारी मारला गेलाच, शिवाय ओलिस ठेवलेले सर्व इस्रायली खेळाडूंचाही जीव घेतला. हा सगळा नरसंहार रात्री सुरू होता. नेमकी काय झालं, कुणालाही कळलं नाही. त्या वेळी जर्मनीचे शेकडो सुरक्षा कर्मचारी उपस्थित होते. मात्र, कोणीही ओलिसांची सुटका करू शकलं नाही. या घटनेनंतर जर्मनीची प्रचंड नाचक्की झाली.

ओलिसांच्या सुटकेची अफवा…

काय कोण जाणे, पण सगळीकडे अशी माहिती गेली की दहशतवाद्यांविरुद्धची मोहीम यशस्वी झाली आणि सर्व ओलिस ठेवलेल्या खेळाडूंना मुक्त करण्यात आले आहे… पंतप्रधान गोल्डा मीर यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचल्यानंतर त्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. त्यांनी शॅम्पेनची बोटलच उघडली. दुसऱ्या दिवशी सकाळी इस्राईलच्या यरुशलेम पोस्टमध्ये बातमी आली, की सर्व ओलिसांची सुटका… ओलिसांच्या नातेवाइकांनाही कळवण्यात आलं, की सर्वांची मुक्तता झाली, तेव्हा तेही आनंदाने नाचू लागले..

मोसादने सांगितली वस्तुस्थिती

हा सगळा गोंधळ इस्रायलची गुप्तहेर संघटना मोसादचा प्रमुख झ्वी जमीर (Zvi Zamir) यांनी पाहिली. त्यांनी लगेच गोल्डा मीर यांना फोन केला. जमीर यांनी शांतपणे सांगितलं, “मला ही माहिती देताना वाईट वाटतं, की आपला एकही खेळाडू वाचलेला नाही. मी जर्मनीच्या एअरपोर्टवरूनच बोलतोय.” हे ऐकूनच मीर यांचे हातपाय गळाले. त्यांच्या हातातून दूरध्वनीचा रीसिव्हर गळून पडला. काही मिनिटांतच टीव्हीवर माहिती आली… “नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार, एकूण 11 ओलिसांपैकी दोन जणांची इमारतीत, तर 9 जणांची एअरपोर्टवर हत्या झाली. कोणालाही वाचवता आलेलं नाही…”
(या घटनेच्या सहा वर्षांनी गोल्डा मीर यांचं निधन झालं…)

म्युनिकचा हा नरसंहार इस्रायलींसाठी मोठा धक्का होता. शोकसागरात बुडालेल्या इस्राईलने त्याच वेळी शपथ घेतली. यामागे असलेले मास्टरमाइंड जिथे कुठे लपले आहेत, त्यांना निवडून यमसदनी धाडले जाईल. ही जबाबदारी सोपवण्यात आली मोसादवर… त्यानंतर पुढची 20 वर्षे मोसादने बदला घेतला… तो कसा, वाचा दुसऱ्या भागात…

Follow us :

म्युनिक ऑलिम्पिक 1972

 

 

रॅथ ऑफ गॉड : मोसादच्या प्रतिशोधाची कहाणी

[jnews_block_9 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”77″]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!