पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू मोहम्मद हाफीज याने 3 जानेवारी 2022 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्याने क्रिकेटच्या प्रत्येक प्रारूपात पाकिस्तानच्या कर्णधारपदाची धुरा वाहिली आहे. मोहम्मद हाफीज याने सांगितले, की सुमारे दोन दशकांच्या आपल्या कारकिर्दीत मी अपेक्षेपेक्षा अधिक मिळवले आहे. या 41 वर्षीय खेळाडूने 2018 मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. हाफीजने पाकिस्तान संघाकडून खेळताना 392 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यात त्याच्या एकूण 12,789 धावा, तर 253 विकेट घेतल्या.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडे (पीसीबी) प्रतिक्रिया व्यक्त करताना मोहम्मद हाफीज म्हणाला, ‘‘गर्व आणि समाधानाने आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करीत आहे. वास्तविकपणे मी सुरुवातीला जितका विचार केला होता, त्यापेक्षा अधिक मिळवले आहे. त्यासाठी मी सर्व क्रिकेटपटू, कर्णधार, सहयोगी स्टाफ आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा आभारी आहे.’’
हाफीजने पाकिस्तान संघाकडून खेळताना 55 कसोटी, 218 वन-डे आणि 119 टी 20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने तीन वन-डे विश्व कप आणि सहा टी 20 विश्व कप स्पर्धांमध्ये पाकिस्तान संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. हाफीजने 2003 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध वन-डे सामन्याद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. नोव्हेंबरमधील टी 20 विश्व कप स्पर्धेतील उपांत्य सामना हा त्याचा अखेरचा सामना होता. यात पाकिस्तानला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.
पीसीबीचे अध्यक्ष रमीज राजा म्हणाले, ‘‘मोहम्मद हाफीज असा क्रिकेटपटू आहे, जो मनापासून खेळायचा. त्याने आपली कारकीर्द लांबलचक आणि यशस्वी करण्यासाठी जीवतोड मेहनत केली आहे.’’
हाफीजने निवृत्ती घेतली असली तरी व्यावसायिक स्पर्धांमध्ये तो खेळणार आहे. पाकिस्तान सुपर लीगच्या (पीएसएल) आगामी स्पर्धांत तो लाहोर कलंदर्स संघासाठी करारबद्ध आहे. अन्य फ्रँचायजी क्रिकेटसाठीही तो उपलब्ध असेल.
मोहम्मद हाफीजची कारकीर्द
महमुदुल्लाह याने घेतली कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती
Follow on Facebook page kheliyad
Follow on Twitter @kheliyad